उठती है हर निगाह खरीदार की तरह…

मजरुह सुलतानपुरींनी १९७० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दस्तक’ चित्रपटासाठी एक गझल लिहिली होती. ‘हम है मताए कुचा ओ बाजार की तरह...उठती है हर निगाह खरीदार की तरह’...असे याचे शब्द होते. संविधानाने बहाल केलेले माणसांचे नागरिकत्व काही सांप्रदायिक झुंडींनी विकत घेतल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. माणसांची मते, माणूसपण आणि त्यांची अभिव्यक्ती कुणालाही विकत घेता येणार नाही, त्यासाठी जबरदस्तीही करता येणार नाही. एका माणसाने कसे जगावे हे सांगणारा दुसरा माणूस जाणीवपूर्वक निर्माण केला जात आहे. त्यासाठी माणसांमध्ये पराकोटीचा विद्वेष पेरला जात आहे. हा विद्वेष संविधानातील नागरिक आणि माणूस म्हणून असलेल्या अधिकारांच्या थेट विरोधातील आहे.

कर्नाटकातील हिजाब, स्कार्फचा वाद असो किंवा लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी शहारुखने केलेल्या ‘दुआ’नंतर निर्माण झालेले वावदान असो किंवा लता मंगेशकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गीते का गायली नाहीत? याची विद्वेषी विचारणा करणारे समाजमाध्यमांवरील कथित आंबेडकरी असोत, विद्वेषाची पेरणी आंबेडकरवादाचा पाया कधीही नव्हती तसेच विद्वेषी विचाराला भारताच्या संविधानात कुठेही स्थान नाही, अशा विद्वेषाला तथागतांच्या मानवतावादी विचारांमध्येही जागा नाही.

भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्यावर दोन गोष्टी प्रकर्षाने पुढे आल्या. पहिली ही की आपण अजूनही व्यक्ती त्यांचे विचार, ते विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आणि त्यांची कला, त्यातून मिळणारा नितळ आनंद या दोन्ही गोष्टींची सरमिसळ करण्यात वाकबगार आहोत. लता मंगेशकर यांनी त्यांच्या गायन कारकिर्दीत हजारो गाणी गायली, त्यात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदर्भ असलेले किंवा त्यांच्यावर आधारित गाणे गायलेले नाही, असा आक्षेप घेणारे कथिक आंबेडकरवादी एका बाजूला होते. तर दुसर्‍या बाजूला त्यांना विरोध करणारे प्रतिगामी म्हणवून घेणारे होते. या दोन्ही गटांकडून समाजमाध्यमांवर द्वेषाचे जे दर्शन केले जात होते, त्यावरून आपण माणूस म्हणवून घेण्यासाठी अद्याप पुरेसे लायकच नसल्याचे स्पष्ट व्हावे, मत व्यक्त करणे, टीका करणे आणि तिरस्कार, द्वेष करताना कथित आंबेडकरवाद्यांनी बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या शिकवणी आणि विचारांचा केलेला पराभव, अवमान हा लता मंगेशकर यांनी बाबासाहेबांचे गाणे न गाता केलेल्या कथित अवमानापेक्षाही जास्त टोकदार, वेदना देणारा आहे.

लता मंगेशकर यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील आणि भारतीय गायनकलेतील योगदान वादातीत आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला राजकीय आणि सामाजिक भूमिका असते, संविधानाने दिलेल्या अधिकारातून आपल्याला स्वतःचे मत असू शकते, लता मंगेशकर यांच्याही व्यक्तीगत मतस्वातंत्र्याचा आदर करणे हे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला अभिप्रेत आहे. लता मंगेशकर यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका प्रस्थापित विचारसरणीच्या बाजूने होत्या हे स्पष्टच आहे. मात्र त्यांनी कधीही त्यांच्या भूमिका बदलल्या नाहीत किंवा नाकारल्या नाहीत, त्या त्यांच्या मतांशी प्रामाणिक होत्या, या प्रामाणिकतेबद्दल शंका नसावी, हे समजून घेता त्यांना झालेले ट्रोलिंग हे तिरस्कार आणि द्वेषातून झाल्याचे स्पष्ट आहे. लता मंगेशकर यांच्याविषयी कथित आंबेडकरवाद्यांकडून नाराजी व्यक्त झाली असती तर तेही समजून घेता आले असते, मात्र ज्या पद्धतीने लता मंगेशकर यांच्याविषयी व्यक्त झालेल्या काही कथितांच्या द्वेषाला बाबासाहेबांच्या चळवळीत कधीही स्थान नव्हते आणि नाही. लता मंगेशकर यांनी बाबासाहेबांची गाणी न गाण्याच्या मुद्यापेक्षा हा द्वेष चिंताजनक आणि धोकादायक आहे.

डॉ.आंबेडकर आणि गांधीजी यांच्यात अनेक विषयांवर राजकीय आणि सामाजिक मतभेद होते, मात्र बाबासाहेबांनी कधीही गांधीजींचा द्वेष केल्याचे उदाहरण नाही, असेच मतभेद बाबासाहेबांचे तत्कालीन इतर नेत्यांसोबतही होते. मात्र बाबासाहेबांच्या मतभेदात द्वेषाला स्थान नव्हते. टोकाचे मतभेद असतानाही आणि या मतभेदाचे राजकीय तसेच सामाजिक परिणामही दूरगामी असतानाही बाबासाहेब गांधीजींचा द्वेष करणारे नसतील तर लता मंगेशकर यांनी बाबासाहेबांवरील गाणे गाण्याचा मुद्यावरून त्यांना ट्रोल करणे हे सूज्ञ आंबेडकरवादाचे लक्षण नसावे आणि तेही ज्यावेळी लता मंगेशकर या जगात देहरुपाने नाहीत त्या वेळी असा द्वेष व्यक्त करणे हे विवेक, विचार, तारतम्य सारेच काही मोडीत काढणारे आहे. हे संवेदनशील माणूस असल्याचे लक्षण खचितच नाही. लता मंगेशकर यांनी पंडित नेहरु आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची महती असलेली गाणीही गायलेली नाहीत, हे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलेले मत कथित आंबेडकरवाद्यांचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी पुरेशी आहे. डॉ. आंबेडकरांची इतर महनीय व्यक्तींसोबत प्रत्येक वेळेस तुलना करणे अप्रस्तुत असावे.

प्रत्येकाचे कार्यक्षेत्र वेगळे असावे, त्यामुळे त्यांचे संंबंधित क्षेत्रातील योगदान ध्यानात घ्यावे, क्षेत्रांची तुलना आणि हे असेच का झाले नाही?, ते तसेच का नव्हते ?, ते तसेच का व्यक्त झाले नाहीत?, त्यांनी असेच का केले नाही ? अशी इतर व्यक्तींवर आपली मते लादली जाऊ नयेत. त्यांनी बाबासाहेबांची महती अधोरेखित करणार्‍या गाण्यांना आपला स्वर दिला नसेलही किंबहुना दिला नाहीच… मात्र त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांविरोधातही कधी जाहीर भूमिका घेतलेली नाही, त्यांनी त्यांची कलेसाठी त्यांना आवश्यक वाटणारी तटस्थता जपली असताना कथित आंबेडकरवाद्यांनी लता मंगेशकरांना या मुद्यावर ट्रोल करणे हे वैचारिक चुकलेपणाचे लक्षण आहे. भीमगीतांनी बाबासाहेबांच्या चळवळीला खडा आवाज देण्याचे काम आजवर केले आहे. लता मंगेशकर यांना ट्रोल करताना नकळत याआधी भीमगीते गाणारे शाहीर किंवा लोककलावंत यांनी त्यांच्या गायनकलेला पूर्ण न्याय दिला नाही, केवळ मंगेशकरांच्या आवाजाने ही चळवळ संपूर्ण झाली असती का, असा भ्रम निर्माण व्हावा.

आंबेडकरी चळवळीतील डफावरील कवनं, छक्कड, गाणी, कवनं, पदं आदी लोककलावंतांनी घराघरात पोहचवल्याचा इतिहास आहे. या गाण्यांची हीच गरज आहे. वातानुकूलित रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये ही गाणी त्याच्या व्यावसायिक मूल्यांमुळे पोहचली, हे स्पष्ट आहे. म्हणूनच लता मंगेशकर आणि कडूबाई खरात यांच्यातील तुलना अप्रस्तुत आहे. कडूबाई खरात यांना घर मिळावे म्हणून काँग्रेसने प्रयत्न केल्यावर त्यांना ट्रोल करणारेही कथित आंबेडकरीच होते, ही गोष्ट इथे अधोरेखित व्हावी. कडूबाई खरात किंवा लता मंगेशकर या दोन्ही कलावंतांना कथित आंबेडकरवाद्यांनी आंबेडकरी चळवळीशी निष्ठेविषयीचे प्रमाणपत्र मागणे म्हणूनच अप्रस्तुत आहे. त्यांची कला, कलेविषयीचा व्यावसायिक दृष्टिकोन आणि व्यक्ती म्हणून मते वेगवेगळी असू शकतात, त्यावरील सहमती आवश्यक नाही, त्यामुळे त्यांच्या मतांचा आदर झाला नाही तरीही हरकत नाही, मात्र अश्लाघ्य भाषेतील ट्रोलिंग हा पर्याय होऊच शकत नाही.

प्रल्हाद शिंदे किंवा आनंद शिंदे यांनीही भक्ती, देवदेवतांची सांप्रदायिक गाणी गायली आहेतच, शिंदे कुटुंबाच्या शिंदेशाहीचा अभिमान व्यक्त होताना आंबेडकरी समुदाय कधीही संकुचित झालेला नव्हता. त्यामुळे केवळ लता मंगेशकर यांच्याबाबत कथित आंबेडकरवाद्यांकडून समाजमाध्यमांवर व्यक्त झालेला संकुचितपण निश्चितच समर्थनीय नाही. केवळ गाणे गायल्याने किंवा कलाप्रकार सादर केल्याने कोणी आंबेडकरी विचारांचा असावा किंवा नसावा, कितपत असावा, कसा असावा याचे मापदंड ठरत नाहीत. लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहताना अभिनेता शहारुख खान याने ‘दुआ‘ मागितली आणि फुंकर घातली. त्यानंतरही त्याचे ट्रोलिंग झाले. लता मंगेशकरांना झालेले ट्रोलिंग आणि शहारुख खानला झालेले ट्रोलिंग या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या वाटत असल्या तरी त्यामागील ‘द्वेष’सूत्र सारखेच आहे. ‘द्वेषां’ना वेगवेगळे रंग देण्याचा प्रकार देशात सध्या सुरू आहे.

लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करताना शहारुख हा त्याच्या ‘खान’ पणामुळे ‘असाच’ वागला असणार हे गृहितक एका विशिष्ट समुदायाविषयी असलेल्या द्वेषातूनच या देशात पोसले गेलेले आहे. या गृहितकातील द्वेषातून निर्माण झालेल्या आगडोंबावरच स्वातंत्र्यापासून आजपर्यंत देशात राजकीय पोळी भाजली गेलेली आहे. या पोसलेल्या द्वेषातून दोन्हीकडून केवळ आणि केवळ दुसर्‍यांच्या अभिव्यक्तीचा आदर न करणर्‍या कडव्या सनातनी प्रवृत्तींचेच फावले हे स्पष्ट आहे. कर्नाटकातील स्कार्फ किंवा हिजाब वादसुद्धा राजकीय उद्दीष्टाने प्रेरित आहे. या ठिकाणीही दुराग्रह आहे. आम्ही सांगू तेच खरे, तसेच वागावे, तेच व्हावे, अन्यथा… अशा धमक्या आहेत. संविधानात व्यक्तीच्या मतांचा आदर आहे. कायद्याचे पालन आहे. परंतु दुराग्रहाला जागा नाही. ‘मी तुझ्या मताचा नसेनही, परंतु तुझे मत मांडण्याचा अधिकार अबाधित राहावा यासाठी मी प्राणपणाने लढेन’ हे वाक्य तत्ववेत्ता व्हॉल्टेअरचे असल्याचे सांगितले जाते.

नागरिक म्हणवल्या जाणार्‍या व्यक्तीच्या मतांचा आदर लोकशाहीचा प्राण असावा, त्यामुळेच कुणी कोणत्या गाण्याला स्वर द्यावा, कोणत्या गाण्याला आवाज देऊ नये, सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत, अलंकार परिधान करावेत किंवा करू नयेत, हा त्यांचा नागरिक म्हणून अधिकार असावा, नागरिक म्हणून त्याचे पालन व्हावे, सूज्ञ आंबेडकरी समुदायाकडून ही अपेक्षा इतरांच्या तुलनेत अधिक असते, त्यामागे त्यांच्या सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीच्या इतिहासाला दिलेल्या सम्यक दिशेचे भान आहे. कडवेपणा, कट्टरतावाद, हिंसा, द्वेषभावनेतून गल्लत होऊन भरकटलेल्यांना संविधानिक आणि सूज्ञ माणूसपणाच्या मार्गावर आणण्याचे काम बाबासाहेब आणि बुद्धांच्या सम्यक मार्गावर असलेल्यांनी कायम केलेले आहे. या मार्गावरून आंबेडकरवाद्यांनी स्वतः भरकटणे एकूणच मानवतावादी चळवळीला मारक आहे.