घरफिचर्समायमहानगर ब्लॉगजपान आणि जगानेही आज एक द्रष्टा नेता गमावला; पंतप्रधान मोदींचा शिंजो आबेंवर...

जपान आणि जगानेही आज एक द्रष्टा नेता गमावला; पंतप्रधान मोदींचा शिंजो आबेंवर विशेष लेख

Subscribe

जपान मध्ये अत्यंत चैतन्यमय भागीदारीचे संबंध निर्माण करण्यात, त्यांचा पाठिंबा अतिशय मोलाचा होता.

माझे मित्र आबे सान

नरेंद्र मोदी

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अतिशय जवळचे मित्र आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे, ज्यांचा काल एका हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला, त्यांच्याविषयी एक भावनोत्कट ब्लॉग लिहिला आहे.

शिंजो आबेजपानचे अद्वितीय नेते, जागतिक कीर्तीचे एक उत्तुंग मुत्सद्दी राजकारणी, भारतजपान यांच्यातील मैत्रीचे महान शिल्पकारआज आपल्यामध्ये नाहीत. जपान आणि जगानेही आज एक अत्यंत द्रष्टा नेता गमावला आहे आणि, मी माझा एक अत्यंत प्रिय मित्र गमावला आहे.

- Advertisement -

मी गुजरातचा मुख्यमंत्री असतांना, 2007 साली पहिल्यांदा शिन्झो आबे यांना भेटलो. त्यांच्या माझ्या पहिल्या भेटीपासूनच, आमची मैत्री कार्यालयीन सोपस्कार आणि शिष्टाचारांचे अडथळे पार करुन त्याच्या पलीकडे गेली होती.

क्योटोच्या तोजी मंदिरात आमची झालेली भेट, शिंकानसेन (ट्रेन) मधून आमचा एकत्रित प्रवास, अहमदाबादला साबरमती आश्रमात आम्ही एकत्रित दिलेली भेट, काशीमध्ये दोघांनी मिळून केलेली गंगा आरती, टोक्यो मधला भव्य चहा समारंभ.. आमच्या दोघांच्या भेटीतल्या अशा असंख्य अविस्मरणीय क्षणांची यादी खरेच खूप मोठी आहे आणि माऊंट फूजीच्या पायथ्याशी असलेल्या यामानाशी प्रांतातल्या त्यांच्या मूळगावी मला आमंत्रित करुन, त्यांनी मला जो सन्मान दिला दिला होता, त्याच्या स्मृती माझ्या मनात चिरकाल राहणार आहेत.

2007 ते 2012 या काळात, ते जपानचे पंतप्रधान नसतांनाही, आणि अगदी अलीकडे, 2020 नंतर सुद्धा, माझे त्यांच्याशी असलेले स्नेहाचे घट्ट संबंध कायम दृढ राहिले. आबे सान यांच्यासोबतची माझी प्रत्येक भेट वैचारिकदृष्ट्या मला अधिकाधिक समृद्ध करणारी होती. त्यांच्याकडे कायमच नवनवीन, अभिनव कल्पनांचा साठा असे, तसेच, प्रशासन, अर्थव्यवस्था, संस्कृती, परराष्ट्र धोरण आणि अशा कितीतरी विषयांवर त्यांच्याकडे मौल्यवान ज्ञान आणि दूरदृष्टी होती.

गुजरातसाठी मी आखलेल्या आर्थिक धोरणात, त्यांनी दिलेले सल्ले फार प्रेरक होते. तसेच, गुजरात आणि जपान मध्ये अत्यंत चैतन्यमय भागीदारीचे संबंध निर्माण करण्यात, त्यांचा पाठिंबा अतिशय मोलाचा होता.

नंतरही, भारत आणि जपान यांच्यातील राजनैतिक भागीदारीत अभूतपूर्व परिवर्तन घडवण्यासाठी, त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. आधी दोन्ही देशांमध्ये असलेल्या, अत्यंत मर्यादित अशा द्वीपक्षीय संबंधांना आबे सान यांनी व्यापक आणि सर्वसमावेशक आयाम दिले. इतके व्यापक, की देशाच्या प्रत्येक क्षेत्राला ह्या संबंधांचा स्पर्श झाला, इतकेच नाही, तर दोन्ही देशांच्या तसेच या प्रदेशाच्या सुरक्षिततेसाठी हे संबंध अत्यंत महत्वाचे ठरले. त्यांच्यासाठी, हे संबंध दोन देशांच्या आणि जगभरातल्या लोकांसाठीही अत्यंत परिणामकारक असे संबंध होते. भारतासोबत नागरी आण्विक कराराचा पाठपुरावा करण्याचा त्यांचा दृढनिश्चय होता जो त्यांच्या देशासाठी अत्यंत कठीण होता आणि भारतातील हाय स्पीड रेल्वेसाठी अत्यंत उदार अटीशर्ती निश्चित करण्यात, त्यांची भूमिका निर्णायक ठरली होती. स्वतंत्र भारताच्या वाटचालीतील महत्त्वाच्या या प्रवासात, जपान प्रत्येक पावलावर विकासाला गती देण्यासाठी भारतासोबत असेल, हे त्यांनी सुनिश्चित केले. भारतजपान संबंधांमधील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन 2021 मध्ये त्यांना प्रतिष्ठेचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

जगातील विविध जटिल स्थित्यंतरांची आबे सान यांना अचूक माहिती होती, त्याचबरोबर राजकारण, समाज, अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर होणारे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन काळाच्या पुढे राहण्याची त्यांची दूरदृष्टी होती , कोणती निवड करायची याचे ज्ञान होते, परिषदांच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट आणि धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आणि देशातील जनतेला , जगाला बरोबर घेऊन जाण्याची दुर्मिळ क्षमता त्यांच्याकडे होती.त्यांच्या दूरगामी धोरणांनी आबेनोमिक्स याने जपानी अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा दिली आणि तिथल्या लोकांमध्ये नवोन्मेष आणि उद्योजकतेची भावना नव्याने प्रज्वलित केली.

त्यांनी आपल्याला दिलेल्या सर्वात मोठ्या भेटवस्तू आणि त्यांचा सर्वात चिरस्थायी ठेवा ज्यासाठी जग कायम ऋणी राहील अशी गोष्ट म्हणजे बदलते वारे आणि संकट ओळखण्याची दूरदृष्टी आणि त्याला सामोरे जाण्यासाठी आवश्यक नेतृत्व त्यांच्याकडे होते. इतरांच्या खूप आधी, त्यांनी 2007 मध्ये भारतीय संसदेतील आपल्या मुख्य भाषणात, समकालीन राजकीय, सामरिक आणि आर्थिक वास्तवाचा उल्लेख करताना या शतकात जगाला आकार देईल अशा हिंदप्रशांत क्षेत्राच्या उदयाचा पाया रचला.

सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेप्रती आदर, आंतरराष्ट्रीय कायदा आणि नियमांचे पालन, दृढ आर्थिक सहभागातून समानतेच्या भावनेने आणि सामायिक समृद्धीसाठी शांततेने आंतरराष्ट्रीय संबंध जपणे या मूल्यांवर आधारित, स्थिर आणि सुरक्षित, शांततापूर्ण आणि समृद्ध भविष्यासाठी एक रूपरेषा आणि व्यवस्था उभारण्यात ते आघाडीवर होते.

क्वाड, आसियान नेतृत्वातील मंच, हिंदप्रशांत महासागर उपक्रम, आशियाआफ्रिका विकास कॉरिडॉर आणि आपत्ती रोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडीला त्यांच्या योगदानाचा मोठा फायदा झाला. शांतपणे आणि गाजावाजा न करता, देशांतर्गत संभ्रम आणि परदेशातून व्यक्त केला जात असलेल्या संशयावर मात करून, त्यांनी संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात संरक्षण, कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासाबरोबरच जपानच्या धोरणात्मक सहभागामध्ये परिवर्तन घडवून आणले. त्यासाठी हा प्रदेश नियतीबद्दल अधिक आशावादी ठरला आहे आणि जगाला भविष्याबद्दल अधिक विश्वास वाटत आहे.

या वर्षी मे महिन्यात माझ्या जपान भेटीदरम्यान मला आबे सान यांना भेटण्याची संधी मिळाली, त्यांनी नुकतेच जपानभारत संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारले होते.त्यावेळी ते नेहमीप्रमाणे उत्साही, मनमोकळे, करिष्मा असलेले आणि अतिशय विनोदी होते. भारतजपान मैत्री आणखी दृढ कशी करता येईल याविषयी त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना होत्या. त्या दिवशी मी त्यांचा निरोप घेतला तेव्हा ही आमची शेवटची भेट असेल याची मला कल्पनाही नव्हती.

त्यांचा प्रेमळपणा आणि बुद्धिमत्ता, त्यांनी दाखवलेली कृपादृष्टी आणि औदार्य, मैत्री आणि मार्गदर्शन यासाठी मी त्यांचा नेहमीच ऋणी राहीन आणि मला त्यांची खूप आठवण येईल. त्यांनी आम्हाला मोकळ्या मनाने स्वीकारले, हे स्मरणात ठेवून भारतात आम्ही त्यांच्या निधनाबद्दल दुखवटा पाळला आहे. लोकांना प्रेरणा देणे हे त्यांना सर्वात जास्त आवडायचे आणि तेच करत असताना त्यांना मृत्यूने गाठले. त्यांचे आयुष्य दुर्दैवीरित्या हिरावून घेतले असले तरी त्यांचा वारसा पुढे कायम राहील.

मी भारतातील लोकांच्यावतीने आणि माझ्या स्वत:च्या वतीने जपानच्या लोकांच्या, विशेषत: आकी आबे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मनापासून सहभागी आहे. ओम शांती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -