घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकंगना नावाची विकृत विदुषी!

कंगना नावाची विकृत विदुषी!

Subscribe

कंगना राणावत हिचंही भाजपला अप्रुप आहे. कारण ती काँग्रेस आणि गांधी कुटुंबियांचा दु:श्वास करत आली. ती काहीही बरळली की तिचं समर्थन करण्यात भाजपचे नेते पुढेच असतात. गुरुवारी तिने हद्दच करून टाकली. टाईम्सनाऊच्या एका कार्यक्रमात तिने १९४७ मध्ये भारताला मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती आणि खरं स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये म्हणजे मोदींचं भाजप सरकार सत्तेवर आलं तेव्हा मिळालं, असं बेलाशक बोलून ती मोकळी झाली. आपल्या या वक्तव्याचा समाजमनावर काय परिणाम होईल, याची जराशीही तमा तिने बाळगली नाही.

एखाद्या व्यक्तीत किती विकृती असावी, याला काही मर्यादा असाव्यात. त्या व्यक्तीच्या एकूणच देहबोलीतून तिच्या गुण अवगुणांची बेरीज वजाबाकी होत असते. आकलनाहून खूप काही बोलल्यावर अशातल्याच काहींना आपण खूप काही मजल मारली असं वाटत असतं. भाजपची कायम समर्थक राहिलेली अभिनेत्री कंगना राणावत हिचंही असंच काहीसं झालं आहे. तिने आजवर तोडलेल्या तार्‍यांना सातत्याने उचलून धरत भाजपने तिला हरभर्‍याच्या झाडावर चढवलं आणि तिला आभाळ ठेंगणं झालं. आता तर या अभिनेत्रीला एकतर वेड्याच्या इस्पितळातच पाठवलं पाहिजे, असं वक्तव्यं करत तिने स्वत:च आपण वेडं असल्याचं दाखवून दिलं आहे. यावर भाजपचे समर्थक वगळता सगळ्यांचच एकमत होईल. जो कोणी काँग्रेसला आणि गांधी कुटुंबियांना शिव्या देईल, ते सगळेच भाजपला हवेहवेसे वाटत असतात.

कंगना राणावत हिचंही भाजपला अप्रुप आहे. कारण ती काँग्रेस आणि गांधी कुटुंबियांचा दु:श्वास करत आली. ती काहीही बरळली की तिचं समर्थन करण्यात भाजपचे नेते पुढेच असतात. गुरुवारी तिने हद्दच करून टाकली. टाईम्सनाऊच्या एका कार्यक्रमात तिने १९४७ मध्ये भारताला मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती आणि खरं स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये म्हणजे मोदींचं भाजप सरकार सत्तेवर आलं तेव्हा मिळालं, असं बेलाशक बोलून ती मोकळी झाली. आपल्या या वक्तव्याचा समाजमनावर काय परिणाम होईल, याची जराशीही तमा तिने बाळगली नाही. तिच्या या दाव्याने सारा देश हादरून गेला नसल्यास आश्चर्यच. कोण्या येर्‍या गबाळ्याने असं वक्तव्यं केलं असतं तर तिकडे लक्ष देण्याची आवश्यकता भासली नसती.

- Advertisement -

पण जिला नागरी सन्मान पद्मश्रीने गौरवलं गेलं अशा व्यक्तीने हे वक्तव्यं करावं, हे या देशाचंच दुर्दैव म्हटलं पाहिजे. कंगना ही काय चिज आहे, हे गेल्या दोन वर्षांपासून देशवासीय जाणून आहेत. तिच्या नादान पाठीराख्यांमुळे ती काहीही बरळतेय, हेही लोकांनी पाहिलं. पद्म पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या कोणाही व्यक्तीने भारताच्या स्वातंत्र्याबाबत असली अर्वाच्च भाषा वापरली नाही. देशाला दिशा देण्याचं काम या थोरांनी केलं. ज्या देशाचे आपण नागरिक आहोत त्या देशाला मार्ग दाखवणं याला त्यांनी कर्तव्य मानलं. त्याउलट कंगनाने केलं आहे. तिला पुरस्काराने सन्मानित केलं आणि त्या बदल्यात तिने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यालाच भिकेच्या व्याख्येत गुंडाळलं. केवळ वेड्या वर्तणुकीचीच माणसं असं वागू शकतात.

टाईम्सनाऊच्या ‘सिलिब्रेटिंग इंडिया @७५’ मध्ये गेस्टस्पिकर म्हणून कंगनाला बोलवण्यात आलं होतं. यावरील एका प्रश्नाच्या उत्तरात १९४७ चं स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळालं, असं वक्तव्यं करत कंगनाने देशातल्या तमाम जनतेच्या काळजावर घाव घातलेच. पण ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले त्या स्वातंत्र्यवीरांच्या आहुतीचा घोर अपमान केला आहे. स्वातंत्र्याला भीक नाही तर मग काय समजायचं, असं कंगना अ‍ॅन्करला विचारते आणि संपादिका असलेली निविका कुमार समोरील टाळ्या वाजवणार्‍यांना हसत दाद देते. हा म्हणजे देशाचा अवमानच नव्हे तर स्वातंत्र्य संग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांची अवहेलना आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वत:ची अहुती देणार्‍यांविषयी आपण इतके कृतघ्न होऊ शकतो? कंगनाच्या या वक्तव्यावर देशभर काहूर माजणं हे स्वाभाविक आहे.

- Advertisement -

तिच्या या बेलगाम वक्तव्यावर देशात जोरदार प्रतिक्रिया उमटत असताना भाजपच्या मात्र एकाही नेत्याने याचा साधा निषेधही केलेला नाही, हे समजून घेतलं पाहिजे. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असायला हवं, हे भाजपच्या एकाही नेत्याला मान्य दिसत नाही. देश १९४७ साली स्वतंत्र झाला, हे भाजपलाही मान्य नसेल तर वि.दा.सावरकर या लढ्यात काय करत होते? असा प्रश्न या मंडळींनी स्वत:ला विचारला पाहिजे. विकृतीचा हा फेरा एकट्या कंगनाचा नाही. यात भाजपची साथ असल्यानेच कंगनासारख्या बोलघेवड्या असली वक्तव्यं करू धजतात. आपल्या बोलण्याचे परिणाम कंगनाला ठावूक होते. यामुळेच आपल्यावर आता दहा एफआयआर होतील, अशी ती बेलाशक म्हणत असेल तर ती हे जाणीवपूर्वक आणि देशात अराजक परिस्थिती निर्माण होण्यासाठी बोलत आहे, हे उघड सत्य कोणाला नाकारता येणार नाही. स्वातंत्र्य लढ्याला जराही महत्व न देणार्‍यांसाठी कंगनाचं वक्तव्य उठावदार वाटलं तर आश्चर्य वाटायचं कारण नाही.

कंगनावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी देशभर होऊ लागली आहे. काहींनी तिच्यावर देशद्रोहाचा खटला चालवून तिला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. आपल्या बेताल वक्तव्यावर देशातील वातावरण दूषित होत असल्यानं तिचं ट्विटर अकांऊंट बंद करण्याची कारवाई ट्विटरने केली होती. पश्चिम बंगालच्या निवडणुकीवेळी तिने अशीच तोंडाची वाफ घालवली होती. तेव्हाही तिच्यावर कारवाई करण्यात आली होती. आपल्या बेकायदा बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवला तेव्हा तिला मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटली होती. तेव्हाही तिची लोकांनी रेवडी उडवली. मात्र तरी तिला रोखावं, असं भाजप नेत्यांना वाटलं नाही.

उलट, आशिष शेलार, राम कदम आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तिची बाजू उचलून धरत तिला संरक्षण मिळालं पाहिजे, अशी जाहीर मागणी करून टाकली. राम कदम या प्रवक्त्याने तर तिला झाशीच्या राणीचीही उपमा देऊन टाकली होती. या मागणीला अनुसरूनच केंद्र सरकारने तिला वाय सुरक्षा पुरवली. ही सुरक्षा पुरवण्यात आल्यावर कंगनाने अमित शहा यांचे खास आभार मानताना कोणत्याही देशभक्त विचारांना सरंजामशाहीने दडपता येणार नाही, असं तिने बजावलं. राज्यातल्या सत्ताधारी पक्षांच्या विरोधात तिने तोंड उघडलं की भाजपच्या नेत्यांना गुदगुल्या होतात. तिची बाजू घेत हे नेते उघडपणे महाराष्ट्रद्रोह करतात, असं पाहायला मिळतं. मुंबई पोलिसांवर टीका करताना तिने मला मुंबईत असुरक्षित वाटत असल्याचं म्हटलं होतं. तेव्हा तर तिने मुंबई पोलिसांचा बापही काढला होता. तेव्हाही भाजपचे प्रवक्ते हाताची घडी आणि तोंडावर बोट घेऊन बसले होते.

पालघरमध्ये साधूंच्या झालेल्या हत्येला राज्य पोलिसांना जबाबदार धरताना कंगनाने पत्रकार परिषदेत एका जस्टीन नामक पत्रकाराला तू तर आमचा दुष्मन बनलास, असं उघडपणे धमकावलं होतं. या घटनेनंतर इंटरटेन्मेंट जर्नालिस्ट गिल्ड ऑफ इंडियाने कंगनावर बंदी घालण्याची घोषणा केली. यानंतर कंगनाने गिल्डलाच नोटीस पाठवत कोर्टात फेर्‍या मारायला लावल्या होत्या. उर्मिला मातोंडकर यांच्यावरील टीकेने तर कंगनाने सार्‍या मर्यादा पार केल्या. मातोंडकर यांना सॉफ्ट पॉर्न चित्रपटांची अभिनेत्री बोलून तिने सीमा ओलांडली. अशा या वाह्यात नटीचा पद्म पुरस्काराने सन्मान करून केंद्र सरकारने या पुरस्काराची अवहेलना केली आहे, असेच म्हणावे लागेल.

कंगनाच्या एकूणच वर्तनाची दखल महानगर दंडाधिकार्‍यांना घ्यावी लागली होती. जेष्ठ सिने दिग्दर्शक जावेद अख्तर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यांनंतर दंडाधिकार्‍यांनी काढलेल्या वॉरंटला जराही न जुमानणार्‍या कंगनावर अटकेची कारवाईची वेळ आली होती. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य हे कंगनाचे सॉफ्ट टार्गेट मानले जातात. कोरोनाच्या काळात राज्यातील चित्रपटगृहे सुरू करण्याच्या मागणीसाठी तिने मुख्यमंत्र्यांवर आसूड ओढलं होतं. जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्री अशी उपाहासात्मक टीका करत तिने तेव्हा टोक गाठलं. अतिरेक तेव्हा झाला, जेव्हा पालिकेने तिच्या अनधिकृत कार्यालयावर हातोडा चालवला. ती सिमल्याहून परत येताच तिने या कारवाईचा राग थेट उध्दव ठाकरे यांच्यावर काढला आणि एकेरीवर येऊन तिने मुख्यमंत्र्यांवर अश्लाघ्य टीका केली.

उध्दव तुला काय वाटतं? तू फिल्म माफियांना सोबत घेऊन माझं घर तोडलंस, आज माझं घर तुटलं, उद्या तुझी घमेंड तुटेल, असं म्हणत तिने शिवसेनेला बाबराची सेना संबोधलं होतं. विशेष म्हणजे तेव्हाही भाजपच्या नेत्यांनी तिलाच साथ दिली. तुमच्याप्रमाणे मी घराणेशाहीची अपत्य नाही, असं सांगताना कंगनाचा तोल इतका ढळला की वडिलांच्या संपत्तीवर मी मजा मारत नाही, असं ती बोलून गेली. महान नेत्याचा पुत्रं होणं हे एकमेव कर्तृत्व पुरेसं नाही, असं सांगताना महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही, असं बोलत तिने सार्‍या राज्यातल्या जनतेला अंगावर घेतलं होतं. इतक्या वादग्रस्त कंगनासाठी राज्याच्या राजभवनाचे दरवाजे सताड उघडे असणं ही तिच्यासाठी बक्षिसी होतीच, पण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीच तिला फॉलो करत असतील तर तिने तरी का थांबावं?

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -