घरफिचर्समायमहानगर ब्लॉगअभ्यास सोडून भविष्य पणाला लावण्याचा घातक अट्टाहास...

अभ्यास सोडून भविष्य पणाला लावण्याचा घातक अट्टाहास…

Subscribe

मुळात शिक्षण घेत असताना अभ्यास सोडून आपले भविष्यसुध्दा पणाला लावायला तयार होण्याइतकी टोकाची धार्मिक कट्टरता कोण भरवत असावं या विद्यार्थ्यांच्या डोक्यात? भारताच्या राजकारणाची ओळख ठरलेत धार्मिक मुद्दे. आजच्या धार्मिक वादाची बीजे पेरणारे आपले राजकीय पक्षच आहेत. कारण त्यांना माहिती आहे भारतीय माणसं जाती धर्माच्या नावाने वेडी होतात. त्यांचा विवेक हरवतो, माणुसकी विरते, संवेदना बोथट होतात, उरतो तो फक्त धर्म! आपल्या गलिच्छ राजकारणासाठी विद्यार्थ्यांना धर्माचे आमिष दाखवून कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे वापरलं जात असताना याची जराही जाणीव या पोरांना असू नये ही शोकांतिका आहे.

देश सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशाचं भविष्य मात्र चुकीच्या मार्गावर जाताना दिसतंय. देशाचं भविष्य हे शाळांच्या, कॉलेजच्या चार भिंतींमध्ये तयार होत असतं. मात्र, याला कुठे तरी गालबोट लागताना दिसत आहे. कर्नाटकमध्ये सुरू असलेला हिजाब प्रकरण असेल किंवा मुंबईत विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी केलेलं आंदोलन. बरं हे आंदोलन केलं कोणाच्या सांगण्यावरुन?…तर सोशल मीडियावर शिवराळ भाषेत व्हिडीओ करणार्‍या टुकार हिंदुस्थानी भाऊ नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरुन हे विद्यार्थी रस्त्यावर उतरतात हे अत्यंत दुर्दैवी आहे.

महाराष्ट्रासह देशातील तरुणांचं आजवर बर्‍याच भाऊ, अण्णा, अप्पा, दादा आणि साहेबांनी नुकसान केलं आहे. त्यांच्या यादीत शोभावा, असा हा फुटकळ कोणी ‘हिंदुस्थानी भाऊ’ नावाचा उपटसुंभ सध्या धुमाकूळ घालतोय. कर्मवीर भाऊराव ते हिंदुस्थानी भाऊ हा महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा झालेला खेळखंडोबा आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये. कोरोनामुळे शाळा, कॉलेज बंद होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू होतं. दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेणार असल्याची घोषणा झाली. त्यानंतर शिवराळ भाषेत व्हिडीओ करणारा हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनानंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरतात. ही परीक्षा ऑफलाईन नको तर ऑनलाईन घ्यावी यासाठी विद्यार्थी राज्यात प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर उतरले. ऑफलाईन नको ऑनलाईन परीक्षा घ्या, हिंदुस्थानी भाऊ जिंदाबाद!… राज्य सरकार… अशा घोषणा देत हजारो विध्यार्थी रस्त्यावर उतरले.

- Advertisement -

दहावी, बारावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. या परीक्षा ऑफलाईनच व्हायला हव्यात. मुलांना लिहिण्याची सवय नसेल तर वेळ वाढवताही येते. शिवाय, हल्ली रोज एकच पेपर होतो. पण प्रत्यक्ष परीक्षा का नको असते, याचे गुपित सार्‍यांना माहीत आहे. तारुण्याची सुरुवात अशी करण्यात आपलं हित नाही, हे मुलांनी आणि पालकांनी समजून घ्यायला हवं. कोणत्याही देशाचे भविष्य हे नेहमी तिथल्या तरुणांच्या हातात असते. विचारांनी प्रगल्भ, आणि उत्साहाने परिपूर्ण असे हे तरुण ज्या दिशेने काम करतात त्याच दिशेने देशाची वाटचाल होत असते. मात्र गेली दोन वर्ष कोरोनामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या हातात स्मार्टफोन आले आहेत.

यामुळेच युवा वर्ग भरकटला आहे. सोशल मीडियावर शिवराळ भाषेत व्हिडीओ करणारे मुलांचे आदर्श बनलेत. ज्या समाजातील तरुणाईचे आदर्श ‘हिंदुस्थानी भाऊ’ किंवा ‘थेरगावची क्वीन’ किंवा असेच कुणीतरी आहेत, अशा समाजाने आपल्या सामाजिकतेचे नीट मूल्यमापन करणं गरजेचं आहे. मुळात, आपल्यासमोर आदर्शच नाहीत की आपली झापडं अधिक मजबूत आहेत याचा विचारही यानिमित्ताने करायला हवा. अर्थात, मूर्खपणाला सीमा नसते हे जरी मर्यादित अर्थाने खरे असले तरीही अशा मूर्खपणाचे नग्न उदात्तीकरण होत असेल तर निश्चितच ‘समाज’ म्हणून आपले भविष्य धोक्यात आहे. हा धोका टाळण्यासाठी वेळीच आपले खरे आदर्श आपणास ओळखावे लागतील.

- Advertisement -

एकीकडे चुकीच्या लोकांना आदर्श मानून रस्त्यावर उतरतात, तर दुसरीकडे धार्मिकवाद शाळांमध्ये पोहोचला आहे. शिकण्याच्या वयात विद्यार्थ्यांमध्ये धर्माच्या नावाखाली असंतोष निर्माण केला जातोय. कर्नाटकमध्ये सध्या हिजाबवरुन वातावरण तापलं आहे. जानेवारीमध्ये उडुपी येथील सरकारी पीयू कॉलेजमध्ये 6 मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यापासून रोखण्यात आलं. आणि त्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं. मुस्लीम विद्यार्थीनींनी ‘हिजाब’ परिधान केल्यामुळे काही हिंदू विद्यार्थ्यांनी देखील गळ्यात भगवी शाल आणि भगवी टोपी घालून कॉलेजला आले, त्यामुळे प्रकरण अधिक चिघळून धार्मिक वादाला सुरुवात झाली आहे.

या घटनेचे पडसाद कर्नाटकाच्या सर्वच जिल्ह्यात उमटले. शिमोगा येथील महाविद्यालयातील तिरंगा ध्वज अभाविपच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी उतरवून त्याजागी भगवा ध्वज फडकविला. तिरंगा उतरवून तिथे भगवा फडकवण्यापर्यंत विद्यार्थ्यांची हिंमत होते. धर्माचा झेंडा तिरंग्यापेक्षा मोठा हे या विद्यार्थ्यांच्या मनात भरवलं कोणी? विद्यार्थ्यांना एवढं विखारी बनवणं हे देशासाठी, समाजासाठी घातक आहे.

दरम्यान, एक मुलगी कॉलेजमध्ये येताच काही मुलं जी भगवी उपरणं खाद्यांवर घेतलेली असतात, ते तिच्या मागे धावत येत जय श्रीरामच्या घोषणा देतात. ती मुलगी देखील अल्ला हू अकबरच्या घोषणा देते. हे नेमकं चाललं काय आहे? बरं एवढंच नव्हे तर मुस्लीम मौलाना त्या मुलीला बक्षीस काय जाहीर करतात, ‘पहले हिजाब, फिर किताब’ ची घोषणा येते, कर्नाटक भाजप हिजाबला अधिकृत विरोध करते, असं असताना काही पुरोगामी लगेच हिजाबधारी बालिकेला आयकॉन वगैरे बनवून तिचे पेंटिंग शेअर करतात आणि हिजाबला समर्थन देण्यात धन्यता मानतात…मुळात या प्रकरणावर वरवर भाष्य करुन चालणार नाही. हा विषय खूप संवेदनशील आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. कायद्यासमोरची समानता हे तत्व लक्षात घेता, शाळा-महाविद्यालयात होणारे गणेशोत्सव, सत्यनारायण पूजा, ख्रिसमस सेलिब्रेशन सगळं काही थांबायला हवं, शाळा-महाविद्यालयात धर्मकारण नकोच, तिथे अध्ययन आणि अध्यापनावर लक्ष केंद्रित करायला हवे.

संविधानाने आपल्याला आपल्या आवडीचे कपडे घालण्याचा हक्क असल्याचं या प्रकरणी काही विद्यार्थ्यांनी म्हटलंय. भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांबद्दल माहिती दिली आहे. याचा साधा अर्थ असा की भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीचा धर्म निवडण्याची मुभा आहे. तसंच त्या धर्माप्रमाणे आचार, प्रचार, उपासना करण्याचा अधिकार आहे. सर्व धर्म समान असून भारत देशाचा एक विशिष्ट असा धर्म असणार नाही, याचा पुनरुच्चार या कलमांमध्ये केला आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिजाब वा बुरखा हे अप्रगत समाजाचं लक्षण आहे असं म्हटलं होतं.

मुस्लीम समाजात सुधारणा होण्याची अत्यंत गरज असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’मधलं त्यांचं हे विधान आहे. त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे असं म्हणायचं, आणि न्यायालयाने शाळेत हिजाब वापरू नये असा निकाल दिला तर तो मानणार नाही असं म्हणायचं. म्हणजे एकाबाजूला तुम्ही संविधानाचा आधार घेणार आणि दुसर्‍या बाजूला तुम्ही न्यायालयाचा निकाल नाकारू, असंही म्हणताय. हे म्हणजे अत्यंत धर्मवादी, अप्रगत व्यवस्थेचे अवशेष जपण्याचा अट्टाहास आहे, जो दुर्दैवी आहे.

गेल्या वर्षी आपण अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचा सुरू असलेला नरसंहार पाहून जे धार्मिक कट्टरतेने ग्रासले आहेत त्यांनी यातून बोध घ्यायला हवा. धार्मिक कट्टरता, प्रखर राष्ट्रवाद या एकप्रकारच्या महामारी आहेत. कोणत्याही राष्ट्रात राष्ट्राऐवजी धर्माला प्रथम स्थान देऊन जिथे धार्मिक कट्टरता तयार केली जाते तिथे त्या राष्ट्राची अधोगती निश्चित असते. राष्ट्राचं भविष्य हे युवा वर्ग आहे. तो युवा वर्ग चुकीच्या मार्गावर, चुकीच्या व्यक्तींना आदर्श तर मानत नाही ना! यावर त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी, समाजातील लोकांनी लक्ष ठेवायला हवं.

मुळात शिक्षण घेत असताना अभ्यास सोडून आपले भविष्यसुध्दा पणाला लावायला तयार होण्याइतकी टोकाची धार्मिक कट्टरता कोण भरवत असावं या विद्यार्थ्यांच्या डोक्यात? भारताच्या राजकारणाची ओळख ठरलेत धार्मिक मुद्दे. आजच्या धार्मिक वादाची बीजे पेरणारे आपले राजकीय पक्षच आहेत. कारण त्यांना माहिती आहे भारतीय माणसं जाती धर्माच्या नावाने वेडी होतात. त्यांचा विवेक हरवतो, माणुसकी विरते, संवेदना बोथट होतात, उरतो तो फक्त धर्म! आपल्या गलिच्छ राजकारणासाठी विद्यार्थ्यांना धर्माचे आमिष दाखवून कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे वापरलं जात असताना याची जराही जाणीव या पोरांना असू नये ही शोकांतिका आहे.

आपलं भविष्य घडविण्याच्या वयात मुस्लीम हिजाबसाठी अडून बसतात तर हिंदू भगव्यासाठी हिंसक होतात. अरे काय चाललंय काय हे? बेरोजगारांची संख्या भरमसाठ आहे, अजूनही आपण मूलभूत सुविधांसाठीच लढतोय. असंख्य गंभीर समस्या असताना देशातील चुकीच्या धोरणांविरुद्ध आवाज उठविण्याची अपेक्षा ज्यांच्याकडून आहे ती पिढी धर्माच्या चक्रव्यूहात अडकत चाललीय. हे असंच चालत राहिलं तर पुढे होणारी हिंसा भयंकर असेल. उद्याचा भारत कसा असेल या विचाराने पोटात गोळा येतो. धर्मनिरपेक्षता फक्त कागदोपत्री उरते की काय अशी भीती वाटल्यावाचून राहत नाही. या विद्यार्थ्यांनी धर्मापेक्षा शिक्षणाला महत्व द्यावं नाहीतर सआदत मंटो म्हणतात, त्याप्रमाणे मजहब जब दिलों से निकलकर दिमाग पर चढ जाए तो जहर बन जाता हैं!

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -