घरफिचर्समायमहानगर ब्लॉगलैंगिक अत्याचार रोखण्यासाठी कायद्याची निष्ठुरता हवी

लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी कायद्याची निष्ठुरता हवी

Subscribe

खरे गुन्हेगार दोषी नाहीत, इतके त्या श्वापदांच्या तोंडी निरपराधांना आणून सोडणारे गुन्हेगार असतात. जे आपल्या शाब्दिक व मुखवट्याच्या भुलभुलैयाने निष्पाप मुली माणसांना राक्षसाच्या तोंडी आणून सोडत असतात. जे देखवे उभे करून सामान्य माणसाला बळीच्या वेदीवर आणून उभे करीत असतात. अशांना पायबंद बसून लैंगिक अत्याचारांना आळा बसण्यासाठी कायद्याची निष्ठुरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. पण त्यासाठी सगळ्याच बाजूंनी प्रामाणिकपणे कृती करण्याची गरज आहे.

चेन्नईत राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीने तिच्यावर होणार्‍या लैंगिक अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली. अकरावीत शिकत असलेल्या या मुलीला आपल्यावरील अत्याचार सहन झाला नाही. जगाला ओरडून सांगण्याची हिंमत ती करू शकली नाही. त्यापेक्षा तिने मृत्यूला कवटाळणे योग्य मानले. आत्महत्या करण्यापूर्वी तिने लिहिलेल्या एका चिठ्ठीत, ‘या जगात मुलींसाठी दोनच जागा सुरक्षित आहेत, एक आईचे गर्भाशय आणि दुसरी कबर’, असे हृदयाला पिळवटून टाकणारे वाक्य लिहिले होते. त्यामुळे देशात एकच खळबळ उडाली. मुली, स्त्रीयांवरील अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला. या अनामिकासारखे त्या वयाच्या व तशा परिस्थितीतून जाणार्‍या कोट्यवधी बालिका जगात आहेत आणि होत्या. पुढल्याही काळात असतील. मुद्दा त्यांच्या वाट्याला आलेला अनुभव बदलण्याचा आहे आणि नेमक्या त्याच बाबतीत कोणी काहीही बोलायला राजी नाही. प्रत्येकाला आता या अनामिकेला न्याय मिळावा असे वाटत आहे. पण तशी स्थिती कुठल्याही बालिकेवर येऊ नये, याची इच्छा नाही की तशी मागणी होत नाही.

हे फक्त आपल्या देशातील चित्र नसून पुढारलेल्या व मागासलेल्या सर्वच देशातील वस्तुस्थिती आहे. अमेरिका, युरोप या प्रगत देशापासून अराजक माजलेल्या इराक सोमालियापर्यंत त्याचीच प्रचिती येईल. त्यात भरडल्या जाणार्‍या मुली बालिका व महिलांपेक्षा त्यापासून कोसो मैल दूर असलेलेच गदारोळ माजवित असतात आणि न्यायासाठी टाहो फोडत असतात. त्या न्यायाची संकल्पना अशा नरकवासातील बालिकांची मुक्ती करण्याशी निगडित नसून आरोपीला शिक्षा होण्याची जोडलेली आहे. पुढली अनामिका होऊ नये वा आणखी एक अनामिका नको, असे कोणी बोलताना ऐकले आहे काय? नाही! कारण अशा अनामिका होतच रहाणार, याची यातल्या प्रत्येकाला खात्री आहे. त्यात भारतातले मेणबत्तीवाले चित्रपट तारे वा बुद्धीमंत येतात, तसेच जगाला कायम शहाणपण शिकवणार्‍या राष्ट्रसंघ व तिथल्याही दिग्गजांचा समावेश होत असतो. आपला चेहरा आरशात बघायची हिंमत नसलेले हे बेशरम लोक, उर्वरित जगाला शहाणपण शिकवित असतात.

- Advertisement -

कुठला तरी एक जुना हिंदी सिनेमा आहे. संजीव कुमार आणि शर्मिला टागोरचा. त्यात शर्मिलाची दुहेरी भूमिका आहे. तरूणपणी त्या दोघांचे प्रेम जमते आणि त्यातून तिला दिवस जातात. पुढे कुठल्या कारणाने परदेशी गेलेला संजीव कुमार व शर्मिलाची फारकत होते आणि त्याच्या प्रेमाने वेडी झालेली शर्मिला एका बाळाला जन्म देते ती दुसरी शर्मिला. पुढे वयात आलेल्या या पोरीला गावातला एक दलाल पळवून नेवून कुंटणखान्यात विकतो. दोन दशकानंतर परतलेला संजीव कुमार आपल्या प्रेमाचे ते उमललेले फुल शोधत त्या कुंटणखान्यापर्यंत पोहोचतो. पैसे मोजून आपल्याच मुलीच्या बिछान्यावर बसतो. पण ज्या पद्धतीत तो तिला वागणूक देतो, त्याने चिडलेली वेश्या मुलगी त्याला खूप सुनावते. तो बाप असल्याचे तिलाही ठाऊक नसते.

पण त्या संवादात शर्मिला एक वाक्य बोलते ते खूप मोलाचे आहे. आपल्याला या कुंटणखान्यात आणून ज्याने विकले, त्याच्यावर आपला राग नाही. तो त्याचा धंदाच होता. पण ज्याने प्रेमात पाडून आपल्या जन्मदातीला वार्‍यावर सोडले, तोच माझा खरा गुन्हेगार आहे, असे ती म्हणते आणि तेच जागतिक सत्य आहे. तेच मानवी समाजातील भीषण सत्य आहे. खरे गुन्हेगार दोषी नाहीत, इतके त्या श्वापदांच्या तोंडी निरपराधांना आणून सोडणारे गुन्हेगार असतात. जे आपल्या शाब्दिक व मुखवट्याच्या भुलभुलैयाने निष्पाप मुली माणसांना राक्षसाच्या तोंडी आणून सोडत असतात. जे देखवे उभे करून सामान्य माणसाला बळीच्या वेदीवर आणून उभे करीत असतात.

- Advertisement -

इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. अत्याचार अनामिकावरचा असो किंवा श्रीमंत सुखवस्तू घरातला असो, तो अत्याचारच असतो आणि त्यात भरडली जाणारी स्त्री वा बालिका अबला म्हणूनच चिरडली जात असते. तिची जात धर्म वा त्वचा वर्ण यामुळे तिच्यावर अन्याय होत नसतो. दुबळेपणा हा तिचा गुन्हा असतो आणि म्हणून सबळांना आपल्या मर्दुमकीचे प्रदर्शन मांडण्याची भेकड संधी मिळत असते. जे बेछूट तो गुन्हा करतात व पचवतात, ते प्रतिष्ठीत असतात आणि पकडले जाणार्‍यांवर राक्षस म्हणून आरोप करणारे देव वगैरे नसतात. ते पकडले जात नाहीत म्हणून सभ्य असतात व त्याच सभ्यपणाचा तमाशा मांडण्यासाठी आवेशपूर्ण आरोप करीत असतात, हनि इराणी ही जावेद अख्तर यांची पहिली पत्नी, तिने अलिकडेच आपण बाल कलाकार असताना कोवळ्या वयात सोसलेल्या अत्याचाराची कथा सांगितलेली आहे.

तिचा अनुभव आजही शेकडो नव्या मुली चित्रसृष्टीत घेतच असतात. त्याविषयी कधी जाहीर चर्चा होते काय? काही वर्षापूर्वी अशा गोष्टी चव्हाट्यावर आल्या त्यात पडद्यावर खलनायक म्हणून काम करणार्‍या शक्ती कपूरचे नाव होते. किती चित्रतारे तेव्हा आपण याच चित्रसृष्टीत असल्याची लाज वाटते असे सांगायला समोर आलेले होते? अनामिकासाठी ज्यांचा जीव तिळ तिळ तुटतो, त्यांना तेव्हा शक्ती कपूरवर झालेल्या आरोपाचा अभिमान वाटला होता काय? उलट तेव्हा जो गौप्यस्फोट झाला त्यातल्या आरोपींच्या समर्थनाला एकाहून एक नामवंत कलावंत पुढे सरसावले होते. अनामिकासाठी जो न्याय असतो, तोच चित्रसृष्टीत नाडल्या जाणार्‍या मुलींच्या अब्रुसाठी गर्भगळित कशाला होतो? यातला दुटप्पीपणा लक्षात घेतला पाहिजे आणि यातले मायावी राक्षस ओळखले पाहिजेत. आपली पापे झाकण्यासाठी त्यांना अनामिकाचा विषय ओरडून सांगावा लागत असतो. त्यातली अनामिका निमित्त असते. तिच्या न्यायापेक्षा आपली पापे झाकायला प्राधान्य असते.

गांधीजी म्हणत हिंसेची कुवत नसल्याने हात न उचलणारा अहिंसक नसतो. हिंसेची पूर्ण क्षमता असताना मनावर नियंत्रण राखून दाखवलेला संयम म्हणजे अहिंसा! नेमकी तीच गोष्ट इथेही लागू होते. पुरूषातला नर म्हणून जी पाशवी प्रवृत्ती असते, ती प्रत्येक क्षणी संधी शोधत असते. ती संधी घेण्याची हिंमत नसल्याने कोणी सभ्य होत नाही. तशी संधी असतानाही त्याला अन्याय अत्याचार समजून दूर रहाण्याची कुवत, ही सभ्यता असते. किंबहुना, असे कोणी करायला धजावला तर त्याला पुढे येऊन रोखण्याची इच्छाशक्ती, ही संस्कृती असते. प्रत्येकाने आपापला चेहरा आरशात बघावा आणि आपल्यात यापैकी कुठली कुवत आहे, ते तपासून घ्यावे. ह्या असल्या नाटकी संस्कृतीने हजारो वर्षात स्त्रीला तिचा सन्मान मिळू शकला नाही की सुरक्षेची हमी मिळू शकलेली नाही. कारण पुरूषात दबा धरून बसलेले श्वापद खरा धोका असतो. या श्वापदाला रोखण्यासाठी कायद्याच्या निर्दय निष्ठूरतेनेच वापर करावा लागेल.

बौद्धिक युक्तीवादाने ते शक्य नसते. कारण गुन्हा करणारा एकेकट्या भयभीत लोकांच्या मनातील भीतीमुळेच शूर झालेला असतो. ते एकत्रित होऊन अंगावर येणार नाहीत, याची खात्री त्याचे खरे बळ असते. पोलीस वा गणवेशातील सरकारी प्रतिनिधी वा कायदा हेच जेव्हा खर्‍या अर्थाने समाजाचे एकत्रित बळ असल्याची खात्री त्याला असते, तेव्हाच गुन्हेगार कायदालाही घाबरतो. आज आपल्या देशात कायदा तेच स्थान गमावून बसला आहे. त्यामु्ळे गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे आणि कायद्याचे राज्य व प्रशासन मूठभर विचारवंतांच्या युक्तीवादाला घाबरणारे केवळ बुजगावणे झाले आहे. त्यामुळे सोकावलेल्या गुन्हेगाराला आपणच लगाम लावावा, धडा शिकवावा, अशी सामूहिक झुंडवृत्ती लोकांमध्ये वाढते आहे. त्यातला धोका इतकाच असतो, की आज गुन्हेगाराला वेसण घालायला उफाळून येणारी ही सामूहिक झुंडशाही बेफाम असल्याने, पोलीस यंत्रणाही तिच्यापुढे निकामी होऊन जाते.

पण तो दुबळेपणा त्या झुंडीच्या लक्षात आला, मग सगळीकडे झुंडीचेच राज्य प्रस्थापित व्हायला वेळ लागणार नाही. हेच अफगाण, इराक वा पाकिस्तानात होताना दिसते आहे. तिथल्या विविध नावाच्या झुंडीही मुळात अशाच सामूहिक न्यायाचा मुखवटा चढवून अस्तित्वात आल्या. जेव्हा शासन व्यवस्थाच निकामी होऊन गेली. तिथे त्यांनी आपली निर्दयी सत्ता प्रस्थापित केली आणि आता तिथे कुणाला बुद्धीवाद व युक्तिवाद करण्याचीही सोय उरलेली नाही. मुद्दा इतकाच, की प्रचलित शासन व्यवस्था व कायदे गुन्हेगारांनी निकामी केलेतच. त्यावर आणखी घाव घालून बुद्धीवादाचे समाधान नक्की मिळू शकेल. पण तीही व्यवस्था आणखी खिळखिळी होऊन गेल्यास येऊ शकणार्‍या तालिबानी व्यवस्थेत बुद्धिवादाचे स्थान कोणते असेल? पांडित्य सोडून आपण सामान्य जनतेपासून किती दुरावलोत, याचा हे जाणते विचार करणार की नाही?

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -