घरफिचर्समायमहानगर ब्लॉगअटक व्हावी, ही तर राजची इच्छा...

अटक व्हावी, ही तर राजची इच्छा…

Subscribe

शिवसेनेने सत्तेसाठी सेक्युलर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्यामुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची टीका वारंवार भाजप आणि मनसेही करीत आहे. त्यामुळे शिवसेनेची जागा घेण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आहे. मागील सहा महिन्यांतील घटनाक्रम पाहता राज यांचे सगळे डावपेच बरोबर आहेत. त्याचा क्लायमॅक्स राज ठाकरे यांच्या अटकेने होणार असेल तर ठरलेल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे किंवा भाजपच्या स्क्रिप्टप्रमाणे सारं काही सुरू आहे, असे म्हणण्यास वाव आहे. कारण राज यांचा अयोध्या दौरा 5 जूनला आहे आणि अटकेचे कवित्व महिनाभर असेच सुरू राहिल्यास फायदा राज आणि मनसेलाच होणार यात वाद नाही. म्हणून अटक व्हावी ही तर राजची इच्छा!

महाराष्ट्रात मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यावरून राजकारण तापलंय. त्या निमित्ताने प्रार्थनास्थळांवरील भोंगे आणि लाऊड स्पीकरच्या मुद्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. अंगावर सफेद कुर्ता, कुर्त्यावर भगवी शाल…डोळ्यांवर फुल फ्रेम चष्मा, तेजस्वी वाणी, रुबाबात चालणं आणि फटकळ बोलणं…,इतकं म्हटलं की एकमेव व्यक्ती डोळ्यासमोर येते ती म्हणजे राज ठाकरे…राज श्रीकांत ठाकरे, बॉलिवूड स्टाईलनं सांगायचं झालं तर नाम ही काफी है…राज ठाकरे यांचं नाव जरी घेतलं तरी अनेकांना धडकी भरते. पण याच राज ठाकरेंना आता पोलिसांनी औरंगाबाद येथील 1 मे च्या सभेत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. हे कमी म्हणून की काय 2008 सालच्या सांगलीतील शिरोळा येथील प्रकरणात समन्सही बजावले आहेत. आता मुंबईत झालेली आणि ठाण्यात झालेल्या सभेवरूनही नोटिसांची जंत्री राज यांच्या नव्या घरी शिवतीर्थावर पाठवण्याची लगबग मुंबई ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहेत. त्यामुळे आता पुढील काही दिवस ऐन उन्हाळ्यात पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांना घाम फुटणार आहे.

9 मार्च 2006 रोजी मनसेची स्थापना होताच राज ठाकरे यांनी देशभर आपली हवा केली. शिवसेनेला नोव्हेंबर 2005 मध्ये रामराम ठोकल्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा दौरा केला आणि परत येताच 9 मार्चला 2006 रोजी मनसेची स्थापना केली. मनसेची स्थापना हीसुद्धा शिवसेनेसारखीच मराठीच्या मुद्यावर झाली. फरक इतकाच होता की शिवसेनेच्या रडारवर दक्षिण भारतीय होते तर मनसेच्या रडारवर उत्तर भारतीय. मराठी माणूस, भूमिपुत्र, परप्रांतियांना मारझोड करताना मनसे पक्षातील नव्या रक्ताला रस्त्यावरच्या आंदोलनाचे टार्गेट दिले. खुद्द राज ठाकरे यांच्याकडूनच खळ्ळ खटॅकचे आदेश आल्याने रिक्षा आणि टॅक्सी चालवणार्‍या भैय्यांवर मनसैनिक तुटून पडले आणि काही दिवसांतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहशत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहारपर्यंत पोहोचली. मुंबई, ठाण्यात रेल्वेच्या परीक्षेला आलेल्या परराज्यातील उमेदवारांना मनसैनिकांनी पिटाळून लावत मारझोड केली. राज्यात तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार होते. केंद्रातही काँग्रेसचे सरकार असल्याने परप्रांतियांविरोधात आंदोलन, जाळपोळ, मारझोड झाल्याने राज ठाकरे यांच्या विरोधात कल्याण, ठाणेमध्ये गुन्हे दाखल झाले होते.

- Advertisement -

आंदोलनं…तोडफोड…मारझोड…खळ्ळ खटॅक ही मनसेची भाषा होती. मनसे, मराठी माणसांच्या मनात तर अमराठी जनतेच्या डोक्यात जाऊन बसली. 9 मार्च 2006 रोजी मनसेची स्थापना झाल्यानंतर पुढील 3 वर्षांत म्हणजे ऑक्टोबर 2009 पर्यंत मनसेनं सुरुवातीच्या काळात अनेक आंदोलनं केली. शिवसेनेपेक्षा आक्रमकता अवलंबल्याने मनसेची हवा मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील महत्वाच्या शहरात झाली. त्यामुळे त्यानंतर ऑक्टोबर 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एका फटक्यात पहिल्याच प्रयत्नात मनसेला मतदारांनी भरभरून मतदान करीत 13 आमदार निवडून दिले. मनसेला सोळा वर्षे पूर्ण झाली आणि मागे वळून पाहिले तर 2008 साल हे मनसेसाठी महत्त्वाचे ठरले आहे. परप्रांतियांना मारझोड, खळ्ळ खटॅकच्या आंदोलनामुळे आणि अटकेमुळे राज ठाकरे यांना 2009 सालच्या विधानसभेत फायदा झाला आणि एकाच फटक्यात 13 आमदार निवडून आले.

मशिदींवरील भोंगे, त्याचवेळी दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, असे आदेश दिल्याने आता राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडण्यास कारणीभूत आणि चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी राज यांना औरंगाबाद पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मुंबईतील कायदा आणि सुवव्यस्था बिघडू नये यासाठी मनसे तसेच इतर धार्मिक संघटनांच्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी नोटिसा धाडल्या आहेत. सार्वजनिक शांतता बाधित करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने २ मे ते १७ मे या कालावधीत मुंबईत वास्तव्यास राहू नये, असे काही कार्यकर्त्यांना नोटिशीमधून बजावण्यात आले आहे. मात्र १५ दिवस मुंबई सोडण्याची नोटीस दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे.

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आता सांगलीच्या शिराळा न्यायालयाने अजामीनपत्र वॉरंट बजावले आहे. 2008 साली राज ठाकरे यांच्यासह सांगलीच्या मनसे कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी न्यायालयामध्ये तारखांना गैरहजर राहिल्याप्रकरणी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. त्यामुळे पोलीस राज ठाकरेंना कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2008 साली परप्रांतियांच्या मुद्यांवर झालेल्या तोडफोडप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कल्याण येथे अटक झाली होती. त्याचे संतप्त पडसाद सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यात उमटले होते. शेंडगेवाडी या ठिकाणी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनादरम्यान तोडफोडीचा प्रकार घडला होता.

या प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यामध्ये तानाजी सावंत यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर राज ठाकरे 2009 मध्ये जामिनीसाठी शिराळा न्यायालयामध्ये हजर झाले होते व त्यांना जामीन मिळाला होता. मात्र त्यानंतर राज ठाकरे खटल्याच्या सुनावणीस गैरहजर राहिले आहेत, असा ठपका शिराळा न्यायालयाने ठेवला आहे. 6 एप्रिल रोजी शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांना पकडून आणण्याबाबत मुंबई पोलिसांनी अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भोंग्यांवरील भूमिकेवरून राज्यात वातावरण तापलेलं आहे. यावरून राज ठाकरे यांच्या विरोधात टीका होत आहे. संभाजी ब्रिगेड, एआयएमआयएम, मुस्लीम संघटना यांनी राज ठाकरे यांना अटक करावी यासाठी पोलीस खात्याकडे मागणी केल्याने ठाकरे सरकारपुढील अडचणी वाढल्या आहेत.

राज यांच्या मशिदींवरील भोंगे काढले नाही तर त्याच्या दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याच्या आदेशामुळे राज्यात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर एआयएमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राज यांच्या भाषणावर सडकून टीका केली. राज ठाकरे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. औरंगाबादचंच उदाहरण द्यायचं झालं तर तिथे हिंदू, मुस्लीम आणि दलित बांधवांमध्ये सलोखा आहे. तो भंग करण्याचा डाव यामागे दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. राज यांच्याविरुद्ध कलम १५३ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी ओवेसी यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याची ठरवल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला, मग मशिदींसमोर हनुमान चालीसा म्हणणार्‍यांवर तुम्ही काय कारवाई करणार आहात? आमच्या मशिदींपेक्षा तुमचे मातोश्री निवासस्थान पवित्र आहे का? असा सवालच ओवेसी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांना लक्ष्य करून राजकारणात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयोग फसल्यानंतर ते आता मशिदींवरील भोंग्यांविरुद्ध बोलू लागले आहेत. ते कायदा हातात घेत आहेत हे स्पष्ट दिसत आहे, मग तो भाऊ आहे म्हणून मुख्यमंत्री गप्प आहात का?, यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी का बोलत नाही. त्यांचे सेक्युलर धोरण हेच आहे का, असे सवालही ओवेसी यांनी विचारल्याने आता राज यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार रणनीती आखत आहे. कारण 2008 साली जेव्हा राज ठाकरे यांना अटक केली होती तेव्हा राज्यभर सर्वत्र भीतीसदृश्य वातावरण होते. त्यामुळे राज यांच्यावर कारवाई केल्यास अथवा अटक केल्यास त्याचे काय परिणाम होतील याचा विचार गृहमंत्री असलेले दिलीप वळसे-पाटील करत आहेत.

लहाणपणापासून ते महाविद्यालयापर्यंत काका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या ‘मार्मिक’मध्ये व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे हुबेहुब आपल्या काकांसारखेच होतील असे कुणालाही वाटले नसेल. बाळासाहेबांसारखाच स्पष्टवक्तेपणा, तीच भेदक नजर, तोच बोलण्यातील पंच आणि तीच स्टाईल. 2006 साली मनसेची स्थापना झाली आणि शिवसेनाप्रमुखांसारखेच राज ठाकरेंनी सुद्धा रान पेटवले होते. शिवसेनेने दक्षिण भारतीयांविरोधात तर राज यांच्या मनसेने उत्तर भारतीयांविरोधात. त्यामुळे अल्पावधीतच मनसे शिवसेनेची जागा घेणार का असे चित्र निर्माण झाले. पण 2007 च्या महापालिका निवडणुका आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता मनसेला लोकप्रतिनिधींचे जाळे विधिमंडळात पाठवता आले नाही. लोकप्रतिनिधींची संख्या रोडावली. नावापुरता एखादा आमदार विधानसभेत पोहोचल्याने मनसेची राजकीय पक्षांतील किंमत कमी होत गेली. मात्र आज 16 वर्षांनंतरही राज ठाकरे यांच्या सभेला होणारी गर्दी तसूभरही कमी झालेली नाही, ही वस्तूस्थिती आहे. मात्र जमलेल्या गर्दीचे व्होटबँकेत रूपांतर करण्यास राज सपशेल फेल ठरले आहेत.

रेल्वे परीक्षा सेंटरमध्ये घुसून मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय उमेदवारांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी 21 ऑक्टोबर 2008 साली रात्रीच्या अंधारात 2.45 वाजता मुंबई पोलिसांनी रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहातून राज यांना अटक केली. तेव्हा लालू प्रसाद हे रेल्वे मंत्री होती. या परीक्षांमध्ये केंद्र सरकारने मराठी तरुणांना नाकारल्याचा आरोप मनसे आणि शिवसेनेने केला. राज यांच्या अटकेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. शांत झालेला महाराष्ट्र पुन्हा पेटला. ठिकठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड अन् जाळपोळ केली. हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि कडक सुरक्षेत राज ठाकरे यांना वांद्रे कोर्टात हजर केले. मात्र आता गेल्या काही दिवसांत हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतल्याने भाजपही कधी उघडपणे तर कधी छुपेपणाने राज यांना पाठिंबा देत आहे. मनसेच्या या मोहिमेला स्थानिक स्तरावर भाजपकडून रसद पुरवली जाण्याची शक्यता आहे. मनसेकडून आंदोलन झाल्यास त्यामध्ये भाजपचे कार्यकर्तेही सहभागी होऊ शकतात. त्यामुळे मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून आता भाजप कार्यकर्त्यांनाही नोटिशी पाठवायला सुरुवात केली आहे.

एकूणच राज यांच्या मरगळ आलेल्या पक्षाला आणि कार्यकर्त्यांना नवसंजीवनी द्यायची असेल तर राज ठाकरे यांना पुन्हा अटक हवीच आहे. 16 वर्षांपूर्वी झालेल्या अटकेमुळे राज यांना त्याचा फायदा विधानसभेत झाला होता. आता मात्र लगेच विधानसभा निवडणूक नाही. आता पुढील सहा महिन्यांत राज्यातील 18 हून अधिक महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. पक्षाला नवीन ओळख देताना मराठी, भूमिपुत्र हा अजेंडा बाजूला ठेवत राज ठाकरे यांनी शिवसेनेप्रमाणे हिंदुत्वाची शाल अंगावर घेतली आहे. शिवसेनेने सत्तेसाठी सेक्युलर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्यामुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची टीका वारंवार भाजप आणि मनसेही करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेची जागा घेण्याचा प्रयत्न राज यांचा आहे. मागील सहा महिन्यांतील घटनाक्रम पाहता राज यांचे सगळे डावपेच बरोबर आहेत. त्याचा क्लायमॅक्स राज ठाकरे यांच्या अटकेने होणार असेल तर ठरलेल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे किंवा भाजपच्या स्क्रिप्टप्रमाणे सारं काही सुरू आहे, असे म्हणण्यास वाव आहे. कारण राज यांचा अयोध्या दौरा 5 जूनला आहे आणि अटकेचे कवित्व महिनाभर असेच सुरू राहिल्यास फायदा राज आणि मनसेलाच होणार यात वाद नाही. म्हणून अटक व्हावी ही तर राजची इच्छा!

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -