घरफिचर्समायमहानगर ब्लॉगसुदाम्याचे पोहे आणि आपल्याकडचे कुचेष्टेखोर!

सुदाम्याचे पोहे आणि आपल्याकडचे कुचेष्टेखोर!

Subscribe

गरीब सुदाम्याने मित्र प्रेमातून श्रीकृष्णाला देण्यासाठी कपड्यात बांधून आणलेल्या पोह्यांचे ‘सुदाम्याचे पोहे’ म्हणून कौतुक करणार्‍यांंच्या देशात केनियातून पाठवण्यात आलेल्या शेंगदाण्याची खिल्ली उडवली जात आहे, तर काही ठिकाणी त्याचे कौतुकही केले जात आहे. भारताला आता केनियाकडून मदत घेण्याची वेळ आली आहे का असं म्हणत आपल्या नसलेल्या मोठेपणाचा अंहगंड खाजवण्याचे प्रकार सुरू आहेत. आपत्कालीन परिस्थितीत एखादा किती मदत देतो हे महत्वाचे नसते, तर त्याची मदत करण्याची वृत्ती महत्वाची असते. कारण तोच अखिल मानवजातीचा आत्मा आहे.

श्रीरामांसमोर ठेवलेल्या गरीब शबरीच्या उष्ठ्या बोरांचे कौतुक करताना भारतीय संस्कृती थकत नसते. मात्र केनियाने पाठवलेल्या कॉफीचीही यथेच्छ थट्टा करणारेही याच देशात असतात. ही दांभिकता दुहेरी आहे. दानाचे महत्व आपल्या पुरातन संस्कृतीत कौतुकाने सांगितलेलं असतं. एका हाताने दान केल्यास दुसर्‍या हातालाही त्याची खबर लागता कामा नये, अशी शिकवण आपल्याकडे असते. तर, देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे, एक दिवस, घेता घेता देणार्‍याचे हातच घ्यावेत, ही कविवर्य विंदा करंदीकरांची कविता आदर्श मानली जाते. आपण संस्कृती आणि परंपरा म्हणून घेणार्‍यांचे हात उसने घेतलेले असतात, याबद्दल शंका नसते, मात्र देणार्‍याकडे देताना नसलेला अहंकार आपण इथून घेतलेला असतो, तो केनिया सारख्या गरीब देशातून आपण उचलेला नसतो. तो आपल्या हाडामांसी रुजलेला असतो. आपल्याला समदर्जा असलेल्या व्यक्तींनी एकमेकांना दिलेली वस्तू ही भेट मानली जाते.

तर श्रीमंताने गरीबाला दिलेली वस्तू ही उपकाराच्या कक्षेत येते. तर गरीबाने श्रीमंताना भेट वस्तू देणे हे सामाजिक आगाऊपणाचे लक्षण मानले जाते. सुदाम्याच्या पोह्याचे कौतुक म्हणजे याच आगाऊपणाच्या संस्कृतीची मैत्रीच्या चौकटीतील नैतिक भलामण असते. ज्या ठिकाणी भेटवस्तू देतानाही देणार्‍याच्या आणि घेणार्‍याच्या आर्थिक स्तराचा विचार केला जातो तिथं निखळ मैत्री असूच शकत नाही, असलाच तर केवळ दिल्याचा अहंकारच असतो आणि अनेकदा आपल्याकडे अहंकाराचे टोक माजात बदलण्यास वेळ लागत नाही. कनिष्ठ-वरिष्ठ, वरचे-खालचे, उपकारकर्ते-उपकृत, स्वावलंबी समजणारे-परावलंबी करून ठेवलेले, असे अनेक गट आपल्याकडे असतात. देणार्‍यांचा अहंकार पोसण्यासाठी भेटवस्तू दिल्या घेतल्या जातात. त्यामुळे कोरोनाकाळात गरजू आदिवासी, गोरगरीबांच्या, कचरा वेचणार्‍यांच्या, किन्नरांच्या, कामगारांना दिलेल्या भेटवस्तूंचे फोटो सोशल मीडियावर कौतुकासाठीच टाकले जातात. कोरोनाकाळाच्या संकटात चालून आलेली पुण्याची संधी सोडणं राजकीय मूर्खपणाचं असतं. या मौल्यवान दानातून मतदानाचे अमूल्य दान पदरात पाडून घेण्यासाठीही आटापिटा करणारे इथं असतात.

- Advertisement -

भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकात दर्जा आणि संधीची समानता प्रस्थापित करण्याची व्यक्त केलेली गरज ही अशा दानतेला आडवी जाणारी असते. सगळेच समान स्तरावर आल्यास दान देणार कोण आणि घेणार कोण, हा प्रश्न इथं असतो. त्यामुळेच संधीची आणि समानता न देता इतर गरजेच्या वस्तू दान करण्याचा मार्ग तुलनेने सोपा असतो. मी आपले उपकार कधीही विसरणार नाही…उपकार विसरणे हा कृतघ्नपणा किंवा नैतिक गुन्हा मानल्या जाणारा समाजसमुदाय दिलेल्या वस्तूच्या बदल्यात गरजेच्या वेळी योग्य ती गोष्ट परत मिळवण्याची अपेक्षा असतेच. इथं दान नाही तर व्यवहार असतो, अनेकदा पूरग्रस्तांना, गरजूंना, आपत्काळ भोगणार्‍यांना केलेल्या दानाची परतफेड मतदानातून करण्याची अपेक्षा राजकारणात ठेवली जाते. मात्र दान करणं हा धर्म असतो, राजकारण नसल्याचं आपल्याला सांगितलेलं असतं. परंतु राजकीय उद्देशाने धर्माचाही वापर करणार्‍यांच्या देशात असे दान ते घेणार्‍यांसाठी आत्मघातकी ठरण्याचाही इथं इतिहास असतो. दान देऊन देणार्‍याने ते विसरण्याचे नैतिक संस्काराचे संकेत असतात, मात्र घेणार्‍याने दान घेतल्याचे न विसरण्याची दुटप्पी शिकवण शिकवली जाते.

आपल्याला मदतीपेक्षा उपकार करण्यात जास्त रस असतो. कोरोनाकाळ हा या रसाला पोषक असतो. म्हणूनच मसाई लोकांनी केलेल्या दानाच्या कौतुकापेक्षा त्यातील राजकारणात आपण रस घेत असतो. आता भारतावर केनियाकडून मदत घेण्याची वेळ आली असल्याची टीका समाजमाध्यमांवर केली जाते. ज्याच्याजवळ जे असते ते तो दान करतो, मातृसत्ताक पद्धती रुजलेल्या केनियातील मसाई शेतकरी शेंगदाणे आणि कॉफीचे उत्पन्न मुबलक घेतो. या ठिकाणी बैलांपेक्षा गाईंचे महत्व असते आणि आपल्याकडे मुलगा झाल्यावर जसा आनंद साजरा केला जातो, तसे तिथे मुलींचा जन्म झाल्यावर आनंदोत्सव साजरा केला जातो. मसाई कुटुंबात गाई आणि पशूधन हीच त्यांची संपत्ती असते. लग्नात वधूपित्याला वराकडून गाई भेट दिल्या जातात, त्या बदल्यात मुलीची मागणी केली जाते. आपल्याकडच्या हुंड्यासारखी ही पद्धत असते. परंतु इथं देणारी मंडळी मुलाकडची असतात. घरातील वडिलधार्‍यांनी गाईंच्या बदल्यात लग्न ठरवल्यावर मुलीला मुलासोबत पाठवले जाते. त्यातून संतती झाल्यास आणि ती जगल्यास लग्नाला मसाई पंचायतीकडून मान्यता दिली जाते. या भागात बालक भूकबळी आणि आजाराने मृत्यू पावणार्‍यांची संख्या मोठी असते. त्यामुळेच दांपत्याला झालेली मुले वाचली तर लग्नाला होकार दिला जातो.

- Advertisement -

केनियातील मोंबासा आणि मसाईमारा दरम्यानच्या दुर्गम भागात मसाई समुदायाची वस्ती आहे. पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची त्यांची स्वतःची पद्धत असते. केनियन माणूस अगत्यशील असतो तिथं पाहुण्यांना जेवल्याशिवाय सोडत नाही. जेवणास नकार दिलात तरी मोठ्या कपातील चहा प्यावाच लागतो. कोरोनाकाळात भारताला अनेक मित्र देशांनी मदत केली आहेच. त्यात केनियाची मदत मदतीचा अहंकार न शिवल्यामुळेच वैशिष्ठ्यपूर्ण आहे. येथील अनेक भागात इंटरनेट, मोबाईल, टेलिव्हीजन हे शब्दही माहीत नाहीत. केनियात स्वतःच्या मालकीची सायकल असणं हे प्रतिष्ठेचं लक्षण असतं. सायकलला ते मसाई भाषेत बुडाबुडा म्हणतात. दुचाकी सायकल घेण्यासाठी इथं सावकाराकडून (अनेकदा हे भारतीय किंवा आशियाई केनियात स्थाईक झालेले) कर्ज घेतले जाते.

सायकल घेऊन माणसांची वाहतूक करण्याचा व्यवसाय केला जातो. माणसांना डबल किंवा ट्रिपल सीट बसवून दहा ते पंधरा कधी त्याहून जास्त किमी प्रवास करून इच्छित स्थळी सोडलं जातं. त्यासाठी प्रवाशांशी बोलणं करून भाडं ठरवलं जातं. येथील 15 ते 20 कच्च्या उंच सखल भागातून प्रवाशांना बसवून सायकल चालवणं हे प्रचंड दमछाक करणारं काम गरीब मसाईचं रोजचं जगणं असतं. अशा केनियाने अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाल्यावरही त्यांनाही 15 गाईंची मदत पाठवली होती. केनियाकडून गायींची ही भेट अमेरिकेने स्वीकारणं जगाच्या दृष्टीने त्यांच्या प्रतिमेसाठी हास्यास्पद झालं असतं. त्या गाई पशूबाजारात विकून त्यातून आलेल्या रकमेतून आकर्षक मणी विकत घेऊन मसाई महिलांनी त्याचे सुंदर दागिने बनवून अमेरिकेला दिले. अमेरिकेतील वस्तू संग्रहालयात ही भेट जपून ठेवण्यात आली आहे. भारताला केलेल्या मदतीबाबत केनियाने दिलेला संदेश मोलाचा आहे.

केनियाच्या सरकारने सांगितलं आहे, भारत सध्या कठिण काळातून जात आहे. आम्ही भारतीय लोकांसोबत आहोत, काही देशांनी भारताला मदत सुरू केली हे आम्हाला समजलं आणि म्हणून आम्हीही ही मदत पाठवत आहोत, मात्र आमची मदत विशिष्ट गटासाठीच आहे. हा गट जो कोरोना काळात सर्वात पुढे कोरोनाविरोधात उभा ठाकला आहे. कोरोना विरोधात लढणारे फ्रन्टलाईन कामगार जीवाची पर्वा न करता इतरांचे जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांना आम्ही पाठवलेल्या चहामुळे थोडी ऊर्जा मिळेल, तरतरी येईल आणि बरे वाटेल, म्हणून आम्ही ही मदत त्यांना पाठवत आहोत. केनियाने भारताला पाठवलेल्या चहा आणि कॉफीच्या मदतीमागे आपली माणुसकीची भूमिका स्पष्ट केली आहे. जगात सर्वाधिक मेहनत करणारे कामगार देणार्‍या केनियाला श्रमिकांची काळजी असणार हे स्पष्ट आहेच. मात्र केनियाकडून आलेल्या मदतीचाही आपल्या राजकीय उद्देशासाठी वापर करून आपल्या मोठेपणाचा अहंकार खाजवणार्‍यांना केनियाकडून माणूसपणाचे धडे शिकण्याची गरज आहे. विविध गटांच्या उतरंडीची विषमतावादी व्यवस्था असलेल्या आणि या विषमतेला गौरवाने मिरवणार्‍या आपल्या देशातील काही प्रवृत्तींनी सुदाम्याचे पोहे म्हणत केनियालाही धार्मिकतेचे धडे देण्याची संधी यातूनही शोधली आहे. मात्र केनियातील मसाई समुदायाने केलेल्या माणुसकीची घोषणा त्याहून कितीतरी मोठी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -