नवे संघ, नवा फॉरमॅट, नवे आयपीएल…

क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी फ्रँचायझी लीग असलेली इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल आजपासून सुरू होत आहे. यंदाचा हंगाम नवा असणार आहे. दोन वाढीव संघांमुळे यंदाच्या हंगामाचा थरार वाढला आहे. आयपीएलचा १५ वा हंगाम अधिक रोमांचक आणि आकर्षक करण्यासाठी दोन ‘डीआरएस’, मंकडिंग, झेलबाद होताना क्रीझ ओलांडली तरी नवा फलंदाजच स्ट्राइकला, अशा काही नव्या नियमांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ‘सुपर ओव्हर’मध्येही अंतिम सामना निकाली ठरला नाही तर साखळीत गुणानुक्रमे सरस संघ विजेता ठरवला जाणार आहे. एकंदरीच ‘आयपीएल’चा फॉरमॅट बदललेला आहे.

कोरोनाच्या कारणामुळे याधीचे दोन हंगाम दुबईला खेळावे लागले. यावेळेस मात्र कोरोना आटोक्यात असल्याने भारतात महाराष्ट्रात होत आहे. महाराष्ट्रातील मुंबईमधील वानखेडे, ब्रेबोर्न, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील आणि पुण्यातील स्टेडियमवर सर्व सामने होणार आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ इतर संघांचा पाहूणचार करणार आहे. पाच वेळा विजेता असलेला मुंबई इंडियन्सचा संघ यावेळी कशी कामगिरी करतो याकडे सार्‍यांच्या नजरा आहेत. रोहित शर्मा नेतृत्व करत असलेल्या या संघामध्ये काही नवे खेळाडू आले आहेत तर काही जुने खेळाडू या संघात कायम आहेत. त्यामुळे हा संघ यावेळी बहारदार कामगिरी करणार का याकडे सर्वांचेच लक्ष असेल.

आतापर्यंत सर्वाधिक वेळा जेतेपद पटकावणार्‍या संघांमध्ये मुंबई इंडियन्स नंबर एकचा संघ आहे. त्यामुळे यावेळी हा संघ कसा खेळ करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. मुंबई इंडियन्सने काही खेळाडूंना रिटेन केले आहे. तर इशान किशनसारख्या यष्टीरक्षक आलेल्या डावखुर्‍या खेळाडूला मोठी किंमत मोजून संघात पुन्हा आणलं. तर दुसरीकडे क्विंटन डी कॉक, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि ट्रेंट बोल्टसारखे दिग्गज खेळाडू यावेळी मुंबई इंडियन्स संघात सामील नसतील. त्यामुळे काही नवे खेळाडू संघात सामील झाल्यामुळे यावेळी मुंबई इंडियन्स संघ अंतिम फेरीपर्यंत मजल मारणार का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मुंबई इंडियन्सनंतर चा सर्वोत्तम संघ ठरलाय तो महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज. या संघावर सर्वांची नजर असणार आहे. चेन्नईची सुरुवातीला लढत होणार आहे ती म्हणजे श्रेयस अय्यरच्या कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत. मात्र आयपीएल सुरू व्हायच्या आधीच धोनीने सर्व सीएसकेच्या चाहत्यांना धक्का दिला. आयपीएलच्या १२ हंगामांमध्ये चार जेतेपदे आणि पाच उपविजेतेपदे जिंकून देण्याची किमया साधणार्‍या महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद गुरुवारी रवींद्र जडेजाकडे सुपूर्द केले. २००८मध्ये ‘आयपीएल’ला प्रारंभ झाल्यापासून सर्वात सातत्यपूर्ण आणि यशस्वी संघ म्हणून चेन्नई सुपर किंग्ज संघाची ख्याती आहे.

निकाल निश्चितीमुळे या संघाला २०१६ आणि २०१७ अशी दोन वर्षे निलंबित करण्यात आले होते. या दोन वर्षांत धोनीने पुणे सुपरजायंट संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या संघाला देखील धोनीने अंतिम सामन्यात पोहोचवले होते. ऑगस्ट २०२० या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणार्‍या धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने गेल्या वर्षी आपले चौथे जेतेपद मिळवले होते. आयपीएलचा१५ हंगाम सुरू होण्याआधीच धोनीने कर्णधारपद सोडलं. चेन्नई संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत जडेजासमवेत अष्टपैलू मोईन अली आणि धडाकेबाज सलामीवीर ऋतुराज गायकवाडसुद्धा होते. परंतु अखेरीस धोनीच्या विश्वासातील ३३ वर्षीय जडेजाने बाजी मारली.

दरम्यान, जेतेपदासोबत आयपीएलमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅप कोणाकडे असणार याचीही उत्सुकता सर्वांनाच लागलेली असेल. आयपीएलच्या हंगामामध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते. मात्र ज्या खेळाडूकडे ऑरेंज कॅप असेल त्या संघाला जेतेपद मिळेलच असं नाही.आतापर्यंतच्या १४ हंगामांपैकी ज्या खेळाडूकडे ऑरेंज कॅप असते, त्याच संघाचा विजय झाला असे फक्त दोन वेळा झालं आहे. सर्वात आधी २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या रॉबिन उथप्पाकडे ऑरेंज कॅप होती. उथप्पाने या सिझनमध्ये एकूण ६६० धावा केल्या करुन ऑरेंज कॅप जिंकली होती. या हंगामामध्ये उथप्पाच्या कोलकाताने ट्रॉफी जिंकली होती. तर दुसरीकडे पाच वेळा जेतेपद पटकावून मुंबईसारख्या भक्कम संघाला फक्त एक वेळा म्हणजेच २०१० मध्ये ऑरेंज कॅप मिळवता आलेली आहे. २०१० मध्ये ऑरेंज कॅप सचिन तेंडुलकरच्या नावावर होती. मात्र या वर्षी चेन्नईने जेतेपद पटकावले होते.

दरम्यान, यावेळेस आयपीएलचा फॉरमॅट बदलण्यात आला आहे. याशिवाय दोन नवे संघ यात सामील झाले आहेत. यंदाच्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन संघ वाढल्यामुळे आतापर्यंतचेच दुहेरी राऊंडनुसार खेळवले गेले असते तर सामन्यांची संख्या ९४ झाली असती. त्यामुळे १० संघांचे दोन गटांत विभाजन करून सामन्यांची संख्या ७४ (७० साखळी + ४ बाद फेरीचे) करण्यात आली आहे. १२ दिवस दुहेरी सामने होतील. प्रत्येक संघाला १४ साखळी सामने खेळता येणार आहेत. प्रत्येक संघाचा आपल्या गटातील अन्य चार संघांशी दोनदा सामना होईल. याशिवाय अन्य गटातील चार संघांशी एकदा, तर एका संघाशी दोनदा सामना होणार आहे. आयपीएलमध्ये अशा प्रकारची कार्यक्रमपत्रिका २०११ मध्ये वापरण्यात आली होती. त्यावेळी संघांची मांडणी मानांकनानुसार करण्यात आली होती.

बाद फेरीच्या सामन्यांसाठी काय आखणी केली आहे. साखळी सामन्यांनंतर गुणानुक्रमे अव्वल चार संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. अव्वल दोन संघांना अंतिम फेरी गाठण्यासाठी यावेळेस दोनदा संधी मिळणार आहे, तर तिसर्‍या आणि चौथ्या संघांना एकच संधी मिळेल. म्हणजेच अव्वल दोन संघ ‘क्वालिफायर-१’चा सामना खेळतील, विजेता संघ थेट अंतिम फेरी गाठेल, तर या सामन्यातील पराभूत संघ ‘क्वालिफायर-२’ सामना खेळेल. तिसरा आणि चौथा संघ ‘एलिमिनेटर’ सामना खेळतील. यामधील विजेता संघ ‘क्वालिफायर-२’साठी पात्र ठरेल, तर पराभूत संघ स्पर्धेबाहेर जाईल. ‘क्वालिफायर-२’ सामन्याद्वारे अंतिम फेरीसाठी दुसरा संघ ठरेल. अशा पद्धतीच्या या नव्या फॉरमॅटमुळे ही स्पर्धा रंजक ठरणार की रटाळ हे पाहावे लागेल.

याशिवाय यंदाच्या हंगामात काही नियम बदलण्यात आले आहेत. २०१९ मधील एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना ‘सुपर ओव्हर’मध्ये ‘टाय’ झाला. यानंतर ‘आयसीसी’च्या नियमानुसार, सरस सीमापार फटक्यांआधारे इंग्लंड संघ विजेता ठरला होता. या नंतर बराच वाद झाला. या सामन्यानंतर काही महिन्यांतच हा नियमसुद्धा रद्दबातल ठरवण्यात आला आणि सामना निकाल लागेपर्यंत ‘सुपर ओव्हर’ पुन्हा खेळवण्याचा नवा नियम ‘आयसीसी’ने केला. परंतु यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये मात्र अंतिम सामना ‘सुपर ओव्हर’मध्येसुद्धा ‘टाय’ झाल्यास विजेता ठरवण्यासाठी नवा नियम अंमलात आणला आहे. त्यानुसार, साखळी टप्प्यातील गुणानुक्रमे अंतिम फेरीतील दोन संघांपैकी जो संघ सरस असेल, तो विजेता ठरवला जाणार आहे.

याशिवाय डीआरएसच्या दोन संधी प्रत्येक संघाला देण्यात आल्या आहेत. यंदाच्या हंगामापासून प्रत्येक संघांना प्रत्येक डावात ‘डीआरएस’च्या दोन संधी देण्यात येणार आहेत. ‘आयपीएल’मध्ये ‘डीआरएस’ प्रणालीचा वापर २०१८ पासून सुरू झाला. मात्र एक अपील वाया गेले तर संघांची ‘डीआरएस’ची संधी हुकायची. त्यामुळे यावेळेस प्रत्येक संघाला दोन डीआरएसच्या संधी देण्यात आल्या आहेत.

अश्विनमुळे आयपीएलमध्ये ज्या मंकडिंगची चर्चा झाली त्या नियमावरदेखील कठोर निर्णय घेतला आहे. ‘एमसीसी’ने नुकताच नियम क्रमांक ४१ हा नियम क्र. ३८मध्ये विलीन केला असून, त्यानुसार समोरील बाजूच्या फलंदाजाने क्रिझ सोडल्यास त्याला मंकडिंगऐवजी धावचीत म्हणून बाद ठरवावे, असे म्हटले आहे. ‘बीसीसीआय’ने यंदाच्या ‘आयपीएल’पासूनच हा नियम अंमलात आणला आहे. २०१९च्या ‘आयपीएल’मध्ये फिरकी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने जोस बटलरला ‘मंकडिंग’ पद्धतीने बाद केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. आजपासून सुरू होणार्‍या आयपीएलच्या १५ व्या हंगामाला सुरुवात होतेय. क्रिकेट रसिकांची उत्कंटा शिगेला पोहोचली आहे, आता पहायचे आहे की, आयपीएलवर आपली मोहोर उठवण्यावर कुठला संघ यशस्वी होतो.