Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग बाबा कालीचरणचा लांच्छनास्पद प्रताप !

बाबा कालीचरणचा लांच्छनास्पद प्रताप !

Subscribe

ज्या विदर्भात महात्मा गांधीजींच्या विचारांची पाळंमुळं रुजली त्या विदर्भातल्या अकोल्यात हा कालीचरण बाबा अवतरावा हा दुर्दैवी योगायोग म्हणावा. या माणसाची देशाच्या महात्म्याविषयी गरळ ओकण्याची हिंमतच कशी होऊ शकते? धर्मसंसदेत तो बोलतो आणि त्याला समोरचे टाळ्या वाजवून समर्थन देताना पाहताना आपण याच महात्म्याने मिळवून दिलेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत याचीही जाणीव त्यांना राहिलेली नाही. हे सारं उघड्या डोळ्यांनी पाहाताना आपण भारतात आहोत की आणखी कुठे, असा प्रश्न पडल्याहून राहत नाही.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवाचं रान केलेल्या महात्मा गांधींवर काहीही बोललं तरी चालून जात असल्याचा प्रताप देशाच्या लोकशाहीला भोगावा लागतो आहे. भारतीय घटनेने स्वीकारलेल्या लोकशाही प्रणालीचा आपल्याला हवा तसा वापर करत काही मंडळी कोणावरही चिखलफेक करू लागली आहेत. कोणीही उठावं गांधी, नेहरूंविषयी काहीही बरळावं इतकी आपली लोकशाही स्वस्त झाली असेल तर देशाचं दुर्दैव म्हटलं पाहिजे. सर्वाधिक दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं आहे. महात्मा गांधींची हत्या करणारा जसा या महाराष्ट्रात निपजला तसच त्याचं समर्थन करणारेही याच महाराष्ट्रात जन्मले. आजवर ते नाट्यरुपात लोकांपुढे आणण्यात आलं. तेव्हा ह्यांची समज होती तो मरेल. पण तसं काहीच झालं नाही. उलट नथुरामाचं उदात्तीकरण करणारेच उघडे पडले.

नाट्यरूप देऊनही काही फायदा होत नाही, असं लक्षात आल्यावर त्याच्या जयंतीदिनी प्रतिकात्मक पुतळ्याला गोळ्या झाडण्यात आल्या. जिवंतपणी गोळ्या झाडून जो मृत झाला नाही त्याच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून तो नष्ट होईल, ही त्यांची दिव्यदृष्टी फळा आली नाही. आता तो थेट धर्म संसदेच्या निमित्ताने हिंदूंच्या भावनांना हात घालू लागला. त्याच्या नावाने वाटेल दुषणं दिली. शिवराळ भाषेचा वापर करून पाहिला पण काही साध्य झालं नाही. सारे प्रयत्न करूनही गांधी मरत नाही, असं पाहिल्यावर आता काय करावं, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. त्यापुढचा मार्ग अवलंबायला घेतला आहे. देशभरात गांधी-नेहरूंना लाखोली वाहणारी पिलावळ कमी नाही. त्यापासून महाराष्ट्र काहीसा दूर असायचा. या महाराष्ट्रानेही यात पुढची उडी घेतली. एका नथुरामाने हे घडवलं आणि त्याची री महाराष्ट्रातल्याच माथेफिरुंनी ओढली.

- Advertisement -

शिवतांडव स्तोत्राच्या निमित्ताने एक साधू गांधींच्या नावाने आद्वातद्वा बोलतो, त्यावर टाळ्या पडतात आणि त्याची स्तुती ठराविक विचारसरणीची मंडळी करतात, याचा अर्थ त्यांच्या मनात गांधींविषयीची घृणा स्पष्ट दिसते. गांधी हा विषय एकट्या महाराष्ट्राचा आणि देशाचाही राहिलेला नाही. जगातील बहुतांश देशांनी गांधी स्वीकारला. गांधी तत्वज्ञानाचा अंगिकार केला आणि गांधी जगाच्या अभ्यासाचा विषय बनले. याच महात्माजींच्या विषयी कोणीही काहीही बरळत असेल आणि केंद्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असेल तर त्याची चर्चा जगभर होणं स्वाभाविक आहे. एका मूर्ख बाबाचा हा प्रताप देशाच्या इभ्रतीला कारण ठरत असेल तर त्या व्यक्तीविरोधात देशद्रोह लागायला हवा होता.

पण त्याची जराही दखल घेतली जाणार नसेल तर? दखल घेतली जात नसल्यानेच जगभर तोच एक चर्चेचा विषय बनला आहे. हा बाबा कुठल्याशा दुर्लक्षित विभागातील असावा असा समज होता. पण तोही फोल ठरला. ज्या विदर्भात महात्माजींच्या विचारांची पाळंमुळं रुजली त्या विदर्भातल्या अकोल्यात हा बाबा अवतरावा हा दुर्देवी योगायोग म्हणावा. या माणसाची देशाच्या महात्म्याविषयी गरळ ओकण्याची हिंमतच कशी होऊ शकते? धर्मसंसदेत तो बोलतो आणि त्याला समोरचे टाळ्या वाजवून समर्थन देताना पाहताना आपण याच महात्म्याने मिळवून दिलेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत याचीही जाणीव त्यांना राहिलेली नाही. हे सारं उघड्या डोळ्यांनी पाहाताना आपण भारतात आहोत की आणखी कुठे, असा प्रश्न पडल्याहून राहत नाही.

- Advertisement -

बजरंग दलाने हरियाणात या धर्मसंसदेचं आयोजन केलं होतं. याच धर्मसंसदेत २० लाख मुस्लिमांची कत्तल करण्याचं आवाहन करण्यात आलं. या आवाहनाची आता जगभर चर्चा सुरू झाली आहे. आपल्या विचारसरणीच्या विरोधात वक्तव्य करणार्‍याला सरकारकडून पाठबळ मिळतं असं म्हटल्यावर समोरच्याला चेव चढतो आणि तो काहीही बोलत राहतो. तसंच या कालिचरण बाबाचं झालं आहे. याच बाबाने कोरोनाच्या महामारीला फर्जीवाडा म्हणून संबोधलं आणि डॉक्टरच रुग्णांना मारत आहेत, असा खुलेआम आरोप केला. इतकंच करून तो थांबला नाही मयतांचे अवयव काढून त्याची तस्करी केली जात असल्याचं वक्तव्य करत त्याने एकच खळबळ उडवून दिली. हे त्याचं वक्तव्य सांगलीतील भर पत्रकार परिषदेतलं असतानाही तेव्हा राज्यातले पोलीस बघ्याची भूमिका घेत होते. तेव्हाच मुस्कट फुटलं असतं तर पुन्हा तोंड उघडलं नसतं. पण ती हिंंमत दाखवण्याची तयारी उध्दव ठाकरे यांच्या सरकारमध्ये नाही. केंद्राकडून तर तसल्या अपेक्षाच नाहीत. सत्ताधारी अनुपम खेर यांच्यासारखे उथळ खासदार असल्या बाबाचे फॉलोअर बनत असतील तर कोणाकडे कोणी दाद मागावी?

केंद्रातलं भाजप सरकार आणि सत्ताधारी भाजपकडून असल्या गोष्टींना खतपाणी घातलं जाऊ लागल्याची बाब यापूर्वीच आंतरराष्ट्रीय माध्यमांपुढे आली आहे. आता तर थेट महात्माजींच्या विचारांवर हल्ले होत आहेत म्हटल्यावर जगातील माध्यमं याची दखल घेणार नाहीत, असं नाही. न्यूयॉर्क टाईम्स, अल-जझिरा, ब्ल्यूमबर्गने या घटनांची ठळक दखल घेत भारतीय संस्कृतीपुढील भीतीही व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आपल्या विचारसरणीच्या व्यक्तींना पाठिशी घालण्याच्या कृतीवर आंतरराष्ट्रीय माध्यम समुदायांमध्ये स्पष्ट शब्दात कोरडे ओढले. १९ डिसेंबरला भाजपशी संबंधित हिंदू युवा वाहिनेने आयोजलेल्या दिल्लीतील कार्यक्रमातही मुस्लिमांविरोधात हत्यार उचलण्याची शपथ देण्यात आली. या युवा वाहिनीची निर्मिती ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संमतीने करण्यात आली आहे.

या वृत्ताची दखल घेत न्यूयॉर्क टाईम्सने मुस्लिमांविरोधी हत्यारं घेण्याच्या आवाहनानंतरही सरकार चूप कसं, असं विचारलं आहे. या वर्तमानपत्राने हिंदू महासभेचा नेता पूजा शकुन पांडे याच्या ‘१०० लोक २० लाख मुस्लिमांच्या मरणाला कारण ठरत असतील तर हिंदू राष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही’, या वक्तव्याची चिरफाड केलीय. मारण्यासाठी मरण्याची तयारी ठेवा, असं जाहीररित्या सांगणार्‍या या पांडेवर कारवाई न होण्यामागची शक्ती भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देऊ लागल्याचं या वृत्तपत्राने नमूद केलंय. ज्यांनी हे उद्योग केले ते भाजपशी संबंधित असल्यानेच सरकार चुप्प असल्याचा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे. ते पक्षात महत्वाची पदंही भोगत आहेत, असं सांगताना न्यूयॉर्क टाईम्सने धर्मसंसदेत उपस्थित असलेल्यांची कुंडलीच बाहेर काढली आहे.

न्यायॉर्क टाईम्सने यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरत त्यांच्या मौनाने मोदींची मानसिकता स्पष्ट केल्याचं म्हटलं आहे. मोदींच्या मौनात तुम्ही काहीही करा देशाचं सरकार तुम्हाला खुलेआम सूट देत असल्याचंच ध्वनीत होत असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सने म्हटलं आहे. अल-जझिरानेही या घटनेची दखल घेत या सगळ्या घटनांवर मोदींच्या मौनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. धर्मसंसदेतील कालिचरणच्या भाषणाबरोबरच एका महिलेच्या भाषणाचा हवाला देताना बाबा आणि त्या महिलेने गोडसेला दिलेल्या देवत्वावर अल-जझिराने चिंता व्यक्त केली आहे. प्रमोद नाथ गिरी या भाजपशी संबंधित बाबाने तर मारा वा मरा, असं आवाहन करत मुस्लिमांच्या कत्तलीच्या वापरलेल्या भाषेवरही आक्षेप घेतला आहे. या वृत्तसंस्थेने भारत आता वेगळ्या वळणावर जात असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेचीच नामचिन वेबसाईड असलेल्या ब्ल्यू बर्गनेही धार्मिक कार्यक्रमात मुस्लिमांविरोधात ओकण्यात आलेली गरळ स्पष्टपणे बाहेर आणली आहे.

पाकिस्तान एक्सप्रेस ट्रीब्यूटनेही धर्मसंसदेतील संकट उघड केलं आहे. आंतरराष्ट्रीय मानव अधिकार नेते कर्लेट रोट यांनीही न्यूयॉर्क टाईम्सवरील वृत्ताची दखल घेत भावनांना कसं हात घातलं जात आहे, याची दखल घेतली आहे. त्यामुळे भारताची जी सगळ्या जगात धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून जी प्रतिमा आहे तिला पुढील काळात धक्का लागल्यावाचून राहणार नाही. कारण राजकारणात जेव्हा धार्मिक भावनांचा अतिरेक करणार्‍या बुवा बाबांची घुसखोरी होऊ लागते तेव्हा ते सुरूवातीला राजकीय फायद्यासाठी राजकीय नेत्यांचा चांगले वाटते, पण पुढे हिच मंडळी त्याच राजकीय नेत्यांना डोईजड होऊ लागतात.

त्यांची मग हम करेसो कायदा अशी वृत्ती बोकाळू लागते. त्याचा मग देशाचा कारभार पाहताना त्रास होऊ लागतो. कारण त्यांचा प्रभाव एकदा का वाढला आणि ते राजकीय नेत्यांबरोबर वावरू लागतात. हे धार्मिक नेते स्वत:ला राजकीय नेत्यांपेक्षा मोठे समजू लागतात. त्यानंतर राजकीय नेत्यांचे महत्व कमी होऊ लागते. मोदी आणि त्यांच्या सहकार्‍यांना कालिचरण बाबा आणि अशा लोकांना समर्थन देताना आज समाधान वाटत असेल, पण ते देशाच्या दूरगामी हितासाठी घातक आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. कारण आज जर ते त्या धार्मिक मंडळींच्या कुर्‍हाडीचा दांडा झाले तर ते उद्या स्वत:वर काळ ओढवून घेणार आहेत, एवढे मात्र नक्की.

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -