घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमहाराष्ट्राचा बिहार व्हायचा नसेल तर...!

महाराष्ट्राचा बिहार व्हायचा नसेल तर…!

Subscribe

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने खडे फोडले जायचे. हीच खडे फोडणारी भाजपची मंडळी सत्तेवर आल्यावर फार मोठा चमत्कार झाला नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दोन तास आकाश पाताळ एक करत महाराष्ट्राचा बिहार कसा झालाय, याचा पाढा वाचला. पण, तेच सत्तेत आल्यानंतर फडणवीस यांच्या नागपुरात दिवसाढवळ्या खून पडले. पिंपरी चिंचवडला तर पोलीस यंत्रणा आहे की नाही, अशी शंका यावी इतपत परिस्थिती वाईट झाली होती. ठाकरे सरकार आल्यानंतर सुद्धा या सार्‍याला लगाम बसलेला नाही. तुरुंगातून सुटल्यानंतर कुख्यात गुंड गजानन मारणे गाड्यांमधून मोठी मिरवणूक काढतो, याचा अर्थ या गुंडापुंडाना कायद्याचा धाक नाही, असेच होते. जी गोष्ट बाहेरच्या गुंडांची, तीच खाकी वर्दीतील पोलसांची म्हणता येईल. युनूस ख्वाजा मृत्यू प्रकरणात दोषी आढल्यामुळे निलंबित झालेला पोलीस अधिकारी सचिन वाझे ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर पोलीस सेवेत येतो आणि गुन्हे विभागात वरिष्ठ अधिकार्‍यांना बाजूला सारून त्याच्या हाती महत्वाच्या प्रकारणांची सूत्रे दिली जातात, याचा अर्थ काय होतो? हे सारे सत्ताधार्‍यांचे हात डोक्यावर असल्याशिवाय होऊ शकत नाही.

शेवटी वाझेसारख्या अधिकार्‍याला नको तितके मोठे केले तर काय होऊ शकते हे मनसुख हिरेन प्रकरणावरून सार्‍या देशाने पाहिले. महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. वाझे ज्या ठाण्यातून आला होता तेथेच मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांची हत्या व्हावी आणि या हत्येतील मारकेरी या खुनाची सुपारी ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच नगरसेवक नजीब मुल्ला यांनी दिली असे तपासात दिसत असेल तर एकूण परिस्थिती गंभीर आहे. हे सारे प्रकार म्हणजे गुंड, राजकारणी, पोलीस हे सारेजण कायदा सुव्यवस्था आपल्याला हवी तशी वाकवत आहेत. असे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये घडते. आता असेच प्रकार राजरोस इथे होत असतील तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला फारसा वेळ लागणार नाही.

- Advertisement -

मनसेचे ठाण्यातील पदाधिकारी जमील शेख यांच्यावर 23 नोव्हेंबर 2020 रोजी भरदिवसा राबोडी परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. जमील शेख हे मोटारसायकलवरून जात असताना मोटारसायकल वरून आलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एकाने जमील शेख यांच्या डोक्यात गोळी झाडून पळ काढला होता. या गुन्ह्याचा तपास ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. गुन्हे शाखेने नाशिक जिल्ह्यातून शाहिद शेख याला अटक केली होती. मात्र या हल्ल्यातील मुख्य हल्लेखोर फरार झाले होते, त्याच्या शोधासाठी नितीन ठाकरे आणि त्याचे पथक मागील काही महिन्यापासून उत्तर प्रदेशात तळ ठोकून बसले होते. ठाणे पोलिसांनी युपीच्या स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने सापळा रचून इरफान सोनू शेख मन्सुरी याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी करण्यात आली असता त्याने ओसाम आणि शाहिद नावाच्या व्यक्तीने मला या हल्ल्यासाठी बोलावून घेतले होते. यासाठी मला दोन लाख रुपये देण्यात आले आणि ही हत्या ठाण्याचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या सांगण्यावरून हत्या करण्यात आल्याची त्याने कबुली दिली आहे.

जमील शेख यांच्या मारेकर्‍याला अटक करण्यासाठी तब्बल शंभर दिवस उत्तर प्रदेशात तग धरून बसलेल्या ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने मारेकर्‍याला सुंगधी तेलाच्या वासावरून त्याला ओळखले आणि पळून जाण्यापूर्वीच त्याच्या मुसक्या आवळल्या. इरफान हा उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील एका खेड्यात राहत असल्याची माहिती मिळाली होती. यामुळे नितीन ठाकरे यांची टीम पथकासोबत लखनौ येथे रवाना झाली होती. इरफान हा आजीच्या घरी आला असल्याची माहिती पथकाला मिळाली. आजीकडे चौकशी केली असता इरफान इकडे आला नाही, असे तिने सांगितले. दरम्यान, नितीन ठाकरे यांना घरात एका विशिष्ट सुगंधी तेलाचा वास आला. मात्र इरफान सापडला नाही. ९0 दिवस उलटले होते. शेवटी इरफानचा शोध घेत घेत पोलीस पथक लखनौ बस स्टॅन्डजवळ दाखल झाले. इरफानचा शोध सुरू असताना ठाकरे यांच्या नाकात बसलेला तेलाचा सुगंध त्यांना बस स्टॅन्डवर आला आणि त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. तेव्हा इरफान त्यांना दिसला. पोलीस पथकाने तिला तिथेच पकडले.

- Advertisement -

ठाकरे यांनी त्याला पहिला प्रश्न सुगंधी तेलाबाबत विचारला असता, हा साब मैने ही लगाया था थंडा तेल, और उस समय मै दादी के घर पर था ! उस वक्त भी थंडा तेल लगाके सोया था, और आप आने से दस मिनिट पहिले वहा से निकल पडा ! अशी कबुली इरफानने दिली. गुन्हेगारांपर्यंत जाऊन पोलिसांनी आपले काम चोख बजावले आहे. आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत जाण्यासाठी गृह विभाग काय पावले उचलते, यावर या केसचा खरा निकाल लागणार आहे. कारण मारेकरी कोणी दुसरे असले तरी मारायची सुपारी देणारी व्यक्ती ही राजकीय असेल तर हे प्रकरण अतीगंभीर होते, हे लक्षात घ्यायला हवे आणि याच प्रमुख बाबीकडे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारचे, विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे लक्ष वेधले आहे.

यासाठी राज हे पवार यांची भेट घेणार आहेत. असे राजरोसपणे खून पडायला लागले, तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही, असे सांगताना थेट नजीब मुल्ला यांच्याकडे बोट दाखवले आहे. माझे पक्षातील सहकारी जमील शेख यांची हत्या झाली. या हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून उत्तर प्रदेशपर्यंत तपास करण्यात आला. यावेळी काही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी कबुली जबाब दिला असून, यात राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्लांचं नाव आलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची तशी प्रेसनोट आहे. नजीब मुल्ला यांनीच जमील शेख यांची हत्या करण्याची सुपारी दिली होती, असं या प्रेस नोटमध्ये म्हटलेलं आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक दिवसाढवळ्या लोकांना मारत आहेत. याच नजीब मुल्लांचं नाव सूरज परमार बिल्डर आत्महत्या प्रकरणात आलं होतं. ती केसही रफादफा झाली. आता पुन्हा त्याचं नाव आलं आहे. आता राज्य सरकार काय करतंय हे पाहतोय, असे सांगत राज यांनी मागच्या-पुढच्या विषयाला वाचा फोडली आहे.

ही वाचा फोडताना राज यांनी ‘पवार साहेबांना अशी मंडळी पक्षात सांभाळायची असतील तर इतरांचे हातही बांधलेले नसतात. खुनाला खुनाने उत्तर हे सुसंस्कृत महाराष्ट्रात सुरू झालं तर ते चित्र चांगलं दिसणार नाही. वेळीच या सगळ्याला आवर घालायला हवा. या माणसाला अटक होणं आणि त्याला शिक्षा होणं गरजेचं आहे,’ अशा खास ठाकरी शैलीत आपले म्हणणे मांडले आहे. म्हणूनच या प्रकरणात सरकार काय पावले उचलते यावर राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला वेळीच आळा बसणार आहे की नाही, हे दिसून येईल. अन्यथा महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -