घरफिचर्समायमहानगर ब्लॉग‘आर या पार’ची निर्णायक लढाई....!

‘आर या पार’ची निर्णायक लढाई….!

Subscribe

शिवसेनेची शनिवारची हिंदुत्ववादी मास्टर स्ट्रोक सभा ही शिवसेनेची भविष्यातील वाटचाल देखील हिंदुत्वाच्या मुद्यावरच सुरू राहणार हे स्पष्टपणे सांगणार इतर होतीच, मात्र त्याच बरोबर केवळ भाजपच्या नेत्यांनी डिवचल्यामुळे शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाण्यावाचून पर्याय राहिला नाही असे सांगून उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे शिवसेनेला काँग्रेसच्या विचारधारेतून मुक्त करून घेतले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील यापुढचा राजकीय संघर्ष हा हिंदुत्वाच्या वाटचालीवरूनच भाजपशी तसेच मनसेशी होत राहील. मात्र हा संघर्ष होत असताना हे दोन्ही किंवा तिन्ही पक्ष हिंदुत्ववादी आहेत हे लक्षात घेण्याची गरज भाजपच्या दिल्लीतील शीर्षस्थ नेतृत्वाला लोकसभा निवडणुकीपूर्वी घ्यावीच लागणार आहे हे राज्यातील भाजप नेत्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे.

शिवसेना आणि भाजपमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने शेवटची आर या पारची लढाई सुरू झाल्याचे संकेत शनिवारच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील बीकेसी मैदानावर झालेल्या शक्ती प्रदर्शनाने स्पष्ट झाले आहे. असली हिंदुत्व नकली हिंदुत्व असे जरी शिवसेनेच्या जाहीर सभांमधून सांगितले जात असले तरी महाराष्ट्रातील मतदार ठाकरे यांचे हिंदुत्व मान्य करतात की नरेंद्र मोदी यांचे हिंदुत्व स्वीकारतात यावरच महाराष्ट्रातील या पुढील राजकीय घडामोडी आणि सत्ता समीकरण अवलंबून राहणार आहे. अर्थात कालच्या प्रचंड सभेमुळे जर कोणाला असे वाटत असेल की भविष्यातदेखील शिवसेना आणि भाजपा हे एकत्र येणार नाहीत तर ती अक्षम्य चूक ठरेल.

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शनिवारची मुंबईतील अंधेरी येथील बीकेसी मैदानावर झालेली अतिप्रचंड सभा ही भाजप, मनसे आणि त्याचबरोबर आघाडीतील दोन मित्र पक्षांना देखील शिवसेनेचे महाराष्ट्रातील सामर्थ्य दाखवण्यासाठी होती. भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा देखील शिवसेनेला महाराष्ट्रातील शत्रू क्रमांक एक गृहीत धरले आहे भाजपा नेतृत्वाकडून ज्या काही राजकीय हालचाली घडामोडी गेल्या काही महिन्यांमध्ये सुरू आहेत ते पाहता शिवसेनेचे हिंदुत्व हेच भाजपला अधिक अडचणीचे आणि धोकादायक आहे. शिवसेनेच्या या हिंदुत्वाचा धोका भाजपने निवडणुकीपूर्वी ओळखल्यामुळे शिवसेनेला हिंदुत्वा वरून डळमळीत करण्याचे डावपेच हे भाजपकडून सुरू झाले आहेत. त्याचप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तेत सहभागी झाल्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्वाला तिलांजली दिली असा जो पद्धतशीर प्रचार म्हणा भाजपकडून सुरू आहे तो शिवसेनेला अधिक घातक आहे.

- Advertisement -

शिवसेनेच्या नेत्यांना हा धोका लक्षात आल्यामुळेच शिवसेनेने मुंबईतील बीकेसी मैदानावर जे प्रचंड शक्ती प्रदर्शन केले ते भाजप आणि मनसे या थेट इशारा देण्यासाठी तर होतेच मात्र त्याचबरोबर आघाडीतील दोन पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनादेखील मुंबई महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद काय आहे हे दाखवण्याचा हा अप्रत्यक्ष प्रयत्न होता. थोडक्यात सांगायचे झाले तर हिंदुत्व याचे पेटंट एकट्या भारतीय जनता पार्टी कडे नाही तर ते शिवसेनेकडे देखील आहे असा जनतेच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आला आणि या शक्ती प्रदर्शनाला जे काही यश मिळाले ते पाहता शिवसेनेचा हा शक्तिप्रदर्शन प्रयोग यशस्वी ठरला असे म्हटले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. शनिवारच्या शिवसेनेच्या या मास्टर डोस सभेतील आणखी एक महत्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे आत्तापर्यंत शिवसेनेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे नेतृत्व म्हणून पाहिले जात होते मात्र कालच्या सभेमध्ये शिवसेनेचे तेजतर्रार नेते संजय राऊत यांचे स्थान आदित्य ठाकरे यांच्या भाषणानंतर दाखवून शिवसेनेने संजय राऊत यांना संघटनेतील क्रमांक दोनशे अत्यंत महत्त्वाचे नेतेपद बहाल केले आहे असे समजायला हरकत नाही.

अर्थात संजय राऊत हे देखील राजकीय वर्तुळात शिवसेनेची बुलंद मैदान तोफ म्हणून समजले जातात शिवसेनेच्या अंगावर येणार्‍या प्रत्येकाला संजय राऊत हे त्यांच्या स्वतःच्या शैलीने शिंगावर घेत असतात. भाजप नेतृत्वाला शिंगावर घेतल्यामुळे संजय राऊत यांनादेखील ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते हे सर्व लक्षात घेऊन आणि महाराष्ट्रातील पुढील काही वर्षातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची संजय राऊत हे एकमेव नेते असे आहेत, जे थेट शरद पवार यांच्याशी तसेच दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांड अशी संवाद साधू शकतात याची खात्री असल्यामुळेच आदित्य ठाकरे यांच्यावर संजय राऊत यांना स्थान देण्यात आले असावे. त्यामुळे महाराष्ट्रात जोपर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन परस्पर विरोधी विचारसरणी असलेल्या राजकीय पक्षांची महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आहे तोपर्यंत तरी संजय राऊत यांचे नेते पण स्वीकारण्या वाचून शिवसेनेच्या नेत्यांपुढे अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नाही हीदेखील एक वस्तुस्थिति आहे.

- Advertisement -

ती समजून घेण्याची गरज आहे. अर्थात संजय राऊत यांचे शिवसेनेतील वाढलेले वजन संघटनेतील अनेक नेत्यांना पचनी पडणारे नाही हीदेखील वस्तुस्थिती आहे, मात्र तरीदेखील जर भाजपला रोखायची असेल आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे या महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व मुख्यमंत्रीपद पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत अबाधित ठेवायचे असेल तर संजय राऊत यांच्याशिवाय पर्याय नाही याची जाणीव झाल्यामुळेच काल प्रथमच आदित्य ठाकरे यांच्यानंतर संजय राऊत यांना भाषण करण्यास पाचारण करण्यात आले. हे देखील नोंद करण्यासारखे आहे.

मुख्यमंत्री किंबहुना त्यापेक्षा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचे भाषण हे अधिक प्रभावी होते. याचं प्रमुख कारण म्हणजे शनिवारी प्रथमच राज्यात अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने शिवसेनेचे ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी प्रथमच असे स्पष्ट केले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही शिवसेनेचे शत्रू नाहीत. यासाठी त्यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातील लेखांचा बातम्यांचा देखील हवाला दिला आणि राज्यातील भाजप नेते सामनाच्या नावाने आणि अगदी स्पष्ट म्हणायचे तर शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नावाने जो काही शिमगा करतात तो कसा चुकीचा आहे हे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एकही ओळ अथवा एकही लेख, एकही बातमी चुकीची देण्यात आलेली नाही असा स्पष्ट निर्वाळा दिला यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील भाजपला जरी अंगावर घ्यायचे असले तरी देखील त्याच वेळेला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवायचे आहेत हे देखील काल स्पष्ट झाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या भाषणामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असताना भाजपातील अन्य कोणत्याही नेत्यावर अथवा केंद्रीय मंत्र्यांवर टीका करण्याचे उद्धव ठाकरे यांनी कटाक्षाने टाळले हे देखील स्पष्ट होते. आणि त्याच बरोबर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना भाजपच्या अथवा अन्य पक्षांच्या ज्या ज्या नेत्यांकडून राज्याचा गाडा चालवताना अडथळे निर्माण केले जात आहेत त्याचा उल्लेख करताना त्यांनी स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा आवर्जून उल्लेख केला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही राजकीय वर्तुळात राजकीय कार्यकर्त्यांना पदाधिकार्‍यांना प्रशिक्षण देणारी आणि थोडक्यात संस्कार शिकवणारी संस्था म्हणून ओळखली जाते उद्धव ठाकरे यांनी राज्यात सध्या जे काही राजकीय वातावरण सुरू आहे ते पाहता भाजपने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मधून प्रशिक्षित केलेले कार्यकर्ते पदाधिकारी कुठे गेले असा प्रश्न उपस्थित केला.

निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना पदाधिकार्‍यांना सध्याच्या भारतीय जनता पक्षात मानाचे स्थान मिळत नाही हे अधोरेखित केले आहे. त्यामुळे भाजपातील जुनेजाणते निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या अस्वस्थता कशी निर्माण होईल याची दक्षता त्यांनी घेतली आहे. एकूणच शिवसेनेची शनिवारची हिंदुत्ववादी मास्टर स्ट्रोक सभा ही शिवसेनेची भविष्यातील वाटचाल देखील हिंदुत्वाच्या मुद्यावरच सुरू राहणार हे स्पष्टपणे सांगणार इतर होतीच, मात्र त्याच बरोबर केवळ भाजपच्या नेत्यांनी डिवचल्यामुळे शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाण्यावाचून पर्याय राहिला नाही असे सांगून उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे शिवसेनेला काँग्रेसच्या विचारधारेतून मुक्त करून घेतले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील यापुढचा राजकीय संघर्ष हा हिंदुत्वाच्या वाटचालीवरूनच भाजपशी तसेच मनसेशी होत राहील. मात्र हा संघर्ष होत असताना हे दोन्ही किंवा तिन्ही पक्ष हिंदुत्ववादी आहेत हे लक्षात घेण्याची गरज भाजपच्या दिल्लीतील शीर्षस्थ नेतृत्वाला लोकसभा निवडणुकीपूर्वी घ्यावीच लागणार आहे हे राज्यातील भाजप नेत्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे निश्चितच अत्यंत तडफदार हुशार आणि अभ्यासू नेते म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात याबाबत वादच नाही. महाराष्ट्रात फडणीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे तब्बल एकशे सहा आमदार निवडून आले त्यामुळे निश्चितच मुख्यमंत्रिपदाची माळ ही देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात पडायला हवी होती. मात्र देवेंद्र फडणवीस हे मैदानी राजकारणात जरी जिंकले असले तरी ते दरबारी राजकारणात कुठेतरी कमी पडले हे त्यांनीदेखील स्वीकारण्याची गरज आहे. या दरबारी राजकारणाने त्यांची मुख्यमंत्रीपदाची दुसरी कारकीर्द गिळली असे म्हटले तर ते नवल वाटू नये. यापुढील काळामध्ये ठाकरे सरकार स्वतःच्या कर्माने पडेल अथवा भाजप व नेतृत्व हे सरकार पाडेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात पडेल की नाही याबाबत भाजपमध्येच अनेक तर्कवितर्क आहेत.

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अधिक अभ्यासू सरस आणि राज्यातील प्रश्नांची जाण असणारे असले तरीदेखील उद्धव ठाकरे यांनी देखील गेल्या अडीच वर्षांच्या काळात कोरोनासारखे महाभयानक संकट देशाप्रमाणे महाराष्ट्रात असतानादेखील असताना त्यांनी ज्याप्रकारे राज्याचा कारभार चालवला आहे ते पाहता राजकीय मुत्सद्देगिरीमध्ये उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्याही दोन पावले पुढे आहेत आणि त्यामुळेच त्यांनी 2019 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा झालेला पहाटेचा शपथविधी उधळून लावत महाराष्ट्राच्या सर्वोच्च सत्ता स्थानावर ते आरूढ होऊ शकले. थोडक्यात 2014 ते 2019 हा पाच वर्षांचा काळ महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा एक हाती कारभार महाराष्ट्रात चालत होता. पण 2019 मध्ये महाराष्ट्रात ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यानंतर दिल्लीतील भाजपच्या नेतृत्वाला फडणवीस यांच्या नेतृत्वातील मर्यादा देखील हळूहळू लक्षात येत आहेत आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचा कारभार हा दिल्लीश्वरांच्या सहमतीच्या आणि समन्वयाच्या राजकारणातून सुरू आहे असे म्हटले तर ती कोणालाही अतिशयोक्ती वाटू नये.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -