घरफिचर्समायमहानगर ब्लॉगधाडसत्र की सूडसत्र !

धाडसत्र की सूडसत्र !

Subscribe

मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर आणि पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल येण्याआधीच मुंबईमध्ये एका मागोमाग एक धाडसत्र सुरू झालेली आहेत. मंगळवारी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय हॉटेल व्यावसायिक राहुल कनाल यांच्या घरावर आणि कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या. त्याचवेळी शिवसेनेचे पदाधिकारी संजय कदम यांच्याही घरावर धाडी टाकण्यात आल्या, त्यातून महत्वाच्या गोष्टी समोर येत नाहीत, तोच अनिल परब यांच्या सीएच्या घरावरही धाडी टाकण्यात आल्या. गेले काही दिवस अनिल परब हे ईडीच्या रडारवर आहेत. त्याच वेळी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आणि कार्यालयावर पडलेल्या धाडी आणि त्यातून मिळालेले घबाड पाहता शिवसेनेतील आणि सरकारमधील महत्वाची मंडळी अडचणीत येणार असे दिसते. गेले काही दिवस महानगरपालिकेत यशवंत जाधव यांचं वाढलेले प्रस्थ, त्यांच्याकडे असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या, त्यांचं थेट मातोश्रीच्या महत्वाच्या व्यक्तींना रसद पुरवणं या सगळ्या गोष्टींसाठी सल्लागाराची भूमिका वठविण्याचं काम परिवहन मंत्री अनिल परब आणि वरुण सरदेसाई करत होते.

यापैकी अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चाणक्य, तर वरूण देसाई हे आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत. राहुल कनाल आदित्य ठाकरे यांच्या सर्वात विश्वासू व्यक्तींपैकी एक समजला जातो. मुंबई महानगरपालिकेतील महत्वाची पदं इतकंच नव्हे तर पहिल्या फटक्यात घोषित झालेली सरकारकडील महत्त्वाची पदं हीदेखील याच राहुल कुणालच्या पदरात पडलेली आहेत. गेल्या काही वर्षात या राहुल कनालचं वांद्रे परिसरात शिवसेनेत आणि मुंबई महानगरपालिकेत वाढलेले प्रस्थ हे अनेकांच्या लक्षात येणारच नव्हतं तर डोळ्यात खूपत होतं, ज्या गोष्टी शिवसेनेच्या आमदार खासदारांसाठी महिनोन्महिने प्रलंबित राहत होत्या, त्या गोष्टी राहुल कनाल आणि वरूण सरदेसाई चुटकीसरशी हातानिराळ्या करून मोकळे होतायत. सहाजिकच त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वाटत होती. मात्र पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाच्या आधीच मुंबईत सुरू झालेल्या या धाडींना राजकीय वास येत असला तरी त्यातून बाहेर आलेलं घबाडं दुर्लक्षित करता येणार नाही.

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेचे नेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर सुरू असलेल्या चार दिवसांच्या धाडीत जे घबाड सापडलं ते पाहता अनेक बडी नाव अडचणीत येतील अशी अटकळ होती. याच यशवंत जाधव यांच्या घरावर धाडसत्र सुरू असताना काही छोटे-मोठे नगरसेवक आणि अडगळीत पडलेले नेते यांनी इमारतीच्या खाली जाऊन पंधरा-वीस मिनिटं उभं राहून त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्या मातोश्रीने यशवंत जाधवांना या पदावर सलग पाच वेळा बसण्याचा मान दिला त्यांनी जाधव यांच्याकडे वारेमाप घबाड सापडताच त्यांच्यासाठी जाहीरपणे समोर येऊन बोलणं टाळलं होतं. ज्या आदित्य ठाकरे यांचा शब्द जाधव यांसाठी शिरसावंद्य मानण्याची अलिखित अट घालण्यात आलेली आहे, त्या आदित्य ठाकरे यांनीदेखील जाधव कुटुंबातील सदस्यांपासून अंतर राखणं पसंत केलं. मात्र तेच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे राहुल कनाल यांच्यावर धाड पडताच विधिमंडळाच्या परिसरात असणार्‍या माध्यमांसमोर हिरीरीने बाजू मांडायला जातात.

म्हणजे यशवंत जाधवांपेक्षा राहुल कनाल यांचं शिवसेनेसाठी योगदान खूपच महत्वाचं आणि मोठं समजायला हवं. जागतिक महिला दिनाच्या दिवशी सकाळपासून सुरू झालेलं मुंबईतलं धाडसत्र येणार्‍या काळात आणखी व्यापक होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. मंगळवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाचा परिसर सोडल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कारस्थानी राजकारणाचा एक वेगळा चेहरा महाराष्ट्रासमोर आणला. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांमुळे पोलीस अधिकार्‍यांची आणि व्यवस्थेची नालस्ती झाली. या प्रकाराचा राज्य पोलिसांकडून तपास व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे सीबीआयला तपास करून देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलेली आहे. नजीकच्या काळात मंगळवारी सुरू झालेले धाडसत्र अधिक मोठ्या प्रमाणात तीव्र होईल याचे संकेतही मिळत आहेत. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होईल.

- Advertisement -

राज्यात आणि केंद्रात वेगवेगळ्या पक्षांची सरकार असली की सवतासुभा तयार होतच असतो, मात्र महाराष्ट्र आणि बंगालसारख्या राज्यांमध्ये जे सुरू आहे ते पाहिलं की राजकारणाचा स्तर आणि पातळी नेमकी कोणत्या थराला गेली आहे, हे सामान्य माणसाच्या आकलना पलीकडे जाणार आहे. आयकर विभाग आणि ईडीच्या सुरू असलेल्या धाडी हा काही पूर्णता सुडाचा किंवा ज्याच्या गाठीशी पैसे नाहीत त्यांना बोलण्याचा प्रकार असू शकत नाही, ज्यांच्यावर धाडी पडलेल्या आहेत त्यांनी केलेले व्यवहार आणि त्यांचं शासकीय कामकाज यामधलं वावरणं हे आक्षेपार्ह असल्यामुळेच या धाडींचा आणि तपासाचा ससेमिरा या मंडळींच्या मागे लागलेला आहे. मग त्यात अनिल परब असोत किंवा यशवंत जाधव. राहुल कनाल असोत किंवा संजय राऊत, यांच्यापैकी कुणीही दारिद्य्ररेषेखाली नाहीत. जेव्हा राज्यात सत्तेत असलेल्या नेत्यांवर धाडी पडत आहेत त्याच वेळेला तपास संस्था आणि यंत्रणा भाजपच्या पंखाखाली गेलेल्या मंडळींकडे दुर्लक्ष करतात, असं म्हणायला खूप मोठा वाव आहे.

त्यातही राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या नारायण राणे यांच्यासारख्या विद्यमान केंद्रीय मंत्र्याला मालवणी पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांच्या तपास प्रक्रियेपासून लवकरात लवकर सुटका करून घेण्यासाठी थेट गृहमंत्र्यांना फोन लावावा लागतो. याचा अर्थ आम्हाला इतकाच कळतो तो म्हणजे वरती कनेक्शन असलं की खालती बिनबोभाटपणे जगता येतं. मग ते राणे असोत किंवा जाधव वरचं कनेक्शन हे महत्वाचं आहे. एरवी वरच्या कनेक्शनमुळे बारमाही मजा मारणारे नेते आता धाडसत्र सुरू होताच मांजरीच्या भिजलेल्या पिल्लांसारखे वावरू लागले आहेत आणि भेदरून गेले आहेत. सध्या सुरू असलेल्या या धाडींमुळे शेकडो लाखांचे दागिने आणि कोट्यवधी रुपयांची माया या तपास संस्थांमुळे जनतेच्या समोर आलेली आहे. या पैशांमुळे मस्तवाल झालेले नेते या दोन चार धाडींमुळे घाबरतील किंवा बिथरतील असं जर आपल्यापैकी काहींना वाटत असेल तर तो आपला गोड गैरसमज आहे. मात्र पाच राज्यांच्या निकालांच्या आधी आणि निवडणुकांचे पडघम वाजू लागताच सुरू झालेल्या या धाडी निव्वळ तपासाचा भाग म्हणून त्याकडे पाहण्याचीही गरज नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -