घरफिचर्समायमहानगर ब्लॉगउष्णतेची लाट अन् वातावरणाचा अलर्ट !

उष्णतेची लाट अन् वातावरणाचा अलर्ट !

Subscribe

मुंबई आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा मोठा परिणाम दिसून आलेला आहे. याला कारण म्हणजे महाराष्ट्राच्या शेजारचे राज्य असलेले गुजरात. याठिकाणी सौराष्ट्र आणि कच्छ भागातून उष्णतेच्या लाटेचा थेट परिणाम हा महाराष्ट्रावर दिसून आला आहे. या भागातून येणार्‍या उष्ण वार्‍यांचा परिणाम हा महाराष्ट्रात कोकण, मुंबईतील तापमान वाढीस कारणीभूत ठरलेला आहे. प्रामुख्याने निरभ्र आकाश हेदेखील तापमानातील वाढीसाठी आणखी एक घटक ठरतो आहे. उष्णतेची सध्या आलेली लाट हा वातावरणाने आपल्याला दिलेला अलर्ट म्हणजे दक्षतेचा इशारा असतो. त्यामुळे निसर्ग काय सांगू इच्छितो याकडे आपल्या दुर्लक्ष करून चालणार नाही.

मुंबईसह महाराष्ट्रात अचानक वाढलेल्या तापमानामुळे वातावरणात मोठा बदल झालेला अनुभवायला मिळत आहे. वातावरणात अचानकपणे झालेली वाढ पाहता एकटा महाराष्ट्रच नव्हे तर पश्चिम भारतातील अनेक राज्यांना या उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत आहे, असेच दिसून येईल. पण या अचानक वाढलेल्या तापमानाला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा हा 35 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेला. तर अनेक भागात तापमानाच्या पार्‍याने चाळीशी ओलांडली आहे. मुंबईसारखे शहरदेखील यासाठी अपवाद नाही. मुंबईचाही पारा हा चाळीशीत पोहचला. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्याने हैराण केले आहे. त्यातून स्वत:ला वाचवण्यासाठी त्यांना विविध उपाय करावे लागत आहेत. या वर्षी मुंबईत थंडी जास्त पडली होती. त्या पाठोपाठ एकदम कडक उन्हाळा सोसावा लागत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दुपारच्या वेळी तर गाडीतून जाताना खिडकीतून हवेची झुळूक येणे दूरच, उष्णतेच्या झळा आत येतानाचा अनुभव येत असतो.

पश्चिम भारतात राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा याठिकाणी उष्ण वार्‍याने अनेक भागात आपला परिणाम दाखवायला सुरूवात केली आहे. तुलनेत उत्तर पश्चिम क्षेत्रातील राज्ये ही उष्णतेच्या लाटेतून वाचलेली आहेत. अनेक राज्यात उष्णतेच्या लाटेची झळ बसलेली नाही. त्यामुळे दिल्ली, पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांना उष्णतेच्या लाटेचा फटका बसलेला नाही. पण जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यासारख्या राज्यात तापमानात वाढ झालेली पहायला मिळाली आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमान हे 34 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचले आहे. धर्मशाला, मंडी, चंबा यासारख्या ठिकाणी तापमानात वाढ झालेली आहे.

- Advertisement -

प्रामुख्याने तापमान वाढीची कारणे समजून घेणे गरजेचे आहे. मार्च-एप्रिल-मे या महिन्यांमध्ये मार्च महिन्यात किमान तापमानाची नोंद होईल, असा अंदाज लावण्यात आला होता. त्यामध्ये उत्तर पश्चिम भारतातील अनेक भागात, पश्चिम तसेच मध्य भारतातील अनेक भागात, पूर्व तटीय क्षेत्र तसेच हिमालय यासारख्या भागात किमान तापमान सामान्य राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण पश्चिम भारतात मात्र सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झालेली पहायला मिळाली. हवामान विभागाला तापमानात वाढ होईल, असा प्राथमिक अंदाज होता. पण वाढलेल्या उष्णतेसाठी प्रामुख्याने एक वादळाचा परिणाम दिसून आलेला आहे. साधारणपणे मार्च महिन्याच्या सुरूवातीला वायुमंडलात वरच्या भागात ही स्थिती निर्माण होते, त्यामुळेच हवेचा पॅटर्नही बदलतो. मोठ्या प्रमाणात हवा खालील बाजूला ढकलली जाते. त्यामुळेच जमिनीवरील तापमानात वाढ झाल्याचे पहायला मिळते.

एखाद्या भागात किंवा प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव तेव्हाच जाणवतो जेव्हा कमाल तापमान हे 40 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक आकडा गाठते. सामान्यपणे डोंगराळ भागात कमाल तापमान हे 30 डिग्री सेल्सिअसवर पोहचते. तर किनारी भागात सरासरी 37 डिग्रीपर्यंत तापमान पोहचते. सामान्यपणे कमाल तापमान जेव्हा 4.5 डिग्री सेल्सिअस ते 6 डिग्री सेल्सिअसवर पोहचते, तेव्हा भारतीय हवामान विभागाकडून अशा स्थितीला उष्णलाट म्हणून घोषित केले जाते. जर एखाद्या भागाचे सरासरी कमाल तापमान जेव्हा 40 डिग्री सेल्सिअस असते, पण तापमान 45 डिग्री सेल्सिअस तापमान पोहचते तेव्हा ते क्षेत्र उष्णतेच्या लाटेमध्ये मोडते. सरासरीपेक्षा जेव्हा तापमान 6.4 डिग्री सेल्सिअस पोहचते तेव्हा अशा स्थितीला उष्णतेची लाट म्हणून संबोधले जाते. एखाद्या परिस्थितीत 45 डिग्री सेल्सिअस ते 47 डिग्री सेल्सिअस तापमान एखाद्या भागात पोहचते तेव्हा अशा स्थितीस भारतीय हवामान विभागाकडून उष्णतेची लाट म्हणून संबोधली जातेय.

- Advertisement -

मुंबई आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा मोठा परिणाम दिसून आलेला आहे. याला कारण म्हणजे महाराष्ट्राच्या शेजारचे राज्य असलेले गुजरात. याठिकाणी सौराष्ट्र आणि कच्छ भागातून उष्णतेच्या लाटेचा थेट परिणाम हा महाराष्ट्रावर दिसून आला आहे. या भागातून येणार्‍या उष्ण वार्‍यांचा परिणाम हा महाराष्ट्रात कोकण, मुंबईतील तापमान वाढीस कारणीभूत ठरलेला आहे. प्रामुख्याने निरभ्र आकाश हेदेखील तापमानातील वाढीसाठी आणखी एक घटक ठरतो आहे. साधारणपणे मार्च महिन्यात कोकणात 35 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाचा पारा चढतो. याआधीही मार्च महिन्यात 40 डिग्री तापमानावर पारा गेल्याची आकडेवारी 2021, 2019, 2018, 2015 आणि 2013 मध्ये आहे. आतापर्यंतचे मार्च महिन्यातील कमाल तापमानाची नोंद ही 28 मार्च 1956 रोजी 41.7 डिग्री सेल्सिअस इतकी झाली आहे.

भारतीय हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा कच्छ-सौराष्ट्र भागाला दिला आहे. त्यामुळे या काळात उष्ण तसेच कोरड्या वार्‍यांमुळे वातावरणातील उकाडा वाढणार हे नक्की आहे. त्याचा फटका हा महाराष्ट्रात मुंबईसह कोकणाला बसणार आहे. कमाल तापमान हेदेखील 38 डिग्री ते 40 डिग्रीपर्यंत जाण्याचे संकेत आहेत. आयएमडीने मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग यासारख्या राज्यांना यलो अलर्ट जाहीर केला आहे.

साधारणपणे सूर्याच्या प्रकाशाची तीव्रता ही मार्च महिन्यात उत्तर दिशेने व्हायला सुरूवात होते. हा प्रवास महाराष्ट्र ते ओरिसा असा असतो. मार्च ते मे अशा कालावधीत हा वातावरणातील बदल असतो. भारतीय हवामान विभागाने मार्च ते मे महिन्यासाठीचा अंदाज वर्तवला आहे. सरासरी तापमानाची नोंद या कालावधीत असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम तसेच मध्य भारतात सरासरीपेक्षा अधिक तापमानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पण उष्णतेच्या लाटेचा अंदाज हा दक्षिण गुजरात ते महाराष्ट्र आणि ओरिसा राज्यांसाठी वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आगामी काही दिवस हे महाराष्ट्रासाठी उष्णतेच्या लाटेच्या निमित्ताने महत्वाचे असे आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी मार्च महिन्यापासून उकाड्याला सुरूवात होते. यंदा उष्णतेच्या लाटेचा परिणाम उर्वरीत राज्यातही झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी एकीकडे उष्णतेच्या लाटेचे वातावरण आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाचेही वातावरण आहे. राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची नोंद ही गेल्या आठवड्याच्या अखेरीस झाली आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागात अतिशय वेगवेगळे पावसाचे तापमान यंदाच्या उकाड्याच्या निमित्ताने पहायला मिळते आहे. वातावरणात प्रत्यक्ष उकाडा जाणवत असला तरीही दुसरीकडे राज्यात वाढलेली विजेची मागणी हादेखील आणखी एक निकष हा उष्णता वाढीचा म्हणता येईल. महावितरणने गेल्याच आठवड्यात कमाल विजेच्या मागणीचा पुरवठा महाराष्ट्रात केला आहे. राज्यातील अनेक भागात एकीकडे उकाड्याचे वातावरण असतानाच विजेच्या उपकरणातही वाढ झाल्याचे चित्र महाराष्ट्रात आहे.

त्यामुळे यंदाचा उकाडा हा वर्षभरातील इतर ऋतुंप्रमाणे गाजणार हे नक्की आहे. त्यामुळे या कालावधी उष्माघाताचा धोका टाळणे हा खबरदारीचा उपाय असू शकतो. साधारणपणे योग्य पद्धतीने शरीरात पाण्याचे प्रमाण असणे हा प्राथमिक उपाय आहे. तर थेट उन्हातील संपर्क टाळणे हेदेखील हिताचे ठरू शकते. ज्या पद्धतीने पावसाळ्यासाठीचे नियोजन आणि उपाययोजना करणे ही स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्य सरकारची जबाबदारी आहे, त्याच पद्धतीने नव्याने येऊ घातलेल्या नैसर्गिक संकटांमध्ये उष्णतेच्या लाटेसारख्या आव्हानांचीही उपाययोजना करणे हे यापुढच्या काळातील आव्हान असणार आहे. पर्यावरणीय बदलांवर अनेक व्यासपीठांवर चर्चा होत असतानाच आता हे वातावरणातील बदल थेट आपल्या दारात येऊन पोहचले आहेत.

त्यामुळेच या बदलत्या वातावरणावर त्याच अनुषंगाने पूरक अशा उपाययोजना करणे हे राज्यातील पर्यावरणीय बदल विभागापुढे असणारे मोठे आव्हान आहे. ज्या पद्धतीने अतिवृष्टीसारख्या संकटात उपाययोजना करण्यात येतात, त्याच अनुषंगाने उष्णतेच्या लाटेसारख्या पर्यावरणीय बदलांना सामोरे जातानाही करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगानेच अशा वातावरणीय बदलांमध्ये होणार्‍या परिणामांचा फटका पाहता त्याअनुषंगानेही यंत्रणांची सज्जता ठेवणे गरजेचे आहे. कॅनडामध्ये उष्माघाताचा परिणाम हा नागरिकांच्या आरोग्यावर झाल्याचे परिणाम पहायला मिळाले होते. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरातसारखी राज्येही याला अपवाद नाहीत. त्यामुळे अतिवृष्टीसारखे संकटही आपल्याला झेलावे लागत आहे, त्यासारखेच उष्णतेची लाट यासारख्या पर्यावरणीय बदलांसाठीही आपण सज्ज रहायला हवे, हे काळाचे आव्हान असणार आहे. कारण अलीकडच्या वातावरणाचे अवलोकन केले तर असे दिसेल की, पावसाळा, हिंवाळा आणि उन्हाळा या सगळ्यांचीच तीव्रता अचानक वाढत आहे. त्याचा अकल्पित फटका आपल्याला बसत असतो.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -