घरफिचर्समायमहानगर ब्लॉगभारताचे पाकवर एकतर्फी प्रेम!

भारताचे पाकवर एकतर्फी प्रेम!

Subscribe

भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती होताना जो रक्तरंजित संघर्ष झाला आणि त्यात दोन्ही बाजूंच्या लाखो लोकांचे बळी गेले. अनेक महिलांवर भयानक अत्याचार झाले. देशाची फाळणी ही धार्मिक आधारावर झाल्यामुळे अनेकांना आपली राहती घरेदारे, शेतीवाडी, मालमत्ता जागाच्या जागी सोडून स्थलांतर करावे लागले. देशाच्या फाळणीच्या या वेदना कधीही विसरता येणार नाहीत, त्यामुळेच १४ ऑगस्ट हा दिवस यापुढे फाळणी भय स्मृती दिन म्हणून ओळखला जाईल, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केले. हा दिवस भेदभाव, शत्रुत्व आणि द्वेष संपवण्यासाठी प्रेरणा तर देईलच, पण त्याचसोबत एकता, सामाजिक सद्भावना अधिक मजबूत होतील, असे मोदींनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयावर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने शंका उपस्थित केल्या आणि मोदींचा हा नवा डाव असल्याचे सूचित केले. फाळणीच्या वेदना ताज्या करून मोदींना काय मिळवायचे आहे. त्यातून देशात पुन्हा विभाजनवादी प्रवृत्ती वाढीस लागतील, असा आरोप केला आहे.

मोदींनी हा निर्णय लालकिल्ल्यावरून दुसर्‍या दिवशी पंधरा ऑगस्टला केलेल्या भाषणातून का जाहीर केला नाही, त्यांनी इतका महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यासाठी ट्विटरचा आधार का घेतला, हाही एक विचार करण्यासारखा विषय आहे. भारताची फाळणी आणि त्यावेळी एकाच देशातील नागरिकांनी विभाजन झाल्यानंतर एकमेकांची उडवलेली अमानुष कत्तल याची आता कुणालाच आठवण काढायची नाही. त्या गोष्टी विसरून जायच्या आहेत. कारण त्याची पुन्हा आठवण काढण्यात आली तर पुन्हा दोन्ही देशांमधील नागरिकांमध्ये आपल्या पूर्वजांवर इतके अत्याचार झाले, या भावनेतून एकमेकांविरुद्ध राग उफाळू शकतो तसेच त्याला एक दुसरी बाजू आहे, ती म्हणजे दोन्ही बाजूंच्या देशातील लोक जे झाले ते पुन्हा कधी घडू नये, याची काळजी घेतील, अशीही एकही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

पण १९४७ नंतर दोन्ही देशांमधील संबंध पाहता आणि दररोज सायंकाळी वाघा बॉर्डरवर दोन्ही बाजूंच्या सैनिकांची आक्रमक परेड आणि दोन्ही बाजूंच्या नागरिकांचा एकामेकांविरुद्धचा जोश पाहिला की, या फाळणीच्या वेदनांचे स्मरण करून काय साध्य होणार आहे, असा प्रश्न पडतो. जगभरामध्ये जेव्हा भावनेच्या भरात मोठ्या प्रमाणात हिंसा घडते, तेव्हा तसे पुन्हा होऊ नये, दोन्ही बाजूंनी त्यावर आत्मचिंतन करावे, या अपेक्षेने काही स्मृती जपल्या जातात. पण त्यासाठी दोन्ही बाजूंची अनुकूलता असावी लागते. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गेल्या ७४ वर्षांचे संबंध पहिल्यावर या फाळणी भयस्मृती दिवसाचे पाकिस्तानला फारसे काही सोयरसुतक असेल असे वाटत नाही. कारण भारताने पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी बरचे प्रयत्न केले. पण ते नेहमीच भारताच्या अंगलट आले, असेच दिसून आलेले आहे.

मुळात पाकिस्तानची निर्मिती ही धार्मिक आधारावर झालेली आहे. भारताची फाळणी होईल आणि देशाचे दोन तुकडे होतील, असे कुणाला वाटत नव्हते. पण भारताला स्वातंत्र्य मिळेल, असे वाटू लागल्यावर कट्टर मुस्लीम नेते, मुल्ला मौलवी यांनी हिंदूंसाठी हिंदुस्थान आणि मुस्लिमांसाठी पाकिस्तान, अशी भूमिका घेतली. भारतात राहून आपल्याला अपेक्षित राजकीय मानसन्मान मिळणार नाही, याची कल्पना महमदअली जीना यांना येऊ लागली, त्यात त्यांना मुस्लीम कट्टरवाद्यांची साथ मिळाली, त्यात पुन्हा भारतासारखी मोठी वसाहत आपल्या हातून सुटत आहे, याचे शल्य ब्रिटिशांना होते, त्यामुळे भारताचे दोन तुकडे होतील, असे ब्रिटिश पाहत होते. ज्यामुळे या दोन देशांंतील संघर्षाचा त्यांना पुढील काळात फायदा होईल. मुस्लिमांच्या भडकलेल्या भावनांचा त्यांनी फायदा उठवला आणि भारताच्या फाळणीला अप्रत्यक्षपणे चिथावणी दिली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर हिंदूंची बहुसंख्या असलेल्या भारतात आपल्याला नेहमीच दुय्यम वागणूक मिळेल, अशी भीती येथील मुस्लिमांमध्ये जीना समर्थकांकडून निर्माण करण्यात आली. त्यात पुन्हा स्वातंत्र्य लढ्यात लढणार्‍या जहालवादी आणि मवाळवादी या दोन्ही विचारसरणींमध्ये मतभेद होते. जीना हे जहालवादी होते.

- Advertisement -

त्यांच्यासमोर असणारे काँग्रेसचे नेते हे महात्मा गांधींच्या प्रभावाखालील मवाळवादी होते. शेवटी ‘लढके लेंगे पाकिस्तान’ या उन्मादक वृत्तीसमोर काँग्रेसच्या नेत्यांचे काही चालेनासे झाले. भारतातील शहरे आणि गावोगावी धार्मिक दंगली पेटविण्यात आल्या. शेवटी काँग्रेस नेत्यांचा नाईलाज झाला आणि भारताची फाळणी त्यांना मान्य करावी लागली. हिंदू आणि मुस्लीम ही दोन वेगळी राष्ट्रे आहेत, असे सांगून जीनांनी ‘टू नेशन थिअरी’ मांडली. पण गेल्या ७४ वर्षांतील पाकिस्तानची वाटचाल पाहता जीनांची ‘टू नेशन थिअरी’ अपयशी ठरलेली आहे, असेच दिसून येत आहे. पाकिस्तान आज अतिरेक्यांचा अड्डा बनलेला आहे, पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीचे धिंडवडे निघाले आहेत, कराचीमधील जीनांचे वडिलोपार्जित घर मागे अतिरेक्यांनी उद्धस्त केले.

सरकार, लष्कर, मुल्ला-मौलवी आणि अतिरेक्याच्या संघटना अशा चार भागात पाकिस्तान विभागला गेला आहे. तिथे कधी काय होईल, हे सांगता येत नाही. तिथल्या सामान्य लोकांना ‘क्या इसिलिए बना था पाकिस्तान’, असे म्हणून कपाळावर हात मारायची वेळ आलेली आहे. पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादामुळे जगातील कुठलेही उद्योग तिथे गुंतवणूक करत नाहीत. त्यामुळे त्या देशाची आर्थिक स्थिती खिळखिळी झालेली आहे. आर्थिक चणचणीवर मात करण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांचे शासकीय निवासस्थान भाड्याने द्यायची वेळ आलेली आहे. काँग्रेस असो वा भाजप असो, त्यांनी पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचा अनेकदा प्रयत्न केला. दोन्ही देशांमध्ये पिपल टू पिपल कॉन्टॅक्ट येऊन संबंध सुधारण्यासाठी बससेवा, रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या, पण त्याचा काही उपयोग झालेला नाही.

जगभरात जिथे मोठा हिंसाचार झाला तिथे त्याच्या भयस्मृती जपण्यासाठी काही संग्रहालये उभारण्यात आली आहेत, ते पाहिल्यावर लोकांच्या मनात अशी भावना निर्माण होते की, जगात पुन्हा असा हिंसाचार टाळायला हवा. पण पाकिस्तान हाच मुळात भारतद्वेषातून जन्मास आलेला देश आहे. देशाच्या विभाजनाला हिंदू-मुस्लीम या धार्मिकतेसोबतच भारतातील वर्ग संघर्षाची पार्श्वभूमी आहे. भारताला पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवायचे आहेत, पण पाकिस्तानच्या त्यांच्या निर्मितीपासूनच्या कारवाया पाहिल्या तर त्यांना भारतासोबतच संबंध सुधारण्याची इच्छा दिसत नाही, असेच स्पष्ट होत आहे. पाकिस्तानमधील सामान्य नागरिक हा भारतविरोधी नाही, पण तेथील राज्यकर्ते, लष्कर, मुल्ला-मौलवी, अतिरेकी संघटना यांना मात्र भारतविरोध जोपासायचा आहे.

कारण त्यामुळेच त्यांचे अस्तित्व टिकून आहे. फाळणीच्या भयस्मृतींचे स्मरण करून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी भर देत असतील तर त्यांचा अटलबिहारी वाजपेयी यांचा झाला तसा अपेक्षाभंग होईल. कारण भारत प्रेमाची भाषा करतो, पण पाकिस्तानला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. त्यामुळे फाळणीच्या भयस्मृती दरवर्षी आठवून संबंध सुधारूया, हे भारताचे एकतर्फी प्रेम उपयोगाचे नाही. त्यासाठी जशास तशी भूमिका घेणे आवश्यक आहे. एका बाजूला मोदी सरकार फाळणीचे भय लक्षात ठेवायला सांगत आहे, तर दुसर्‍या बाजूला सीमेवरून सतत गोळीबार करून पाकिस्तान भय निर्माण करीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -