घरफिचर्समायमहानगर ब्लॉगहिंदी...भाषा आणि दशा

हिंदी…भाषा आणि दशा

Subscribe

बोली, ग्रामीण किंवा काळाच्या ओघात शब्दार्थ बदललेल्या भाषांवर बदलत्या संस्कृतीचे सातत्याने आक्रमण होत असते. मराठीचा विचार केल्यास सत्तर ऐंशीच्या दशकात ग्रामीण बोली भाषा असलेल्या तमाशा किंवा वगनाट्याचा परिणाम असलेल्या भाषेचा मराठी चित्रपटांवर परिणाम होता, आज हा परिणाम तेवढा उरलेला नाही. त्यामुळेच देशाच्या कागदोपत्री व्यवहाराची भाषा कोणती असायला हवी? या प्रश्नाला अमित शहांचे उत्तर हिंदी हे असेल तर राज्यातील स्थानिक भाषाव्यवहारांचे काय करावे ? त्या ठिकाणी प्रांतरचनेची स्थानिक भाषा कितपत मर्यादेत ठेवावी, हा प्रश्न आहे.

हिंदी देशाची भाषा व्हावी या अमित शहा यांच्या वक्तव्यावर दक्षिणेकडील राज्यांतून टीकेची तीव्र झोड उठवली जात आहे. देशाची एक भाषा असायला हवी, याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, ती हिंदीच असायला हवी किंवा इतर कोणते पर्याय त्यासाठी खुले असायला हवेत यावर विचार व्हायला हवा. देशातील सर्व भागात हिंदी बोलली जात असली तरी स्थानिक भाषांच्या तुलनेत त्याचे प्रमाण कमीच आहे. हिंदी भाषेतही अनेक स्थानिक भाषांची सरमिसळ झाली आहे. मुंबईतील हिंदी, हैदराबादमधील हिंदी, विदर्भ किंवा मराठवाड्यात बोलली जाणारी हिंदी यात केवळ फरक नसून स्थानिक भाषेतील अनेक पर्यायी शब्द हिंदीने आपलेसे केले आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी हिंदी आणि उर्दूचे शिवाय ज्याला अस्सल बंबय्या हिंदी म्हटले जाते त्याचीही सरमिसळ झाली आहे. त्यातून नवीच हिंदी भाषा समोर आली आहे.

हिंदी किंवा मराठी तसेच भाषावार प्रांतरचनेतील स्थानिक भाषांमध्ये हिंदीवाचून अडत नाही. लिपी, ऐकणे आणि बोलणे ही तीन भाषेच्या अभिव्यक्तीची माध्यमे मानली जातात. केवळ संकेताच्या पुढे गेलेल्या समाजात राहणार्‍या मानवाच्या संपर्कासाठी भाषेचे माध्यम निर्माण झाले, मानवाप्रमाणे भाषाही उत्क्रांत होत गेली आणि बदलत गेली, काही शब्द बदलले, काहींचे अर्थ बदलले, काही नवे शब्द आले, काही काळाच्या ओघात नाहीसे झाले. स्थानिक भाषेच्या परिणामातून भाषा बदलत गेली. शुद्ध भाषा किंवा व्याकरणातील भाषा व्यवहारात कुचकामी ठरते. भाषेचे शुद्धीकरण किंवा प्रमाणीकरण हा बनाव आहे. भाषेचा शब्द वाक्यातून ध्वनीत होणारा विशिष्ट स्वरूपाचाच असायला हवा, असे नियम बनवणार्‍यांनी प्रमाण भाषेचा बागुलबुवा उभा केला आहे.

- Advertisement -

खेड्यापाड्यातील पहिलीच्या विद्यार्थ्याला खांद्यावरील मानवी अवयवाचे नाव लिहायला सांगितल्यावर त्याने ‘डोस्कं’ किंवा ‘टकुरं’ असं उत्तर लिहिल्यास ते चूक ठरवून ‘डोके’ हाच शब्द बरोबर असल्याचे गृहीत धरणार्‍यांनी भाषेच्या संपर्क आणि संकेतांना डावलल्याचे स्पष्ट होते. संपर्क किंवा संवादाच्या माध्यमात भाषा मानवी जाणिवा, नेणिवा किंवा मते मनातील भावना आणि इच्छा आहेत तशा व्यक्त करण्याचे माध्यम आहे, त्या ठिकाणी अनेकदा शब्दांची गरज असेलच असेही नाही. एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीशी ज्यावेळी बोलते त्यावेळी पहिल्या व्यक्तीच्या मनांतील हेतू, उद्देश विचार आणि भावनेच्या तुलनेत जास्तीत जास्त प्रमाणात दुसर्‍याला समजावून देण्याचे भाषा हे माध्यम असावे, जर हे शक्य होत नसल्यास कोणत्याही भाषेचा संवादासाठी माध्यम म्हणून पुरेसा वापर करता येत नसतो.

बोली, ग्रामीण किंवा काळाच्या ओघात शब्दार्थ बदललेल्या भाषांवर बदलत्या संस्कृतीचे सातत्याने आक्रमण होत असते. मराठीचा विचार केल्यास सत्तर ऐंशीच्या दशकात ग्रामीण बोली भाषा असलेल्या तमाशा किंवा वगनाट्याचा परिणाम असलेल्या भाषेचा मराठी चित्रपटांवर परिणाम होता, आज हा परिणाम तेवढा उरलेला नाही. त्यामुळेच देशाच्या कागदोपत्री व्यवहाराची भाषा कोणती असायला हवी? या प्रश्नाला अमित शहांचे उत्तर हिंदी हे असेल तर राज्यातील स्थानिक भाषाव्यवहारांचे काय करावे ? त्या ठिकाणी प्रांतरचनेची स्थानिक भाषा कितपत मर्यादेत ठेवावी, हा प्रश्न आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात मराठीच्या अवस्थेचा विचार केल्यास मराठी शाळा बंद पडत असल्याचे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही, दक्षिणेकडील राज्यांमध्ये बहुतांशी इंग्रजी ही ज्ञान, अभ्यास, व्यवहाराची भाषा असली तरी स्थानिक भाषेवर तिचे अतिक्रमण होणार नाही, इतकी काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळेच कमल हासन आणि रजनीकांत यांनी त्यांच्या स्थानिक भाषांची तळी उचलून धरली आहे. हिंदी चित्रपटातून नावलौकीक मिळाल्यावर हिंदीला नकार देण्याचा आरोप त्यामुळेच निराधार आहे. केवळ चित्रपटांचा विचार केल्यास प्रमाण हिंदीचा विचार कुचकामी ठरतो, चित्रपटांची भाषा ही प्रमाणभाषा कधीच नसते. ती तशी नसावीही, केवळ समाजमनाची भाषा मनोरंजनाचा उद्देश असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीकडून हिंदीच्या प्रबोधनाची अपेक्षा ठेवणे गैर आहे. त्यामुळेच ज्यांना केवळ मोडकी तोडकी हिंदी बोलता येते किंवा जे कलाकार किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज सार्वजनिक जीवनात हिंदी भाषा कितीशी बोलतात. जावेद अख्तर, गुलजार, नसिरुद्धीन शहा, अमिताभ बच्चन असे नावाजलेले असे काही मोजकेच कलावंत हे हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतात, उरलेले बहुतेक बॉलिवूडचे शिलेदार आहेत आणि हे हिंदी चित्रपटसृष्टीच्या तुलनेत बॉलिवूडच्या शिलेदारांची संख्या मोठी आहेच.

कॅटरिना, करिनासारख्या अभिनेत्रींचे हिंदी चिपटात काम करताना हिंदी भाषेशिवाय काही अडत नाही. इंग्रजी लिपित हिंदी लिहलं की संवादाचं काम झालं. हिंदी चित्रपटांच्या अनेक संहिता या इंग्रजी भाषेतच लिहल्या जातात. हिंदी चित्रपटांचा मुहूर्त किंवा खास खेळ आयोजित केल्यावर हिंदी पेक्षा इंग्रजीत प्रेक्षक आणि प्रसार माध्यमांशी संवाद साधला जातो. इंग्रजी येणं हे आधुनिकतेचं लक्षण मानलं जातं. हे खरंही आहे. ती ज्ञानभाषा आहेच. मात्र, दक्षिणेकडील राज्यांनी या भाषेचा वापर केवळ ज्ञानार्जनासाठीच अधिकतर केला आहे. आपल्या स्थानिक भाषासंस्कृतीवर त्याचे आक्रमण होऊ दिले नाही. त्यामुळेच रजनीकांतचा ‘रोबोट’ नावाचा बिगबजेट सिनेमा स्थानिक भाषेत प्रदर्शित करण्यास प्राधान्य दिले गेले, हिंदीतून तो डब होऊन प्रेक्षकांपुढे आला. हिंदीतील दिवार सारखे गाजलेल्या चित्रपटाची कथा घेऊन केवळ भाषा माध्यम बदलून हे चित्रपट रजनीकांतने दक्षिणेकडील भाषेतही केले आहेत. आपल्याकडे नागराजचा मराठीतला सैराट हिंदीत धडक बनून आला. मात्र, मराठीच्या तुलनेत हिंदीत हा सिनेमा प्रभाव दाखवू शकला नाही. सैराटचे कथानक आणि त्यातील जास्त वास्तव हे मराठी भाषा आणि संस्कृतीतील मातीत मुरलेले होते. त्यामुळेच हिंदीतला त्याचा परिमाण मराठीच्या तुलनेत कमालीचा उथळ होता.

भाषा हे इतिहास, संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते, त्यामुळेच अशा संस्कृतींमधला फोलपणा आणि वास्तव उघड करण्यासाठी भाषेचे माध्यम महत्त्वाचे आहे. मराठी साहित्यातील भाषेच्या परिमाणांना सुरुंग लावण्याचे काम बंडखोरी करणार्‍या साहित्यीकांनी केले. त्यावेळीही माणसाच्या जगण्याची भाषा आणि सारस्वतांनी प्रमाण ठरवलेली मराठी भाषा यातील लढाई सुरूच होती. संतसाहित्यापासून ही लढाई सुरू आहे. मराठीचे गोडवे गाताना मराठीला पांढरपेशा वर्गातच बंदिस्त करण्याचा प्रयत्न झाल्यावर माणसांचे साहित्य मूल्य स्वीकारलेल्यांनी या भाषेला या बंदीगृहातून सोडवून निव्वळ माणसांच्या वस्तीत आणले. तिथे व्याकरणापेक्षा संवाद महत्त्वाचा होता. भाषेतील सांकेतिक अक्षरांपेक्षा अशी भाषा मनं वाचू शकते का हे पाहिले जात होते, भाषेला प्रमाणबद्ध करण्याचा प्रयत्न अशा प्रकारे उलथवून टाकणे मराठीच्या लवचिकतेसाठी आवश्यकच होते. यामुळे मराठी भाषेची हानी तर झालीच नाही, उलट ती वैचारिक दृष्टीने प्रगल्भ झाली आणि माणसाच्या जगण्याच्या जवळ गेली.

एखादी भाषा ठरवून ती देशाची केली जात नाही. मानवी संवेदना, भावना, इच्छा, समाज आणि संस्कृतीला पूरक आणि पोषक असे तत्व भाषेत असेल तर ती समाजभाषा बनतेच, देशाची भाषाही बनू शकते किंवा ज्ञानभाषा म्हणूनही समोर येऊ शकते. हिंदी या कसोटीवर कितपत उतरते यावर ही देशाची भाषा असावी का? या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -