महिला दिन विशेष : स्त्री सबलीकरणातून बलवान भारताकडे!

International Women's Day

ज्या घरातील सूत्रे स्त्रीकडे ते घर प्रगतीकडे. ज्या देशातील स्त्री बलवान तो देश महान!

गार्गी, मैत्रेयी व लोपामुद्रा पासून सुरू झालेला स्त्री महतीचा प्रवास सावित्रीबाई फुलेंमार्गे सुधा मूर्ती, निर्मला सीतारामन, सिंधुताई सपकाळ आणि गीता व बबीता फोगाट बहिणींपर्यंत येऊन पुढे निरंतर चालू राहणार आहे. प्राचीन इतिहास काळापासून आजपर्यंत अनेक महिलांनी स्वतःला अनेक क्षेत्रांमध्ये सिद्ध केलेले आहे. ते राजकारण, समाजकारण, शिक्षण असो वा इतर कुठलेही क्षेत्र असो, त्यात महिलांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

युनिसेफ असे सांगते की ज्या मुलींना शिक्षण मिळते त्यांचा विवाह योग्य वेळी होतो. अशा मुली निरोगी जीवन जगतात आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनतात. मुलींच्या शिक्षणामुळे त्यांच्यात उत्पादनक्षमता निर्माण होते आणि कुटुंबाचे भविष्य उज्वल होते. युनिसेफचा एक अहवाल असेही सांगतो की लहान मुलांकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा मेंदू असतो. पण दुर्दैवाने त्याच्याकडे बऱ्याच वेळेला लक्ष दिले जात नाही. उत्तम दर्जाचे प्राथमिक शिक्षण देणे म्हणजेच त्याच्या मेंदूची काळजी घेणे. ही एक जबाबदार नागरिक बनवण्याची पायाभरणी आहे.

बालकांच्या आयुष्यातली पहिली पाच ते सात वर्षे फार महत्त्वाची असतात. याच कालखंडामध्ये त्याच्या मेंदूचा विकास फार मोठ्या प्रमाणात होत असतो. हे लक्षात घेऊन शैक्षणिक धोरणांमध्ये बदल करून नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ आणण्याची भूमिका शासनाने घेतलेली आहे. ज्यात प्राथमिक शिक्षणाची सुरुवात बालवाडीपासून होणार आहे.

युनिसेफचा अहवाल सांगतो, की भारतात तीन ते पाच वयोगटातील ७०% बालक प्राथमिक शिक्षण घेत आहेत. हे प्रमाण पुढे वाढत जाऊन शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचल्यास नव्या सशक्त भारताची निर्मिती होईल.

प्राथमिक शिक्षणाबरोबरच माध्यमिक आणि उच्च शिक्षणातील मुलींच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. ‘शिकलेली आई घर पुढे नेई’. शाळेतील चिमुकल्यांच्या तोंडून निघणारे हे घोषवाक्य, आई शिकत आहे आणि घर पुढे नेत आहे याचे प्रतीक आहे.

स्त्रीच्या जीवनात दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे शिक्षण आणि दुसरं म्हणजे लग्न. हे लक्षात घेऊन, शासनाने ‘सुकन्या समृद्धी योजना’ पोस्टाच्या माध्यमातून सुरू केली. स्त्री सबलीकरणासाठी उचललेले हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. या माध्यमातून स्त्री सबलीकरणास गती प्राप्त झालेली आहे. मुलीच्या जन्माबरोबरच तिचे पोस्टात खाते उघडून तिला आर्थिक दृष्ट्या सबल केले जात आहे. त्याचबरोबर योग्य वेळी शिक्षणासाठी खर्च म्हणून त्याच खात्यातून तिला काही रक्कम प्राप्त होणार आहे, ज्या आधारे ती तिचे शिक्षण पुढे चालू ठेवेल आणि शेवटच्या टप्प्यात म्हणजेच विसाव्या वर्षी, तिच्या विवाहासाठी उरलेली रक्कम प्राप्त होईल.

मुलींना प्राथमिक शिक्षण मिळावे आणि प्राथमिक शाळेतील मुलींच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्या शाळाबाह्य होऊ नयेत यासाठी शासनाकडून पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याचा परिणाम म्हणून खूप मोठ्या प्रमाणात मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येत आहेत. निवासी शाळा आणि वस्तीगृहांची संख्या वाढल्यामुळे शिक्षणापासून दूर असलेल्या खेड्यापाड्यातील मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलेल्या आहेत. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातून आलेल्या या मुलींच्या राहणे, खाणे-पिणे शैक्षणिक साहित्य आणि गणवेश याची सोय झाल्यामुळे त्या आपले शिक्षण पुढे चालू ठेवू शकत आहेत.

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हे आता जनआंदोलन झाले आहे. ज्याचा परिणाम म्हणून मुलींच्या संख्येमध्ये आणि शिक्षणामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एखादी शासकीय योजना जेव्हा जनआंदोलनाचे रूप धारण करते, तेव्हा ती किती व्यापक आणि प्रभावशाली होते याचे एक उत्तम उदाहरण आहे.

प्रातर्विधीसाठी महिलांना वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागलेला आहे. याचा परिणाम सरळ त्यांच्या आरोग्यावर होतो हे शासनाच्या लक्षात आल्यामुळे स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत सबंध देशामध्ये अकरा कोटी टॉयलेट्स बांधण्यात आले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आलेल्या स्वच्छतागृहांमुळे महिलांचा त्रास कमी झालेला आहे.

सुधा मूर्ती एक विचारवंत, समाज सुधारक, उद्योजक आणि अत्यंत संवेदनशील असलेल्या लेखिकेने ग्रामीण भागात महिलांसाठी दहा हजार स्वच्छतागृहे बांधली. आपल्याला झालेला त्रास इतर स्त्रियांना होऊ नये याच एका प्रामाणिक हेतूने सुधा मूर्तींनी इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधली. एका बलवान स्त्रीने इतर स्त्रियांच्या जीवनातील दुःख कसे कमी करावे? याचे एक उत्तम उदाहरण आहे. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या समस्येबद्दल अत्यंत संवेदनशील असते आणि त्यावर शक्य असेल त्या उपाययोजना करत असते. तसेच ती सकारात्मक विचार आणि कृती करत असल्याचे लक्षात येते. ग्रामीण दुर्गम भागातील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘आशा’ आरोग्य सेविकांचे कार्य फार मोलाचे आहे. खेड्यापाड्यातील गर्भवती आणि आजारी महिलांसाठी ती एक आशेचा किरण आहे.

चुलीचे आणि महिलेचे नाते फार जवळचे आहे. पारंपरिक चुलींमध्ये वापरण्यात येणाऱ्या इंधनापासून फार मोठ्या प्रमाणात धूर निघतो. ज्याचा थेट परिणाम स्त्रीच्या आरोग्यावर होतो. त्यातून तिचे आयुर्मान कमी होणे, दृष्टी त्रास अशा विविध त्रासाला तिला समोरं जावं लागत होतं. मात्र १ मे २०१६ ला सुरू झालेल्या शासनाच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत देशातील ७१५ जिल्ह्यांमध्ये आठ कोटींहून अधिक दारिद्र रेषेखालील महिलांना गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले आहेत. यातून तिचा त्रास कमी होऊन वेळही वाचतो आणि अप्रत्यक्षपणे आरोग्याचीही काळजी घेतली जात आहे.

शिक्षण, आरोग्य, उद्योजकता, खेळ आणि समाजकारण अशा अनेक ठिकाणी महिलांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. शिक्षण हे महिला सबलीकरणाचा केंद्रबिंदू आहे आणि आरोग्य हे तिच्या सबलीकरणाचा पाया आहे. बचत गटाच्या माध्यमातून स्त्री उद्योगी आणि स्वावलंबी बनली आहे.

स्त्रीच्या प्रगतीच्या वाटेमध्ये बांध घालणे सोपे आहे पण त्याच्या दुष्परिणामांची कल्पनाही करणे फार अवघड आहे. मानवाच्या प्रगतीमध्ये तिचा वाटा फार मोठा आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते हा विचार आता जुना झाला आहे. कारण प्रत्येक क्षेत्रांमध्ये स्त्रीने स्वतःला सिद्ध केले आहे.

लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी संगीताची केलेली सेवा हिमालयाइतकी मोठी आणि महान आहे. मधुबाला, हेमामालिनी, माधुरी दीक्षित सारख्या इतर अनेक दिग्गज सिनेकलाकारांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवून चित्रपटसृष्टीला एक वेगळी उंची दिली आहे. अपर्णा सेन, दीपा मेहता सारख्या अनेक दिग्गज महिलांनी फिल्म निर्मात्या म्हणून आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. मेरी कोमने घर आणि मुलं सांभाळता सांभाळता मुष्टी योद्धा म्हणून स्वतःला सिद्ध करत ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक प्राप्त केलं आहे. अनिता देसाई, अरुंधती रॉयसारख्या अनेक महिलांनी आपल्या लिखाणातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सीमा राव या ‘वंडर वुमनला’ भारताची पहिली महिला कमांडो ट्रेनर म्हणून सन्मान प्राप्त झाला आहे. ती ‘क्लोज क्वार्टर बॅटल’ मध्ये एक्सपर्ट आहे. पूनिता अरोरा आणि मिताली मधुमतीसारख्या अनेक महिलांनी भारतीय सैन्यदलामध्ये उत्कृष्ट योगदान दिले आहे. किरण बेदीने पोलीस दलामध्ये दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. या सर्वच महिलांनी आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटविला आहे. भावी पिढीतल्या मुलींसाठी त्या रोल मॉडेल आहेत. मुलींनी यांना पाहून प्रेरणा घ्यावी आणि आपल्याला जमेल त्या, आपल्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये स्वतःस सिद्ध करावे. स्त्रीमध्ये असलेल्या अनेक गुणांपैकी जिद्द आणि चिकाटी हे दोन अत्यंत महत्त्वाचे गुण आहेत. ज्या जिद्दीने आणि चिकाटीने या महिलांनी स्वतःला सिद्ध केलं आहे, त्याच जिद्दीने आणि चिकाटीने मुलींनी स्वतःला सिद्ध करावे.

पूर्वी केवळ शिक्षण खात्यामध्येच शिक्षिकेची भूमिका पार पाडणारी स्त्री आज बँक, पोस्ट ऑफिस, रेल्वे, आरोग्य विभाग, दूरसंचार विभाग, फॉरेस्ट डिपार्टमेंट, तहसील कार्यालय, जिल्हापरिषद यांसारख्या अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पदावर कार्यरत असलेली दिसते. तिचा वावर आता गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत झाला आहे. आणि रोड वरून तो आकाशापर्यंत गेला आहे. स्कूटर, कार चालवणाऱ्या महिला आता मोठ्या प्रमाणात वैमानिक ही बनू लागलेल्या आहेत. काही क्षेत्र केवळ पुरुषांसाठी आहेत हा विचार मोडून काढून बऱ्याच महिलांनी स्वतःला त्या क्षेत्रात सिद्ध केलेलं आहे.

स्त्री-पुरुष विषमता हा भूतकाळ होता. स्त्री-पुरुष समानता हा वर्तमानकाळ आहे. स्त्री आणि पुरुष जीवन रुपी नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन्ही बाजू समान असतात, त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुष हे समान आहेत ही जाणीव आज प्रत्येकामध्ये निर्माण होत आहे.

डॉ. अजित मुळजकर, डॉ. नरेश पिनमकर


लेखक परिचय –

डॉ. अजित मुळजकर – लातूरच्या निलंग्यातील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक

डॉ. नरेश पिनमकर – लातूरच्या निलंग्यातील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे सहाय्यक प्राध्यापक