आयपीएलच्या आनंदाला टाळेबंदी

IPL 2021 Schedule: View the complete IPL schedule with one click

कोरोनामुळे भीतीच्या वातावरणाखाली सध्या सारा देश असून लॉकडाऊन लागू केल्याने बहुतांश माणसे घरात बसून आहेत. अशा वेळी चार भिंतीच्या आड मनाला आधार देण्याचा काही रस्ता दिसत नव्हता, तेव्हा आयपीएल त्यावर थोडे फुंकर घालण्याचा प्रयत्न करत होती. जणू निराशा दूर करण्याचे हे काम होते. आजूबाजूला कोरोनामुळे आज तो गेला, काल त्याचे असे झाले. ऑक्सिजन मिळत नाही, रेमडेसिवीर वेळेत मिळाले नाही म्हणून रुग्ण वाचू शकले नाही, अशा बातम्या चारी बाजूंनी येत असताना तनामनात कोरोनाचा काळोख भरून राहिला होता. अशा अंधार्‍या वेळी आयपीएलचे सामने हा काळोख थोडा फार दूर करण्याचा प्रयत्न करत होते.

मुख्य म्हणजे तरुण पिढी आयपीएलच्या निमित्ताने तरी घरी रहात होती. त्यांना घरात बांधून ठेवल्यासारखे वाटत नव्हते. पण, आता हा आनंदसुद्धा कोरोनाने हिरावून घेतला आहे. अतिशय सुरक्षित वातावरणात सुरू असलेली आयपीएल कोरोनापासून मुक्त राहील असे दिसत असताना तिला कोरोनाने गाठले. शेवटी ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयपीएलमधील उर्वरित सामने सध्या स्थगित करून नंतर वातावरण सुधारल्यानंतर स्पर्धा पूर्ण करायची असा विचार दिसत आहे. मात्र एकूणच देशभर कोरोनाचा उद्रेक पाहता आणि दुसर्‍या लाटेपाठोपाठ कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने उरलेले सामने रद्द करण्यावाचून दुसरा कोणताच पर्याय शिल्लक राहिला नव्हता. आता फक्त बीसीसीआय स्थगित असाच शब्द प्रयोग वापरत आहे, इतकेच.

बीसीसीआयला अनेकांनी यंदाचा आयपीएल हंगाम गेल्या वर्षीप्रमाणे संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र सुरुवातीला परिस्थिती तितकीशी गंभीर दिसत नव्हती. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यापासून देशात सर्वच ठिकाणी कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाल्याने आयपीएलवर स्पर्धा रद्द होण्याचे संकट घोंघावत होते. शेवटी तसेच झाले आणि देशातील तरुण वर्गाची, क्रिकेटप्रेमींची मोठी निराशा झाली. उरलेले सामने युएईमध्ये घेऊन आयपीएल पूर्ण करावे, असा विचार झाला होता. पण, भारतामधील एकूण कोरोनाचे गडद संकट पाहता आता शेवटच्या क्षणी कुठलाही देश ही स्पर्धा घेण्याचा धोका पत्करणार नाही, हे स्पष्ट होते आणि तसेच झाल्याने आयपीएल गुंडाळण्यावाचून दुसरा मार्ग नव्हता. दुसरे म्हणजे दिल्ली, अहमदाबाद येथे कोरोनाची स्थिती आणखी गंभीर झाल्याने उरलेले सर्व सामने मुंबईत घ्यावेत, असाही रेटा सुरू झाला होता.

पण मुंबईतील प्रशासनावर या सामन्यांचा आणखी ताण आला असता, तशी भूमिका मुंबई महापालिकेने घेतल्यामुळे आयपीएल संयोजकांसमोर काहीच उपाय उरला नाही. सोमवारी एकाच दिवसात आयपीएलशी संबंधित 10 जण कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. कोरोनाने आधी केकेआर मग नंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश केला होता. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एका बस क्लिनरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तसेच दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफमधील पाच कर्मचार्‍यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

केकेआरचे वरून याशिवाय मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. यामुळे आयोजकांच्या चिंता वाढल्या. यापुढे कोरोनामुळे मोठ्या संख्येने खेळाडू बाधित होतील की काय, अशी भीती निर्माण झाल्याने शेवटी आयोजकांना स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. याआधी गेल्या वर्षी 2020 मध्ये चेन्नईच्या सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. पण, त्यानंतर ही लागण पसरली नव्हती. मात्र यावेळी तसे चित्र दिसत नसल्यामुळे सुरक्षेतेचा विचार करून स्पर्धा थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला. विशेष म्हणजे आयपीएलचा अर्धा टप्पा पूर्ण झाला असताना आणि चुरशीचे वातावरण निर्माण झाले असताना ती थांबवाबी लागली, यामुळे क्रिकेटप्रेमी नाराज झाले आहेत.

भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असताना बीसीसीआयने आयपीएल भारतात आयोजित केली. त्यामुळे पुढे जाऊन ही स्पर्धा रद्द किंवा स्थगित करावी लागू शकेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आयपीएल स्पर्धा बायो-बबलच्या सुरक्षित वातावरणात सुरू असल्याने धोका वाटत नव्हता. पण, यावेळचा संसर्ग इतका वेगवान आहे की, बायो-बबलचे कवच तोडून कोरोनाने शिरकाव केला. आता त्यामुळेच बीसीसीआयने हट्टाहास न करता, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असती, तर हा सर्व प्रकार टाळता आला असता, अशा जर तरच्या भाषा सुरु झाल्या आहेत. यंदा आयपीएल स्पर्धेला 9 एप्रिलला सुरुवात झाली. मात्र, त्याच्या एक आठवडा आधीच गव्हर्निंग कौन्सिलने मागील वर्षीप्रमाणेच यंदाही आयपीएल युएईमध्ये घेण्याचा प्रस्ताव बीसीसीआयपुढे ठेवला होता. भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे परिस्थिती चिंताजनक होऊ शकेल, अशी भीती आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी बीसीसीआयपुढे व्यक्त केली होती. मात्र, बीसीसीआयने गव्हर्निंग कौन्सिलच्या प्रस्तावाला नकार दिला आणि यंदाचा आयपीएल मोसम भारतात आयोजित केला.

याचे मुख्य कारण म्हणजे खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून निर्माण केलेली बायो-बबल व्यवस्था. या सिस्टममध्ये आल्यानंतर बाहेरील जगाशी खेळाडूंचा संपर्क राहत नाही. स्पर्धेदरम्यान चाहत्यांना मित्र आणि नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नाही. स्पर्धा संपेपर्यंत बबलमधील सर्व लोकांना बाहेर जाऊ दिले जाणार नाही. याचवेळी खेळाडूंच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची कोरोना टेस्ट केली जाते. हॉटेल स्टाफ, हॉटेल आणि स्टेडियममधील किचन स्टाफ, टीम बस ड्रायव्हर, स्टेडियम स्टाफ अशा सर्व लोकांची कालमर्यादित कोरोना चाचणी केली जात आहे. बायो-बबलच्या नियंमांचे पालन करणे हे सर्वात महत्वाचे आहे. जर एखाद्या खेळाडूने बायो-बबलच्या नियमांचे पालन केले नाही, तर त्याला संघाबरोबर राहता येत नाही. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात येते आणि ती चाचणी निगेटिव्ह आल्यावरच त्याला बायो-बबलमध्ये प्रवेश दिला जातो. नियम मोडल्यास खेळाडूला कॉन्ट्रॅक्ट गमवावा लागू शकतो. परदेशात सुरू असलेल्या विविध देशांच्या फुटबॉल स्पर्धांमध्ये असेच बायो बबलसारखे वातावरण असते. पण, बायो बबलसारखी काळजी घेऊनही शेवटी कोरोनाच्या वेगापुढे काही चालले नाही.

यंदा आयपीएलचे 60 पैकी फक्त 30 म्हणजे निम्मे सामने होऊ शकले. बीसीसीआय आणि आठही संघांना या निर्णयाचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. केवळ तेवढेच नाही, तर प्रसारक स्टार स्पोर्ट्स आणि जाहिरातदारांचेही आर्थिक नुकसान होणार आहे. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी-20 स्पर्धा आहे. या स्पर्धेतून बीसीसीआयला सर्वाधिक महसूल मिळतो. आयपीएल न झाल्यास आमचे तब्बल 400 कोटी रुपयांचे नुकसान होईल, असे बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली मागील वर्षी म्हणाला होता. यंदा आयपीएलचे 60 पैकी केवळ 30 सामनेच होऊ शकेल. त्यामुळे बीसीसीआयचे 400 कोटींचे नसले, तरी मोठे आर्थिक नुकसान होणार हे निश्चित आहे. त्यातच कोरोनामुळे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नसल्याने आधीच बीसीसीआयला फटका बसला होता.

आयपीएलच्या लोकप्रियतेमुळे जाहिरातदार या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. आयपीएलच्या सामन्यांदरम्यान आपली जाहिरात दाखवली जावी यासाठी ब्रँड्स बरेच पैसे खर्च करतात. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या 22 सामन्यांमध्ये जाहिरातींचे प्रमाण 2 टक्क्यांनी वाढले होते. मात्र, आता त्यांचेही नुकसान होणार आहे. आयपीएलच्या माध्यमातून जमा होणार्‍या रकमेतील एक मोठा भाग यंदा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी देण्याचा विचार झाला असता तर त्याचा मोठा फायदा भारताला झाला असता. सचिन तेंडुलकरने 1 कोटीची मदत देऊन सुरुवातही चांगली केली होती. पण, आता आयपीएल स्थगित झाल्याने पुढे येऊ पाहणारा मदतीचा हात मागे जाणार आहे.