घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकोकणचा कॅलिफोर्निया की केनिया होणार !

कोकणचा कॅलिफोर्निया की केनिया होणार !

Subscribe

कोकण हा निसर्गसंपन्न प्रदेश असल्यामुळे त्याचा कॅलिफोर्निया होंऊ शकतो, त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे, असे कोकणी माणसाचे फार जुने स्वप्न आहे. अमेरिकेत कॅलिफोर्निया हा निसर्गाने समृद्ध असा प्रदेश आहे. लॉस एंजलीस येथील हॉलिवूड ह्या सिनेउद्योगामुळे, येथील नैसर्गिक सौंदर्यासाठी मोठ्या संख्येने भेट देणार्‍या पर्यटकांमुळे व सिलिकॉन व्हॅलीमधील अतिविकसित तंत्रज्ञान उद्योगांमुळे कॅलिफोर्नियाची भरभराट झाली आहे. तेथील हवामान चित्रपटांच्या चित्रीकरणास फार चांगले आहे. त्यामुळे त्याठिकाणी हॉलिवुडची चित्रनिर्मिती मोठ्या प्रमाणात होत असते. कॅलिफोर्नियामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत. निसर्गाची जोपसना करतानाच संतुलित भौतिक प्रगतीसाठी कॅलिफोर्निया ओळखला जातो. कॅलिफोर्नियाच्याच धर्तीवर निसर्गरम्य कोकणाचा विकास साधावा, अशीच भावना कोकणी माणसाची आहे. मुंबईतून पूर्वी बोटीने लोक कोकणात जात, पण पुढे ती बोट बंद पडली. त्यामुळे सगळा भार एसटीवर पडला. त्यामुळे कोकणात रेल्वेने जाता यावे, असे स्वप्न कोकणी माणूस पाहू लागला.

पण जशी आज चिपी विमानतळाची परिस्थिती आहे, तशीच एकेकाळी कोकण रेल्वेची होती. अनेक चाचण्या होत असत, पण कोकण रेल्वे सुरू करण्याच्या दिशेने ठोस असा निर्णय होत नव्हता. पण त्यातही मंत्री असताना मधू दंडवते यांनी तसा प्रयत्न करून पाहिला, पण ते प्रयत्न अपुरे पडले. मुळात कोकणात रेल्वे घेऊन जाणे हे एक मोठे आव्हान होते. कारण कोकण भौगोलिकदृष्ठ्या अतिशय अवघड प्रदेश आहे. तिथे उंच डोंगर आणि खोल दर्‍या, अनेक नद्या, ओहळ, पावसाळ्यात प्रचंड पाऊस अशा परिस्थितीत रेल्वेसाठी मार्ग कसा तयार करायचा हे मोठे आव्हान होते. पण नामवंत अभियंता ई. श्रीधरन यांनी हे शिवधनुष्य उचलायचे ठरवले. खरे तर त्यांचे स्वप्न वेगळे होते. ते स्वत: दक्षिणेकडचे असल्यामुळे तो भाग भारताच्या मुख्य भूमीला रेल्वेने त्यांना जोडायचा होता. त्यामुळेच त्यांनी आपली बुद्धी आणि तंत्र पणाला लावून कोकण रेल्वेसाठी मार्ग बनवला. त्यासाठी जगातील आधुनिक तंत्रज्ञान आणण्यात आले. मोठमोठे डोंगर पोखरून त्यातून बोगदे तयार करण्यात आले.

- Advertisement -

दर्‍यांवर आणि नद्यांवर अतिशय उंचीवरून जाणारे पूल बांधण्यात आले. या सगळ्या कामांसाठी मोठा निधी उभारण्याची गरज होती. त्यासाठी ई.श्रीधरन यांनी शक्कल लढवली. त्यांच्या अथक प्रयत्नातून कोकण रेल्वे सुरू झाली. तसे पाहिले तर कोकणातून ती जाते म्हणून ती कोकण रेल्वे असेच म्हणावे लागेल. कारण या मार्गावर धावणार्‍या रेल्वेगाड्या मोठ्या संख्येने दक्षिण भारतात जाणार्‍या असतात. वाटेत कोकण लागते इतकेच. बरेच वेळा कोकणी माणसाला या गाडीत तिकीटही मिळत नाही. इतकी गर्दी असते की, टॉयलेटमध्ये उभे राहून त्याला प्रवास करावा लागतो. कोकणात रेल्वे आली की, कोकणाचा विकास होईल, अशी स्वप्ने रंगवली जात होती. पण विकास वगैरे या गोष्टी अजून दृष्टीपथात यावयाच्या आहेत. इथे दक्षिणेत जाणार्‍या गाड्यांना कोकणात थांबे देण्यासाठी कोकणातील लोकप्रतिनिधींना आंदोलने करावी लागतात, अशी दुरवस्था आहे.

रेल्वेमुळे निर्माण झालेले रोजगार हे अगोदरच परप्रांतीय कंत्राटदारांनी हस्तगत केले. आपल्या गावांकडून पोरे आणून त्यांना कामाला लावले. कोकणातील तरूण या हालचालींपासून कोसो दूर होता. रेल्वेगाडीत जागा असली तर कोकणी माणसाला बसायला मिळते, नाही तर कायम हाऊसफुल्ल. त्यात पुन्हा बुकिंग दलालांची लॉबी असते. अवघ्या काही मिनिटात अख्ख्या रेल्वेची तिकिटे ते बूक करून टाकतात. सामान्य कोकणी माणूस तर चार चार महिने अगोदर बुकिंग करतो. कोकणात रेल्वे आली की, तिथल्या फळबागांचा मोठा विकास होईल, तिथल्या नैसर्गिक उत्पादनांना दूरवर निर्यात करून मोठा नफा मिळता येईल, असे वाटत होते. पण कोकण रेल्वेचा असा विकासासाठी अजून तरी उपयोग झालेला नाही.

- Advertisement -

या रेल्वेतून कोकणी तरूणतरुणी मुंबईत कुठे तरी नोकरी मिळेल का, या आशेने येताना दिसतात. दहावी-बारावीत कोकणातील मुले महाराष्ट्रातील इतर भागांवर बाजी मारतात, पण या हुशार कोकणी मुलांना नोकरी धंद्यासाठी कोकण सोडावे लागते. फारच कमी संख्येने ही हुशार मुले कोकणात राहतात. काही मुले उच्च शिक्षणासाठी कोकणातून बाहेर गेली की, बहुतेकजण परत येतच नाहीत. बाहेरच स्थायिक होतात. कधी तरी सणावाराला कोकणात येतात. त्यामुळे कोकणातील बरीचशी घरे बंद आहेत. ती कधी तरी सणावारांना उघडली जातात आणि त्यांची साफसफाई करण्यात येते. कोकणी माणूस मुंबई-पुण्यातून गणपती आणि शिमग्यासाठी कोकणातील घरी जातो. आठवडाभर झाला की, घर बंद करून पुन्हा माघारी फिरतो. कोकणात रेल्वे आली, पण ज्या प्रकारे कोकणात या वाहतूक साधनाचा उपयोग करून संपन्नता यायला हवी होती, ती काही आलेली दिसत नाही. कारण कोकणातील बहुतांश शिकलेला तरुणवर्ग पोटापाण्यासाठी आणि नशीब काढण्यासाठी कोकण सोडताना दिसतो.

कोकणातील बहुसंख्य बाजारपेठा या स्थानिकांपेक्षा परप्रांतियांनी काबीज केलेल्या दिसतात. तिथे असलेला कोकणी माणूस किंवा सणावाराला जाणारा मुंबईकर चाकरमानी हा त्यांचा ग्राहक असते. कोकणी माणसांनो जमिनी विकू नका, असा टाहो फोडताना सामाजिक कार्यकर्ते दिसतात. पण जमीन विकून पैसा मिळत असल्यामुळे तो पैसे मिळवण्यात धन्यता मानतो. पण परप्रांतातून आलेल्या माणसांना कोकणाविषयी प्रेम असण्यापेक्षा तिथे असलेली संसाधने हवी तशी ओरबाडून पैसा कमवायचा असतो. कोकणात धंदा करण्यासाठी बाहेरच्या कंपन्या गेल्या. रायगड जिल्ह्यात अनेक कारखाने उभे राहिले, रत्नागिरीत लोटे परशुराम येथे उद्योग वसाहत निर्माण करण्यात आली. यातून कोकणाच्या प्रगतीपेक्षा तेथील प्रदूषणातच मोठी भर पडलेली दिसते. बर्‍याच नद्या प्रदूषित झाल्या आहेत. त्यामुळे एकेकाळी जिथे मासेमारी चाले, ती बंद झाली आहे. इतकेच नव्हे तर कोकणात रिफायनरी आणण्यासाठी शासकीय पातळीवरून जोरदार प्रयत्न सुरू आहेत, पण लोकांच्या विरोधामुळे सध्या त्याला ब्रेक लागलेला आहे. आता फक्त सिंधुदुर्ग यातून वाचला असे वाटत होते, पण सिंधुदुर्गावर मायनिंगचे मोठे संकट आलेले आहे.

तिथे सिलिकॉन आणि अन्य खनिजांसाठी डोंगर पोखरले जातात. त्यामुळे डोंगरांची अवस्था आतून वाळवीने भुगा केलेल्या लाकडी फर्निचरसारखी होते. ते वरून छान वाटते. पण त्यावर जोर पडला की, ते कोसळून पडते. तसेच मायनिंगमुळे पोखरलेले डोंगर उन्हाळ्यात अबाधित वाटतात, पण जेव्हा कोकणात प्रचंड पाऊस पडू लागतो. त्यावेळी मात्र ते अक्षरश: विरघळतात आणि त्याच्या दरडी मोठ्या प्रमाणात कोसळतात. त्याखाली घरे आणि त्यातील माणसे चिरडली जातात. कोकणातील मायनिंगला पुढील काळात कठोरपणे शिस्त लावण्याची गरज आहे. यात राजकीय नेते आणि बड्या कंपन्यांचे हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे बेसुमार मायनिंगकडे दुर्लक्ष केले जाते. पण जेव्हा मोठा पाऊस येतो, तेव्हा मात्र या दुर्लक्षामुळे अनेकांचे जीव जातात. कोकणात गेल्या पंधरा दिवसात पावसाने अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते केले आहे. पण त्याला कोण जबाबदार आहे, याचा आता सगळ्यांनी मिळून विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण हे असेच चालू राहिले तर कोकणाचा कॅलिफोर्निया करायचे तर दूरच, त्याचा केनिया मात्र नक्कीच होईल आणि त्याच्या झळांमध्ये कोकणी माणूस होरपळून निघेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -