देवाक काळजी…!

nature in konkan

‘हॅलो राजेश, मी चंदू बोलतंय… चंदू वालावलकर… सकाळी अम्याचा ॲक्सिडेंट झाला हा…झारापजवळ. मित्रा वांगडा जाय होतो बाइक घेवन… डंपरान उडवल्यान हा…शिरयस आसा, आधी त्येका ओरोशीक न्हेल्लव…थयं काय व्हवंचा नाय म्हणानं, गोव्यात इलवं…पण डॉक्टर सांगतहतं मुंबैक न्हेवचा लागात…तू जरा कायतरी खटपट कर..नायतर तरणोताठो झिल हाताबोटाक लागाचो नाय…’

सिंधुदुर्गातून आलेल्या या फोन नंतर मी काही क्षण स्तब्ध झालो. ज्या अम्याचा अपघात झाला होता तो अमित वालावलकर उणापुरा २२ वर्षांचा तरुण, उंच, पिळदार शरीराचा, आई-वडिलांचा एकुलता एक, तीन बहिणींचा एकटा भाऊ… कोकणातल्या माझ्या गावच्या वाडीतलाच.

झाला प्रकार माझ्या लक्षात आला होता. मी तात्काळ सिंधुदुर्गच्या जिल्हा रुग्णालयामध्ये संपर्क साधला.तिथल्या आरएमओकडून नीट माहिती घेतली त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अम्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मेंदूला मार लागला होता. त्याचं कोकणातल्या किंवा गोव्यातल्या उपचारानं जगणं ही अशक्य कोटीतील गोष्ट होती. त्यासाठी मुंबईत आणून तात्काळ मेंदूवर शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. पत्रकारितेत असल्याने मी जरा वेगात हालचाल सुरू करु शकलो. परळच्या केईएम रुग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ.अतुल गोयलांशी संपर्क साधला. त्यांनी लवकरात लवकर पेशंटला मुंबई आणण्याची सूचना केली. मी पुन्हा चंदुला सिंधुदुर्गात फोन करून ‘तुम्ही पेशंट फक्त सुरक्षितपणे होईल तितक्या लवकर मुंबईत आणा बाकीचं मी बघतो’ अशा स्वरूपाचा निरोप दिला. त्यानंतर त्यांनी गोव्यातून पेशंट दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी मुंबईला आणला.

मी स्वतः सकाळी जाऊन अॅम्ब्युलन्सने आणलेल्या अम्याला दाखल करून घेतला.तेव्हा तो खूपच क्रिटिकल होता. त्याचे आई वडील रडत होते देवाचा धावा करत होते. त्याला इमर्जन्सी वॉर्डमध्ये आणल्यानंतर ज्या स्वरूपाची दुखापत त्याच्या डोक्याला झाली होती ते पाहता दोन डॉक्टर इंग्रजीमध्ये संवाद साधत होते ‘हीज लाईफ लाईन इज व्हेरी स्ट्रॉंग… गॉड नोज हाऊ हि इज अलाईव्ह…’ हा संवाद ऐकून माझ्या अंगावर काटा आला. त्यानंतर केईएम मध्ये अमितच्या उपचाराची धावपळ सुरू झाली. डॉक्टर अतुल गोयल यांचं अख्खं युनिट, काही लोकप्रतिनिधी मित्र, महापौर आणि केईएमचा स्टाफ या सगळ्यांच्या मदतीने शस्त्रक्रियेसह उत्तम उपचार झाले. आणि अमितच्या जीवाचा धोका टळला.

सुमारे अडीच महिने अमित रुग्णालयात होता त्यानंतर काही दिवस आपल्या मामाकडे राहून तो कोकणातल्या आपल्या घरी पोहोचला. आज त्याची प्रकृती उत्तम आहे. तो सारं काही सामान्य तरुणासारखं करतोय, जगतोय. त्याची केस जिल्ह्यात बहुतेकांना माहीत आहे. त्याच्या आई- वडिलांना या सगळ्याची जाण असेल का? तुम्हाला काय वाटतं? याचं खरं उत्तर मला माहिती आहे पण तरीही ते मी मुद्दाम देणार नाही. कारण मला या ठिकाणी काही वृत्ती आणि अपप्रवृत्तींवर प्रकाश टाकायचाय. या दोन्ही गोष्टी तुमच्या-आमच्यापैकींच्याच, तुमच्या आमच्यातल्या कुटुंबातल्या अनेकांना अनेकांबाबत जाणवल्या असतील. आणि जसं शरद पवार म्हणतात ना की सगळं परवडलं पण भावकी नको… अगदी ते खरंच आहे. या सगळ्याचा प्रत्यय कोरोनाच्या या महामारी मध्ये आपल्यापैकी अनेक चाकरमान्यांना आलेला आहे.

खरंतर सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातला सगळ्यात छोटा जिल्हा‌ नव्वदच्या दशकामध्ये त्याला पर्यटन जिल्हा म्हणून सरकारकडून घोषित करण्यात आलं. गेल्या वीस वर्षांपूर्वी याच तळकोकणातल्या कुटुंबातील अनेक जण मुंबईतून येणाऱ्या मनीऑर्डरची चातकासारखी वाट बघायचे. अनेक म्हातारीकोतारी ‘आमचा काय इला हा काय’ असं पोस्टमनला आवर्जून विचारत पोस्टाचे उंबरठे झिजवायचे. ऐंशीच्या दशकात मुंबईत गिरणी कामगारांचा काळीज पिळवटून टाकणारा संप झाला. त्यानंतर बहुतेक गिरणी कामगार आपल्या गावी येऊन स्थिरावला, काही आजारात गेला तर काहींनी आपली जीवनयात्रा व्यसनांच्या मगरमिठीत संपवली. मुंबईत जेव्हा गिरण्या सुरू होत्या तेव्हा मुंबईतला चाकरमानी दोन वेळा वर्षातून न चुकता कोकणात जायचा. एकदा आवर्जून गणपतीला आणि एकदा मे महिन्यात किंवा दिवाळीत. तो तिथून येताना नक्की एक दोन झिलग्यांना घेऊन मुंबईत यायचा.

कोकणचा तरुण मुंबईत आला की मिलमध्ये तो आधी झाडू खात्यात शिरायचा. आणि तिथून त्याचा प्रवास सुरू व्हायचा. ज्याच्या कडे यायचा त्याच्याकडे काही दिवस काढल्यानंतर ग्रामस्थांच्या खोलीवर किंवा जिथे जमेल तिथे आपली सोय लावून घ्यायचा. थोडा शिकला-सवरलेला असला तर तोंडाच्या गोडीने पोलीस, बीएमसी, बीईएसटी, पोर्टट्रस्ट, डॉक नाहीतर बॅंकेत शिपाई वगैरे चिकटून जायचा. बघता बघता तो चाकरमानी होऊन जायचा. पण गिरण्यांचा संप झाला आणि इथल्या सुखवस्तू असलेल्या मिल कामगारालाच जगणं मुश्कील झालं. त्यानंतर नव्वदच्या दशकामध्ये जागतिकीकरणामुळे अनेक उद्योगधंदे आले, फाईव्ह स्टार हॉटेल, हॉस्पिटलं आली. आणि मिलच्या संपकाळात थांबलेला कोकणी माणसाचा मुंबईकडचा ओढा पुन्हा काहीश्या स्वरूपात सुरू झाला.

तोपर्यंत मात्र मुंबईमध्ये घरांच्या किमती वाढल्या होत्या, भाड्याच्या घरांची भाडी वाढली होती, झोपड्या जाऊन एसआरए मध्ये मिळालेल्या घरांचा आकार आणि त्यात मूळच्या कुटुंबाबरोबर आणखी कोणालातरी घेऊन वास्तव्य करणं हे काहीसं गैरसोयीचं होतं. शहरातली आणि लोकलमधलीपण गर्दी प्रचंड वाढत होती. प्रवास करणं जिकीरीचं होतं. परप्रांतीय राज्यातून कमी मोबदल्यात येणारा कामगार उपलब्ध होऊ लागला होता. कोकणी माणसाच्या तुलनेत भय्ये- बिहारी- बंगाली कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे ठरत होते. त्याच सुमारास सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. आणि कोकणी माणसाने तिथेच थांबून उद्योग-व्यवसायाच्या काही गोष्टी करायला सुरुवात केली. मग त्यामध्ये एमटीडीसीच्या मान्यतेने केलेली न्याहारी- निवास योजना असेल, टूरिस्टचा धंदा, आंबा आणि काजू चा व्यापार, मासेमारी,छोट्या खानावळी या सगळ्यामध्ये कष्टकरी कोकणी माणसाने स्वतःला गुंतवून घेतलं. आता इथेही बघा दोन फरक आहे एक जो कामाला डगमगत नाहीये, कितीही काम पडू द्या अतिथी देवो भव: म्हणून सेवेला तत्पर असतो. आणि दुसरा ज्याला फक्त पुढारपण करायचं, झटपट पैसे कमवायचेत आणि लाखांच्या बाता मारायच्यात… तो मात्र राजकीय नेत्यांच्या वळचणीला राहणंच पसंत करू लागला.

नऊ लाख लोकसंख्येच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर संपूर्ण जिल्ह्यातील आठ तालुक्यातला मालवण तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने सगळ्यात हॉटस्पॉट. इथे असलेले समुद्रकिनारे नारळी-पोफळीच्या बागा, सिंधुदुर्ग किल्ला, रॉक गार्डन आणि जलक्रीडा यामुळे छोट्याशा मालवण तालुक्याने संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशभरातल्या पर्यटनावर स्वतःची छाप सोडलीय. म्हणूनच तर दरवर्षी १४ लाख पर्यटक सिंधुदुर्ग किल्ल्यावर भेट देण्यासाठी येतात अशी बंदर विभागाची आकडेवारी सांगते. इथल्या देवबाग आणि तारकर्लीला भेट दिल्यावर स्वर्गीय सुखाची अनुभूती मिळते. त्यानंतर नंबर लागतो तो देवगडचा. कुणकेश्वर मंदिर आणि परदेशाशी ही स्पर्धा करतील असे समुद्रकिनारे यामुळे देवगड ने आपले वेगळे स्थान बनवले आहे. विजयदुर्गाचाही एक वेगळं स्थान पर्यटकांमध्ये आहे. तिसरा क्रमांक लागतो तो वेंगुर्ल्याचा -सावंतवाडीचा. तिथेही लज्जतदार जेवण, समुद्रकिनारे मासे, प्रेक्षणीय स्थळं आणि निसर्ग सौंदर्य यामुळे पर्यटकांचे पाय वेंगुर्ल्याकडे आपसूकच वळतात.

कुडाळ आणि कणकवली हे दोन तालुके तसे व्यापारी वृत्तीचे आणि धंदेवाईक मानसिकतेचे त्यातही कुडाळ व्यापारी बाजारपेठ. सारं काही पैसे, धंदा, फायदा या चष्म्यातूनच बघायचं हा कुडाळने आपला स्थायीभाव बनवलाय. अगदी परवाच याचं प्रत्यंतर आलं. कुडाळ मधल्या एक पंधरा वीस जणांच्या धंदेवाईकांच्या गटाने जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिलं आणि या पत्रावर रेड झोन मधल्या मुंबईकरांना जिल्हा मध्ये प्रवेश देऊ नये अशा स्वरूपाची मागणी केली. या पत्रावर सह्या करणाऱ्यांपैकी बहुतांश मंडळी ही पूर्णतः धंदेवाईक- बिल्डरी मनोवृत्तीचे. घरं बांधायची, कॉम्प्लेक्स उभारायचीत, रोहाऊस- बंगले बांधायचे आणि मुंबईकरांच्या आवडी-निवडीची नेमकी नाडी पकडून त्यांच्याकडून बक्कळ पैसा कमवायचा अशी त्यांची मानसिकता. यामध्ये काही मुंबई आणि कोकणातल्या सामाजिक क्षेत्रात थोडीफार उठबस करणारेही आहेत. पण त्यांनीही याच धंदेवाईकांच्या पावलावर पाऊल ठेवणं पसंत केलं आणि पत्रक काढून मोकळे झाले. काही वेळातच ते पत्रक मुंबईच्या चाकरमान्यांमध्ये कमालीचं वायरल झालं आणि अनेकांनी आपण दुखावल्याची भावना बोलून दाखवली. मला खरंतर या विषयावर लिहायचं नव्हतं पण अनेकांनी लिहावं असा आग्रह केला. मुंबईत असलेल्या जवळपास चार लाख चाकरमान्यांच्या भावनांचा विचार केला तर मात्र माझ्यासारख्या त्या मातीतल्याच असलेल्या पत्रकाराला यावर लिहिणं हे मला खूपच गरजेचं वाटलं.

गेल्या वीस वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू याच्यामुळे आलेली सुबत्ता, पर्यटनामुळे आणि छोट्या खानावळीं मुळे खिश्यात खुळखुळणारा पैसे यामुळे कोकणी माणसाला चाकरमान्यांच्या मनीऑर्डर वर अवलंबून राहावे लागत नाही. आता मुंबईतलं राहणीमान हे जगातल्या दहा महागड्या शहरांपैकी एक झालं असल्यामुळे मुंबईत असलेला चाकरमानी इतक्या मोठ्या प्रमाणात कोकणातल्या मंडळींना सतत मदत करू शकत नाही. पण त्याच वेळेला गेलेल्या १०-१२ वर्षांत कोकणात आपलं घर असावं , दोन-चार गुंठ्याचा छोटासा जमिनीचा तुकडा असावा आणि वर्षातून एखाद-दोन वेळा आपल्याला तिथे देवदर्शनासाठी जाता यावं अशा स्वरुपाची मानसिकता मुंबई- पुणेकरांची झाली. याच मानसिकतेचा आणि भावनेचा अचूक फायदा कुडाळ, कणकवलीच्या धंदेवाईक बिल्डरांनी नीट उचलला त्यासाठी त्यांचे कौतुक करायलाच हवं. कारण मुंबईकरांना लागतो तो दर्जा आणि चोख व्यवहार या दोन्ही गोष्टींच नीट मार्केटिंग इथल्या काही बिल्डरांनी केलं. त्यांच्या कामाचा दर्जा हा मुंबईतल्या नामांकित बिल्डरांनीशी स्पर्धा करण्याइतपत चांगला असल्याचं मी स्वतः अभ्यासानंतर बोलतोय. त्यामुळे कुडाळ पिंगुळी सारख्या भागांमध्ये तीन हजार रुपये चौरस फुटापर्यंत निवासी जागांच्या किमती गेल्यात तर कणकवली मध्ये पाच हजाराचा टप्पा ही काही ठिकाणी पार झालाय.

कुडाळातल्या एका अव्वल हॉटेलच्या विदेशातून आलेल्या मराठी मॅनेजरचा चार वर्षांपूर्वीचा मासिक पगार होता ८०,००० रुपये. इथल्या एका नर्सरीची उलाढाल आहे काही लाखांच्या घरात. १७ वर्षांपूर्वी कुडाळात आलेल्या एका उत्तर भारतीय सुताराने इथे स्वत:चा बंगला उभारायला घेतलाय आणि त्याचं काम करतोय जिल्ह्यातला सगळ्यात महागडा कॉन्ट्रॅक्टर. इथे तनिष्क, रॉयल एनफिल्ड, वामन हरी पेठे, ह्युंदई सारखे ब्रॅण्ड आलेत. त्यातल्या कशा बद्दलच मला असूया नाहीये. इथे एक प्रश्न मला उपस्थित करायचाय की ही इतकी आर्थिक उलाढाल फक्त स्थानिक कोकणी माणसाच्या खिशातल्या पैशांनीच होते का? तर त्याचे उत्तर नाही असंच आहे.

आजही चाकरमानी मोठ्या प्रमाणात देवभोळा आहे. त्याला आपल्या मातीची ओढ आहे. त्यामुळे वर्षातून एकदा ते दोनदा तो आवर्जून कोकणातल्या आपल्या घरी जात असतो. कुडाळ, कणकवली सावंतवाडी रेल्वे स्टेशन वर उतरल्यानंतर इथले स्थानिक रिक्षावाले त्याच्याकडे हमखास ‘बकरा’ याच नजरेतून आणि भावनेतून बघत असतात. दीडशे – दोनशे रुपये त्याच्याकडून एक्स्ट्रा उकळले जातातच. कणकवलीची बातच न्यारी तिथलं व्यवसायाचं, राजकारणाचं आणि धंद्याचं गणित वेगळं. गेल्या दोन दशकात कोकणी माणसाकडे जी सुबत्ता आली ती प्रामुख्याने चाकरमान्यांनी आपला हात सहज सैल सोडला त्यामुळेच.

इथल्या राजकीय नेतृत्वाने पर्यटनासाठी या विशेष स्वरूपात मेहनत घ्यायला हवी होती काम करायला होतं ते मात्र होताना दिसत नाहीये. अगदीच उल्लेख करायचा तर कसाल – मालवण आणि नांदगाव- कुणकेश्वर हे मार्ग अनेक वर्षात चौपदरी का होऊ शकले नाहीत? सिंधुदुर्ग विमानतळाची निर्मिती झाली आहे. स्थानिक पुढाऱ्यांपासून ते मुख्यमंत्रांपर्यंत सगळ्यांनी विमान उड्डाणाच्या वेगवेगळ्या तारखा देऊन झाल्या. प्रत्यक्ष विमान कधी उडणार याचे कोकणी माणसाला वेध लागलेत.पण या विमानाने येणारा माणूस हा पर्यटक आहे, चाकरमानी आणि व्यावसायिकही आहे.

इतकंच कशाला ज्यांनी मुंबईकरांना जिल्हा बंदींची पत्रंक काढली त्यांच्यात खरंच मुंबईकरांनो आम्हाला तुमची गरज नाही सांगण्याची धमक आहे का? जे वकील आलिशान बंगल्यात राहतायत, बीएमडब्लू घेऊन फिरतात ते तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांचे खटले लढवून ग्लॅमरस झालेत का? इथल्या किती स्थानिकांच्या वेळेवर भरलेल्या घरपट्टीनं शहराच्या विकासासाचा गाडा चालतोय ? तर नाही अनेक मुंबई-पुणेकर आपली घरपट्टी आगावू भरतात. हे तरी या यादीतल्या पुढाऱ्यांनी विसरायला नको होते.

मुंबई हे देशातील सगळ्यात जास्त गर्दीचं हे महानगर आहे. आज त्यामुळेच कोरोनाचं संकंट या शहरावर गडद आहे. या शहरातील ७०लाख लोक झोपडपट्टी मध्ये राहतात. आणि रोज सुमारे ७५ लाख लोक उपनगरीय रेल्वेनं जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत. मुस्लीम अतिरेक्यांच्या सर्वात हिटलिस्टवरचं हे मायानगर आहे. सकाळी निघालेला माणूस संध्याकाळी सुखरुप परत येईल हे सांगू शकत नाही. अश्या स्थितीत खुराड्यांसारखी घरं, सार्वजनिक शौचालय, आणि दोन महिने बंद पडलेलं शहर या पार्श्वभूमीवर मूळचा कोकणातील चाकरमानी आपल्या मातीच्या ओढीने सिंधुदुर्गात नाही जाणार तर काय कराचीत जाणार?

आज जर मुंबईत १४ दिवस कोरोनावर उपचार घेऊन घरी जाताना किमान दोन लाखाचं बिल हातात कोंबलं जातं, घरात दोन लोकांना कोरोना झाला तर? कोकणातून मुंबईत येऊन स्थायिक झालेल्या एका आमदाराला आणि त्याच्या पत्नीला कोरोना झालाय. हेच सामान्य नागरिकांना झाला तर विचार करा? सरकारी योजनेतून उपचार देणाऱ्या रुग्णालयात कधीच जागा संपल्यात. आपल्याकडे वैद्यकीय उपचार हे सगळ्यात महागडे आहेत मला सांगा आज चाकरमान्यांना कोकणात यायचे वेध तेवढ्यासाठीच लागले होते. त्यापैकी कोणालाच असं वाटत नव्हतं कि मुंबईतला कोरोना आपल्या माणसांना देऊन यावा. आज वेळ आमच्यावर आहे देव न करो कदाचित उद्या जर अशी वेळ तिथल्या कोणावर आली तर त्याचं काय करायचं? आज हृदयावरची एखादी उपचार पद्धती किंवा मेंदू ,किडनी यासारखे उपचार मोठ्या प्रमाणात कोकणात
होत तर नाहीच आणि झालेच तर निर्दोष असतील याची खात्री नाही. त्यामुळे कोकणी माणसाला आजारपणात आधार असतो तो मुंबईकरांचाच. विचार करा मी अमित वालावलकरच्या अपघाताच्यावेळी दुर्लक्ष केलं असतं तर? मुंबई आणि पुण्याच्या तुमच्याच लोकांनी कसोटीच्या वेळेला जर हात आखडता घेतला तर काय होऊ शकतं? स्पर्धा परीक्षा, नोकरीच्या मुलाखती, दूतावासातील मुलाखती, यासाठी कोकणातल्या तरुणांना मुंबई ठाणे आणि पुण्याचा आधार वाटतो ना? त्यावेळी असहकार पुकारला तर तुमची नेमकी काय भावना असेल? इथे मला तुमचं -आमचं आपलं – परकं असं मुळीच करायचं नाही. पण अनेक गावांमध्ये मुंबईकरांना विरोध केला जातोय. सावंतवाडी मध्ये सख्ख्या भावाला घराचे दरवाजे बंद करण्यात आले. मला सांगा या सगळ्यामुळे आपण आपल्या मध्येच दुरावा निर्माण करतोय.

कोकणी माणूस देव भोळा आहे आणि त्याचाच फायदा कोकणातल्या स्थानिकांना मंदिरांच्या आणि देवळांच्या जीर्णोद्धाराच्या वेळी झालेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठी आणि मध्यम स्वरूपाची जवळपास तीन हजार मंदिर आहेत. या मंदिरांचं अर्थकारण हे फक्त स्थानिकांच्या भोवती पिंगा धरतेय का ? इथले वार्षिक जत्रोत्सव, उत्सव यातून मुंबईकरांना वजा करुन बघा. यासाठी लागणारी खूप मोठी अर्थशक्ती ही मुंबईतूनच कोकणात जाते. मला मान्य आहे की कोकणी माणसाला काही गोष्टींची भीती ही जरा लवकरच वाटते. मग एखादी पोलिसी कारवाई असेल किंवा एखादा कोरोना सारखा आजार असेल तर यावर काही चर्चेने मार्ग निघाला असता. अजूनही निघू शकतो. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास ५०% घर ही कुलूपावस्थेत बंद आहेत. कितीतरी मंडळी शिक्षण नोकरी आणि व्यवसाय यांच्या निमित्ताने जिल्ह्याबाहेर आहेत. त्यांच्या कामाच्या ठिकाणांपेक्षा जिल्ह्यातील त्यांची घरं, बंगले आणि रो हाऊसेस प्रशस्त आहेत. मग ही मंडळी तिथे येऊन विलगीकरणात नियमानुसार राहिले तर काय बिघडणार आहे? पण “तुम्ही इलास तर आमी कोरोनानं मरतलवं” अशी भावना जर सरसकटपणे करुन घेणं म्हणजे आपल्याच माणसांवर आपणच अन्याय करण्यासारखे आहे. मुंबैकरांनी आपल्या मौखिक संपर्काच्या जोरावर जर कोकणातल्या बिल्डर, व्यवसायिक आणि हॉटेल वाल्यांच्या विरोधात चुकीची का होईना नकारात्मक मोहीम सुरू केली तर त्याचा किती मोठा फटका या सगळ्यात छोट्या जिल्ह्याला बसेल, याचा आपण कधी विचार केलाय का?

कोरोना हा दुर्लक्ष आणि बेफिकिरी केली तर नक्कीच जीवावर बेतणारा आजार ठरू शकतो. पण योग्य काळजीसह उपचार केले तर मात्र एक साधा ताप यापलीकडे या आजाराचे स्वरूप नाही आणि त्यामुळे रोज मरणाशी झुंज देणाऱ्या चाकरमानी मुंबईकराला जिल्ह्यात न घेता त्याला मरणाच्या दारात लोटणं हे एरवी फणसासारखे असलेल्या कोकणी माणसाला खरंच शोभणारं आहे का ? याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे अन्यथा आपल्याच माणसांना आपण दुखावून दूर राहू शकतो आणि कोरोनापेक्षा ही भीती जास्त मोठी आहे. कारण त्याच्यावरच या जिल्ह्याचं एकूणच भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे आजच्या घडीला तिथला स्थानिक माणूस काय आणि चाकरमानी काय या सगळ्यांचीच देवाक काळजी!