घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकोळशातल्या हिर्‍यांना आयपीएलमुळे चमक!

कोळशातल्या हिर्‍यांना आयपीएलमुळे चमक!

Subscribe

हिरे शोधण्यासाठी कोळशाच्या खाणीत उतरावे लागते, तसेच स्टार क्रिकेटर्सलाही आपली चमक दाखवण्यासाठी कष्टप्रद जीवन जगावे लागल्याची अनेक उदाहरणे आजवर भारतीय क्रिकेटमध्ये समोर आली आहेत. यात गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू झालेल्या इंडियन प्रिमीयर लीगचा (आयपीएल) वाटाही महत्त्वाचा ठरलाय, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. प्रवीण तांबेसारखा हिराही आयपीएलमुळे खर्‍या अर्थाने उजेडात आला. त्याच्यासारख्या अनेक क्रिकेटर्सला आयपीएलने संधी दिली आणि त्यातून हे खेळाडू स्टार बनले. हे खेळाडू स्टार तर बनले, परंतु त्यांच्या अत्यंत हलाखीच्या जीवनप्रवासाविषयी त्यांच्या यशानंतर अनेकांना कळले. यशस्वी झाल्यानंतर या खेळाडूंचे आयुष्य खर्‍या अर्थाने उजेडात आले आणि अनेकांचे डोळे विस्फारले. कुणी झाडू मारणारा, कुणी पाणीपुरी विकणारा, कुणी साफसफाई करणारा, तर कुणी वडिलांच्या छोट्या-छोट्या कामांमध्ये हातभार लावून आपलं क्रिकेटप्रेम सांभाळणारा... अशी अनेकांची जीवनगाथा ऐकून अंगावर शहारे येतात. पण, गरीबीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंतचा हा सर्वच खेळाडूंचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो, हे विशेष.

प्रतिकूल परिस्थिती अन् वयावर मात करून यशाला गवसणी घालता येते, हे प्रवीण तांबे या व्यक्तीमुळे संपूर्ण जगाला समजले. खरं तरं, जिद्द अन् चिकाटी अंगी असली की मेहनतीच्या बळावर क्रिकेटमध्ये स्टार बनणारे खेळाडू आजवर अनेकदा उजेडात आले. त्यांची कहाणी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरली. खास करून आजवर प्रवीण तांबेसह अनेक खेळाडू हे इंडियन प्रिमीयर लीगमुळे उजेडात आले. सातत्याने संशयाच्या भोवर्‍यात गरगरणार्‍या आयपीएलने खेळाडूंना मात्र ग्लॅमर दिलं हेही तितकंच खरं. यंदाच्या आयपीएलनेही उमरान मलिक, रिंकू सिंग, कुलदीप सेन, तिलक वर्मा, रोमॅन पॉवल, अर्शदीप सिंग अशा स्टार्सना ग्लॅमर दिलेय. कोळशाच्या खाणीतून हिरे सापडावेत, तसे हे हिरे आता भारतीय क्रिकेट संघाला भेटलेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

अत्यंत गरीब परिस्थितीतही क्रिकेटप्रेम टिकवून, असेल त्या परिस्थितीत कामगिरीत सातत्य राखून संपूर्ण जगाला आपलं वेड लावणार्‍या अशा काही खेळाडूंची यशोगाथा खरोखरच अविश्वसनीय असते. त्यातील गेल्या दशक, दीड दशकांतील काही महत्वाची नावे घेतल्यास भारतात महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, हरभजन सिंग ही नावे सर्वश्रूतच आहेत. याशिवाय युवा ब्रिगेडमध्ये अत्यंत चमकदार कामगिरी करणार्‍यांमध्ये अलिकडे यशस्वी जयस्वाल, कार्तिक त्यागी, तिलक वर्मा, रवी बिश्नोई ही नावेही अनेकांच्या तोंडी आलीत. त्याचे कारणही तसेच आहे. एक रात्रीत हे खेळाडू स्टार झाले, असं म्हटलं गेलं. मात्र, त्यांच्या स्टार होण्यामागचा प्रवास पाहिला तर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. खरं तरं, ग्रामीण भागातील खेळाडू किंवा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणारे खेळाडू आपल्या कुटुंबियांच्या कष्टाचं चीज करण्यासाठी रात्रीचा दिवस करतात, पावलोपावली हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून धडपडतात. त्याचीच फलनिष्पत्ती म्हणून त्यांच्या कष्टाला फळही आपसूकच मिळतं.

- Advertisement -

आयपीएलच्या या १५ व्या सत्रात भारताला वेगवान गोलंदाजीतला कोहिनूर सापडला. उमरान मलिक त्याचे नाव. ज्याने यंदाच्या सत्रात १५७ च्या वेगाने टाकलेला चेंडू जगभरातील क्रिकेटप्रेमींना घायाळ करून गेला. आज अनेकांच्या तोंडी त्याचे नाव येतंय. पण, त्याच्या या यशामागचे दिवस पाहिले तर उमरानचे कुटुंबीय फळविक्री करतात. त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट हे दिवास्वप्नचं होतं. परंतु, उमरानने काबाडकष्ट करत हे स्वप्न सत्यात उतरवले. त्याने आपल्या कष्टप्रद जीवनाला आपली ताकद समजून वेगाने मारा करणे पसंद केले आणि आज तो वेगाचा बादशहा बनला. आता त्याच्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे दरवाजे उघडायला वेळ लागणार नाही, हेही खरं. त्याच्याशिवाय यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून खेळणार्‍या तिलक वर्माने असंख्य भारतीयांची मने जिंकली. अत्यंत गरिबीतून आलेल्या तिलकला दोन वेळचे जेवणही मुश्किल होते. परंतु, त्यातही त्याने आपले क्रिकेटवेडे प्रेम टिकवून ठेवले आणि आज मुंबई इंडियन्ससारख्या बलाढ्य संघात जागा बनवली. आपला फॉर्म कायम राखत त्याने साकारलेल्या खेळी अनेक दिग्गज खेळाडूंनीही मान्य केल्या.

याच आयपीएलमधले असे आणखी एक नाव म्हणजे रिंकू सिंग, ज्याचे वडील उत्तर प्रदेशात अलिगढला घरोघरी सिलिंडर पोहोचवण्याचे काम करायचे. एवढेच नव्हे तर रिंकूला आपल्या घरची परिस्थिती पाहता नोकर म्हणून काम करण्याची वेळ आली होती. त्याने झाडू मारण्याचे काम करून आपला आणि आपल्या कुटुंबियांच्या खर्चात हातभार लावला. तरीदेखील त्याने जिद्द सोडली नाही. मिळेल त्या वेळेत, मिळेल त्या साहित्यात त्याने आपला क्रिकेट छंद जोपासत रणजीत धडक दिली. उत्तर प्रदेशकडून रणजी खेळताना त्याने अत्यंत महत्वपूर्ण खेळी साकारत आयपीएल, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत मजल मारली. याच्यासारखेच आणखी एक नाव म्हणजे, कुलदीप रामपाल सेन. रेवा, मध्य प्रदेशचा हा वेगवान गोलंदाज आज राजस्थान रॉयल्सच्या संघात स्थान टिकवून आहे. त्याचे वडील न्हावी आहेत. घरची परिस्थिती अत्यंत बिकट.

- Advertisement -

परंतु तरीही त्याने क्रिकेटवेड कायम ठेवून आज राजस्थानकडून खेळताना अनेकदा गेम चेंजरची भूमिका निभावली आहे. रणजीसह सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे त्याला राजस्थान रॉयल्सने संधी दिली आणि त्याने या संधीचं सोनही केलं. या आताच्या आयपीएल स्टारसोबतच गेल्या मोसमात भारतीय १९ वर्षाखालील संघातील काही नावे आजही आवर्जून घ्यावी लागतात. पाणीपुरीच्या ठेल्यापासून विश्वचषकापर्यंतचा प्रवास करणार्‍या यशस्वी जयस्वालची जिद्दकथाही अनेकांच्या डोळ्यात पाणी आणते. त्याच्यासमवेतच्या कार्तिक त्यागी, रवी बिश्नोई, तिलक वर्मा यांनीही अशाच खडतर मार्गावरून भारतीय संघात प्रवेश केला. सामान्य कुटुंबातून येत आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:चेच नव्हे, तर भारताचे नाव उंचावणार्‍या या खेळाडूंनी अनेक उदयोन्मुख खेळाडूंच्या अपेक्षा वाढवल्या आहेत.

या युवा खेळाडूंप्रमाणे आजपासून दीड दशकांपूर्वीचा विचार केला तर भारतीय संघाला लाभलेल्या दिग्गजांमध्ये महेंद्रसिंग धोनीचे नाव आजही आवर्जून घेतले जाते. वडिलांनी खेळपट्टी बनवण्याचे, सांभाळण्याचे काम केले. कौटुंबिक परिस्थिती तशी सामान्यच. परंतु, वेगवेगळ्या क्रिकेट सामन्यांत विजयी योजदान देऊन त्यातून बक्षीस मिळवून धोनीने करिअर घडवायला सुरुवात केली. यानंतर त्याने तिकिट कलेक्टर म्हणून नोकरी करून क्रिकेटसाठी दिलेले योगदान संपूर्ण जगाला ज्ञात आहे. धोनीने भारतीय क्रिकेट संघासाठी दिलेले योगदान त्याच्या कौटुंबिक परिस्थितीत कमालीची सुधारणा करणारे ठरले. धोनीच नव्हे तर उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा, हरभजन सिंग यांच्याही यशोगाथा अविश्वसनीय आहेत. ट्रक ड्रायव्हर बनण्याचा निर्णय घेण्याइतपत वाईट परिस्थिती ओढावलेल्या फिरकीपटू हरभजन सिंगनेही अत्यंत बिकट वाटेवर प्रवास केलाय. त्याच्या कारकिर्दीत त्याने भारतीय संघासाठी दिलेले योगदान आजही अनेक नवोदितांसाठी अनुकरणीय ठरते.

याच फळीतील वेगवान गोलंदाज असलेल्या उमेश यादवनेही अत्यंत हलाखीच्या दिवसांत भारतीय संघात येण्यापर्यंत मोठी धडपड केली. कोळशाच्या खाणीत काम करणार्‍या उमेशच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाला दोन वेळचे जेवण देण्यासाठी मोठे कष्टप्रद जीवन जगले. त्यांच्यासाठी उमेशलाही अनेकदा मन मारावे लागले. मात्र, त्याने क्रिकेटर होण्याचे स्वप्न पूर्ण करून दाखवले. याचप्रमाणे आणखी एक नाव म्हणजे, मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार. त्याला क्रिकेट खेळण्यासाठी साधे बूटही मिळणे दुरापास्त होते. अनेकदा दुसर्‍यांच्या बुटांनी खेळताना भुवनेश्वरने आपली लय अखेरपर्यंत कायम ठेवली आहे, हे विशषच म्हणावे लागेल. भुवनेश्वर कुमारला लहानपणापासूनच बिकट परिस्थितीशी झुंजावे लागले. परंतु, आपल्या जिद्दीने त्याने भारतीय संघात आपला दबदबा कायम राखला. त्याच्या स्विंगची जादू अनेक परदेशी खेळाडूंच्या लक्षात आली नाही. सेंट्रल झोन, दुलिप ट्रॉफीसह रणजीतही उत्तर प्रदेशच्या या गोलंदाजाने आपली चमक दाखवली. विशेष म्हणजे, गोलंदाजीबरोबरच त्याने फलंदाजीतही अनेकदा आपली चुणूक दाखवली आहे.

याच यादीतील एक नाव म्हणजे सर जडेजा. रवींद्र अनिरुद्ध जडेजा या दिग्गज खेळाडूनेही अतिशय हलाखीच्या दिवसात आपले क्रिकेटप्रेम जोपासले. वडील सिक्युरिटी गार्ड आणि आई एका साध्या रुग्णालयात नर्स असताना सरकारी क्वार्टरमध्ये छोट्याशा घरात जडेजा कुटुंबीय रहात होते. मात्र, तरीदेखील रवींद्र जडेजाने आपली क्रिकेटची धार कमी होऊ दिली नाही. जामनगर, गुजरातच्या या राजपूत कुटुंबातील क्रिकेटरने संपूर्ण जगाला आपल्या अनोख्या शैलीने वेड लावले आहे. त्याची आक्रमक शैली आणि गोलंदाजीतील धार संपूर्ण जगात लोकप्रिय ठरली आहे. यंदाच्या आयपीएल सत्रात त्याला चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार म्हणून खेळण्याचीही संधी मिळाली. अर्थात एवढेच खेळाडू नव्हे, तर याहीपेक्षा अनेक खेळाडूंनी आपल्या खडतर प्रवासातून भारतीय संघापर्यंत मजल मारली आहे, जी शब्दांत वर्णन करणे तसे शक्यही नाही.

भारतातल्या अशा एक ना अनेक खेळाडूंच्या जिद्दकथा पाहून भारतीय संघाचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल असल्याची जाणीव होते. फक्त याहीपुढे अशा कष्टप्रद जीवन जगणार्‍या खेळाडूंना योग्य वेळी, योग्य ठिकाणी संधी मिळणे गरजेचे आहे, एवढीच यानिमित्ताने अपेक्षा..!

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -