घरफिचर्समायमहानगर ब्लॉगआरोग्य विद्यापीठाला लष्करी बूस्टर

आरोग्य विद्यापीठाला लष्करी बूस्टर

Subscribe

कोरोनाच्या काळात देशातील आरोग्य व्यवस्था व डॉक्टरांचे महत्व सर्वांनाच कळले. पहिल्या लाटेतून सावरल्यानंतर बिनधास्त झालेल्या जनतेला दुसर्‍या लाटेची भीती पाहिजे त्या प्रमाणात राहिली नाही. परिणामी, दुसर्‍या लाटेत नागरिकांच्या मृत्यूचा आकडा लाखोंच्या घरात पोहोचला. साथरोगाने इतक्या मोठ्या प्रमाणात थैमान घातले की, कोरोना झाल्यानंतर तिसर्‍या-चौथ्या दिवशी होत्याचे नव्हते होऊ लागले. चालता बोलता माणसांचा मृत्यू होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेसह सर्वसामान्य नागरिकांमध्येही दहशत निर्माण झाली. अशा काळात डॉक्टर्स निभावत असलेल्या कर्तव्यामुळे त्यांना देवदूत म्हटले गेले.

अशा डॉक्टरांना घडवणार्‍या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी लेफ्टनंट जनरल डॉ.माधुरी कानिटकर या विराजमान झाल्या आहेत. ३९ वर्षे लष्करी अधिकारी राहिल्यानंतर कुलगुरु होणार्‍या डॉ. माधुरी कानिटकर या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. त्यांची निवड कुलगुरुपदासाठी किती योग्य आहे याची प्रचिती त्यांचा कामगिरीच्या आजवरच्या आलेखावरुन येते. त्यांनी पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे. तसेच त्यांनी बालरोगशास्त्र या विषयात एमडी प्राप्त केली आहे. २०१७ ते २०१९ या काळात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांना अध्यापन व संशोधनाचा एकूण २२ वर्षांचा अनुभव आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे २००८ साली त्यांना सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले आहेे.

- Advertisement -

आरोग्य क्षेत्रात महिलांची संख्या पुरुषांच्या बरोबरीने आहे. पॅरामेडिकल स्टाफमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. डॉक्टरांना शिकवणार्‍या प्राध्यापकांचे आणि पर्यायाने आरोग्य विज्ञान विद्यापीठाची सूत्र हाती घेतलेल्या एका महिलेनी आपली वेगळी ओळख पहिल्या दिवसापासून निर्माण केली. विशेषत: ‘व्हिजन डॉक्युमेंट’ हा त्यांच्या दृष्टीने अत्यंत आत्मियतेचा विषय ठरला. एखादा अधिकारी पदभार स्वीकारल्यानंतर संबंधित विभागाची माहिती करुन घेतो. परंतु, कुलगुरु म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी दोन महिने अगोदर अभ्यास करुन हे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ त्यांनी तयार केले. यात संशोधन आणि शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य देत त्यांनी सर्वसामान्य जनतेला उत्तम आरोग्य सेवा कशा मिळू शकेल, यादृष्टीने आरोग्य विज्ञान विद्यापीठाची सरंरचना तयार केली. विविध प्रकारचे ‘स्किल बेस्ड’ अभ्यासक्रम सुरु करत स्वत:चे ‘व्हिजन’ या विद्यापीठासमोर त्यांनी मांडले. विद्यापीठाच्या आजवरच्या आयुष्यातील ही सर्वात सकारात्मक बाब म्हटली पाहिजे. एखादा अधिकारी नियुक्त होण्यापूर्वीच आपल्याला नेमके काय काम करायचे आहे, याची यादीच अगोदरच तयार करुन ठेवतो. त्याला खरी ‘व्हिजन’ म्हटले पाहिजे आणि तेच डॉ.कानिटकर यांनी दाखवून दिले.

आरोग्य विज्ञान विद्यापीठापुढे असंख्य आव्हाने आहेत. आरोग्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांची होणारी लूट त्यांना थांबवावी लागेल. सेंट्रल कौन्सिल इंडियन मेडिसीनच्या मान्यतेविना आयुर्वेद व युनानी या वैद्यकीय शाखेत डिप्लोमा, फेलोशिप अभ्यासक्रम चालवले जातात. विनापरवानगी अभ्यासक्रमांच्या प्रमाणपत्रावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा लोगो वापरुन विद्यापीठाची एकप्रकारे फसवणूक होते. ‘महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनल अ‍ॅक्ट’ नुसार आयुर्वेदात एमडी व एमएस डॉक्टर काम करतात. त्यांना २०१४ मध्ये सर्जरी व अ‍ॅलोपॅथिक उपचार करण्याची परवानगी मिळाली आहे. कायद्यातील या बदलाचा फायदा उठवत वैद्यकीय क्षेत्रातील काही संस्था आणि आयुर्वेद महाविद्यालयांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सहाय्याने फेलोशिप कोर्सेस सुरू केले. त्यासाठी साधारणत: ७० हजार रुपये शुल्क एका विद्यार्थ्याकडून घेतले जाते. प्रमाणपत्र मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनची मान्यताच नसल्याने ते बोगस डॉक्टर ठरतात.

- Advertisement -

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे दिसून येते. पर्यायाने हे डॉक्टर ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवतात. त्यांच्याकडून झालेल्या चुकांसाठी संपूर्ण आयुर्वेद डॉक्टरांना दोषी ठरवले जाते. त्यामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाने हे अभ्यासक्रम त्वरित बंद करण्याची मागणी आहे. नवनियुक्त कुलगुरु डॉ.कानिटकर यांना अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालावे लागेल. कोविड-१९ सारख्या आपत्तीवर मात करण्यासाठी डॉक्टर्स नेहमी सजग कसे राहतील, यादृष्टीने सर्वोत्तम शिक्षण द्यावे लागेल. आरोग्य क्षेत्रात जगभरात होत असलेल्या संशोधनाचा अधिकाधिक वापर करुन घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर करावा लागेल. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आता ‘ई-ऑफिस’ संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन पध्दतीनेच होणार असल्याने येत्या नवीन वर्षात विद्यापीठ ‘पेपरलेस’ करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. येत्या दोन वर्षात आरोग्य विज्ञान विद्यापीठ रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.

विद्यापीठाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यापूर्वी त्याचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्यात आले आहेत. यात ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा, अभ्यासक्रमातील बदल, डीजिटल टेक्नॉलॉजीचा अधिक वापर करण्यासोबतच विद्यापीठाला सर्वात प्रथम पेपरलेस करण्याचा संकल्प कुलगुरु डॉ. कानिटकर यांनी केला आहे. येत्या दोन महिन्यांत ही संकल्पना कार्यान्वित केली जाणार आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाने आवश्यक बाबींची पूर्तताही केली आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या प्रारंभीच विद्यापीठाचे कामकाज ‘ई-ऑफिस’च्या माध्यमातून सुरू होणार आहे. देशातील ८० टक्के जनता ग्रामीण भागात तर २० टक्के नागरिक शहरात राहतात. ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था पाहिजे त्या प्रमाणात पोहोचत नसल्याने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अशा ठिकाणी वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात इंटर्नशिप सक्तीची केली आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आरोग्य विज्ञान विद्यापीठ ऑनलाईन शिक्षणावर अधिक भर देणार आहे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात वाद होऊ नयेत, यासाठी संवाद कौशल्यावर आधारित शॉर्टटर्म स्किल बेस्ड कोर्सेस सुरू करण्यात येणार आहेत. शहरी भागात आरोग्य सुविधा उत्तम प्रकारे मिळत असल्या, तरी ग्रामीण भागात आणि विशेष म्हणजे आदिवासी भागात अजूनही कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. त्यासाठी डॉक्टरांची प्रॅक्टिस कशा पद्धतीने उपयोगी ठरु शकते, यादृष्टीने ‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये विविध गोष्टींचा अंतर्भाव आहे. ‘व्हीजन डॉक्युमेंट’च्या माध्यमातून विद्यापीठाच्या उज्ज्वल भविष्याची पहाट बघण्याचे स्वप्न डॉ.कानिटकर यांनी बघितले आहे. परंतु, या वाटेवर असंख्य काटे यापूर्वीच पेरुन ठेवले आहेत.

त्यांच्यावरू चालण्याची तयारी डॉ.कानिटकर यांनी दाखवली आहे. त्यांना यात किती प्रमाणात यश मिळते, हे येणार्‍या काळात दिसेलच. रात्रीचा काळोख संपण्याची वाट बघत बसण्याची त्यांची वृत्ती नाही, हे त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून दाखवून दिले. लष्करी अधिकारी हा एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरु होणे ही पहिलीच वेळ आहे. आपणच कुलगुरु का व्हावे, असा स्वत:च्या मनाशी विचार करत त्यांनी या कार्याला सुरुवात केली. बदल घडवायचा असेल तर त्यासाठी स्वत: प्रयत्न केले पाहिजे. आव्हानांचे संधीत रूपांतर केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असा विचार केला आणि या विद्यापीठाचे कुलगुरु होण्याचा निर्धार त्यांनी पक्का केला. सकारात्मक विचार करून त्यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. यात त्यांना निश्चितच यश लाभो, याच सदिच्छा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -