Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग आले रे आले, विराफिन आले!

आले रे आले, विराफिन आले!

Subscribe

कोरोनाचे रुग्ण अवघ्या सात दिवसांत बरे करणारे विराफीन हे औषध आता भारतीय औषध दुकानांमध्ये येऊ घातले आहे. यात रुग्ण बरा होण्याची गती वाढते, रुग्णाला ऑक्सिजनची अपेक्षित पातळी लवकर गाठता येते असे दावे या औषध निर्मिती करणारी झायडस कॅडीला कंपनीने केले आहेत. अर्थात या दाव्यांवरही आता वैद्यकीय क्षेत्रातून मत-मतांतरे व्यक्त होऊ लागली आहेत. पण रेमडेसिवीरची ‘मोनोपॉली’ कमी करण्यासाठी हे औषध प्रभावी ठरेल हे निश्चित. अर्थात, यामुळे विराफीनची साठेबाजी करणारे सज्ज झाले नाही म्हणजे मिळवले !

कोरोना लसीची जशी चातकाप्रमाणे वाट बघितली जात होती, त्याच प्रमाणे कोरोनावर प्रभावी ठरणार्‍या औषधाचीही सगळ्यांनाच प्रतीक्षा होती. रेमडेसिवीर औषधाचा काही प्रमाणात प्रभाव दिसू लागल्यानंतर सगळ्याच डॉक्टरांनी त्याचा सपाटा लावला. अगदी ७ आणि ८ एचआरसीटी स्कोअर आणि ९४ पर्यंत ऑक्सिजन पातळी असणार्‍यांनाही रेमडेसिवीरचे इंजेक्शन दिले जाऊ लागले. परिणामी या इंजेक्शनच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. मागणी इतका पुरवठा होऊ न शकल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ उडाली आणि हीच हतबलता ‘कॅश’ करीत वैद्यकीय क्षेत्रातील काही नतद्रष्टांनी या इंजेक्शनचा काळाबाजार मांडला. त्यातून मग रेमडेसिवीरची टंचाई होऊन रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शनसाठी कुत्तरओढ झाली. त्यानंतर आता आशेचा एक किरण पुन्हा दिसू लागला आहे.

अर्थात ती साठेबाजांसाठीही आणखी एक पर्वणीही ठरू शकते. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीजीसीआयने आपत्कालीन वापरासाठी झायडस कॅडिला कंपनीच्या विराफीन या औषधाला मान्यता दिलीय. कोरोनावरील उपचारांसाठी आपत्कालीन वापरासाठी ही मान्यता आहे. अतिशय महत्वाच्या काळात हे औषध भारतात आले आहे. कोरोनाविरोधातल्या या लढ्यामध्ये त्याच्या मदतीने रुग्णांना बरे होण्यास निश्चितच मदत होऊ शकणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी हे औषध डॉक्टरांच्या परवानगीने वापरता येणार आहे. औषधाच्या तिसर्‍या टप्प्यांतील चाचण्यांचे निकाल पॉझिटिव्ह असून औषध दिल्यानंतर सातव्या दिवशी कोरोनाबाधित व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. झायडसने जाहीर केल्यानुसार, हे औषध यशस्वी ठरवण्याचे प्रमाण तब्बल ९१.१५ टक्के आहे. अर्थात हे औषध दिलेल्या कोरोनाबाधितांपैकी ९१.१५ टक्के रुग्णांचे अहवाल हे सात दिवसांमध्ये निगेटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

हे औषध केवळ प्रौढांना आणि जे रुग्ण देखरेखी खाली आहेत त्यांच्याचसाठी आहे. ज्याप्रमाणे रेमडेसिवीरचे पाच डोस द्यावे लागतात. तसे विराफीनचे नाही. त्याचा एकच डोस द्यावा लागणार आहे. त्यामुळे एकदा हा डोस हाती लागला की पुन्हा त्यासाठी मेडिकल स्टोअर्सच्या खेटा माराव्या लागणार नाहीत. हे औषध इतर आजारांवरील इजेक्शन्सप्रमाणेच त्वचेच्या खाली द्यावे लागत असल्याचे कंपनीने स्पष्ट केलेय. रुग्ण लवकर बरे होत असल्यामुळे त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज कमी होते. तसेच रुग्णाचा श्वसनातील वा फुफ्फुसातील दाह (रेस्पिरेटरी डिस्ट्रेस) देखील कमी होतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. जर रुग्णाला सुरुवातीच्या काळातच विराफीन दिले, तर करोना विषाणूचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी होतो. यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते, असे कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्विल पटेल यांनी सांगितले आहे.

हे औषध नवीन नसून ते मूळचे इंटरफेरॉन अल्फा २ बी या रासायनिक संयुगांचा पुढचा प्रकार आहे. हे संयुग १९८० मध्ये स्वीत्झर्लंडमधील ज्युरिक विद्यापीठात चार्ल्स वेस्मान या शास्त्रज्ञाने शोधले. इंटरफेरॉन अल्फा- २ बी हे या आधीपासून अमेरिका-युरोप आणि आशियाई देशात कॅन्सर ड्रग म्हणून वापरले जाते. रेमडेसिवीरसारखेच हे औषधदेखील क्रोनिक हेपेटायटिस बी, क्रोनिक हेपेटायटिस सी (रक्ताची कावीळ) यासाठी वापरले जाते. झायडस कॅडीलाने सन २०११ मध्ये ‘हेपेटायटिस सी’साठी या औषधाची निर्मिती केली होती. यात तीव्र स्वरुपाचा हेपेटायटिस बी आणि सी च्या रुग्णांवर प्रभावी उपचार केले जातात. रेमडेसिवीर या औषधालाही हेपेटायटिस सी रुग्णांवर उपाचार करण्यासाठी वापरले जात होते. मात्र, आता हे औषध कोरोना आणि श्वासाशी संबंधित आजारांवर वापरले जाते. ऑक्सिजनची कमतरता हीदेखील आजची सर्वात मोठी समस्या आहे.

- Advertisement -

या समस्येची तीव्रता कमी करण्याचे कामही विराफीन औषध करणार आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, आज ज्या रुग्णांना ८४ तास ऑक्सिजन द्यावा लागतो, त्यांना विराफीनचे इंजेक्शन दिल्यानंतर केवळ ५४ तासच ऑक्सिजन देण्याची गरज भासेल. त्यातून ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात बचतही होऊ शकते. गेल्या डिसेंबरमध्ये या औषधाच्या आरोग्य चाचण्या देशातील २५० रुग्णांवर करण्यात आल्या होत्या. त्यात दहा रुग्ण मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयातील होते. विराफीन इंजेक्शन दिल्यानंतर ऑक्सिजनची गरज कमी झाल्याचेे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. अर्थात हे इंजेक्शन प्रभावी असले तरीही त्याच्या वापरानंतर अन्य औषधे बंद करायची असेही नाही. अन्य जी औषधे आहेत, ती घेतच रहावी लागतात. त्यासोबत विराफीनचा वापर होतो. हे इंजेक्शन घेतल्यानंतर दोन ते तीन दिवसात रिकव्हरी रेट (बरे होण्याचे प्रमाण) गतीमान होतो. रेमडेसिवीर आणि फॅबिफ्लू या औषधांच्या तुलनेत विराफीन औषध अधिक गुणकारी आणि किमतीनेही कमी असू शकते.

विराफीन हे कॅन्सरविरोधी औषध आहे. त्यामुळे ज्याचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. या औषधाची किंचित जरी अधिक मात्रा दिली गेली तर रुग्णांना दुष्परिणाम दिसू शकतात, असे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या मेडिकल सायन्स डिव्हिजनचे मेरी क्युरी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. इंटरफेरॉन हे संयुग, आपल्या शरीरातील पेशींकडून, व्हायरसच्या आक्रमणाविरोधात वेगाने बनविले जाते. व्हायरस कोणता आहे याचा त्याच्याशी काही संबंध नसतो. तसेच हे संयुक्त कॅन्सर पेशींविरुद्ध हल्ला करण्यास आपल्या प्रतिकारशक्तीला मदत करते. मात्र नाण्याला दोन बाजू असतात. तसेच या औषधाच्या उपयुक्ततेच्या बाबतीतही दोन मतप्रवाह आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोविड, संशोधने आणि औषधे यांवर अतिशय महत्वपूर्ण मार्गदर्शन करणारे इंग्लंडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी विराफीन हे औषध अजूनतरी फारसे अश्वासक नसल्याचे त्यांच्या विश्लेषणात म्हटले आहे.

