घरफिचर्समायमहानगर ब्लॉगपंधरवडा संयमाचा, संकल्प कोरोनामुक्तीचा!

पंधरवडा संयमाचा, संकल्प कोरोनामुक्तीचा!

Subscribe

कधी-कधी चांगूलपणाही महागात पडतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली संचारबंदी आणि ‘ब्रेक द चेन’चे नवे नियम यांचे पहिल्याच दिवशी जे भजे झाले ते याचेच मासलेवाईक उदाहरण म्हणावे लागेल. उद्धव ठाकरे हे मंगळवारी जनतेशी संवाद साधणार ही बातमी धडकताच सर्वांनाच लॉकडाऊनचे संकेत मिळाले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी नवीन नियमावली जाहीरदेखील केली. पण त्यात काय बंद राहणार यापेक्षा काय सुरू राहणार याचीच मोठी यादी असल्याने ‘ब्रेक द चेन’च्या उद्देशालाच हरताळ फासला गेला. राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या भयावहरित्या वाढत आहे. नवे ६० हजार पॉझिटिव्ह रुग्ण असून जवळपास ३०० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर १.६४ टक्के इतका आहे. रुग्णांची ही वाढती संख्या आता नियंत्रणाबाहेर गेली आहेे. वैद्यकीय व्यवस्थाही वाढत्या रुग्णांवर उपचार करताना तोकडी पडत आहे. त्यामुळे सर्वत्र रुग्णांची आरडाओरड सुरू दिसते.

सगळीचकडे ऑक्सिजन बेडची कमतरता आहे. त्यामुळे गंभीर प्रकृतीचे रुग्ण अक्षरश: तडफडून मृत्यूला कवटाळत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचाही गेल्या काही दिवसांपासून जो ‘तमाशा’ सुरू आहे तोदेखील रुग्णांसाठी जीवघेणा आहे. या इंजेक्शनचा पुरवठा तसा पुरेसा आहे. पण वैद्यकीय व्यवसायातील काहींची साठेबाजी याला मारक ठरत आहे. या साठेबाजांना शोधून काढण्यात शासनाला अपयश येत आहे. सर्वत्र व्हेंटिलेटर्सची संख्याही अतिशय तुटपूंजी आहे. जेथे मुबलक प्रमाणात व्हेंटिलेटर्स आहेत, तेथे ती कार्यान्वित करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. रुग्ण ज्या प्रमाणात वाढत आहेत, त्या प्रमाणात त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर्स, नर्स आणि अन्य कर्मचारी नाहीत. या काळात अनेक रुग्णांना प्लाझ्माची गरज भासत आहे. पण आपल्या रक्तगटाचा प्लाझ्मा मिळणेही दुरापास्त होत आहे. रुग्णांना कोणतीही वैद्यकीय सुविधा सहजासहजी मिळत नसल्याने या सुविधांच्या शोधात ते पॉझिटिव्ह असतानाही राजेरोसपणे फिरताना दिसतात. परिणामी कोरोनाचे विषाणू झपाट्याने पसरत आहेत. विषाणूची ही साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असा सूर आळवला गेला.

- Advertisement -

अर्थात लॉकडाऊन म्हणताच लोकांच्या भुवया ताणल्या गेल्या. त्यांच्या काही महिन्यांपूर्वीच्या आठवणी जागृत झाल्यात. त्यावेळी झालेले आर्थिक हाल आणि उपासमार अनेकांना डोळ्यासमोर दिसू लागली. त्यातून सुरू झाला लॉकडाऊनला विरोध. त्यातच डोमकावळ्यासारखा टपून बसलेल्या विरोधी पक्षालाही लॉकडाऊन हा नवा मुद्दा मिळाला. लॉकडाऊन जाहीर झाले नाही तोपर्यंत यांची कोल्हेकोई सुरू झाली. वास्तविक, काही महिन्यांपूर्वीचे व्हिडिओ बघितले तर लॉकडाऊनची मागणी भारतीय जनता पार्टीच्याच बर्‍याचशा मंडळींनी केली होती. परंतु, आता शासनाकडे लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असे दिसताच त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. त्यातून काही व्यापारीही विरोधासाठी पुढे आले. सत्ताधारी आघाडीतील काँग्रेसला ‘लॉकडाऊन’ हा शब्दच नको होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ‘कडक निर्बंध’ लावावेत, असे वाटत होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तारेवरची कसरत करत ‘संचारबंदी’ नावाचा मधला मार्ग शोधून काढला. लॉकडाऊन या शब्दाबाबत नकारात्मक मानसिकता तयार झाल्यानेच त्यांनी मध्यममार्ग शोधून काढला.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी त्यांनी निर्बंध अधिक कठोर करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले खरे; पण ते करताना त्यांनी सर्वच कंपन्या सुरू ठेवण्यास, किराणा दुकाने, अत्यावश्यक सेवा, शासकीय कार्यालयांत ५० टक्के उपस्थिती, सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवण्यास परवानगी दिली. यातून साध्य काय झाले? कडक निर्बंधांच्या पहिल्याच दिवशी नियमांचा फज्जा उडालेला सर्वत्र दिसला. मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले. प्रत्येकाकडे कारणे होते. अत्यावश्यक सेवेच्या नावाने प्रत्येकानेच हात धुवून घेतले. त्यातून ठिकठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडत होता. अशा परिस्थितीत कोरोना कसा नियंत्रणात येणार? नवीन निर्बंध जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी उदारमतवादी भूमिका घेतली. गोरगरीबांचा विचार केला. त्यांना अन्न-धान्य कसे मिळेल, त्यांच्या खात्यात ‘फुल ना फुलाची पाकळी’ इतके पैसे कसे पडतील याचा त्यांनी विचार केला. ‘रोजी थांबली, तरी रोटी थांबणार नाही’, असा दिलासा त्यांनी दिला आणि त्यादृष्टीने नियमावली बनवली. आधीच्या निर्बंधांत आणखी काहींचा समावेश करून व काही सवलती तशाच ठेवून सामान्य नागरिकांना अनावश्यक बाहेर पडण्यास बंदी, असे नव्या निर्णयाचे स्वरूप आहे.

- Advertisement -

मधल्या काळात अत्यावश्यक सेवेत अनेक व्यवसायांचा झालेला समावेश व सार्वजनिक वाहतुकीला असलेली परवानगी या वेळीही कायम ठेवली आहे. आवश्यक कारणाशिवाय लोकांना बाहेर पडता येणार नसेल तर असे व्यवसाय, वाहतूक सुरू असून उपयोग काय, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. या सगळ्यातून निर्णयातील विसंगती समोर येते. त्यातून गर्दीला आपसूक निमंत्रण दिले गेले. मुख्यमंत्र्यांची ही मवाळ भूमिका राज्याला घातक ठरणारी आहे. कोरोनाच्या काळात लोकांना वर्षभरापासून त्रास होतच आहे. कडक लॉकडाऊन जाहीर केले असते तर थोडाफार त्रास वाढला असता. पण विषाणूची साखळी तुटण्यास त्यातून मदत झाली असती. ‘सर सलामत तो पगडी पचास’ म्हटले जाते.

लोकांचे आज रोजगार गेले तरी त्यातून लगेच उपासमार सुरू झाली नसती. आज जगणे महत्वाचे आहे आणि जगण्यासाठी कोरोनाची साखळी तुटणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केले होते तेव्हा त्यांनी अनेक कटू निर्णय घेतले होते. पण त्याचा परिणाम कोरोनाची साखळी तुटण्यावर झाला होता. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी यंदा ठोस भूमिका घेणे अपेक्षित होती. पण त्यांनी सगळ्यांनाच खूश ठेवण्याच्या नादात मोठी आफत ओढावून घेतली. आता त्यांच्या अपयशाचे पाढे विरोधी पक्ष वाचायला मोकळा झाला आहे. खरे तर, ही वेळ राजकारण करण्याची नाही. लोकांचे जीव वाचणे महत्त्वाचे आहे.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जे निर्बंध लावले त्याचे पालन करुन रस्त्यावर गर्दीच होणार नाही यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेणे गरजेचे आहे. किंबहुना हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. आपल्या घरातील एखादी व्यक्ती बाहेर जात असेल तर त्याचे काम खरेच अत्यावश्यक आहे का याची शहानिशा करण्याची जबाबदारी आता कुटुंबप्रमुख अथवा अन्य सदस्यांची आहे. व्यावसायिकांनीही सामोपचाराने घ्यावे. आपल्या दुकानांमध्ये गर्दी होत असेल तर ती दुकाने थेट बंद करावीत. शासनावर केवळ टीकाच करण्यापेक्षा आता शासनाच्या प्रयत्नांना साथ देण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी हा अतिसंयमाचा पंधरवडा आहे.

हा संयम अगदीच अशक्य होईपर्यंत घरी थांबण्याचा आहे. शासन कसे काम करते, विरोधक त्यांच्यावर कसे तुटून पडतात, सरकारी यंत्रणा किती कार्यक्षम आहे या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून केवळ स्वत:ची, कुटुंबियांची काळजी करण्याचे हे पंधरा दिवस आहेत. महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र ‘कोरोना मुक्त’ होण्याकडे वाटचाल करेल यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी संचारबंदीचे नियम जाहीर करताना मानवतावादी दृष्टीकोन बाळगण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिलेले आहेत. अगदी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनीही जनतेला आवाहन केले आहे की, ‘पोलिसांना कुणावर लाठी वापरण्याची इच्छा नाही, पण नियमांचे उल्लंघन करून तशी वेळ आमच्यावर आणू नका’. लसीकरणासोबतच गर्दी टाळणे हा एक प्रभावी उपाय आहे, त्याचे पालन महाराष्ट्रातल्या जनतेने स्वत:हून करण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -