घरफिचर्समायमहानगर ब्लॉगनेत्यांची ‘आयटम’गिरी आणि राजकारण!

नेत्यांची ‘आयटम’गिरी आणि राजकारण!

Subscribe

राजकारण किंवा राजकारणी समाजाचा आरसा मानला, तर त्या आरशातून चेहर्‍याप्रमाणेच त्याची संस्कृती आणि ‘चालचलन’ देखील प्रतिबिंबित होणार यात शंका नाही. आणि त्याच प्रतिबिंबातून मग ‘टंच माल’, ‘आयटम’, ‘पैशांसाठी नाचगाणं करणारी’, ‘50 कोटींची गर्लफ्रेंड’ अशा उपमादेखील ऐकायला मिळतात. पण अशा प्रकारचे शब्द आपल्या कानांवर पडले, तर त्यांना सरसकट एकाच तराजूत मापण्याआधी आपण ही खातरजमा करून घेणं फार आवश्यक असतं की कोणत्या संदर्भात हे शब्द वापरले आहेत. जे गेल्या आठवड्याभरापासून कमलनाथ अगदी कंठरवाने सांगत आहेत. अर्थात, असे शब्द वापरताना नेत्यांच्या मनात काय चाललेलं असतं, हे कळणं जरी कठीण असलं, तरी किमानपक्षी त्याच्या जवळ जाणारा अंदाज तरी नक्कीच बांधता येऊ शकेल!

काँग्रेसचे एकेकाळी सरचिटणीस राहिलेले आणि माजी मुख्यमंत्री म्हणून देखील एका राज्याचा कारभार चालवलेल्या दिग्विजय सिंह यांचं ते विधान आठवतंय का? ‘टंच माल’! केवढा तो गहजब उडाला होता त्या विधानावरून. वास्तविक राजकारणात अशी वक्तव्य झाल्यानंतर प्रत्येक वेळी तोपर्यंत केलेल्या तशा प्रकारच्या वक्तव्यांची पुन्हा एकदा उजळणी केली जाते. त्यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप केले जातात. त्यातून टीका करण्याची आणि बचाव करण्याचीही संधी साधली जाते. माध्यमांना त्यातून काही काळ ‘कुरकुरीत मसाला’ मिळतो आणि प्रेक्षकांचं काही काळ मनोरंजन होतं. त्यापलीकडे अशा वक्तव्यांमधून किंवा त्याच्या कव्हरेजमधून फारसं काही हाती लागत नाही. विशेषत: ज्या लोकशाहीसाठी त्या निवडणुका किंवा ते राजकारण केलं जातं, त्या लोकशाहीला तर त्याने काहीही फरक पडत नाही. मात्र, तरीदेखील अशी वक्तव्य वेळोवेळी केली जातात आणि त्यावरून ‘राडा’ घातला जातो. या वक्तव्यांच्या लिस्टमध्ये नुकतंच एक नवीन विशेषण समाविष्ट झालंय. ते म्हणजे ‘आयटम’!

खरंतर हा शब्द वाचला किंवा ऐकला तर ही कुठल्याही व्यक्तीला टपोरी भाषा किंवा गुंडांची भाषा वाटू शकते. त्यात काहाही चुकीचं नाही. ती सामान्य लोकांच्या बैठकीतली भाषा नाहीच मुळी. पण जर राजकारण किंवा राजकारणी समाजाचा आरसा मानला, तर त्या आरशातून चेहर्‍याप्रमाणेच त्याची संस्कृती आणि ‘चालचलन’ देखील प्रतिबिंबित होणार यात शंका नाही. आणि त्याच प्रतिबिंबातून मग ‘टंच माल’, ‘आयटम’, ‘पैशांसाठी नाचगाणं करणारी’, ‘50 कोटींची गर्लफ्रेंड’ अशा उपमादेखील ऐकायला मिळतात. पण अशा प्रकारचे शब्द आपल्या कानांवर पडले, तर त्यांना सरसकट एकाच तराजूत मापण्याआधी आपण ही खातरजमा करून घेणं फार आवश्यक असतं की कोणत्या संदर्भात हे शब्द वापरले आहेत. जे गेल्या आठवड्याभरापासून कमलनाथ अगदी कंठरवाने सांगत आहेत. अर्थात, असे शब्द वापरताना नेत्यांच्या मनात काय चाललेलं असतं, हे कळणं जरी कठीण असलं, तरी किमानपक्षी त्याच्या जवळ जाणारा अंदाज तरी नक्कीच बांधता येऊ शकेल!

- Advertisement -

कमलनाथ हे नाव मध्य प्रदेशच्या राजकारणात फार मोठं आहे. फक्त मध्य प्रदेशचे माजी मुख्यंमत्रीच नाही, तर मध्य प्रदेशमधले एक ज्येष्ठ राजकारणी म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे अशा व्यक्तीकडून अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य येणं हे फक्त मध्य प्रदेशसाठीच नाही तर अवघ्या देशात ज्यांचा ज्यांचा राजकारणावर विश्वास आहे, अशा सगळ्यांसाठीच धक्कादायक होतं. पण माध्यमांमध्ये फक्त त्यांच्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यावरून गहजब सुरू झाला. वास्तविक सहज बोलतानाही एखाद्या व्यक्तीबद्दल आपण ‘आरे काय आयटम माणूस आहे हा’, असं बोलून जातो. कमलनाथ यांनीही तेच केलं. फक्त हे बोलताना ते हे विसरले की आपण सामान्य माणूस नसून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहोत. आपण चौकातल्या गप्पांमध्ये बोलत नसून एका राजकीय व्यासपीठावर आमदारकीच्या निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या एका उमेदवाराचा प्रचार करताना त्या राज्याच्या एका महिला मंत्र्याबद्दल हे उद्गार काढत आहोत. आणि तिथेच घोळ झाला. कमलनाथ ते बोलून गेले आणि अशा शब्दांच्या प्रतिक्षेतच असलेल्या माध्यमांनीही आणि विरोधकांनीही या मुद्यावरून त्यांना झोडायला सुरुवात केली. इतकंच नाही, तर त्यांच्या पक्षाचे माजी अध्यक्ष आणि खासदार असलेल्या राहुल गांधींनीही या मुद्यावर नाराजी व्यक्त केली. पण कमलनाथ मात्र त्यावर ठाम होते. कारण त्यांचा बोलण्याचा संदर्भच वेगळा होता.

एखादा नसलेला मुद्दादेखील निवडणुकीच्या काळात मुद्दा कसा होऊ शकतो, याचं हे एक आदर्श उदाहरण आहे. कारण कमलनाथ यांच्या त्या वक्तव्यानंतर ज्यांच्याबद्दल ते हे बोलले होते, त्या इमरती देवींनी हा त्यांच्या महिला असण्यावर आघात आहे अशा आविर्भावात आकांडतांडव करायला सुरुवात केली. ग्वाल्हेरमध्ये झालेल्या एका सभेमध्ये तर चक्क ज्योतिरादित्य सिंधिया स्टेजवर असतानाच हजारो लोकांसमोर इमरती देवी रडायला लागल्या! आता काँग्रेसमध्ये असताना जे ज्योतिरादित्य सिंधिया दिग्विजय सिंह यांनी केलेल्या ‘100 टंच माल’चं समर्थन करत होते, त्यांनी यावेळी मात्र पार पोडियम तबल्यासारखा ठोकून आणि इमरती देवींचा हात खुळखुळ्यासारखा हलवून ‘आपके घर की लाज को कमलनाथ ने आयटम कहा है’ असं जाहीर करून टाकलं. समोरच्या प्रेक्षकांनाही उगीच वाटायला लागलं की खरंच कमलनाथ त्यांच्याच घरातल्या कुणालातरी आयटम म्हटलेत की काय! बरं इतका गोंधळ घालणारे सिंधिया त्याच इमरती देवींच्या वक्तव्यावर मात्र काही बोलायला तयार नाहीत. महिला सन्मानाचा दावा करणार्‍या इमरती देवींनी ‘कमलनाथ की माँ और बहन होगी बंगाल की आयटम’, असं स्पष्ट वक्तव्य करून टाकलं. म्हणजे खरंतर कमलनाथ यांच्यापेक्षाही गंभीर विधान इमरती देवी यांचं होतं!

- Advertisement -

‘ये क्या आयटम है आप सबको पता है’, असं म्हणणार्‍या कमलनाथ यांच्या आई आणि बहिणीला बंगालची आयटम म्हणणार्‍या इमरती देवी मात्र नक्राश्रू ढाळत गोंधळ करत आहेत. आणि मध्य प्रदेशमध्ये गरिबी, बेरोजगारी, रस्ते, पाणी, घरं, जातीव्यवस्था, गुन्हेगारी अशी कोणतीच समस्या नसून फक्त ‘आयटम’ हा एकच मुद्दा असल्याच्या आविर्भावात आता दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करत आहेत. जनतेचंही काही काळ मनोरंजन होऊ लागलं आणि माध्यमांनाही काही काळ मसाला मिळू लागला आहे. पण याचं पुढे काय? तर जे ‘100 टंच माल’चं किंवा ‘50 करोड की गर्लफ्रेंड’चं किंवा ‘नाचकाम करणारी महिला’चं झालं, तेच याचंही होणार. जनतेच्या हाती काय?

2013 सालीदेखील मध्य प्रदेशच्याच विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये दिग्विजय सिंह म्हणाले होते, मीनाक्षी नटराजन या गांधीवादी, सरळमार्गी आणि प्रामाणिक आहेत. मला 40-42 वर्षांचा अनुभव आहे. मी पारखी आहे. खोटी लोकं मला लगेच लक्षात येतात. मीनाक्षी नटराजन या ‘100 टंच माल आहेत’! या वक्तव्यामध्ये कुठेही मीनाक्षी नटराजन यांच्यावर अश्लाघ्य शब्दांमध्ये किंवा त्यांच्या स्त्रीत्वाचा अपमान करणारी टिप्पणी दिसत नाही. उलट एखादी व्यक्ती शंभर नंबरी सोनं आहे, असा संदर्भ इथे होता. पण या मुद्यावरूनदेखील अशाच प्रकारे हवा उडवली गेली. त्यावरून देखील असंच राजकारण केलं गेलं आणि जनतेला अशाच पद्धतीने मूर्ख बनवून मतांचा फायदा पदरात पाडून घेतला गेला. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी बोलणारा ‘त्या’ अर्थाने बोलतच नाही. 2012 मध्ये गुजरात निवडणुकांच्या निकालांबाबत एका टीव्ही शोमध्ये बोलताना तत्कालीन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी आधी अभिनेत्री आणि नंतर राजकारणात सक्रिय झालेल्या स्मृती इराणींवर केलेली टीका अश्लाघ्य याच श्रेणीत मोडणारी होती. ‘कलतक आप पैसों के लिये ठुमके लगाती थी, और आज राजनीती सिखाने लगी’, अशा शब्दांत टिप्पणी केली होती. अशा ठिकाणी मात्र जो अर्थ नेत्यांच्या मनात असतो, तोच त्यांच्या शब्दांमधून उतरत असतो. कारण तो स्पष्टपणे व्यक्त होत असतो.

पण इथे मुद्दा नेतेमंडळी करत असलेल्या वक्तव्यांचा, त्यामागच्या त्यांच्या खर्‍या-खोट्या हेतूंचा किंवा त्यातून पुढे होणार्‍या राजकारणाचा नाहीच. मुद्दा राजकीय नेत्यांच्या, त्यांच्या बातम्या रंगवणार्‍या माध्यमांचा आणि त्या चघळणार्‍या सामान्यांच्या मानसिकतेचा आहे. कारण प्रत्येक वेळी अशा वादात महिलांनाच टार्गेट का केलं जातं? असा एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. महिलांबद्दल बोलताना, विशेषत: राजकीय व्यासपीठासारख्या जाहीर व्यासपीठावरून बोलताना ज्येष्ठ म्हणवल्या जाणार्‍या राजकारण्यांनी देखील भान न ठेवता बोलणं वेगळ्या प्रकारचं उदाहरण समाजात देखील पसरण्याला कारणीभूत ठरतं. याची जाण जर राज्य करणारे राजकारणी, त्यांच्या समोर असणारे विरोधकच ठेवणार नाहीत, तर त्यापुढे समाजात, इतकंच नाही तर घराघरात ही मानसिकता अधिक घट्ट होत राहील आणि एक समाज म्हणून भारताला कायम पराभूत करत राहील हे नक्की!

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -