राजकारण टाळून फक्त लढ म्हणा…

दरड, महापुरामुळे महाराष्ट्र शोकाकूल झाल्यानंतर सरकारी घर योजना, पॅकेजेसच्या घोषणा यंदाही सुरू झाल्या आहेत. कोकणात, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये पुराचे पाणी अद्याप ओसरलेले नाही. अशा परिस्थितीत मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मदत करण्यापेक्षा ती दाखवण्याची अहमहमिका सुरू झालेली आहे. त्यामुळे कुठल्याही दुर्घटनेचे होणा-या राजकारणाला हा पूरही अपवाद नाही. महाराष्ट्रातील पूरस्थिती, महाडमधील दरड दुर्घटनेचेही राजकारण होत आहे. कोकणी माणसाला दिलासा देण्याची गरज असताना वैयक्तिक राजकारणाची चिखलफेक होत आहे. यापेेक्षा सगळ्या नेत्यांनी संघटितपणे आपद्ग्रस्तांना मदत करायला हवी.

केंद्राच्या ताकदीवर या पूरसंकटात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न होत आहेत. रायगडमधील तळीये दरडग्रस्तांच्या मदत आणि पुनर्वसन, घर उभारणीच्या कामातही कुरघोडीचे राजकारण होत आहे. महाराष्ट्रातील पूरस्थितीनंतरही मदतीबाबत केंद्र आणि राज्य असा संघर्ष किंवा जबाबदारींची टोलवाटोलवी येत्या काळात पाहायला मिळणार आहे. पूर, दरडग्रस्तांच्या जखमा ताज्या असतानाच या राजकारणाला सुरुवात झाली आहे. कोकणात दौरे करणा-या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेली टीका ही पूर्णपणे राजकीय हेतूनेच प्रेरीत आहे. त्यामुळेच मदत नको, पण राजकारण आवर, असे बोलण्याची वेळ कोकणातील पूरग्रस्तांवर आली आहे. असेच राजकारण माळीण दुर्घटनेनंतरही झाले होते.

वीस वर्षांपूर्वी उस्मानाबाद, लातूरमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपाच्या खुणा आणि कटू आठवणी अजूनही विस्मृतीत गेलेल्या नाहीत. कुठल्याही दुर्घटनेनंतर दुःखाचा डोंगर कोसळतो, महापूर येतो. अशा परिस्थितीत तातडीने मदत करणे माणसाचा सहजस्वभाव असतो. मात्र अशी मदत करताना, त्या मदतीमुळे अडचणी वाढणार नाहीत ना, याचाही विचार व्हायला हवा. महापूर, भूकंप आणि दरड कोसळण्याच्या दुर्घटनेतील हानी, भीषणता संपूर्णपणे समोर यायला काही काळ जावा लागणार आहे. या काळात मदतीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. पूर ओसरल्यावर मदत करणा-या सरकारी, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, नेत्यांचे पाहणी दौरे वाढून आधीच मदतीच्या कामात असलेल्या स्थानिक प्रशासनावरील ताण वाढवण्यात अर्थ नाही. किल्लारी, सास्तूर गावात आलेल्या भूकंपानंतर या भागात मदतीचा ओघ सुरू झाला.

जगभरातील प्रसारमाध्यमांनी या भूकंपाचे वृत्तांकन केल्यानंतर जागतिक संस्थांकडूनही मदतीचा ओघ सुरू झाला. त्याचा परिणाम असा झाला. यात तात्पुरते उभारण्यात येणारे तंबू या शिवाय बिस्किटांचे तयार पीठ, सूप्स, शिजवण्याचे खाद्य, नूडल्स आदी खाद्यपदार्थही होते. भूकंपानंतर हे पदार्थ तातडीने उपयोगात आणता येणे शक्य नव्हते. त्यामुळे हे पदार्थ टिकवण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने ही मदत उपयोगात आणता आली नाही. जगभरातील मानवी जीवनशैलीमध्ये फरक असल्याने त्या त्या ठिकाणी माणसांच्या उपयोगात येतील अशाच वस्तू संबंधितांकडून माणुसकीच्या दृष्टीकोनातून पाठवण्यात आल्या. या मदतीमागील भावना उदात्त होतीच, परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. कोकणातील स्थिती, तेथील जीवनाच्या गरजा यांचा विचार करूनच मदतीसाठी यंत्रणा उभारता यायला हवी.

मदतीच्या नियोजनाची अशीच यंत्रणा सातारा, सांगली आणि कोल्हापुरातही उभारता यायला हवी. या ठिकाणी झालेले नुकसान कधीही भरून न येणारे आहे. मालमत्तेची हानी पुन्हा भरून काढता येईल, मात्र जीवित हानीची वेदना कमी होण्यासाठी माणुसकीचा गहिवर महत्वाचा आहे. महाराष्ट्रावरील समुद्री तुफानाची संकटे अंगावर घेणा-या कोकणाला ख-याखु-या माणुसकीच्या मदतीची गरज आहे. पूर, दरडग्रस्त कोकणी माणसाच्या सोबत उभे राहून त्याला दिलासा देण्याची गरज आहे. मात्र हे करत असताना भावनेच्या भरात केलेल्या मदतीमुळे संकटातही संधी शोधणा-या आणि आपले अमानवी उखळ पांढरे करणा-या घटकांनाट मदत होऊ शकते हे ध्यानात घ्यावे. योग्य नियोजनबद्ध केलेल्या मदतीचा पुरेपूर उपयोग होतो. तर नियोजनाअभावी केलेल्या मदतीची अडगळच होते. सद्यस्थितीत पुराचे पाणी ओसरताना, दरड हटवली जात असताना वैद्यकीय मदतीची गरज सर्वाधिक आहे. या आघातातून सावरण्यासाठी आपले कुटुंबिय गमावलेल्यांना भावनिक आधार देण्याची गरज आहे.

महाराष्ट्रातील पूरस्थितीनंतर निर्माण झालेले प्रश्न नवे नाहीत. सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि समुद्रकिना-याच्या मधोमध असलेल्या कोकणात मुसळधार कोसळणारा पाऊसही नवा नाही. कोकणातील पावसात महिने, दोन महिने सूर्यदर्शन होत नसल्याचे कोकणवासीय सांगतात. जोरदार पावसात पूल पाण्याखाली जाऊन गाव, वाडीवस्तीचा संपर्क तुटणे नवे नाही. डोंगरद-यात राहाणारा तळ कोकणी माणसाला निसर्गाच्या खेळांची सवय असते. शेकडो वर्षे समुद्रकिनारी राहाणा-या माणसांमध्ये समुद्राचे गुण झिरपलेले असतात. खवळलेल्या समुद्राला आव्हान देणा-या किना-यावरील चिरे, कातळाचा खंबीरपणा कोकणी माणसात असतोच असतो. समुद्राच्या हजारो लाटा रोखण्याची ताकद या कातळात असते. कोकणामुळेच अवघ्या महाराष्ट्राला पाऊस मिळतो. कोकण सोडून उर्वरित महाराष्ट्रात झाडांची होणारी कत्तल चिंताजनकच असते.

मराठवाड्यातील वाढते तापमान 45 ते 47 डिग्री सेल्सियसपर्यंत गेल्यावर आपणास ग्लोबल वर्मिंगची चिंता वाटू लागते. कोकणाला पावसाची सवय होती, परंतु विकासाच्या नावाखाली कोकणातील निसर्ग ओरबाडून येथील तांबड्या मातीत सिमेंट मिसळल्याने पाण्याचा निचरा होण्यात निर्माण झालेला अडथळा महत्वाचे कारण असावे. जमिनीची धूप, चिरेखाणीतील डोंगरांचे सपाटीकरण यामुळे कोकणाची पाऊस झिरपण्याची नैसर्गिक क्षमता कमी होत आहे. चार पदरी, रस्ते, विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या विरोधात जाऊन उभारले जाणारे प्रकल्प नैसर्गिक आपत्तींना आमंत्रणच देणार आहेत. कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याच्या प्रयत्नात येथील निसर्गाला नख लावण्याचा होणारा प्रयत्न धोकादायक ठरणार आहे. पर्यटन आणि पर्यावरणपूरक व्यावसाय उभारणीवर अर्थचक्र चालवणारे देशही जगात आहेत. निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणासही हे शक्य आहे, त्यासाठी पुरेसे प्रयत्न व्हायला हवेत.

निसर्ग चक्रीवादळ, त्यानंतर तौक्ते आणि आता या महापूर हे तीन मोठे धक्के कोकणच्या किना-याने येथील भूमीला दिले आहेत. भौगोलिक रचनेमुळे अशी संकटे कोकणासाठी नवी नव्हती, मात्र विकासाच्या नावाखाली कणखर कोकणी माणसााला कमकुवत करण्याचे प्रकार होता कामा नयेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणातील शेतकरी समाधानी असतोच, तो निसर्गाला ओरबाडात नाही. पोटापुरते पेरतो आणि तेवढ्यावरच समाधान मानल्याने कोकणातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली नसतो, कोकणात विकासाच्या कृत्रिम, माणसांचा बाजारभाव ठरवणा-या अत्याधुनिक संकल्पना तांबड्या मातीत रुजलेल्या नसतात. त्यामुळेच सामान्य कोकणी माणूस जागतिकिकरणाच्या रेट्यातील वाढत्या औद्योगिक संकल्पानाच्या चक्रात अडकलेला नसतो. त्यामुळेच तो तणावविरहीत असतो. किना-यावरील डोंगर द-यातील पशुपक्ष्यांमध्ये वाटलेला निसर्गाचा असीम आनंद कोकणी माणसाच्या वाट्याला पुरून उरेल इतका आलेला असतो. या आनंदात माणसांच्या औद्योगिक लोभाची कृत्रिम भेसळ नसते. हा आनंद समाधान निसर्गानेच कोकणी माणसांना बहाल केलेला आहे. त्यात माणसांनी ढवळाढवळ करूच नये.

कुठल्याही प्रदेशाचा विकास हा आवश्यक असतो. त्या माध्यमातून तिथे उद्योगधंदे उभे राहत असतात. पण हा विकास करताना तो तिथे राहणार्‍यांच्या मुळावरच येणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण निसर्गाचे दोहन करायला काहीच हरकत नाही, पण त्याचे शोषण होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी. मानव हा निसर्गाचाच भाग आहे, याचे त्याला विस्मरण होता काम नये. त्यामुळे जर आपण निसर्गाची काळजी घेतली नाही, तर त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. कोकण हा निसर्ग सौंदर्याने संपन्न असा प्रदेश आहे, त्याच प्रमाणे हा भाग नैसर्गिकदृष्ठ्याही संवेदनशील आहे. त्यामुळे विकासाच्या नावावर त्याची ओरबाडणूक झाली तर त्याचे दुष्परिणाम जेव्हा मोठा पाऊस येतो तेव्हा जाणवतात. पाऊस हा तसा कोकणाला नवा नाही, पण आता विकासाच्या नावाखाली कोकणातील डोंगराचा पाया ढिला होत आहे, त्यामुळे डोंगर आपला तोल सावरू शकत नाहीत. पाऊस पडतो तेव्हा मग ते कोसळतात आणि त्याखाली माणसांचे बळी जातात.

राज्याच्या हवामान खात्याने पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ज्यात ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर तसेच सातारा या जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टीची शक्यता वर्तवली जात आहे. ठाण्यात शुक्रवारी शनिवारी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि रायगडमध्ये पुढचे चार दिवस जोरदार पाऊस होणार आहे. कोल्हापुरातही अतीवृष्टी होणार असून त्यामुळे पूरस्थितीतून सावरण्यासाठी आणि पाणी ओसरण्यासाठी आणखी कालावधी जाणार आहे. अशा परिस्थितीत राजकारण दूर ठेवून पूर, दरडग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी कोकणी माणसाच्या पाठीवरती हात ठेवून लढ म्हणण्यासाठीतरी महाराष्ट्राने एकत्र यायला हवे.