घरफिचर्समायमहानगर ब्लॉगएक चतुरस्त्र टायगर..!

एक चतुरस्त्र टायगर..!

Subscribe

महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात चतुरस्त्र युवा म्हणून ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत, तेच हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे...

– प्राजक्त झावरे पाटील
उद्या (शनिवारी) 4 फेब्रुवारी रोजी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांचा वाढदिवस..! महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात चतुरस्त्र युवा म्हणून ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत, ते हे डॉ. श्रीकांत शिंदे..! ‘तरबेज, चाणाक्ष, बिनधास्त, बेधडक, करारी, कडक, तडफदार, हौशी, कलाप्रेमी, कर्तव्यदक्ष, स्वछंदी’ अशी कित्येक विशेषणे त्यांच्यावरून सहज ओवाळून टाकता येतील असे..! भविष्यातील वैभवशाली राजकारणाला पडलेले एक अफाट स्वप्नच जणू..!

डॉ. श्रीकांत म्हणजे खरा ढाण्या वाघच..! वाघ म्हणजे निर्भयतेचे प्रतीक..! वाघ म्हणजे राजाच..! तो ना कुणाच्या मर्जीसाठी जंगलात भटकत असतो, ना कोणावर हक्क दाखविण्यासाठी; त्याचा वावर असतो स्वतःच्या मर्जीनुसार..! त्याचा हा बेदरकारपणा ना अहंकार असतो, ना फाजील आत्मविश्वास..! तो त्याचा रुबाब असतो..! शिकार करायची असली तरी तो सिंहासारखा सोबत सहकारी घेऊन करत नाही. ती हिम्मत त्याच्या एकट्यात असते. एकटं असण्याने त्याचा दबदबा आजिबात कमी होत नाही. उलट जिथे तो पाऊल टाकतो, तिथ त्याच राज्य तयार होते. तिथे तयार होणारे त्याचे हे वलय आदरयुक्त भीती निर्माण करणार असत; तसेच ते चुंबकाप्रमाणे खेचून घेणारे देखील असते. विशेष हे की हा जंगलाचा राजा असला तरी मात्र अत्यंत निर्विकार असतो, अत्यंत खोल..! सार्‍यां वादळांना सहज सामावून घेणारा..!

- Advertisement -

एका प्रथितयश व्यवसायच (डॉक्टरीच) नामांकित कॉलेजात शिक्षण घेणारा हा तरुण तसा अपघातानेच राजकारणात आला. खासदारांच्या वडिलांनी धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्यानंतर त्याच तडफेने जपलेल्या ठाण्याच्या गडाला तेंव्हा राष्ट्रवादीने आनंद परांजपे नावाचा सुरुंग लावला होता. विद्यमान खासदार, त्यात स्व. प्रकाश परांजपे यांचे चिरंजीव यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचा वाट धरली होती. त्या काळात केंद्रात आणि राज्यात तशी सत्ता काँग्रेसचीच. त्यामुळे दिघे साहेबांच्या गडाला हा बसलेला एक आघात होता. यातून बाहेर यायचे असेल आणि ही लोकसभेची जागा राखायची असेल तर खुद्द एकनाथ शिंदे यांना मैदानात उतरावे लागणार होते. तशी तयारी देखील त्यावेळी मातोश्रीने सुरू केल्याचे सर्वश्रुत आहे. त्यावेळी दुसरा कोणताच सक्षम पर्याय समोर नव्हता..! अश्या वेळी डॉक्टरीच्या शेवटच्या वर्षात असणार्‍या श्रीकांत यांना या खडतर चक्रव्यूहात उतरावे लागले. वडिलांच्या साथीने पक्षाची गोळाबेरीज साधत अखेर डॉ. श्रीकांत मैदानात आले आणि मोठ्या मताधिक्याने विजयी ही झाले. आणि या वाघाचा राजकारण्यांच्या विस्तीर्ण जंगलात रुबाबदार प्रवेश झाला असा..! त्यानंतर मात्र त्यांनी “थांबणे” हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाकला. अखंड, अविरतपणे जनसामान्यांचा श्रीकांत झाला.

राजकारणात सुरवातीच्या काळात स्थिर झाल्यानंतर मतदारसंघात बांधणी करून तो अभेद्य करण्याच काम त्यांनी सुरू केले. विकासाच्या वाटेने प्रवास केला तर लवकर गड अभेद्य करता येतो या सूत्रानुसार त्यांनी मतदारसंघात आपल्या कामाने धुरळा उडविला..! पायाभूत सुविधा हा विषय अजेंड्यावर घेऊन मतदारसंघाचा चेहराच बदलून टाकण्याचा विडा जणू त्यांनी उचलला..! कल्याण – डोंबिवली हे ऐतिहासिक शहर आहे, हे त्याच्या दुरावस्थेवरुन सहज समोर येत होते. पण आजचे कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ कात टाकतय; झपाट्याने पायाभूत सुविधांचा विकास होताना दिसतोय आणि हे विरोधक देखील कबूल करतातच की..! पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांबद्दल आपण लिहू, बोलू तेवढे ते तोकडच आहे.. अगदी गाजलेला ऐतिहासिक पत्रीपूल असेल किंवा अलीकडे येऊ घातलेला ऐरोली काटई रस्ता असेल किंवा ग्रामीण पट्ट्यातील रस्त्यांचे जाळे असेल, वर्षानुवर्ष पिचलेले डोंबिवली MIDC मधील रस्ते असतील, मेट्रोच विकसित होणारे जाळे असेल, कायापालट होत असलेले रेल्वे स्टेशन असतील किंवा जलवाहतुकीची मुहूर्तमेढ रोवणे असेल सगळ्यांना अमृत काळ आला तो केवळ खासदार डॉ. श्रीकांत यांच्या दूरदृष्टीच्या विचारांमधूनच..! आणि विकासाची गंगा या परिसरात वाहती झाली.. यामुळेच ते इन्फ्रास्ट्रक्चर मॅन झाले.

- Advertisement -

पायाभूत विकास हा मूळ अजेंडा असला तरी मतदारसंघात सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्यासाठी विविध नव्या संकल्पना त्यांनी राबविल्या आहेत. अंबरनाथ आर्ट फेस्टिव्हल हे त्याच सर्वोत्तम उदाहरण..! प्राचीन वारसा लाभलेल्या पण दुर्लक्षित असणार्‍या शिवमंदिरला गतवैभव मिळवून देण्याच काम त्यांनी केले, इतकच नाही तर त्या परिसराचा स्वप्नवत कायापालट घडवून आणत, आर्ट फेस्टिव्हलच्या माध्यमातून पुन्हा मंदिराला आधुनिक संजीवनी दिली. त्या सोबतच क्रीडा संकुले, मैदाने पुनरुज्जीवित केली; नव्याने उभारली. सामाजिक वारसा सांगणारे स्मारके, सभागृह उभी राहिली. विरंगुळ्यासाठी उद्याने फुलली. इतकच नाही तर UPSC / MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी केंद्रे सुरू केली. अजून भविष्यात दर्जेदार क्रिकेट- फुटबॉल मैदाने, ऑलिंपिक साईज स्विमिंग पूल आदी गोष्टी देखील उभ्या राहत आहेतच. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांवरील एक आगळवेगळ स्मारक देखील लवकरच उभे होत आहे. संतांची परंपरा लाभलेल स्मारक उभे होत आहे. ही यादी वाढवत जायचे म्हंटले तर अजून रीघ वाढत राहील; पण एक नक्की विकासाची पताका खांद्यावर घेऊन निघालेला लोकशाहीचा खरा वारकरी कसा असतो, याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. साहेब..

कामाच्या बाबतीत त्यांची दिसणारी आक्रमकता हा त्यांचा मूळ स्वभाव..! जे आहे ते रोखठोक..! नाही पटले तर फटाके फुटणार हे ठरलेलेच..! त्यांनी स्वतःच्या आचरणातून ही सत्याची जरब उभी केली. एक कडक शिस्तीचे वलय त्यांच्या भोवती उभे झाले ते या धडाकेबाज स्वभावामुळेच..! भले भले त्यांच्या या वलयाला दचकून चाचपडत उभे असतात. डॉ. कडक शिस्तीचे आहेत. त्यांना सगळे तसे परफेक्टच हवे असते आणि मग ते साधताना सर्वांची दमछाक ठरलेली. कोणत्याही विषयाबाबत असणारी त्यांची आकलन क्षमता अफाट आहे. तुम्ही उद्योगावर बोला, कलेवर बोला, चित्रांवर बोला, नवनवीन तंत्रज्ञानावर बोला किंवा अगदी शेतीवर बोला त्यांची प्रगल्भता आणि विषय समजून घेण्याची वैचारिक उंची अफाट आणि त्या क्षेत्रातील तज्ञांना अचंबित करणारी आहे. एखादी गोष्ट करायची ठरवली की ती होणारच.. काय बिशाद आहे त्या गोष्टीची की ती नाटक करेल, असा त्यांचा जिद्दी स्वभाव..! पण डॉक्टर तितकेच हळवे आहेत. आपलेपणा जपणारे आहेत, मित्रांची मैत्री निभावणारे आहेत, कार्यक्षम मुलगा म्हणून आई वडिलांचा भार हलका करणारे आहेत, छोट्या बाळाचे तितकेच उत्कट बाप आहेत..! इतकच नाही तर ते लोकशाही परिवारातील युवकांचे चैतन्य आहेत, जनसामान्यांचे आधार आहेत, महिला भगिनींचे कणखर भाऊ आहेत, आबालवृद्ध यांचा बुलंद आवाज आहेत..!

काहीही म्हणा खासदार साहेबांचा स्वॅगच वेगळा आहे. तसे म्हणाल तर इतरांप्रमाणे तेही “त्या” वेगळ्या आवेशात सहज वागू शकले असते, परंतु आजही ते एकदम down to earth आहेत. एकदम..! दुसरे कोणी असते तर क्षमता नसताना देखील पक्षासहित सगळेच सहज ताब्यात घेतले असते.. (पूर्वानुभव तर तसाच आहे)..! अगदी सहज..! पण एका परिपक्व नेत्याला जे हवे ते सारे त्यांच्यात असून देखील ते सर्व मर्यादा पाळून आहेत.. हे जे वैचारिक संस्कार त्यांच्याकडे आहेत ते आज कुठेच दिसून येणार नाहीत, हे मात्र ठामपणे खरे..! त्यांची राजकीय समज, सामाजिक दृष्टी, वैचारिक मांडणी आणि अविरत कृतिशीलता अत्यंत प्रगल्भ आहे. त्यामुळे त्यांचे भविष्य राजकीय क्षितिजावर उत्तुंग तर आहेच पण अढळ देखील, हे सांगायला ज्योतिषाची गरज अजिबात लागणार नाही.

तर असा हा युवकांचा ढाण्या वाघ आज 36 वर्षांचा होतोय. तसे जंगलातील आणि राजकारणातील वाघ दुर्मिळ होत चाललेत. पण आपला हा वाघ त्या पलिकडचा आहे. माझ्या मते ते स्वयंभू आहेत, तरीही आपण शुभचिंतन करून त्यांना अजून ताकदवान करुयात.. कारण त्याचं अस्तित्व आपली अस्मिता आहे..!

(लेखक मराठीमाती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -