Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग आयपीएल हवी, पण लोकांना मदतही करा!

आयपीएल हवी, पण लोकांना मदतही करा!

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतात हाहा:कार उडाला आहे. निवडणुका, प्रचारसभा आणि कुंभमेळा आल्यामुळे या लाटेला हवा मिळाली. दररोज लाखो लोक बाधित होत असून हजारो माणसांना आपले जीव गमवावे लागत आहेत. दिवसेंदिवस परिस्थिती अधिक बिकट होत असून कुठे रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता जाणवतेय तर कुठे बेड मिळेनात, अशा सगळ्या भीतीच्या वातावरणात आयपीएल खेळवली जात असून अशावेळी कुणी आपल्या वैयक्तिक सुरक्षेच्या कारणास्तव तर कुणी कुटुंबीयांसाठी आयपीएल स्पर्धेला रामराम ठोकतंय. अगोदरच पाच खेळाडूंनी स्पर्धा अर्ध्यावरच सोडण्याचा निर्णय जाहीर केला असून अशातच यात आणखी दोन मोठ्या खेळाडूंची भर पडतीय. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि दिल्लीचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ मायदेशी परतण्याच्या तयारीत आहेत. इतकंच नव्हे तर आयपीएलमध्ये उपस्थित असणारे प्रशिक्षक, कॉमेंटेटर तसंच जवळपास 30 ऑस्ट्रेलियन दिग्गज भारतातून मायदेशी परतण्यास उत्सुक आहेत.

ऑस्ट्रेलिया आपल्या देशाच्या नागरिकांची सध्या मोठी काळजी घेत असून सर्वांत जास्त काळ लॉकडाऊनमध्ये राहणार्‍या ऑस्ट्रेलियन नागरिकांना आता पुन्हा लॉकडाऊनमध्ये राहावे लागू नये म्हणून ऑस्ट्रेलियन सरकार दक्ष झाले आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन सरकार देशाच्या सीमा सील करण्याच्या विचारात आहे. सरकारने हे पाऊल उचलण्याअगोदर आपण मायदेशी गेलेलं बरं, असा विचार ऑस्ट्रेलियन खेळाडू, समालोचक आणि प्रशिक्षक करत आहेत. कोरोनाचे कारण पुढे करून आतापर्यंत पाच खेळाडूंनी माघार घेतली असून यात अश्विन, अँड्यू टाय, केन रिचडर्सन, अ‍ॅडम झम्पा, लियाम लिव्हिंगस्टोन यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच राजस्थान रॉयल्सच्या संघात असणार्‍या ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्यू टायने माघार घेतली होती. भारतात कोरोनाचा प्रकोप आणखी वाढल्यास आपल्याला ऑस्ट्रेलियाचे दरवाजे बंद होऊ शकतात, अशी भीती या खेळाडूंना असल्याची चर्चा आहे. मात्र काही परदेशी खेळाडूंच्या मते आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडू बायो बबलमुळे सुरक्षित आहेत. बाहेर कोरोनामुळे परिस्थिती गंभीर असताना खेळाडूंची काळजी घेतली जात आहे.

- Advertisement -

स्पर्धेदरम्यान खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बायो बबल व्यवस्था करण्यात आली आहे. काही खेळाडूंच्या मते बायो बबल म्हणजे बिग बॉसचं घर. कारण या सिस्टममध्ये आल्यानंतर बाहेरील जगाशी खेळाडूंचा संपर्क राहत नाही. फक्त टीम मेंबर आणि आयपीएलसाठी काम करणारे स्टाफ जे बायो बबलमध्ये आले आहेत. दुबईमध्ये झालेल्या आयपीएल नंतर यंदाच्या आयपीएलमध्ये सहभागी होणार्‍या खेळाडूंना बायो बबल (जैव सुरक्षित) वातावरणामध्ये राहावे लागते. यामध्ये कुठल्याही प्रकारची कुचराई चालणार नाही, अशा परिस्थितीत खेळाडूंचा संपूर्ण स्पर्धेदरम्यान बाहेरील जगाशी संपर्क राहत नाही. आयपीएल कोरोनामुक्त राहावं यासाठी खेळाडूंचे जग हे हॉटेल, सरावाचे मैदान आणि आयपीएल लढती एवढ्यापुरतेच मर्यादित ठेवण्यात आले आहे. तसेच आयपीएलचे सामनेही रिकाम्या स्टेडियममध्ये घेण्यात येत आहेत. विशेष म्हणजे कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना बायो-बबलमध्ये ठेवण्यात येते. कोणताही व्हायरस खेळाडूंच्या जवळ येणार नाही, याची काळजी बायो-बबल घेत असते. आयपीएलमध्ये भाग घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचार्‍यांची आयपीएल सुरु होण्याअधी दोनदा कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर प्रत्येकाला काही दिवस विलगीकरणात ठेवले होते.

या काळात, तीन वेळा कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच प्रत्येकास बबलमध्ये समाविष्ट केले गेले. बबलमध्ये समाविष्ट असलेल्यांना फक्त मैदान आणि हॉटेलमध्येच राहण्याची परवानगी आहे. स्पर्धा संपेपर्यंत बबलमधील सर्व लोकांना बाहेर जाऊ दिले जाणार नाही. याचवेळी खेळाडूंच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी केली जाते. हॉटेल स्टाफ, हॉटेल आणि स्टेडियममधील किचन स्टाफ, टीम बस ड्रायव्हर, स्टेडियम स्टाफ अशा सर्व लोकांची कालमर्यादित कोरोना चाचणी केली जात आहे. बायो-बबलच्या नियमांचे पालन करणे हे सर्वात महत्वाचे आहे. जर एखाद्या खेळाडूने बायो-बबलच्या नियमांचे पालन केले नाही, तर त्याला संघाबरोबर राहता येत नाही. त्यानंतर त्याची करोना चाचणी करण्यात येते आणि ती चाचणी निगेटिव्ह आल्यावरच त्याला बायो-बबलमध्ये प्रवेश दिला जातो. नियम मोडल्यास खेळाडूला कॉन्ट्रॅक्ट गमवावा लागू शकतो. कोरोना काळामध्ये बायो बबल या व्यवस्थेकडे एक सकारात्मक समाधान म्हणून पाहिजे जात आहे.

- Advertisement -

आयपीएल म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे आणि हे सर्व क्रिकेट खेळणार्‍या देशांना तसेच खेळाडूंना ठाऊक आहे. मध्येच त्यांनी ही स्पर्धा सोडली तर त्याचा मोठा फटका त्यांना भविष्यात बसू शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) हे जाणून असल्याने त्यांनी खेळाडू स्पर्धा सोडून गेले तरी हरकत नाही, आयपीएल रद्द होण्याचा प्रश्न नाही, असे ठणकावून सांगितले आहे. याशिवाय आपल्या देशात एखादी गोष्ट सुरळीत सुरू असली की त्यात खो घालणारी विघ्नसंतोषी लोकांची एक टोळी असते. तेच लोक आता आयपीएल रद्द करा, म्हणून उगाचच अश्रू ढाळत आहेत. खरेतर यामधून सकारात्मक बाजू शोधून काढताना आयपीएलच्या माध्यमातून जमा होणार्‍या रकमेतील एक मोठा भाग यंदा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दिला तर एक चांगला संदेश भारतीय समाजात जाऊ शकतो. मुख्य म्हणजे बीसीसीआयप्रमाणे भारतीय खेळाडूंनीसुद्धा मदतीचा हात पुढे करायला हवा.

याची सुरुवात ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज पीट कमिन्सने करून एक मोठा आदर्श ठेवला आहे. कमिन्सने भारतातील ऑक्सिजन समस्या सोडवण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीला 37 लाख दिलेत. कमिन्सने यासंदर्भात लिहिलेला संदेश खूप महत्वाचा वाटतो. ‘आपल्याला भारत अतिशय आवडता देश असून मी माझ्या आयुष्यातील काही सर्वात चांगल्या लोकांना या देशात भेटलो आहे. या संकटाच्या काळामध्ये आयपीएलसारख्या स्पर्धांच्या आयोजनामधून देशातील लोकांना थोडा विरंगुळा मिळेल, असा सरकारचा या स्पर्धेच्या आयोजनाला परवानगी देण्यामागील दृष्टीकोन आहे. जगभरातील इतर खेळाडूंनीही पुढाकार घेत या संकटाच्या काळामध्ये मदतनिधी द्यावा आणि मदतीसाठी पुढे यावे. लोकांनी आपल्या भावनांचा योग्य कामासाठी वापर केल्यास बदल नक्की घडले आणि या परिस्थितीवर मात करणं शक्य होईल. मी केलेली मदत फार नाहीय; पण त्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल, अशी मला आशा आहे.’

कमिन्सची हीच भावना बीसीसीआय आणि इतर खेळाडू यांनी ठेवून मदतीचा हात पुढे केल्यास सध्याच्या बिकट परिस्थितीत लोकांना मोठा आधार मिळेल. ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा हेच सांगत असून आयपीएलमधील पैसा कोरोना उपचारासाठी द्यावा, अशी त्याने मागणी केली आहे. सध्याच्या परिस्थितीत बिंद्राची ही मागणी योग्य ठरते. मात्र कोरोना सुरू आहे म्हणून आयपीएल रद्द करावी असा जो काही सूर आळवला जात आहे, तो अजिबात योग्य नाही. यामधून काहीच साध्य होणार नाही. उलट कोरोनामुळे समाजात जे काही निराशाजनक वातावरण तयार झाले आहे, त्यामधून दिवसात तीन चार तास बाहेर पडण्याचा तो एक उत्तम मार्ग आहे. कोरोनाच्या सततच्या भीतीच्या वातावरणात सध्या सारा देश असून लॉकडाऊनमुळे बहुतांश माणसे घरात बसून आहे. अशा वेळी चार भिंतीच्या आड मनाला आधार देण्याचा काही रस्ता दिसत नाही, तेव्हा आयपीएल त्यावर थोडी फुंकर घालण्याचा प्रयत्न करते. जणू स्ट्रेस बस्टरचे काम करत आहे.

- Advertisement -