घरफिचर्समायमहानगर ब्लॉगराजा अभ्यासात आहे हुश्शार, पण...

राजा अभ्यासात आहे हुश्शार, पण…

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपची सुपारी घेतली आहे, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. राज ठाकरेंनी पन्नास हजार कार्यकर्त्यांसमोर हिंदुत्वाची आक्रमक पण आक्रस्ताळी वाटणारी भूमिका घेतली आणि त्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली. त्याचवेळी समाजातला एक खूप मोठा वर्ग जो या अनधिकृत भोंग्यांमुळे गेली अनेक वर्षे हैराण झाला होता. त्याला बाळासाहेब ठाकरेंनंतर आपला आवाज उचलणारा एक नेता सापडला होता. सुरुवातीला राज ठाकरे यांची थट्टा करणारा जो एक समुह सरकारमध्ये आहे त्यांनी थट्टामस्करी सुरू केली. मात्र राज ठाकरे यांना वाढता पाठिंबा मिळतो हे लक्षात येताच काही वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांनी मशिदीवरील भोंग्यांच्याबाबतीत ठोस भूमिका घ्यायला सुरुवात केली.

आमचा राजा अभ्यासात खूपच हुशार आहे. त्याचं हस्ताक्षर आणि पाठांतर तर विचारूच नका. त्याला कलांचीही आवड आहे, चाचणी परीक्षेत पण चांगले मार्क मिळतात. पण वार्षिक परीक्षेत त्याला काय होतं तेच कळत नाही अशी भावना व्यक्त करणारे अनेक पालक समाजात आपल्या अवतीभवती वावरत असतात. अशाच पालकांना अस्वस्थ करणार्‍या ‘राजा’चं प्रतिनिधीत्व महाराष्ट्राच्या राजकारणातला एक विद्यार्थी करतोय, राज श्रीकांत ठाकरे त्याचं नाव. पण हा विद्यार्थी आता नव्या अभ्यासानुसार मेरीटमध्ये येण्याचे संकेत आता मिळू लागलेले आहेत. कारण त्यानं प्रस्थापित ब्रॅण्डेड कोचिंग क्लासेस लावले आहेत…

बुधवारी दुपारी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या बरोबरच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बैठकीनंतर या विद्यार्थ्याचा उज्ज्वल यशाचा काळ सुरू झाल्याचे संकेतच मिळून गेले. राज्यभरातील मशिदींवर लागलेल्या अनधिकृत भोंग्यांच्या बाबतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या आपल्या जाहीर सभेत जोरदार तोफ डागली. संबंधितांना 3 मेचा अल्टिमेटम दिला. आणि त्यानंतर राज्यभरातून नव्हे तर देशभरातून राज ठाकरे यांच्या या नव्या भूमिकेला वाढता प्रतिसाद मिळत गेला. बुधवारी तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची बैठक बोलावली. ही बैठक बोलवेपर्यंत सामान्य नागरिकांपासून महत्वाच्या राजकीय नेत्यांपर्यंत एकच प्रश्न विचारला जात होता तो म्हणजे, ‘अकेला राज ठाकरे क्या करेगा ?’ बैठक संपली आणि स्वतः गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीच या प्रश्नाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.

- Advertisement -

मशिदींवर भोंगे लावणं किंवा ते उतरवणं हे सरकारचं काम नाही, असं सांगून गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, मात्र या बाबतीत एक धोरण बनवण्यासाठी आणि सांगोपांग चर्चा करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, मुस्लीम धर्मगुरू यांच्या बरोबरीनेच प्रमुख नेत्यांसह राज ठाकरे यांनादेखील बैठकीला निमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. इतकं काय मोठं याने होणार आहे असं कुणालाही वाटू शकेल. मात्र राजकीय विळ्या-भोपळ्याचे वैर असलेल्या पक्षाचे पक्षप्रमुख मुख्यमंत्रीपदावर बसलेले असताना सरकारने इतक्या संवेदनशील विषयावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांना बैठकीला बोलवून या गोष्टीतच ‘अकेला राज क्या करेगा ?’ या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. राज यांच्या गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत त्यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्याची भूमिका घेतल्यानंतर संपूर्ण देश ढवळून निघाला. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांमध्येदेखील हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने हनुमान चालीसा ऐकवली गेली.

दिल्लीमध्ये जहांगिरपुरीसारख्या भागात हनुमान जन्मोत्सव मिरवणुकीनंतर दोन गटात दंगल झाली. बुधवारी वर्षानुवर्षे ज्या दिल्लीतील जहांगिरपुरीच्या अनधिकृत बांधकामांवर पालिका प्रशासनाचा हातोडा पडला नव्हता तिथल्या कारवाईसाठी जेसीपी, डंपर तर पोहोचलेच पण ते चालवताना कोणत्याही धर्मीयांचा उद्रेक होऊ नये म्हणून चार हजार सुरक्षाकर्मींची कुमक तैनात करण्यात आली होती. अनधिकृत बांधकामांकडे पालिकेचे अधिकारी डोळे वर करून बघण्याचे धाडस करू शकत नव्हते त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. ही कारवाई गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असली तरी त्याची बीजं मात्र मुंबईत राज ठाकरेंनी रोवली हे त्यांच्या विरोधकांनाही नाकारता येणार नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले बोलघेवडे प्रवक्ते आणि माझं काहीही करा पण मला तुमची म्हणा असं सांगणारी काँग्रेसची नेतेमंडळी राज ठाकरेंवर तुटून पडत असताना दुसर्‍या बाजूला गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी चालवलेल्या धनुष्यबाणाच्या प्रत्यंचेने आपलं काम केलेलं होतं. राज ठाकरे यांच्या वाणीच्या धनुष्यबाणातून सुटलेल्या बाणाने घ्यायचा त्या लक्ष्याचा वेध घेतलेला होता.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी भाजपची सुपारी घेतली आहे असा आरोप त्यांच्यावर या सभेनंतर करण्यात आला. राज ठाकरेंनी पन्नास हजार कार्यकर्त्यांसमोर हिंदुत्वाची आक्रमक पण आक्रस्ताळी वाटणारी भूमिका घेतली आणि त्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली. त्याचवेळी समाजातला एक खूप मोठा वर्ग जो या अनधिकृत भोंग्यांमुळे गेली अनेक वर्षे हैराण झाला होता. त्याला बाळासाहेब ठाकरेंनंतर आपला आवाज उचलणारा एक नेता सापडला होता. सुरुवातीला राज ठाकरे यांची थट्टा करणारा जो एक समुह सरकारमध्ये आहे त्यांनी थट्टामस्करी सुरू केली. मात्र राज ठाकरे यांना वाढता पाठिंबा मिळतो हे लक्षात येताच काही वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांनी मशिदीवरील भोंग्यांच्याबाबतीत ठोस भूमिका घ्यायला सुरुवात केली. असं आपण समजू शकतो राजकीय सत्तेच्या विजनवासामुळे राज ठाकरे यांनी भाजपबरोबर लगट करण्याचा निर्णय घेतला असेलही.

मात्र याच भाजपकडून आपल्या ईडीच्या चौकशा, बेनामी मालमत्तांची प्रकरणं, अनैतिक विवाहबाह्य संबंधांची प्रकरण, केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांमधल्या कंपन्यांच्या एजन्सी, पेट्रोल पंपासारख्या गोष्टी लपूनछपून मिळवणार्‍या सर्वपक्षीय नेत्यांची राज्यात मुळीच कमतरता नाहीय. राज ठाकरे यांनी जाहीररीत्या भूमिका घेतली त्याला भाजपचा सुपारीबाज म्हणून ठरवताना या नेत्यांनी जरा आपल्या दिव्याखालचा अंधार तपासून पाहिला असता तर त्यांच्या पदरी निराशा आली नसती. राज ठाकरे यांच्याबरोबर युती न करताच शिवसेनेला अंगावर घ्यायचा कार्यक्रम मुंबईतल्या काही भाजपच्या नेत्यांनी येणार्‍या मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राबवायचं निश्चित केलं होतं. त्याचं कारण केंद्रात असलेली भक्कम सत्ता, विरोधकांचे काटे काढण्यासाठी केंद्रीय संस्थांचं मिळत असलेलं सहकार्य या सगळ्यामुळे मुंबई महाराष्ट्रातले भाजपचे काही नेते नाकाने कांदे सोलायला लागलेले आहेत.

अवघा एक आमदार असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गिनतीत धरायला ही नेते मंडळी तयार नाहीत. अशा अनेक बोलघेवड्या पोपटांना राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेला मिळालेल्या यशामुळे चर्चेच्या फेर्‍यांना बसायला भाग पाडलं आहे. तर दुसर्‍या बाजूला चंद्रकांत पाटलांसारख्या कोल्हापुरी नेत्याचा टांगा कोल्हापुरातच पलटी झाला असल्याने आता अनेकांची पोपटपंची बंद झाली आहे. अर्थात याला शिवसेनेचे काही मकाव मात्र अपवाद आहेत. एरवी राज यांच्या दिवाणखान्यात चोरवाटांनी पोचणारे हे शिवसेनेचे मकाव आपली रोज सकाळची न चुकणारी शीळ घालतानाही राज यांच्या नावाने ‘नवहिंदुत्ववादी ओवेसी’ म्हणून कंठशोष करून घेत आहेत. अर्थात यामुळे राज यांना विचलित होण्याची कोणतीच गरज नाही. कारण कोविडमुळे आणि त्यातही त्या आधी आपल्या राजकीय धरसोड वृत्तीमुळे अडगळीत पडलेले राज ठाकरे पुन्हा एकदा प्रकाशात तर आलेच आहेत. पण त्याच वेळेला त्यांनी माध्यमांपासून ते मध्यमवर्गीयांच्या घरात पुन्हा एकदा जुन्या सन्मानानेच प्रवेश मिळवला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मराठी माणसांनी निर्व्याज प्रेम केलं. शिवसेनाप्रमुखांनीही अनेक भूमिका स्वीकारल्या आणि बदललल्याही. तरीही या राज्यातल्या मराठी माणसानं बाळासाहेबांवर प्रेम करण्यामागचं एक प्रमुख कारण होतं, शिवसेनाप्रमुख आणि त्यांना मानणारा मराठीजन यांच्यामध्ये राजकीयपण थोरल्या ठाकरे यांनी कधी येऊ दिले नाही. ती गोष्ट त्यांचा सत्तेचा अधिकृत वारसदार असलेल्या उद्धव ठाकरे यांना मात्र जमलेली नाही. आणि त्यामुळेच शिवसेनेला सत्तेत असूनही बॅक सीटवर बसण्याची वेळ आली आहे. भविष्यात ही वेळ राज ठाकरे यांच्यावर येऊ नये असे जर त्यांना किंवा त्यांच्या समर्थकांना वाटत असेल तर राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या आंदोलनाबाबत मिळालेल्या यशानंतर आपल्या राजकीय धोरणांमध्ये प्रामाणिकपणा जपण्याची गरज आहे.

राजकीय समीकरणांसाठी बेरीज वजाबाकी करणं हे आता सगळ्यांनाच अपरिहार्य झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून फक्त राज ठाकरेंनाच ठोकणं हे चुकीचं आहे. बघायचं असेल तर राज यांच्या टीकाकारांनी थोडं शिवसेना आणि तिचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्थितीकडेही पहावं. बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. राज ठाकरे यांनीही मशिदीच्या भोंग्यांच्या बाबतीत मिळालेल्या यशामुळे हुरळून न जाता आता शक्य तितक्या नेटकेपणाने पक्षाची बांधणी करायला हवी. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी कुणाला 48 तास आधी तर कुणाला 24 तास आधी एबी फॉर्म देण्यात आले. याच गोष्टीमुळे पक्षाला काही ठिकाणी नक्कीच फटका बसला. आता हे टाळायचं असेल तर आगामी निवडणुका आणि राजकीय डावपेच यासाठी राज यांना वेळ काढून लक्ष द्यावं लागेल.

राज ठाकरे हे जितके मोठे मासलीडर आहेत तितकीच त्यांची कर्णेंद्रिये छोटी असल्याचं गेल्या काही काळातल्या घटनांवरून स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे योग्य सहकारी, त्यांचे अचूक आंदोलन आणि पक्षाची एकविचारी पद्धतीची वाटचाल याकडे आता राज यांना लक्ष द्यावं लागेल. वडिलांचे निर्णय चुकले की त्याचा फटका मुलांना कसा बसतो याची उदाहरणं राज यांच्या अवतीभवती आहेत. त्यांच्या जुन्या पक्षातल्या जुन्या सहकार्‍यांकडे राज यांनी पाहिलं तर या प्रश्नाची अधिक विस्तृत उत्तरं त्यांना मिळू शकतील हे टाळायचे असेल तर राज यांना आता एक नवा सूर सापडलेला आहे. त्यातून त्यांनी एक नवी दिशा पकडण्याची गरज आहे. ते करताना राज ठाकरे चुकले तर मात्र लेखाच्या सुरुवातीला म्हटलेल्या पालकांसारखी राज यांच्या चाहत्यांची आणि समर्थकांची इतकेच काय पण बाळासाहेबांचे मराठी किंवा हिंदुत्व ज्या नेत्यामध्ये डोकावल्याचे अनुभवायला मिळतं त्या नेत्याची राजकीय ट्रॅजेडी होऊ नये, अशीच मराठी आणि हिंदूंचीही अपेक्षा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -