Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग कोरोना नियंत्रण आणि मृत्यूचा बॅकलॉग

कोरोना नियंत्रण आणि मृत्यूचा बॅकलॉग

Related Story

- Advertisement -

अथक परिश्रमानंतर कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यात यश येताना आता दिसत आहे. राज्यात आता दहा हजारांच्या आसपास बाधितांचा आकडा येत आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याची जमेची बाजू. त्यातच मृत्यूदरही आता आटोक्यात आल्याचा दिसत आहे. मात्र बर्‍याचशा शहरांत मृत्यूचा दर हा कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव होता त्यापेक्षाही अधिक असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात मात्र मृत्यूची संख्या कमी असून गेल्या महिन्यात ज्या मृत्यूंची नोंदच सरकारी दफ्तरी झाली नाही किंवा जे मृत्यू लपवण्यात येत होते, त्याचा बॅकलॉग आता भरुन काढला जात आहे. प्रत्येक मृत्यूमागे मृत्यूचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. आरोग्य विभागाने आकडेवारीची लपवाछपव केली तरी मृत्यूच्या प्रमाणपत्रांच्या संख्येवरुन पितळ उघडे पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पूर्वीचे नोंद न केलेले मृत्यू आता नोंदवले जात आहेत. अर्थात, खासगी हॉस्पिटल्सचाही यात मोठा सहभाग आहे.

ज्यावेळी कोरोनाचा प्रभाव प्रचंड होता, त्यावेळी खासगी हॉस्पिटलमधील सर्वच कर्मचारी कमालीचे व्यस्त होते. त्या काळात रुग्णांचा जीव वाचवणे गरजेचे असल्याने मृत्यूंची सरकारी नोंद करण्यात थोडाफार हलगर्जीपणा झाला. पण ‘देर आये, दुरुस्त आये’. दुसर्‍या लाटेत वैद्यकीय व्यवस्थेसह प्रशासनाची प्रचंड दमछाक झाली खरी; पण विश्रांती घेण्यास उसंतच न देता आता तिसर्‍या लाटेसाठीही सज्जता बाळगण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात प्रशासनाला सूचना देत आवश्यक औषधे, उपकरणांचा साठा करुन ठेवण्याचे आदेशित केले आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसर्‍या लाटेत अतिशय कमी कालावधीत रुग्णसंख्या दुप्पट झाली.

- Advertisement -

नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटचाही धोका असल्याने तिसरी लाट आल्यास राज्यात रुग्णसंख्या परत दुपटीने वाढू शकते. त्यामुळे फाजील आत्मविश्वास बाळगण्यात अर्थ नाही. पहिल्या लाटेत १९ लाख रुग्ण होते. दुसर्‍या लाटेत ही संख्या ४० लाखांपेक्षा जास्त झाली. सक्रिय रुग्णांची संख्या ही ४० लाखांपेक्षा जास्त झाली होती. तिसर्‍या लाटेविषयीचा अभ्यास तर धडकी भरवणारा आहे. या लाटेत सक्रिय रुग्णांची संख्या ही ८ लाख होऊ शकते. तसेच संसर्गग्रस्त मुलांची संख्या१० टक्यांच्या आसपास असू शकते, असे आरोग्य विभागाचा अहवाल सांगतो. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर आणि सॅनिटायजरचा नियमित वापर या त्रिसूत्रीचा अजूनही तंतोतंत अवलंब करायला हवा. प्रत्यक्षात बाजारात फेरफटका मारला असता परिस्थिती सुन्न करणारी दिसते.

प्रत्येक लाटेत तेच ते नियम लावत गेलो तर कोरोना संसर्गामुळे जेवढे मृत्यू होतील, त्यापेक्षा अधिक मृत्यू हे बेरोजगारी, ताणतणाव, आर्थिक कोंडी यातून होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणूनच एखाद्या आव्हानात्मक योजना किंवा प्रकल्पासाठी ज्या पद्धतीने अत्यंत नियोजनबद्ध सर्वांगीण आराखडा तयार केला जातो, तसंच नियोजन कोरोनाबाबतही करण्याची गरज आहे. व्यापार्‍यांना त्यांच्या उत्पन्न मिळवण्याच्या हक्कापासून दूर ठेवता येणार नाही, हातावर पोट भरणार्‍यांचाही विचार करावा लागेल. कोरोनाचे निर्बंध लगेचच शिथिल करणे धोक्याचे असू शकते. त्यामुळे काही शहरांमध्ये वेळेच्या मर्यादा घालून देण्यात आलेल्या आहेत. या वेळेत सरसकट सर्वच्या सर्व आस्थापना सुरू असतात. मात्र, काही व्यवसाय असेही असतात, ज्यांचे ग्राहक हे ठराविक वेळेतच अधिक येत असतात. म्हणजे, आजही स्ट्रीट फूड्सची सर्वाधिक विक्री ही सायंकाळी ६ ते ९ या वेळेत होते. हेल्दी फूड्ससाठी सकाळी ८ ते १० ही वेळ चांगली मानली जाते. याच अनुषंगाने इंदूर शहरात उभा राहिलेला सराफा बाजार देशभरात प्रसिद्ध आहे.

- Advertisement -

मुंबईत ज्या नाईट लाईफची चर्चा चाललीय, ती संकल्पना इंदूरमध्ये पूर्वीपासूनच यशस्वी ठरत आली आहे. काहीअंशी अशीच व्यवसायानुसार वेळेची विभागणी केल्यास त्याचा ग्राहकांसह व्यावसायिकांनाही फायदा होईल. भाजीबाजार, दुग्धजन्य पदार्थ, मिठाईच्या दुकानांसाठी सकाळ आणि सायंकाळची वेळ, अत्यावश्यक सेवा पूर्ण वेळ, स्ट्रीट फूडसाठी सायंकाळची वेळ, सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत अन्य व्यवसाय ही संकल्पनादेखील प्रभावी ठरू शकते. यातून गर्दीची विभागणी होईल आणि संसर्गाची भीतीही कमी होईल. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबाबतही बेसावध राहून चालणार नाही. ही लाट येत्या सप्टेंबरमध्ये येईल आणि त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलंय. खरंतर, कोरोनाने सगळीच भाकीते आणि अंदाज उडवून लावले आहेत. अर्थात विषाची परीक्षा कुणी घेऊही नये. अंदाज वर्तवला तर तयारी ही करावीच लागणार आहे. प्रशासकीय पातळीवर ही तयारी होणे क्रमप्राप्तच आहे. परंतु जनजागृती आणि भीती यातील फरक आता शासनानेही समजून घ्यायला हवा. आधीच भीतीग्रस्त असलेल्या जनतेला पोटच्या गोळ्याची भीती दाखवली गेली तर त्यातून जागृती नव्हे नैराश्य बाहेर पडेल. परिणामी कोरोनापेक्षाही भयावह मानसिक आजारांशी सामना करावा लागू शकतो.

कोरोनाने देशात शिरकाव केला तेव्हा स्वाभाविकपणे ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे त्यावर सर्वप्रथम या विषाणूने हल्ला केला. कोणत्याही नवीन विषाणूच्या बाबतीत हाच सार्वत्रिक अनुभव असतो. विषाणूचा जेव्हा जम बसला तेव्हा त्याला दुसरी लाट संबोधले जाऊ लागले. आपल्या देशात वृद्धांपेक्षा तरुणांची संख्या ही अधिक आहे. पहिल्या लाटेत अनेक वृद्धांना बाधा झाली होती. त्यामुळे दुसर्‍या वेळी तरुणाईला या विषाणूने ग्रासले. याचे महत्वाचे कारण म्हणजे, घरातील वृद्ध व्यक्ती जेव्हा बाधित होत होत्या, तेव्हा तिची सुश्रूषा करण्यासाठी घरातील तरुण मंडळीच धावपळ करताना दिसत होती. रुग्णालयाचा शोध घेणे, ते मिळाल्यावर वारंवार तेथे जाणे, औषधे मिळवण्यासाठी बाहेर पडणे, ऑक्सिजन वा रेमडेसिवीर मिळवण्यासाठी ठिकठिकाणी खेटा मारणे हे आणि अशा असंख्य गोष्टींसाठी त्याला घराबाहेर पडावे लागले. विषाणूचा कहर जेथे जास्त होता त्या भागांशी त्याचा संपर्क आला आणि त्यातून तोही बाधित झाला. त्यामुळे ‘पॉझिटिव्ह’ तरुणांची संख्या वाढत गेली. अर्थात, दुसर्‍या लाटेत वयोवृद्ध व्यक्ती सहीसलामत सुटले, असेही नाही.

या लाटेत असंख्य वयोवृद्धांना प्राण गमवावे लागले. लहान मुलांच्या बाबतीत मात्र कोरोनाने काहीशी सबुरी घेतली. त्याचे श्रेय लहान मुलांनाच द्यावे लागेल. २४ तासांपैकी सुमारे १० ते १२ तास घराबाहेर राहणार्‍या बालकांनी समजुतीची भूमिका घेत गेल्या सव्वा वर्षात पूर्णवेळ घरात बसून राहणे पसंत केले. त्यामुळे त्यांना कोरोना विषाणूची बाधा कमी झालेली दिसते. शिवाय लहान मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने ज्यांना विषाणूची बाधा झाली त्यांच्यात सौम्य लक्षणे आढळली. लहान मुलांना कमी बाधा होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे ते रुग्णांच्या संपर्कात आले नाहीत. घराबाहेर पडण्याचे प्रमाण त्यांचे नगण्य असल्याने त्यांना कोरोना विषाणूचा धोका कसा वाढेल याचेही स्पष्टीकरण अद्याप कुणी दिलेले नाही. त्यातच आता तिसर्‍या लाटेच्या शक्यतेने दिवाळीपर्यंत शाळा उघडण्याची शक्यताही मावळली आहे. त्यामुळे शाळेतून कोरोनाचा प्रसार वाढू शकतो, असेही म्हणता येणार नाही. अशा या संकटकाळातून बाहेर आल्यानंतर आता राज्य आणि केंद्र सरकारनेही आरोग्य व्यवस्था कायमस्वरुपी सक्षम राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे प्रयत्न माकडाच्या घरासारखे असू नयेत, हीच अपेक्षा!

- Advertisement -