घरफिचर्समायमहानगर ब्लॉगआणखी एक बळी, आणखी एकदा आक्रोश

आणखी एक बळी, आणखी एकदा आक्रोश

Subscribe

एक पालक म्हणून कुटुंबप्रमुख म्हणून आपल्या जबाबदार्‍या पार पाडण्याबाबत आपण कितपत गंभीर आहोत, याचाही कुणी विचार करीत नाही. त्यामुळे केवळ कायदाच नाही, तर आपले संस्कार, मूल्यशिक्षण कमी पडत असल्याने अशा घटना घडत आहेत. कठोर शिक्षा करा, फाशी द्या, गोळ्या घाला एवढे बोलून आपली या पापातून सुटका नाही, तर त्यासाठी आपल्या घरात, शेजारी आपण स्त्रीचा सन्मान करण्याची कृती कितपत करतो, याचाही विचार करण्याची वेळ आहे. नाही तर अशा घटना घडत राहणार, त्यात एखाद्या पीडितेचा बळी जाणार आणि आपला आक्रोशही सुरूच राहणार. आज दूरचित्रवाणी आणि वर्तमानपत्रातून दिसणार्‍या या घटना आपल्या गल्लीत व घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत, याचे भान ठेवण्याची गरज आहे.

हिंगणघाटातील दारोडा येथील तरुण प्राध्यापिकेला आठ दिवसांपूर्वी एका नराधमाने पेटवून दिले आणि तिचा सोमवारी मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. दूरचित्रवाहिन्यांवरून तो आक्रोश प्रक्षेपित करण्यात आला. विद्यार्थिनी, महिला यांनी त्यांच्या वेदना व्यक्त केल्या. विरोधी पक्षांनी सत्ताधार्‍यांना प्रश्न विचारले आणि मनातील चीड, संतापाचे विरेचन होत असतानाच त्या पीडितेच्या मृत्यूची बातमी आली. पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरून गेला. आता पुढे काही दिवस या पीडितेच्या मृत्यूने जनसामान्यांमध्ये निर्माण झालेल्या संतापाच्या भावनेचे आपल्याला दर्शन घडवले जाईल. विरोधी पक्षनेते, संबंधित मंत्री कदाचित मुख्यमंत्री पीडितेच्या घरी जातील, सांत्वन करतील. त्या नराधम आरोपीला अधिकाधिक कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देतील. पीडितेच्या घरातील कुणाला सरकारी नोकरीचे आश्वासन मिळेल. कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळेल. काही दिवस आरोपीला कोठडी, जामीन, अशा बातम्या वाचायला मिळतील. आणखी महिनाभरानंतर पुन्हा आपल्या आजुबाजूला अशीच काही तरी घटना घडेल आणि त्या घटनेच्या गदारोळात या पीडितेचा आपल्या सर्वांनाच विसर पडेल आणि समाज पुन्हा आपल्या दैनंदिन कामात व्यस्त होईल. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी प्रशासन अटी शर्तींचा डोंगर उभा करून पीडितेच्या कुटुुंबीयांवर भीक नको पण कुत्रे आवर, असे म्हणण्याची वेळ येईल आणि या घटनेचा निकाल लागेल तेव्हा लोक ही पीडिता, कुटुंबीयांचे दुःख आणि त्यातून निर्माण झालेली संवेदनशीलता या सार्‍यांचा विसर पडलेला असेल.

या आधी २०११ मध्ये नवी दिल्लीत एका युवतीवर मध्यरात्रीनंतर बसमध्ये बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आल्यानंतर देशभर गदारोळ उडाला होता. अनेक महिने दूरचित्रवाहिन्या आणि प्रसार माध्यमांमधून त्याचा आक्रोश जगासमोर मांडला जात होता. या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी राजधानी दिल्लीत जवळपास महिनाभर आंदोलन सुरू होते. त्यावरून सरकारला कोसले जात होते. कायदा कठोर करण्याची मागणी केली जात होती. सरकारही त्यांच्या संवदेनशीलतेचे प्रदर्शन करीत होते. अखेर पीडितेच्या कुटुंबीयांना मदत, नोकरी आदी जाहीर केल्यानंतर आंदोलन थांबले गेले. कथित फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालला. त्यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने नंतरच्या सरकारने त्यात दुरुस्ती केली. त्यासाठी अनेक वादविवाद झाले, मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करण्याचे शहाजोगी सल्ले दिले गेले. अनेक बुद्धीवंतांनी त्यासाठी आपल्या लेखण्या झिजवल्या व वाणी खर्ची घातली. आज त्या घटनेला ९ वर्षे उलटून गेली असून त्या पीडितेच्या आईने आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात असंख्य चकरा मारल्या आहेत. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होऊनही ती टाळण्यासाठी एका न्यायालयातून दुसर्‍या न्यायालयाचा आधार घेतला जात आहे.

- Advertisement -

न्यायालयेही अशा क्रूरकर्म्यांचा जगण्याचा हक्क मान्य करून त्यासाठी सर्वतोपरी संधी देण्याची भूमिका घेत आहेत. काही कथित बुद्धीवादी लोक निर्भयाच्या आईला हृदय मोठे करून गुन्हेगारांना माफ करण्याची भूमिका घेण्याचा सल्ला देत आहेत. सरकारने या वर्षी दोन वेळा फाशीची वेळ टाळली आहे. राजधानी दिल्लीत गुन्हेगारांना वाचवण्यासाठी कायद्यातील सगळ्या पळवाटा शोधण्यासाठी समाजातील उच्चभ्रू लोकांकडून कायद्याचा किस पाडण्याचे काम सुरू असतानाच महाराष्ट्रातील हिंगणघाट येथे एका तरुण प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातून पेटवून दिल्याचा प्रकार घडला आहे. अर्थात नऊ वर्षांनंतर घडलेली ही पहिली घटना नाही. दरम्यानच्या काळात नगर जिल्ह्रात कोपर्डी येथील एका अल्पवयीन मुलीवरही अत्यंत क्रूर पद्धतीने अत्याचार करण्यात आले होते. त्याचीही महाराष्ट्रभर मोठी प्रतिक्रिया उमटली. या पीडितेच्या न्यायासाठी राज्यभर लाखोंचे मोर्चे निघाले. वेगाने सुनावणी होऊन आरोपींना लवकरात लवकर फाशीवर लटकावण्यासाठी सरकारवर दबाव आणला गेला. आज त्या पीडितेला न्याय मिळाला नाही किंवा याबाबत साधी चर्चाही होताना दिसत नाही. आपल्या अशा नराधमांच्या वासनांची शिकार झालेल्या मुली-महिलांची संख्या मोठी आहे, पण केवळ तात्पुरता आक्रोश, टीका, दिलासा, आश्वासन आणि शांतता, असा जणू पायंडाच पडला आहे. यातील काही घटना माध्यमांमधून प्रकर्षाने समोर आल्यानंतर प्रत्येक वेळी सरकार कठोर कायदा करण्याची घोषणा करते आणि वेळ मारून नेते. मग सरकार कोणतेही असो. त्यांच्या पटकथा ठरलेल्या आहेत. विरोधी पक्षात असतील तर कायद्याचा धाक उरला नाही म्हणून सरकारवर टीका करतील व सत्तेत असतील तर कठोर कायदा करण्याची भाषा करणार आणि पीडितेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत वा सरकारी नोकरीचे आश्वासन दिले जाणार. म्हणजे आपण कोठे उभे आहोत, यावरून प्रत्येकाने आपापली भूमिका निश्चित केली असून अशा घटना म्हणजे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत बुद्धीवंत यांनी साजरे करण्याचे इव्हेंट झाले आहे की काय, असा प्रश्न पडावा,अशी सर्वदूर देशभरातील स्थिती आहे.

आणखी पुढचे काही दिवस हा आक्रोश आपल्या सर्वांच्या कानी पडेल आणि डोळ्यांनी दिसेल. त्यानंतर ही घटना विस्मृतीत जाईल, अशा घटना व त्या घटनांवरील प्रतिक्रिया आपल्या जणू अंगवळणी पडल्या असून समाज म्हणून आपण सगळेच जण कोडगे झालो आहोत. या घटना थांबवण्यासाठी किंवा असे प्रकार होणारच नाहीत, याबाबत काय करता येऊ शकते, याबाबत कुणीही चकार शब्द बोलायला तयार नाही. अशा घटना कशा टाळता येतील, महिलांमध्ये स्वसंरक्षणाचे धाडस कसे निर्माण होईल, कुणी त्रास देत असेल तर त्याबाबत दाद कशी मागता येईल, याबाबत अनेकवेळा चर्चा होते. योजना तयार होतात, योजनांसाठी आर्थिक तरतूद होते, पण त्याची अंमलबजावणी कशी होते, याबाबत कुणीही बोलायला तयार नाही. एखादी पीडिता पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तिला कसा प्रतिसाद मिळतो, याबाबत कुणी बोलायला तयार नाही. पीडिता तक्रार करते तेव्हा तिच्याविषयीच पहिली शंका घेण्याची सहजप्रवृत्ती असणार्‍या समाजात अशा घटना म्हणजे त्याच्या मानसिकतेचा परिपाक आहे, हे लक्षात येत नाही. त्यांना वाटते, असे प्रकार करणारे कुणीतरी बाहेरच्या जगातून आले आहेत आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली म्हणजे आपले कर्तव्य पूर्ण होते. तसेच अशा घटनांबाबतची आपली प्रतिक्रियाही पीडितेचा धर्म, जात, प्रांत तसेच त्या नराधमाचा धर्म, जात वा प्रांत यावर अवलंबून आहे. आक्रोश करणे आपल्या सोईचे असते तेव्हा आपण छाती बडवतो आणि गैरसोयीचे असेल तर घटनेतील त्रुटी, दोष शोधत राहतो आणि प्रत्येकवेळी अपेक्षा करतो अशा गुन्हेगारांना जागेवरच गोळ्या घातल्या पाहिजेत. मात्र, कायद्याचा धाक किंवा जरब का उरली नाही? कारण शक्ती कायद्यात नसते तर त्यांच्या अंमलबजावणीत असते व एक देश म्हणून समाज म्हणून कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आपण प्रामाणिक राहिलो नाही. अशा प्रकारच्या प्रत्येक घटनेबाबत आमची मते आणि भूमिका ठाम राहत नाहीत. अशा घटनांबाबत कठोर कारवाई व्हावी म्हणून एक समाज म्हणून आम्ही एकत्र येऊन सरकारवर दबाव आणत नाही. यामुळे गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटत नाही. त्याचप्रमाणे एक पालक म्हणून कुटुंब म्हणून आपल्या जबाबदार्‍या पार पाडण्याबाबत आपण कितपत गंभीर आहोत, याचाही कुणी विचार करीत नाही. त्यामुळे केवळ कायदाच नाही, तर आपले संस्कार, मूल्यशिक्षण कमी पडत असल्याने अशा घटना घडत आहेत. त्यामुळे कठोर शिक्षा करा, फाशी द्या, गोळ्या घाला एवढे बोलून आपली या पापातून सुटका नाही, तर त्यासाठी आपल्या घरात, शेजारी आपण स्त्रीचा सन्मान करण्याची कृती कितपत करतो, याचाही विचार करण्याची वेळ आहे. नाही तर अशा घटना घडत राहणार, त्यात एखाद्या पीडितेचा बळी जाणार आणि आपला आक्रोशही सुरूच राहणार. मात्र,आज दूरचित्रवाणी आणि वर्तमानपत्रातून दिसणार्‍या या घटना आपल्या गल्लीत व घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत, याचे भान ठेवण्याची गरज आहे.

आणखी एक बळी, आणखी एकदा आक्रोश
Milind Sajgurehttps://www.mymahanagar.com/author/milind-sajgure/
Resident Edior, Nashik Edition, Aaple Mahanagar
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -