घरफिचर्समायमहानगर ब्लॉगWomen’s Day :आपण जर शूर असू तर घंटा कुणात हिंमत नाही आपल्याला...

Women’s Day :आपण जर शूर असू तर घंटा कुणात हिंमत नाही आपल्याला हटवायची ! -प्रियदर्शिनी इंदलकर

Subscribe
संतोष खामगांवकर
छोट्या पडद्यावर “मी भिवाली अवली कोली… ” अशी मजेदार ओळख करून देणारी ‘हास्यजत्रा फेम’ प्रियदर्शिनी इंदलकर आता घराघरांमध्ये जाऊन पोहोचली आहे. लहानपणापासूनच ती रंगमंचाशी परिचित होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिची पावलं छोट्या पडद्याकडे वळली. ‘अस्सं माहेर नको गं बाई’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकांतून ती झळकली. भाऊबळी, सोयरीक या  चित्रपटांमधून ती मोठ्या पडद्यावर आली. आता ती ‘फुलराणी’ या चित्रपटातून मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
पुण्यातच वाढलेल्या प्रियदर्शिनीचे आई-बाबा दोघेही कामाला जात. त्यामुळे घरी एकटीच असणारी प्रियदर्शनी खूप वेळ टीव्हीवरील कार्टून्स पाहायची. यातूनच  तिच्यातला डबिंग आर्टिस्ट जागा झाला आणि लहानपणीच ‘अफलातून’ या टीव्ही शोमध्ये तिची वर्णी लागली. ती म्हणते, “मला त्यावेळी खरंच माहीत नव्हतं की. कशा पद्धतीने हा प्रवास होणार आहे ?… मला फक्त एवढंच कळत होतं की,  हे सगळं करताना मला मजा वाटते !  त्यात मला जेवढं सांगितलं जातंय तेवढं मी  अचूक करायचे आणि आश्चर्य म्हणजे त्या शोची मी विनर झाले. हे माझ्यासाठी अगदीच अनपेक्षित होतं !”
प्रियदर्शनीला या जिंकण्याचा एक वेगळा आनंद होता. कारण हा शो चालू असतानाच तिचा एक अपघात झाला होता. तो अपघात तिच्यासाठी लाईफ चेंजिंग ठरला.  ती त्याबद्दल सांगते की, “ मी आणि माझी आई कारने प्रवास करत होतो आणि आमची गाडी दीडशेच्या स्पीडने डिवाइडरला धडकली. आम्ही दोघीही जवळपास मृत्यूच्या दाढेतून परत आलोय. त्याच्यातून बाहेर पडूनही व्हिक्टरी मिळणं हे खरंच अनपेक्षित होतं. त्यामुळे त्याचा आनंदच वेगळाच होता.”
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला जायचं असं प्रियदर्शनीने दहावीला असतानाच ठरवलं होतं. त्यासाठी ती सहा वर्षे तयारी करत होती. त्यासाठी तिने एनएसडीसीचे  राऊंड्सही दिले. परंतु  एनएसडीचं  तिचं स्वप्न पूर्ण झालं नाही. प्रियदर्शनी हताशपणे सांगत होती, “ जवळपास त्याच्या पुढचं माझं अख्ख वर्ष या डिप्रेशनमध्ये गेलं की, मला का नाही मिळाली ही अपॉर्च्युनिटी ?… काय कमी आहे माझ्यात हे मी शोधत राहिले आणि माझ्या जे आहे ते मी विसरत गेले. इथे कुठेतरी माझा आत्मविश्वास खचला.” याच दरम्यान तिने  ‘हास्यजत्रा’चं  पहिलं ऑडिशन दिलं. त्यात वय कमी म्हणून तिला बाद करण्यात आलं. पण वाईटातून चांगलं होतं, या उक्तीला अनुसरून तिला एक नाटक मिळालं. या नाटकाचे प्रयोग करत असतानाच ती भार्गवी चिरमुलेच्या संपर्कात आली. निखिल रत्नपारखी, नंदिता पाटकर अशा कलाकारांशी ओळखी झाल्या. दरम्यान तिचं मुंबईमध्ये पदार्पण झालं. पण सुरुवातीला मुंबई-पुणे अपडाऊन अशी कसरत सुरू झाली.
तिचे प्रयत्न चालूच असल्यामुळे ‘हास्यजत्रा’मध्ये तिची वर्णी लागली. त्यावेळी वांद्रे येथील तिच्या काकांच्या घरात राहत होती. त्या घटनेबद्दल प्रियदर्शिनी सांगते की, “ ती एकट्यापुरतीच छोटीशी खोली होती. आमच्या पुण्यातील किचनचा अर्धा भाग असं म्हटलं तरी चालेल, एवढीच ती खोली होती. पण यानिमित्ताने मुंबईतल्या खोल्यांशी माझा प्रथमच संबंध आला. माणसं मुंबईत एवढ्या लहान जागेत राहतात याची जाणीव झाली. वांद्रे ते मीरा रोडचा स्टुडिओ असे ते स्ट्रगलिंग डेज होते.  पैसे वाचवण्यासाठी बिस्किट आणि चहा-कॉफीचा नाश्ता करा, किंवा एखाद्या वेळेस जेवण स्किप करायचं असा तो सगळा काळ होता.”
प्रियदर्शिनीच्या जीवनामध्ये असं सगळं चालू असताना ‘भाऊबळी हा चित्रपट तिला मिळाला. मुंबईतील रंगपमंचावर काही कामं मिळाली. पुढे पुन्हा हास्यजत्रेचा एक सिझन सुरू झाला. ऑडिशन चालूच होते. ‘अस्सं माहेर नको गं बाई’ ही मालिका तिला मिळाली. हे सगळं मुंबई पुणे अपडाऊन करूनच ती करत होती. अशातच कोरोना आला आणि कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये ती घरी बसली.  प्रियदर्शनी सांगते की, “ यादरम्यान सुदैवानं एका ऑडिओ बुक्सचं प्रोजेक्ट मला मिळालं, ज्याच्यासाठी मी माझा आवाज दिला होता. ते पूर्ण होत असतानाच मी ‘फुलराणी’ हा सिनेमा साइन केला. शूट सुरू केलं आणि तिसऱ्या दिवशी कळलं की, पुन्हा दुसरा लॉकडाऊन लागला आहे.” लॉकडाऊनमध्ये नुकतीच ठाण्यात शिफ्ट झालेल्या प्रियदर्शिनीला पुन्हा पुण्याला जावं लागलं.  कारण  ‘फुलराणी’साठी तिने हास्यजत्रेतून आणि मालिकेतून गॅप  घेतला होता. अचानक तीनही कामं गेली.
मनोरंजन क्षेत्रातील अस्थिरतेबद्दल आणि धोक्यांबद्दल प्रियदर्शनी सांगते की, “ आपण जेवढे घाबरू नं  तेवढ युनिव्हर्स आपल्याला  घाबरवतं. आपण जर शूर असू, तर घंटा कुणात हिंमत नाही आपल्याला हटवायची !… जर  तुमच्यात तेवढी धमक असेल तर कोणीही तुम्हाला पराभूत करू शकत नाही. तुम्हाला कितीही रिजेक्शन आले तरीही तुम्ही पायावर उभे राहायला शिकलात की, तुम्हाला कुणीच रिजेक्ट करू शकत नाही. आपल्याकडे आज इंडस्ट्रीमध्ये एखाद्या व्यक्तीकडे बघून असं वाटतं की, या व्यक्तीत असं काय आहे की, आज ही एवढी यशस्वी आहे?…  तर दुसऱ्याकडे बघून वाटतं की,  एवढं टॅलेंट असूनही ही व्यक्ती का अयशस्वी आहे?… तर मला असं वाटतं की, हा त्या आत्मविश्वासाचा आणि धमक असण्या-नसण्याचा  फरक असावा. टॅलेंट तर तुमच्यात असलंच पाहिजे पण त्यासोबत तो कॉन्फिडन्सही तुम्हाला कॅरी करायला हवा. एकदा का तुमचा कॉन्फिडन्स दिसला की जगाला तुमच्यातलं टॅलेंटही दिसतं, ही मला सापडलेली गोष्ट आहे. या इंडस्ट्रीमधल्या वाईट एक्सपिरीयन्सबद्दल जे काही बोललं जातं, त्याबद्दल मला असं वाटतं की, एक स्त्री म्हणून तुम्हाला पुरुष अप्रोच करतील किंवा  स्त्रियासुद्धा अप्रोच करतील पण तुमच्यावर आहे की, त्यांना नाही म्हणायचं की, हो म्हणायचं… कामासाठी जर तुम्ही काहीही करायला तयार असाल तर नंतर तुम्ही कंप्लेंट नाही करू शकत की, माझ्यासोबत हे हे घडलं.  तुमचा जर तुमच्या तत्त्वांवर आणि टॅलेंटवर विश्वास आहे तर त्यासाठी तुम्हाला कुठलाही अनैतिक मार्ग पत्करण्याची गरज नाही. “
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -