मोदींच्या जीवावर फडणवीस सुभेदार !

आपापले पक्ष सोडून सध्या अनेकजण भाजपच्या तंबूत मिळेल तिथून घुसत आहेत, हे चित्र पाहिल्यावर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा आहे, असे म्हटले जात आहे. पण हा करिश्मा फडणवीसांचा नसून तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये लोक मोदींना मतदान करत असतात, असेच दिसून आलेले आहे. त्यामुळे मोदींच्या जीवावर फडणवीस सुभेदार असेच म्हणावे लागेल.

महाराष्ट्रात सध्या विविध पक्षांमधील नेते आणि पदाधिकार्‍यांना भाजपविषयी प्रचंड आकर्षण वाटू लागले असून मिळेल त्या मार्गाने ही मंडळी भाजपच्या तंबूत शिरत आहेत. कारण भाजपची सर्कस सध्या जोरात आहे. ती सध्या इतकी हाऊसफुल चालत आहे की, ती पाहण्यासाठी तिकीट मिळो किंवा न मिळो, विविध पक्षांमधील लोक तंबूत घुसत आहेत. सत्तेत येण्यापूर्वी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अच्छे दिन आनेवाले हैं, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार लोकांना अच्छे दिन येण्यासाठी अजून वेळ असला तरी भाजपला मात्र सध्या अच्छे दिन आलेले आहेत. एकेकाळी शेटजी भटजींचा पक्ष म्हणून भाजपला हिणवणारे आणि नाके मुरडणारे तसेच शाहू फुले आंबेडकरांच्या समतावादी समाज रचनेचा पुरस्कार करणार्‍या किती तरी जणांना आता भाजप अगदी जवळचा वाटू लागला आहे. काळाचा करिष्मा जबरदस्त आहे. माणूस एकदा यशस्वी झाला की, मग तो बोलतो ते ब्रह्मवाक्य असते आणि त्याची साथसंगत सगळ्यांनाच आवडू लागते.

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी आणि नंतरही महाराष्ट्रात कायम काँग्रेसचाच दबदबा राहिलेला होता. ‘ताई माई अक्का विचार करा पक्का, हातावर मारा शिक्का’, असे समीकरण रुढ झालेले होते. लोकांच्या डोक्यावर काँग्रेसने आपला हात ठेवलेला होता. त्यामुळे त्यांना दुसरे काही दिसत नसे. पुढे शिवसेना आणि भाजप महाराष्ट्रात हळूहळू आपले पाय रोवू लागले. पण काँग्रेसपुढे स्वतंत्रपणे आपला टिकाव लागणार नाही, याची त्यांना कल्पना आल्यावर त्यांनी महाराष्ट्रात युती करण्याचा निर्णय घेतला. त्या युतीला या दोन्ही पक्षांनी हिंदुत्त्वाच्या पायावर स्थापित केले. १९९५ साली या दोन्ही पक्षांच्या युतीचे सरकार महाराष्ट्रात पहिल्यांदा सत्तेत आले. काँग्रेससाठी हा फार मोठा धक्का होता. काँग्रेसकडून ही सत्ता जाण्यापूर्वी शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सत्ताबद्दल बदलत्या काळाचे संकेत देणारा होता. शिवसेनेने राजकीयदृष्ठ्या उपेक्षित असलेल्या कोकणात आपला विस्तार करून राजकीय पटलावर आपले पाय घट्ट रोवले, पण पश्चिम महाराष्ट्र हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला होता. तो किल्ला पाडणे स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही शक्य झाले नव्हते. त्या पश्चिम महाराष्ट्राच्या बालेकिल्ल्यावर काँग्रेस आणि त्यांच्यातून निर्माण झालेली राष्ट्रवादी काँग्रेस बिनधास्त होती. सहकार संस्थांच्या माध्यमातून आपले मतदार बांधलेले आहेत. ते भाजप किंवा शिवसेनेकडे जाणार नाहीत, त्यामुळे आपण निवडून येणारच असा ठाम विश्वास त्यांच्या नेत्यांना होता. पण त्यांचा विश्वास २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ढासळून पडला. गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमदेवार म्हणून राष्ट्रीय पातळीवर आले होते. त्यांनी आपल्या वेगवान आणि धडाकेबाज प्रचारसभांमधून काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला होता. मोदींच्या या झंझावातात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला पश्चिम महाराष्ट्र ढासळून पडला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था दोन आणि चार खासदार अशी झाली. महाराष्ट्रात दीर्घकालीन राज्य करणार्‍या काँग्रेससाठी हा प्रचंड धक्काच होता.

केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पुढे काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली. लोकसभेत आपल्याच बळाचा फायदा शिवसेनेला मिळाला, म्हणून आता तो फक्त आपल्याला मिळावा आणि मुख्यमंत्री आपला व्हावा, म्हणून भाजपने जागावाटपाच्या वादातून शिवसेनेशी असलेली युती तोडली. भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढले. त्यात भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्याचा फायदा होऊन भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. अर्थात, मुख्यमंत्री म्हणून कुणाला पुढे आणायचे हा निर्णय केंद्रात भाजपची बहुमताने पहिल्यांदाच सत्ता आणणार्‍या नरेंद्र मोदी यांचा होता. कारण महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्याच्या स्पर्धेत बरेच नेते होते. त्यात गोपीनाथ मुंंडे, नितीन गडकरी, एकनाथ खडसे अशा मुरलेल्या नेत्यांचा समावेश होता. फडणवीस यांच्यापेक्षा हे नेते वयाने आणि अनुभवाने मोठे होते. एकनाथ खडसे तर म्हणाले होते, देवेंद्र तो कल का बच्चा हैं. पण मोदींनी या वरिष्ठांना बाजूला ठेवून नव्या दमाचे देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली.

देवेंद्र फडणवीस हे हुशार आहेत. नगरसेवकापासून ते महापौर आणि पुढे आमदार असा त्यांनी स्वबळावर राजकीय प्रवास केलेला आहे. त्यांचा संयमी स्वभाव, अभ्यासूवृत्ती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी या सगळ्याच जमेच्या बाजू होत्या. फडणवीस कितीही हुशार असले तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, महाराष्ट्रात काहीही झाले तरी राजकारणात मराठा लॉबीची मक्तेदारी असते. त्यांच्या अनुमतीशिवाय कुठलाही माणूस मुख्यमंत्रीपदी बसू शकत नाही. पण ही मराठा लॉबीची मक्तेदारी नरेेंद्र मोदी यांनी मोडून काढली. मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस हे आपले पंख पसरवून राज्यात भाजपचा राजकीय प्रभाव वाढवत आहेत. पण त्यांच्या पंखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बळ आहे, हे विसरून चालणार नाही. मोदी जर का फडणवीस यांचे रक्षणकर्ते नसते तर महाराष्ट्रात त्यांचा मुख्यमंत्रीपदी फार काळ टिकावही लागला नसता हे लक्षात घ्यायला हवे. कारण महाराष्ट्रात अन्य पक्षांप्रमाणे भाजपमध्येही मुख्यमंत्रीपदावर आरुढ होण्यासाठी आसुसलेल्यांची संख्या कमी नाही. पण मोदींची खप्पामर्जी झाली तर जे काही हाती आहे तेही गमावून बसावे लागेल, ही भीती त्यांना असल्यामुळे ते फडणवीस यांना त्रास देण्याच्या फंदात पडत नाहीत.

दुसर्‍या बाजूला महाराष्ट्रातील राजकारणाचे बादशहा मानले गेलेले शरद पवार यांचे आता वय झाले आहे. त्यामुळे त्यांचा प्रभाव ओसरला आहे. त्यामुळे मोदींच्या समोर त्यांची डाळ आता शिजेनाशी झालेली आहे. हे लक्षात घेऊन त्यांच्या पक्षातील बर्‍याच पदाधिकार्‍यांनी भाजपचा रस्ता धरला आहे. विविध पक्षातील लोक फडणवीसांच्या प्रभावामुळे भाजपमध्ये येत आहेत, अशी चर्चा प्रसारमाध्यमांवर होत असते, पण वास्तव असे आहे की, भाजपबद्दल अन्य पक्षीय लोकांना वाटत असलेले आकर्षण हे देवेंद्राचे नसून नरेंद्रांचे आहे, हे लक्षा घेतले पाहिजे. आजच्या घडीला भाजपमधून मोदींना वजा केले अशी कल्पना केली, तर भाजपची हवा निघून जाईल. कारण कुठलाही पक्ष हा सक्षम नेत्यामुळे उभा असतो. सध्या काँग्रेसकडे असे भारदस्त नेतृत्व नसल्यामुळे त्यांची संघटना अस्ताव्यस्त झालेली आहे. काँग्रेसजनांना एका सूत्रात बांधून त्यांच्यामध्ये नवे चैतन्य निर्माण करणारे नेतृत्व त्यांच्याकडे सध्या नाही. त्यामुळेच त्यांच्यामध्ये गटबाजी उफाळून आलेली आहे. ते आपापसात लढत आहेत. सध्या महाराष्ट्रातील काँग्रेस ही गटागटात विभागली गेली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि अजित पवार यांच्या अंतर्गत दुहीमुळे कमकुवत झाली आहे. अन्यथा, शरद पवार यांचे वय झालेले असतानाही अजित पवार यांनी पक्षात नवी जान भरली असती. एकूणच काय तर सध्या मोदींच्या समोर महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी हतबल झाले आहेत. त्याची कारणे अनेक आहेत. काही प्रेमापोटी तर काही भीतीपोटी भाजपकडे जात आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जेरीस आणण्यात फडणवीस यशस्वी ठरत आहेत, असे बोलले जात असले तरी त्यांच्या मागील खरी ताकद नरेंद्र मोदींची आहे कारण सगळ्या यंत्रणा त्यांच्याच हातात आहेत. दुसरीकडे मोदींच्या करिश्म्यावर भाजपचे बहुसंख्य खासदार आणि आमदार निवडून येत असतात. लोक भाजपला नव्हे तर मोदींना मतदान करत असतात. मोदींची मर्जी नसेल तर देवेंद्र फडणवीस शून्य आहेत. त्यामुळेच मोदींच्या जीवावर फडणवीस सुभेदार, असे म्हणावेच लागेल.