आता अंतर्गत मुद्यांवर गप्प का?

पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावर ट्विट करत या सेलिब्रिटींची झोप उडवून दिली होती. यानंतर ज्या पद्धतीने भारतीय सेलिब्रिटी रिहानाच्या ट्विटरवर तुटून पडत हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे, यामध्ये हस्तक्षेप करु नका सांगू लागले. मग आता हे कलाकार कोरोनामुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेचं दिवाळं निघालं आहे. त्यावर का नाही बोलत? सत्ताधार्‍यांना का प्रश्न विचारत नाहीत ? रिहानाच्या ट्विटवर गळे काढून ओरडणारे सेलिब्रिटी आता अंतर्गत मुद्यांवर मूग गिळून गप्प आहेत. कारण या कलाकारांना कणाच नाही.

देशातील व्यवस्थेविरुद्ध बोलण्यासाठी सर्वांकडे ताठ कणा असावा लागतो. हा कणा भारतीय सेलिब्रेटींना आहे का? असा प्रश्न आपसूक उपस्थित होतो. याचं कारण असं की देशात जे काही सुरू आहे त्याविरोधात आवाज उठवण्यात, रोखठोक परखड मत व्यक्त करण्यात हे सेलिब्रेटी धजावतात. हे चित्र गेले काही वर्षे प्रकर्षाने दिसत आहे. हे सेलिब्रेटी सत्ताधार्‍यांच्या पालखीचे भोई झाले आहेत. ताजं उदाहरण घ्यायचं झालं शेतकरी आंदोलनावर एका जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर ज्या पद्धतीने भारतीय सेलिब्रेटी रिहाना विरोधात एकवटत हा आमचा आंतरिक मुद्दा असून केंद्र सरकारचा निर्णय कसा योग्य आहे, हे दाखवण्यासाठी ट्विटवर ट्विट करु लागले.

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत होते. अनेकदा शेतकर्‍यांनी उपोषण केलं. रॅली काढल्या. या आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना केंद्रीय मंत्र्यांनी, भाजप खासदारांनी, आमदारांनी आणि नेत्यांनी दहशतवादी म्हणून हिणवलं. या शेतकर्‍यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक केंद्राने दिली. यावर अमेरिकन पॉपस्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनावर ट्विट केलं आणि एकच स्फोट झाला. शेतकरी आंदोलनाची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ लागली. रिहानाच्या ट्विटनंतर भारतीय सेलिब्रेटी समोर आले. ही आमची आंतरिक बाब आहे. बाहेरच्यांनी बोलू नये असे ट्विट अनेक कलाकारांनी, खेळाडूंनी केलं. भारताचे अनेक सेलिब्रिटी रिहानाविरोधात एकवटले. क्रिकेटचा गॉड सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर, अजय देवगण, कैलाश खेर, कंगणा राणावत आदी सर्वच कलाकारांनी रिहानाविरोधात ट्विट केलं. बाहेरच्या देशातील व्यक्तीला भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असं ट्विट सत्ताधार्‍यांच्या पालखीचे भोई झालेल्या सेलिब्रिटींनी केलं.

गेले ७० दिवस शेतकरी आंदोलन करत होते. मात्र, रिहानाच्या ट्विटनंतर या कलाकारांना, खेळाडूंना शेतकरी आंदोलन करत असल्याचं जाणवलं. रिहानाने फक्त शेतकरी आंदोलनावर बोलत का नाही, असा प्रश्न केला. या नंतर अनेक कलाकार, खेळाडू एकामागून एक ट्विट करु लागले. परंतु ते शेतकर्‍यांच्या बाजूने न बोलता केंद्राने केलेले कायदे कसे चांगले असं सांगू लागले. रिहानाला ज्या पद्धतीने आमच्या आंतरिक मुद्यांवर बोलू नका म्हणून सांगत होते, ते आता देशातील परिस्थितीवर गप्प का आहेत?

देशाला कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा जबर फटका बसला आहे. दिवसागणिक लाखांच्या घरात रुग्णसंख्या आढळत आहे. यामुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. कोरोनाच्या या महामारीने देशाची आरोग्य व्यवस्था कशी पोकळ आणि अकार्यक्षम आहे याचं वास्तव जगासमोर आलं आहे. लोकांचा ऑक्सिजनअभावी, व्हेंटिलेटर्स अभावी, आवश्यक असलेली औषध मिळत नसल्यामुळे मृत्यू होत आहे. हे सर्व बळी देशाच्या जीर्ण झालेल्या आरोग्य व्यवस्थेचे, राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाचे आहेत.

शेतकरी आंदोलनावरून जेव्हा जगभरातील नागरिकांनी असंवेदनशील सरकारवर टीका केली, तेव्हा सरकारच्या आदेशावरून या सेलिब्रिटींनी देशाचा अतंर्गत मुद्दा असल्याचे सांगत नकली नाराजी व्यक्त केली. आता त्यांची निवडक नाराजी कुठे आहे? सगळीकडे भारतीय मरत आहेत. प्रत्येक क्षणाला मरत आहेत, पण या पोकळ आदर्शांना थोडाही त्रास होत नाही.

सगळ्यांनाच सत्ताधार्‍यांच्या पालखीचे भोई होता येत नाही. काहीजण पाठीला कणा आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, अनुराग कश्यप असेल…किंवा ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर दक्षिणेतला अभिनेता सिद्धार्थ. सिद्धार्थ हा गेले काही दिवस सातत्याने व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवत आहे. सिद्धार्थने ‘रंग दे बसंती’ चित्रपटामध्ये काम केलं आहे. या चित्रपटात तो विद्रोही दाखवला आहे तोच त्याच्या आयुष्यातही विद्रोही आहे. तो सरकारला प्रश्न विचारतो म्हणून त्याला आणि त्याच्या घरच्यांना धमकीचे फोन्स येतात. तरीही तो घाबरत नाही आहे. भाजपच्या तामिळनाडू आयटी सेलने त्याचा नंबर लीक केला, शिवीगाळ, जीवे मारण्याची, बलात्काराची धमकी देणारे जवळपास ५०० फोन आले. पण त्याने न घाबरता मी गप्प बसणार नाही, मी बोलत राहणार असं ठणकावून या व्यवस्थेला सांगितलं आहे. हे असे कणा असलेले हातावर मोजण्या इतकेच सेलिब्रिटी आहेत.

देशात आरोग्य आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांचा ऑक्सिजन अभावी तडफडून मृत्यू होतोय. रुग्णांना बेड मिळत नाहीत. रेमडेसिवीरसारखी आवश्यक औषधांसाठी वणवण फिरावं लागतंय. रुग्णालय आणि स्मशानभूमीतील फरक नाहीसा झाला आहे. रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाही आहेत. ऑक्सिजन न मिळता लोकांचा तडफडून मृत्यू होतो हे अत्यंत धक्कादायक आहे. या सगळ्याला जबाबदार हे सत्ताधारी, ही व्यवस्था आहे. या व्यवस्थेला त्यांची चूक दाखवून द्यावी लागेल. परंतु हे सेलिब्रिटी सत्ताधार्‍यांच्या पालखीचे भोई झालेले आहेत.

याशिवाय, एकीकडे देशातील नागरिक उपचारांअभावी तडफडून मरत असताना, खायला अन्न मिळत नसताना हे सेलिब्रिटी मालदीवला ‘व्हेकेशन मोड’वर गेले आहेत. यांचा समाचार त्यांच्यासोबतच काम करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने घेतला आहे. लोकांना पोट भरण्यासाठी अन्न नाहीय आणि तुम्ही पैसे उधळत आहात. जरा तरी लाजवाटू द्या! अशा शब्दांत नवाजुद्दीन सिद्दीकीने फटकारलं आहे. यानंतर आता काही कलाकार मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. पण मदत करुन चालणार नाही. गरीबांना जेवळ देण्यासाठी, वैद्यकीय सामुग्री पुरवण्यासाठी पुढे आले आहेत. देशातील वेगवेगळ्या शहरांतील लोकांनी हाकेला प्रतिसाद दिला. कित्येक कलाकार यासाठी पुढे आले. या गोष्टीचं मुख्य प्रवाहातील मीडियाने तसंच सोशल मीडियाने जयजयकार केला.

परंतु ज्या प्रश्नाला मुख्य प्रवाहातील मीडियाने मोठ्या हुशारीने बाजूला सारलं. तो म्हणजे, अशा मोहिमांद्वारे आरोग्य व्यवस्थेची झालेली दुर्दशा सुधारणार आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. अशा मोहिमांनी समस्या सोडवणं शक्य नाही. मुळात अशा मोहिमा मदत देण्याच्या नावाखाली वास्तवात जनतेची दिशाभूल करतात आणि समस्येचे मुळापर्यंत जाण्यात अडथळे निर्माण करतात. अशा मोहिमा जनतेच्या मनात सुधारवादी राजकारणाबद्दल विश्वास निर्माण करतात आणि क्रांतीकारी राजकारणापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी एक भक्कम भिंत उभी करतात. सध्याच्या आरोग्य व्यवस्थेची होत असलेली दुर्दशा अशा कोणत्याही तात्कालिक मदतीच्या मोहिमेतून कमी होऊ शकत नाही. यासाठी सरकारलाच ठोस पावले उचलावी लागतील. जर सरकार काहीच करत नसेल तर त्यांना प्रश्न विचारावा लागेल.

परंतु हे सेलिब्रिटी या व्यवस्थेला, व्यवस्थेत काम करणार्‍यांना प्रश्न विचारणार नाहीत. हाच फरक आहे भारतातील आणि परदेशातील सेलिब्रिटींचा. जेव्हा पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावर ट्विट करत या सेलिब्रिटींची झोप उडवून दिली होती. यानंतर ज्या पद्धतीने भारतीय सेलिब्रिटी रिहानाच्या ट्विटरवर तुटून पडत हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे, यामध्ये हस्तक्षेप करु नका असे सांगू लागले. मग आता हे कलाकार कोरोनामुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेचं दिवाळं निघालं आहे. त्यावर का नाही बोलत? देशातील नागरिकांचा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तडफडून मृत्यू होतो. हे अत्यंत धक्कादायक आहे. या बायाबापड्यांचा, गोरगरीब जनतेच्या जीवाला किंमत आहे की नाही? देशातील नागरिकांचा जेव्हा उपचारांअभावी मृत्यू होतो, तेव्हा तथाकथित आमच्या अंतर्गत मुद्यांवर बोलू नका म्हणून टिमक्या मिरवणार्‍या सेलिब्रिटींना जराही पाझर फुटत नाही. हे मुद्दे या लोकांना आंतरिक मुद्दे वाटत नाहीत की सत्ताधार्‍यांच्या दावणीला तुम्ही बांधले गेले आहात? या लोकांना या व्यवस्थेला, या सत्ताधार्‍यांना प्रश्न विचारण्याची हिंमत होत नाही.

या असल्या सेलिब्रिटींना लोकांनी आदर्श मानला, यांना डोक्यावर घेतलं, हीच चूक केली आहे. आवडत्या अभिनेत्याचा, अभिनेत्रीचा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांबाहेर तिकीटांसाठी रांगेत ताटकळत उभं राहिले. त्या या लोकांना आता ऑक्सिजन, रुग्णालयात बेड, उपचार मिळत नाहीत, तेव्हा या कलाकारांना जराही दु:ख वाटत नाही का? की आम्हाला ज्यांनी डोक्यावर घेतलं त्यांना असं उपचारांअभावी मरावं लागतंय की या सेलिब्रिटींना या व्यवस्थेची भीती वाटतेय. कारण व्यवस्थेविरुद्ध बोलणार्‍यांना त्याची शिक्षा मिळते. याचं उदाहरण म्हणजे तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांच्या घरावर टाकलेल्या आयकर विभागाच्या धाडी. परंतु हे कलाकार काही डगमगले नाही. अशा धाडी पडल्यावर भलेभले राजकारणी गप्प बसले, पण हे कलाकार आजही व्यस्थेविरुद्ध बोलत आहेत. कारण या कलाकारांना कणा आहे. पण जे शेतकरी आंदोलनावेळी रिहानाच्या ट्विटवर गळे काढून ओरडणारे सेलिब्रिटी आता अंतर्गत मुद्यांवर मूग गिळून गप्प आहेत, कारण या कलाकारांना कणाच नाही.