हे औषध अती गंभीर स्वरुपाच्या रुग्णांसाठी नव्हे तर मध्यम गंभीर स्वरुपाच्या रुग्णांसाठी वापरले जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आजाराच्या स्वरुपावरुन रुग्णाच्या सात पायर्‍यांचा मापदंड (क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट) दिला आहे. त्यात जो घरी बसून इलाज घेतो आणि लक्षणे सौम्य आहेत हा रुग्ण पहिल्या पायरीवर असतो तर ज्या रुग्णाचा कोरोनाने मृत्यू होतो असा रुग्ण सातव्या पायरीवर दाखवलेला आहे. विराफीन औषध निर्मिती कंपनीचा दावा लक्षात घेतला तर सात पायर्‍यांमधील दोन पायर्‍या गतीने चढण्याइतकीच विराफीनची उपयुक्तता आहे. मात्र यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने इंटरफेरॉन बिटा या औषधाच्या चार हजार लोकांवर चाचण्या घेतल्या होत्या. पण तेव्हा हे औषध उपयोगी नसल्याचे स्पष्ट झाले होते. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅलर्जी आणि इंन्फेक्शन डिसीजने इंटरफेरॉन अल्फा २ बी या साम्य असलेल्या औषधाच्या चाचण्या घेतल्या होत्या. मात्र त्याचे साईड इफेक्ट वाढू लागल्याने त्याच्या चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या. म्हणजेच यासंदर्भातील चाचण्या अयशस्वी ठरलेल्या आहेत.

विराफीन औषधाचा दुसर्‍या टप्प्यातील ट्रायलचा अभ्यास गेल्या महिन्यात ऑनलाईन प्रसिद्ध झाला आहे. त्याबद्दलच अनेक प्रश्नचिन्ह आहेत. आता कंपनीने तिसर्‍या टप्प्याची पीडीएफ प्रसिद्ध केली. पण याची सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. ज्यांच्यावर चाचण्या केल्या, त्या रुग्णांचीही सविस्तर माहिती उपलब्ध नाही. कंपनीच्या दाव्यानुसार विषाणूचा दाब औषध बर्‍यापैकी कमी करते. म्हणजेच सात दिवसांत रुग्णांची आरटीपीसीआर टेस्ट ही निगेटिव्ह येण्याचे प्रमाण ९५.७७ टक्के इतके असते. तर जे रुग्ण विराफीनऐवजी अन्य औषधांचा वापर करत आहेत, त्यांच्यात हे प्रमाण ७३.२४ टक्के इतके आहे. विराफीन औषध वापरले नाही तर ऑक्सिजनची आवश्यकता सहा दिवस पडू शकते आणि औषध वापरले तर आवश्यकता पाच दिवस पडू शकते.

म्हणजेच औषध वापरले तर रुग्ण पूर्णपणे बरा होतो हा दावा आश्वासक वाटत नाही, असे डॉ. संग्राम पाटील यांनी स्पष्ट केले आहे. कंपनीने तीनही टप्प्यांचे सविस्तर अभ्यास सादर करावा आणि त्यानंतर भारतातील वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यावर आपले मत मांडावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. डॉ. पाटील यांच्या विश्लेषणाने विराफीनच्या बाबतीत साशंकता व्यक्त केली गेली असली तरी सर्वसामान्यांनी मात्र त्याची चिंता वाहू नये. त्याची चिंता करायला संशोधक आणि वैद्यकीय तज्ज्ञ सज्ज आहेत. जे दोष या औषधात असल्याचे अभ्यासकांना वाटते ते दोषही लवकरच दूर केले जातील अशी अपेक्षा !

आले रे आले, विराफिन आले!
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -