घरफिचर्समायमहानगर ब्लॉगजावेद अख्तरांचे सोयीस्कर संतुलन !

जावेद अख्तरांचे सोयीस्कर संतुलन !

Subscribe

जावेद अख्तर हे गीतकार आणि सुधारणावादी विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यात बरेचदा त्यांच्या पत्नी शबाना आझमी यांची यांना साथसोबत आणि समर्थन मिळत असते. पण बरेचदा असे दिसते की, त्यांचे सुधारणावादी विचार हे सोयीस्कररित्या मांडलेले असतात. सोयीस्कर म्हणजे भारतातील मुस्लीम त्यांचा सलमान रश्दी करणार नाहीत, याची ते काळजी घेत असतात. अख्तर हे उत्तम गीतकार आहेत, यांची अनेक गाणी अर्थपूर्ण आणि मनाला भावणारी असतात, त्यात शंका नाही, पण ते जेव्हा कुठल्या मोठ्या विषयावर भूमिका घेतात, त्यावेळी त्यात त्यांचा हिंदुत्वविरोध डोकावल्याशिवाय राहत नाही. या देशात मुस्लिमांची बाजू घेणारे, किंबहुना त्यांचे नेते म्हणवणारे काही नेते आणि विचारवंत आहेत, त्यापैकी अख्तर एक आहेत.

कारण ज्यावेळी मुस्लिमांवर शेकणारे विषय पुढे येतात किंवा घटना घडतात, तेव्हा हेच जावेद सोयीस्करपणे शांत बसतात, पण जेव्हा हिंदुत्ववाद्यांना झोडायची संधी मिळते, त्यावेळी जागे होतात आणि स्वयंस्फूर्त टोकदार विधाने करायला लागतात. जावेद यांनी नुकतीच एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काही विधाने केली, त्यातून खळबळ माजण्याचे खरे तर कारण नाही, कारण अशी विधाने करणे जावेद आणि अन्य काही कट्टर मुस्लिमांच्या लाईफस्टाईलचा एक भाग झालेला आहे. कारण त्यांना एक गोष्ट माहीत आहे, भारतामध्ये थेट हिंदू किंवा हिंदुत्ववादी संघटनांवर कितीही बोचरी टीका केली तरी इथे आपल्याला काही धोका नाही. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली ते आपले विचार व्यक्त करतात. एनडीटीव्हीला मुलाखत देताना जावेद अख्तर म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांचे समर्थक हे तालिबानी मानसिकतेचे आहेत.

- Advertisement -

तालिबानची कृती ही रानटी आहे. त्यांची धार्मिक उन्माद माजवण्याची कृती ही आरएसएसप्रमाणे आहे. तालिबानी ज्याप्रमाणे मुस्लीम राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचप्रमाणे भारतातील काहीजण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडत आहेत. अख्तर यांनी आरएसएस आणि हिंदुत्ववादी संघटनांची तुलना अफगाणिस्तानमधील तालिबानशी करताना दोन्ही बाजूंना संतुलित करण्यासाठी एक लघुविधान केले आहे. अख्तर म्हणतात, भारतातील एक छोटासा मुस्लीम गट तालिबानचे समर्थन करतो. या देशातील काही मुस्लिमांनी अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता काबीज केल्यावर त्याचे स्वागत केले. भारतातील मुस्लीम तरुणांना चांगले जीवन जगायचे आहे. ते चांगले शिक्षण आणि रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण मुस्लिमांचा एक लहानसा गट स्त्री-पुरुषांमध्ये भेदभाव करतो.

अख्तर यांनी या ठिकाणी आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांचे समर्थक तालिबानी मानसिकतेचे आहेत, असे म्हटले आहे, पण या देशातील तालिबानचे समर्थन करणारे मुस्लीम हे तालिबानी मानसिकतेचे आहेत, असे विधान करण्याची हिंमत जावेद यांनी केली नाही. त्यांना अशी हिंमत का होत नाही, हाही एक विचार करण्यासारखा विषय आहे. कारण या भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करून मुस्लीम धर्माविषयी आपली मते मांडणार्‍या सलमान रश्दी यांना भारत सोडण्यास इथल्या कुठल्या हिंदूंनी भाग पाडले नाही. त्यांचे विचार कट्टर मुस्लिमांना पटणारे नव्हते, म्हणून त्यांच्या जीवाला धोका होता, म्हणून त्यांना देश सोडावा लागला. पाकिस्तानात महिलांचे हक्क, शिक्षण, त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढणार्‍या युसुफझाई मलाला हिला पाकिस्तान सोडावा लागला. तो तिथल्या कट्टर मुस्लिमांमुळेच सोडावा लागला. बांगलादेशात ‘लज्जा’ ही कांदबरी लिहून व्यक्तीस्वातंत्र्याचा उपयोग करणार्‍या लेखिका तसलिमा नसरीन यांना तिथल्या कट्टर मुस्लिमांमुळे जीव वाचवण्यासाठी बांगलादेश सोडावा लागला. याचा अर्थ भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील सगळेच मुस्लीम हे धर्मांध आहेत, असे नाही.

- Advertisement -

जावेद भारतातील ज्या तालिबान समर्थक छोट्या मुस्लीम गटाचा आपल्या मुलाखतीत ओझरता उल्लेख करतात, तसेच मुस्लीम कट्टरवादी गट पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये आहेत, आणि त्या छोट्या कट्टरवादी गटाचींच जावेद यांच्यासारख्या व्यक्तीस्वातंत्र्यवादी विचारवंतांना भीती वाटते. त्यांना इथल्या आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल यांच्यासारख्या हिंदुत्ववादी संघटनांची भीती वाटत नाही, त्यामुळे त्यांच्यावर हवी तशी टीका करतात. या संघटनांवर बदनामीकारक टीका केली म्हणून यातील कुठली हिंदू संघटना जावेद यांनी भारत सोडावा, असा फतवा काढणार नाही, याची जावेद यांना आणि त्यांच्यासारख्या मंडळींना पूर्ण खात्री असते. भारत हा हिंदूबहुल देश आहे, पण याच देशात राहून हिंदुत्ववादी संघटनांवर यथेच्छ टीका करण्याचे अभिव्यक्तीस्वांतत्र्य भारतातमध्येच मिळते. कारण जगात कुठल्याही देशात राहून तिथल्या बहुसंख्य लोकांच्या संघटनांवर अशी प्रच्छन्न टीका करता येत नाही. किंवा तसे कुणी धाडसही करत नाही. कारण त्यामुळे अनेकांना जीव वाचवण्यासाठी आपला राहता देश सोडावा लागलेला आहे. जावेद हे सोयीस्कर भूमिका घेत आहेत.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी जो हाहा:कार चालवलेला आहे. त्याचा जगभरातून निषेध केला जात आहे. तसाच तालिबान्यांचा थेट निषेध जावेद यांना करता आला असता, पण तसे त्यांनी केले नाही. त्यांनी आरएसएस, विहिंप आणि बजरंग दलाची बरोबरी तालिबानशी केली. असे त्यांनी केले याचा बारकाईने विचार केला की, असे लक्षात येते की, जावेद यांनी तालिबानचा थेट निषेध केला असता तर भारतातील तालिबान समर्थक जो छोटा मुस्लीम गट आहे, त्याच्या प्रतिक्रियेची त्यांना चिंता असावी. कारण हाच गट आपल्या विरोधात आवई उठवू शकतो आणि ते आपल्याला जड जाऊ शकते. तालिबानवर आपण थेट टीका केली तर आपल्याला मुस्लीम विरोधक ठरविण्यात येईल, याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळेच त्यांनी तालिबानचा सोयीस्कर निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचा आधार घेतला. कारण त्यांना माहीत आहे, ज्या हिंदुत्ववादी संघटनांवर त्यांनी टीका केली आहे. त्यांच्यापासून त्यांना कुठलाही धोका नाही. त्यामुळे याच सुरक्षिततेचा वापर करून जावेद आणि त्यांच्यासारखी मंडळी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बिनधास्तपणे वापर करत असतात.

अकबरुद्दीन ओवैसी यांनी या देशातील बहुसंख्य हिंदुंचे शिरकाण करण्याबाबत जी धक्कादायक विधाने केली आहेत, तशी ते अन्य देशांमध्ये असते तर तिथल्या बहुसंख्य लोकांविरुद्ध करू शकले असते का? तर अर्थातच नाही. पण भारत हा लोकशाहीवादी देश आहे, इथे व्यक्तीस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आणि त्याचसोबत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, देश हिंदूबहुल आहे. म्हणजे ही लोकशाही आणि हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुणामुळे टिकून आहे, हे जावेद अख्तर आणि ओवैसी बंधू यांच्यासारख्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. पण ते लक्षात घेतील, असे वाटत नाही. कारण त्यांना तशी गरज वाटत नाही. जावेद यांनी केलेल्या टीकेची हिंदुत्ववादी संघटना दखल घेतील, असे वाटत नाही, आणि तशी ती त्यांनी घेऊही नये. कारण मुस्लीम धर्मीय असलेल्या तालिबानवर टीका करताना जावेद किती घाबरलेले आहेत, हेच त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी तालिबान्यांवर टीका करताना हिदुंत्ववादी संघटनांच्या सुरक्षित बालेकिल्ल्यांचा आधार घेतला आहे. हिंदुबहुल भारत हे अशा लोकांसाठी नेहमीच सुरक्षित ठिकाण राहिलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -