कोरोनातील मानव तस्करी

भारतासह अनेक देशांमधील महिला, तरुणी व अल्पवयीन बालकांच्या शरीर विक्री व्यवसायाबरोबरच, अवयव तस्करी व अंमली पदार्थांची विक्री व खरेदीसाठीही मानवी देह वापरले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

lekh photo

संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकलं आहे. हा विळखा केव्हा सुटेल हे सध्या कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. यामुळे कोरोनावरील लस केव्हा येईल याकडे अख्खे जग डोळे लावून बसलं आहे. कोरोना हा आता जीवनमरणाचा प्रश्न झाल्याने या काळात कोरोनाव्यतिरिक्त दुसरे सर्व प्रश्न गौण ठरले आहेत. तर दुसरीकडे मात्र याच परिस्थितीचा गैरफायदा घेत टोळक्यांनी मानव तस्करीचा धंदा पुन्हा जोमाने सुरू झाला आहे. यात भारतासह अनेक देशांमधील महिला, तरुणी व अल्पवयीन बालकांच्या शरीर विक्री व्यवसायाबरोबरच, अवयव तस्करी व अंमली पदार्थांची विक्री व खरेदीसाठीही मानवी देह वापरले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. डिजिटल माध्यमांतर्फे तस्करांचे टोळके आपले जाळे पसरवत आहे. विशेष म्हणजे यात फक्त गरीब व गरजू घरातीलच नाही तर सधन घरातील सुशिक्षित महिला व बालकेही नकळत या जाळ्यात अडकत आहेत. यामुळे कोरोनाबरोबरच मानव तस्करीचे नवे आव्हान भारतासह जगासमोर उभे राहिले आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून भारतानेच नाही तर जगातील सर्वच कोरोनाबाधित देशांनी काही काळापुरता लॉकडाऊन केला होता. यामुळे लाखो लोक देशोधडीला लागले. कंपन्या बंद झाल्या, तर कारखान्यांना मालकांनी टाळे लावले यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आली. हातात काम नाही, खिशात पैसा नाही, बायकापोरांना एकवेळचं अन्नही देऊ शकत नाहीत. अशा विवंचनेत अनेकजण होते व आजही आहेत. यावर तोडगा म्हणून पोटाची खळगी भरावी म्हणून काही जणांनी पैशांच्या मोबदल्यात पोटची मुलं विकल्याच्या बातम्या एकदिवसाआड पेपरात येत आहेत. ही चिंतेची बाब आहे.

याचाच गैरफायदा घेत कोरोनाच्या या काळात नोकरी गेलेल्या किंवा घरातील कर्त्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने आर्थिक विवंचनेचा सामना करणार्‍या हताश, गरीब व असहाय्य व्यक्तीला तस्करांचे टोळके हेरत आहेत. कधी कामाचे तर कधी प्रेमाच्या जाळ्यात फसवून या गरजू मुलं-मुलींना काम देण्याचे आमिष देत आहेत. त्याला भुलून पालकही मुलांचा ताबा संबंधित व्यक्तीला म्हणजेच एजंट बनून आलेल्या तस्कराला देतात. त्यानंतर त्या असहाय मुला-मुलींची रवानगी कामाच्या ठिकाणी नाही तर कुंटणखान्यात किंवा इतर वामकामासाठी केली जाते. याच पार्श्वभूमीवर कोरोना काळात भारतात मानव तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘ट्रॅफिकिंग इन पर्संस रिपोर्ट-2020’ चा अहवाल सादर केला होता. त्यात दाट लोकसंख्या असलेल्या देशात मानव तस्करीचे संकट वाढत असून भारतासारख्या देशातही याचा झपाट्याने विस्तार होत असल्याचे नमूद केले आहे. तसेच या अहवालात मानव तस्करीच्या श्रेणीत भारताचा टियर-२ मध्ये समावेश करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

कोरोना काळात अनेक देशांमध्ये वेश्याव्यवसायास बंदी घालण्यात आली आहे. अशा देशांमध्ये या मुलांना पाठवलं जात आहेत. तेथे त्यांना जबरदस्तीने शरीरविक्रीच्या व्यवसायात ढकलले जात आहे. बर्‍याचवेळा मुलांचा वापर हा मजूर म्हणून केला जात आहे. तर मुलींना सर्रासपणे वेश्या व्यवसायात ढकलेले जात आहे. भारतात लॉकडाऊननंतर मानव तस्करीने अशाच प्रकारे वेग घेतला असून यात ग्रामीण व रोजंदारीवर जगणार्‍या मजूर कुटुंबातील मुलांचे प्रमाण अधिक आहे. कारण लॉकडाऊनमुळे कामधंदाच नसल्याने अनेक कुटुंब उघड्यावर पडली आहेत.

अशा कुटुंबांना गुंडाळणे तस्करांसाठी अधिक सोपे आहे. यामुळे कोरोना काळात जगभरात अनेक देशांमध्ये राज्यांमधून, जिल्ह्यातून, तालुक्यातून, शहरातून, गावातून मोठ्या प्रमाणावर महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. दरम्यान, मानव तस्करी ही काही आताच सुरू झाली नसून ज्या ज्या वेळी जगात, एखाद्या देशात, भूकंप, पूर, महामारी,
ओला – सुका दुष्काळ अशी संकटं येतात तेव्हा त्या त्या भागात मानव तस्करी होते, असा इतिहास आहे. फक्त तेव्हा इतर प्रश्न महत्त्वाचा असल्याने मानव तस्करीकडे कोणाचे फार लक्ष नसते. जसे आज सगळ्यांच्या डोक्यात फक्त कोरोनाचे विचार घोंघावत आहेत. तशीच परिस्थिती प्रत्येक महासंकटात निर्माण होते. अशावेळी काही बोटावर मोजता येतील एवढ्याच सरकारी व स्वयंसेवी संस्था या पीडितांच्या मदतीला धावून येत असतात. आजही असेच दृश्य असून मानव तस्करांचा सुळसुळाट झालेला असताना अवघे २७ टक्केे Anti-HumanTrafficking Units (AHTUs) मानव तस्कर विरोधी युनिट यावर काम करत आहेत.

एकीकडे गरीब घरातील कुटुंबातील मुला-मुलींना फूस लावून पळवून त्यांची तस्करी करण्याचा धंदा करणारी टोळक्यांची नजर आता सधन घरांकडेही वळली आहेत. नवीन सावज टिपण्यासाठी तस्करांनी सोशल मीडियाचा वापर सुरू केला असून सोशल मीडियावरून चांगल्या घरातील महिला, तरुणी व अल्पवयीन मुला-मुलींना मैत्रीच्या जाळ्यात ओढले जात आहे. त्यातून या महिला व मुला-मुलींना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून हवे ते काम करून घेण्याचा नवीन फंडा तस्कर टोळीने या कोरोना काळात सुरू केला आहे. कोरोना व लॉकडाऊनमध्ये जवळजवळ सगळीच मुले घरात अडकून पडली होती. कोरोना संसर्गाची भाती असल्याने त्यांना घराबाहेर पडण्यासही बंदी होती. शाळा, कॉलेजेसही बंद, मित्रांच्या भेटीगाठीही बंद यामुळे आतापर्यंत बाहेरच्या जगाशी थेट संपर्कात असणार्‍या मुलांची घरात घुसमट होऊ लागली. ऑनलाईन अभ्यासाबरोबरच स्वत:ला बिझी ठेवण्यासाठी स्मार्टफोन, लॅपटॉपचा त्यांचा वापर वाढला. फेसबुक व इन्स्टा व इतर माध्यमांतून अनोळखी व्यक्तींशी त्यांचे संबंध वाढत आहेत. याचाच गैरफायदा घेत टोळक्यांनी अशा एकलकोंड्या व्यक्तींचा सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध घेणे सुरू केले. त्यांच्याशी मैत्री वाढवली व त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीर विक्रीबरोबरच इतर वाईट व्यवसायात ढकलले आहे. आजच्या तारखेला देशात मानव तस्करीने पीडित असलेल्यांची संख्या जवळपास ८० लाखांहून अधिक आहे. कोरोना काळात हा आकडा वाढला असून मजूर वर्ग हा तस्करांच्या निशाण्यावर आहे. ही मानव तस्करी सीमेपार पोहचली असून बीएसएफनेही मानव तस्करी रोखण्यासाठी कंबर कसली आहे. बीएसएफ अधिकार्‍यांच्या मते कोलकाता, गुवाहाटी आणि पूर्वोत्तर भारतातील काही शहरे दिल्ली व मुंबई सारख्या शहरांमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने सीमेपलीकडूनही तस्करीच्या माध्यमातून माणसं आणली जात आहेत व पाठवलीही जात आहेत.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालातही यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यानुसार भारतात अनेक मानव तस्करींची टोळकी असल्याचा संशय या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ही टोळकी नक्षलवादी व दहशतवादी संघटनांना लहान मुले व महिला पुरवण्याचे काम करत आहे. त्यांचा उपयोग प्रामुख्याने हत्यार व स्फोटकं सांभाळण्याबरोबरच लैंगिक उपभोगासाठीही केला जात आहे. कोरोना काळातली ही बिभीत्सता खरं तर समाजाची काळी बाजू दाखवणारी आहे. ती खोडून काढण्यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. मात्र, कधी भूकंप, कधी ओला तर कधी सुका दुष्काळ, पूर तर आता कोरोना यासारखी संकटे येतानाच र्‍हास सोबत घेऊन येतात; पण कडक कायदे करून मानव तस्करी रोखता येणं आपल्या हातात आहे. यासाठी आवश्यक उपाययोजनाच नाही तर जनजागृतीचीही आज गरज आहे.