घरफिचर्समायमहानगर ब्लॉगरात्र कोरोनाची आहे..दिवस माणसाचा आहे

रात्र कोरोनाची आहे..दिवस माणसाचा आहे

Subscribe

सध्या कोरोनाच्या विषाणूचे संकट मानवावर आलेले आहे. अशीच संकटे या पूर्वीही मानवावर आलेली होती. त्यातून त्याने कुशलतेने मार्ग काढून पुन्हा आपला पुढचा प्रवास सुरू केला. कोरोनामुळे जगातील अनेकांना जीव गमावावे लागत आहेत. महाराष्ट्रात सध्या बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. आजवरचा अनुभव पाहिला तर माणूस या कोरोनाच्या लवकरच मुसक्या आवळेल यात शंका नाही. सध्या रात्र कोरोनाची असली तरी उद्या उगवणारा दिवस माणसाचा असेल, यात शंका नाही.

मानवी इतिहास पाहिला तर मानवजातीवर अनेक महाकाय संकटे आलेली आहेत, यातून अवघी मानवजात नष्ट होणार की, काय अशी भीती निर्माण झालेली होती. काही काळ मानव या संकटांच्या धक्क्यामुळे हादरून गेला असला आणि अनेकांना त्यात जीव गमवावा लागला तरी त्यातून सावरून त्याने पुढील प्रवासाला सुरुवात केलेली आहे. भविष्य सांगणार्‍या अनेकांनी अनेक वेळा विशिष्ट वर्षी जगाचा अंत होईल, जगबुडी येईल, असे अंदाज व्यक्त केलेले होते. या भविष्यवाणीमुळे लोकांना भीती वाटत राहते, पण प्रत्यक्ष ती वेळ आली की, जगबुडी किंवा कयामत आलेली नाही, असेच दिसून आलेले आहे.

पृथ्वीवरील मानवावर आलेल्या विविध संकटातून मानव आपली सुटका करून घेत आलेला आहे. त्या संकटावर मात करताना त्याच्यासोबत असलेल्या अनेकांचा बळी जातो, पण त्यातून जे वाचतात, ते जगाचा गाडा पुढे हाकतात. तसे पाहिले तर विविध कारणांंमुळे जगात माणसांचे मृत्यू होत असतात. पण जेव्हा संकटाची मोठी लाट येते आणि अनेकांचे मृत्यू होऊ लागतात, म्हणजे कमी वेळात जास्त मृत्यू होतात, तेव्हा मात्र लोकांना चिंता वाटू लागते. सध्या जगात अशीच परिस्थिती आलेली आहे. दीड वर्षापूर्वी कोरोना नावाचा जो विषाणू जगात उद्भवला त्यामुळे जागतिक परिस्थितीच बदलून गेली आहे. एकमेकांच्या विरोधात बेटकुळ्या काढणार्‍या राष्ट्रांना त्याने आपली जागा दाखवली आहे. त्याने माणसाला आपल्या मर्यादा दाखवलेल्या आहेत. विज्ञान तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी एक विषाणू स्वत:ला प्रगत म्हणवणार्‍या मानवाला कसा हताश आणि हतबल करू शकतो, हे त्याने दाखवून दिले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात कोरोनामुळे अतिशय भयावह अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. गेल्या दीड वर्षामध्ये कोरोना या विषाणूने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. अमेरिका, रशिया आणि युरोपमधील देशांचीही पाचावर धारण बसली. त्यांच्याकडे प्रतिबंधात्मक काळजी घेतली जात असते तसेच आधुनिक वैद्यकीय साधने असूनही कोरोनाने त्या देशांमध्ये काही लाख लोकांचा बळी घेतला. या प्रगत देशांच्या अर्थव्यवस्था हादरवून टाकल्या. भारतामध्ये गेले दीड वर्ष कोरोनाने अनेकांना आर्थिकदृष्ठ्या रिकामे केले. कोरोनावर उपचार करण्यासाठी भरपूर खर्च तर झालाच पण त्याबरोबर अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. कोरोना आला आहे, तो अल्पावधीत जाईल असे वाटत होते, पण तो आपली रुपे बदलून नव्या रुपात पुन्हा लोकांच्या हात धुवून मागे लागला आहे. त्याला रोखण्यासाठी व्यापक लसीकरणाची गरज आहे. अशा प्रकारच्या लसीकरणामुळे इस्त्रायल, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांनी आता कोरोना नियंत्रणात आणण्यात यश मिळवले आहे. या देशांमध्येही कोरोनाने हाहा:कार उडवला होता. त्यांच्याकडे ही पहिली, दुसरी, तिसरी लाट आली. या लाटांवर मात करण्यात त्यांनी बर्‍यापैकी यश मिळविले आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कोरोनाने महाराष्ट्रात केलेला कहर हा भयंकर आहे. ऑक्सिजन अपुरा पडत असल्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्णांना आपले जीव गवमावे लागत आहेत. रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची आता लागत आहे, तशी गरज मागील वर्षी लागत नव्हती, पण आता परिस्थिती विचित्र प्रकारे बदलली आहे. २०२० सालच्या शेवटी कोरोना भारतातून जाईल, असे वाटत असताना तो परत फिरला आणि त्याने मानवाच्या फुफ्फुसातील ऑक्सिजन क्षमतेवरच हल्ला केला. त्यामुळे महाराष्ट्रात केवळ शहरात नव्हे तर छोटी शहरे आणि ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला असून थैमान घातले आहे. चांगली धडधाकड माणसे मृत्यूमुखी पडत आहेत. विश्वास बसत नाही, अशा बातम्या कानी येत आहेत. त्यातून पुन्हा लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडत असल्यामुळे त्यांच्या जवळ जाणेही शक्य होत नाही, त्यामुळे सगळीच परिस्थिती अवघड होऊन बसली आहे. एखाद्या जागतिक युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

जगावर कोरोना नावाच्या सूक्ष्म विषाणूने हल्ला करून मानवजातीला त्राही भगवान करून सोडले आहे. अशा वेळी देवाचेही काही चालेनासे झाले आहे, उलट, देवांची देवळेही बंद करून ठेवण्याची वेळ आलेली आहे. जो विषाणू आपल्याला आपल्या भक्तांपासून दूर ठेवत आहे, त्याला आपण नष्ट केले पाहिजे, असे खरे तर देवाला वाटायला हवे होते, पण तसेही कुठे होताना दिसत नाही. त्यामुळे अशा आपत्कालीन स्थितीत लोकांना देवाचा आधार वाटतो, पण अवघी मानवजात निराधार झालेली दिसत आहे. आता वैद्यकशास्त्रातून ज्या काही लशी आणि औषधे निर्माण होतील, त्यातूनच आपला जीव वाचू शकेल, असेच माणसाला वाटू लागले आहे. मंदिर, मशीद आणि आपल्या धर्मस्थळांविषयी आक्रमक होणार्‍या मानवाला कोरोना हा आपला सगळ्यांचा कसा समान शत्रू आहे, हे दिसले आहे. जगातील लोकांनी आपापसातील भेदभाव विसरून एकत्र यावे आणि एकोप्याने रहावे, यासाठी संयुक्त राष्ट्र संघासारख्या संघटना अस्तित्वात आल्या. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धात जग भाजून आणि भरडून निघाल्यावर पुन्हा असा जागतिक संघर्ष होऊ नये यासाठी बराच प्रयत्न होताना दिसत आहे. तरीही जगात नंबर वन राहण्यासाठी आणि होण्यासाठी विविध देशांचे प्रयत्न सुरू असतात.

दुसर्‍या महायुद्धात हिटलरला संपवण्यासाठी एकत्र आलेल्या अमेरिका आणि सोवियत संघ यांच्यामधील शीतयुद्धातूनच तिसरे महायुद्ध भडकेल असे, सगळ्यांना वाटत होते, पण १९९१ साली सोवियत संघ कोसळला आणि महायुद्धाची शक्यता धुसर झाली. आता सोवियत संघाची जागा वेगाने चीन घेऊ पहात आहे. त्यामुळे जगभरात रस्त्यांचे जाळे निर्माण करून जागतिक बाजारपेठा काबीज करून त्यावर आपली मक्तेदारी निर्माण करण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. त्यात पुन्हा सध्या जगाला ज्या कोरोना विषाणूने नाकी नऊच नव्हे तर नव्यान्नव आणले आहेत, त्या कोरोनाचा उद्भवही चीनच्या वुहान प्रांतातून झालेला आहे. याविषयी चीनची अळीमिळी गुपचिळी आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर जगातील महत्वाकांक्षी देशांच्या एक गोष्ट लक्षात आली आहे की, शत्रू देशांच्या शहरांवर क्षेपणास्त्रे आणि बॉम्बहल्ले केले तर, मालमत्ता मोठ्या प्रमाणात नष्ट होते. त्यामुळे पराभूत झालेल्या देशांकडून आपल्या हाती काही लागत नाही. त्यामुळे अशी अस्त्रे निर्माण करावीत की, ज्यामुळे मालमत्ता आहे तशीच राहील, पण केवळ माणसे मारली जातील.

कोरोना हे तशा प्रकारचे जैविक अस्त्र तर नाही ना, अशीही शंका उपस्थित करण्यात येत आहे. कारण जगातील महत्वाकांशी देश इतरांना अंकित करण्यासाठी कुठल्या थराला जातील, हे काही सांगता येत नाही. हेही मानवी इतिहासात दिसून आलेले आहे. अर्थात, याच्या सत्यतेचा शोध घेतला जाईलच. पण सध्या तरी कोरोनाने जगात आणि विशेषत: भारतात हाहा:कार उडवलेला आहे. जगभरातून प्रामुख्याने ऑक्सिजन, लशी, पीपीई किट्सची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे. कोविशिल्ड लशीची निर्मिती करण्यासाठी कच्च्या मालावर अमेरिकेने बंदी घातली होती, ती भारतातील गंभीर परिस्थिती पाहून उठवण्यात आली आहे. रशियाच्या स्पुटनिक या लशीलाही भारतात परवानगी मिळलेली आहे. त्यामुळे पुढील काळात भारतात वेगाने लसीकरण सुरू होईल.

भारताची लोकसंख्या मोठी असल्यामुळे सर्वत्र लस पोहोचण्यास आणि मिळण्यास थोडा विलंब होईल, पण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लस जास्तीत जास्त लोकांना दिली जाईल. त्या माध्यमातून कोरोनाला आळा घालता येईल. पण लसीकरणावरून आता राजकीय पक्षांची श्रेयवादांची लढाई सुरू होता कामा नये. कारण भारतामध्ये लोकशाही ही आदर्श राज्यप्रणाली असली तरी लोकशाहीसाठी आवश्यक असणारी परिपक्वता इथल्या राजकीय वर्गात अजूनही निर्माण झालेली दिसत नाही, असेच बरेच वेळा दिसून आलेले आहे. राज्यात आज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कोरोनास्थितीत जे काही आरोपप्रत्यारोप सुरू आहेत, ते पाहिल्यावर आता लोकांनीच त्यांना सज्जड दम देण्याची गरज आहे.

मानवजातीवर आजवर अनेक संकटे आली आहेत. त्या संकट काळात काही काळ गोंधळ उडतो, पाणी गढूळ होेऊन जाते. पण याच गोंधळलेल्या परिस्थितीत समाज फार वेळ राहत नाही. संकटकाळात जसे काही मार्ग बंद होतात, तसेच काही नवे मार्ग खुले होत असतात. आपण रात्रीच्या काळोखाला पुढे ढकलून सूर्याला उगवायला भाग पाडू शकत नाही. काही काळ संयम ठेवून वाट पहावी लागेल, निसर्गाच्या नियमांप्रमाणे रात्रीचा अंधार संपणार आहे, सूर्याचा उदय होणार आहे.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -