Eco friendly bappa Competition
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग ड्युरान्ड रेषा पाकिस्तानच्या गळ्यातील हड्डी

ड्युरान्ड रेषा पाकिस्तानच्या गळ्यातील हड्डी

Subscribe

लोकांच्या आशाआकांक्षा दडपणारी एक अन्याय्य सीमा म्हणून ड्युरान्ड लाईनकडे अफगाणी लोक बघत असतात. आपल्या देशामधून अमेरिकन सैन्य मागे गेले की हे प्रश्न उफाळून वर येणार याची तेथील सत्ताधार्‍यांना चांगलीच जाणीव आहे. तसेच जोवर आपल्या पसंतीचे निर्णय अफगाणिस्तानमध्ये होत नाहीत तोवर धर्मांध टोळ्यांना हाताशी धरून पाकिस्तान तिथे हैदोस घालणार याचीही कल्पना अफगाण नेत्यांना आहे. आणि त्याला अटकाव करण्याच्या योजनेमध्ये भारत महत्वाची भूमिका बजावू शकतो याचीही त्यांना जाणीव आहे. म्हणूनच माजी प्रमुख हमीद करझाई तसेच आताचे अमरुल्ला सालेह तसेच अफगाणचे माजी अध्यक्ष अशरफ घनी यांना भारत जवळचा वाटतो.

सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ड्युरान्ड रेषेवरून जुंपली आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान्यांना ड्युरान्ड रेषा मान्य नाही. तर पाकिस्तान मात्र त्या ड्युरान्ड रेषेला आंतरराष्ट्रीय सीमा करायला निघाला आहे. पाकिस्तानी लष्कराने या ड्युरान्ड रेषेवर कुंपण घालण्याचे काम सुरू केले, मात्र ते तालिबान्यांनी हाणून पाडले. भविष्यात या मुद्यावरून पाकिस्तान आणि तालिबान्यांमध्ये जुंपणार हे निश्चित आहे. ब्रिटिशांनी उपखंडातील सत्ता सोडली तेव्हापासून अफगाणिस्तान व पाकिस्तानमधील ही रेषा आंतरराष्ट्रीय रेषा मानण्याचा प्रघात पडला आहे. युनोच्या दप्तरीदेखील हीच रेषा आंतरराष्ट्रीय रेषा म्हणून गणली गेली आहे.

पण इतिहास या घटनेला साक्ष आहे की पाकिस्तानला राष्ट्र म्हणून मान्यता देण्याच्या प्रस्तावाला तत्कालीन अफगाण सरकारने कडाडून विरोध केला होता. असा विरोध करणारे अफगाणिस्तान हे तेव्हाचे एकमेव राष्ट्र होते. तसेच ड्युरान्ड लाईन ही आंतरराष्ट्रीय रेषा मानण्यासही त्यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे अफगाणिस्तानच्या लेखी या रेषेचे काय महत्व आहे ह्याची आपल्याला काहीशी कल्पना येऊ शकेल. अर्थात, अफगाणिस्तानची ही भूमिका आजवर कधीच बदललेली नाही. त्यावरून परस्पर देशांमध्ये जे वाद होत असतात त्यावर उतारा म्हणून अखेर पाकिस्तानने 2600 किमी सीमेवर कुंपण बांधण्याचा निर्णय घेतला व काही अंशी तो प्रत्यक्षात उतरवण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

शांतता कराराला अंतिम रूप दिले जात असतानाच आता हा विवादास्पद मुद्दा पुढे यावा आणि थेट ड्युरान्ड लाईन डब्यात टाका अशी भूमिका अचानक कशी उपस्थित झाली असा प्रश्न वाचकांना जरूर पडू शकतो. पण इंग्रजी भाषेमध्ये म्हणतात तसे ड्युरान्ड लाईनचा प्रश्न म्हणजे Elephant in the Room आहे. एखाद्या खोलीमध्ये बोलणी चालू आहेत आणि त्याच खोलीमध्ये हजर असलेल्या हत्तीसारख्या विशाल प्राण्याकडे मात्र उपस्थितांचे लक्ष जात नाही. किंबहुना, ते त्याची दखलही न घेता निर्णय राबवू पाहत आहेत तेव्हा त्या कराराच्या मुदतीबद्दल अर्थातच प्रश्न निर्माण होत आहेत. करार भले झाला आणि त्यावर अंमलबजावणी सुरू झाली तरीदेखील जोपर्यंत ड्युरान्ड लाईनचा प्रश्न लोंबकळत राहील तोवर पाकिस्तान अफगाणिस्तानवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालूच ठेवेल. इथे मला एक गोष्ट नमूद करायची आहे ती म्हणजे 1994 ते 2001 या दरम्यान पाकिस्तानप्रणित तालिबान्यांचे राज्य अफगाणिस्तानवर होते तेव्हासुद्धा त्या पाकी मिंध्या तालिबान्यांनी ड्युरान्ड लाईन मानण्यास नकार दिला होता. तेव्हा आज सत्ता तालिबान्यांच्या हाती पुन:श्च आली तरीदेखील ड्युरान्ड लाईनवर तोडगा निघाला म्हणून पाकिस्तान सुस्कारा टाकू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.

कारण ड्युरान्ड लाईनसंबंधी आजवर घेतले गेलेले आक्षेप त्याच गंभीर स्वरूपाचे आहेत. मुळात ही रेषा आखली गेली ती एका राष्ट्राची सीमा ठरवण्यासाठी आखली गेली नव्हती. या रेषेमुळे त्या प्रदेशामधील पश्तुन प्रजा दोन देशांमध्ये विभागली गेली आहे. अफगाणिस्तानमधील पश्तुन व पाकिस्तानमधील पश्तुनांना ही रेषा जाचक वाटणे स्वाभाविक आहे. अनेक कुटुंबे त्यामुळे विभागली गेली आहेत. एकाच संस्कृती आणि भाषा विशेषाचा समाज अशा प्रकारे विभागला गेल्याचे दुःख अर्थातच पश्तुन टोळ्यांना स्वस्थ बसू देत नाही. केवळ पश्तुनच नव्हे तर त्या प्रदेशामध्ये राहणार्‍या अन्य टोळ्याही अशाच दोन देशांच्या सीमारेषेमुळे दुभंगल्या आहेत. हे भविष्य टाळण्यासाठीच 1947 च्या अगोदरच्या काळामध्ये खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी यांनी आम्हाला पाकिस्तानी पंजाबी कुत्र्यांच्या तोंडी कृपया देऊ नका म्हणून महात्मा गांधी व नेहरूंना विनंती केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हा प्रदेश पाकिस्तानला द्यायचे ठरले आणि त्यावर भारताने आक्षेप घेतला नाही. नंतरच्या काळामध्ये पाकिस्तानने लष्करी हालचाली करून हा भूप्रदेश आपल्या पोलादी पकडीमध्ये घेतला आणि आजवर तेथील प्रजेची कुचंबणा आणि पिळवणूक थांबू शकलेली नाही. पश्तुनांचा हा प्रदेश आपला आहे असा दावा अफगाणिस्तान करत आले आहेत.

- Advertisement -

पश्तुनांच्या सोबतीनेच दक्षिणेकडील हिश्श्यामध्ये या रेषेने बलुची लोकांनाही असेच विभागून टाकले आहे. आज बलुच प्रजा पाकिस्तान, इराण आणि अफगाणिस्तान या तीन देशांमध्ये विभागली गेली आहे. हा केवळ प्रादेशिक अस्मितेचा प्रश्न नसून पाकिस्तानच्या सत्तेवर मजबूत पकड असलेल्या पंजाबी प्रजेने त्या त्या जनतेवर केलेले अत्याचार इतके अनन्वित आहेत की त्या जखमा भरून येऊ शकत नाहीत. याच सर्व आक्षेपांना जमिनीखाली गाडून टाकण्यासाठी 1947 नंतर पाकिस्तानने वन युनिटचे खूळ काढले आणि त्यातूनच बांगलादेश स्वतंत्र होण्याची बीजे रोवली गेली. आज त्याच वन युनिटचे दुष्परिणाम म्हणून जर पश्तुन आणि बलुच लोकांनी स्वातंत्र्याची मागणी केली आणि ती अंमलात आणण्यासाठी हालचाली केल्या तर त्यांना दोष देता येणार नाही. वन युनिटच्या दुष्परिणामांची ही दुसरी लाट आज 49 वर्षांनंतर पाकिस्तानला भेडसावत आहे. आणि बांगला स्वातंत्र्याप्रमाणेच हाही प्रश्न मुळावर घाव घालेल म्हणून पाकिस्तानी नेतृत्व बिथरले आहे. पाकिस्तान हा नेहमी बड्या देशांसाठी हुजर्‍या म्हणून काम करणारा देश आहे.

अमेरिका, रशिया, उत्तर कोरिया, चीन या देशांकडून पाकिस्तानला आर्थिक आणि लष्करी मदत मिळत आलेली आहे. त्याच बळावर पाकिस्तान उभा आहे. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर यांना जागतिक पातळीवर आपला प्रभाव निर्माण होण्यासारख्या फारच कमी गोष्टी करता आल्या आहेत. पाकिस्तान केवळ नावापुरता एक देश आहे, त्याच्या आतमध्ये अनेक गट आणि तट आहेत. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर त्याचे निर्माते महमदअली जिना यांनी या देशाला इस्लामिक स्टेट म्हणजे मुस्लीम राष्ट्र म्हणून घोषित केले. पण या देशातील मुस्लीम शिया-सुन्नीप्रमाणेच अनेक गटातटात विभागलेले असून त्यांच्यात संघर्ष सुरू असतो. पाकिस्तानने भारतविरोध सोडून दिला तर हे गट तट या देशाचे तुकडे करून वेगळे होतील, याची भीती पाकिस्तानातील राज्यकर्त्यांना वाटते, म्हणून भारताच्या भीतीचे भूत ते आपल्या जनतेसमोर नाचवत ठेवतात. यामुळे लोकांचे लक्ष भारताकडे राहून अंतर्गत संघर्षाची तीव्रता कमी होईल. पाकिस्तान हा देश एकसंध ठेवणे हे तेथील राज्यकर्त्यांपुढील मोठे आव्हान आहे. पुढील काळात तर ते अधिकच अवघड होत जाणार आहे.

लोकांच्या आशाआकांक्षा दडपणारी एक अन्याय्य सीमा म्हणून ड्युरान्ड लाईनकडे अफगाणी लोक बघत असतात. आपल्या देशामधून अमेरिकन सैन्य मागे गेले की हे प्रश्न उफाळून वर येणार याची तेथील सत्ताधार्‍यांना चांगलीच जाणीव आहे. तसेच जोवर आपल्या पसंतीचे निर्णय अफगाणिस्तानमध्ये होत नाहीत तोवर धर्मांध टोळ्यांना हाताशी धरून पाकिस्तान तिथे हैदोस घालणार याचीही कल्पना अफगाण नेत्यांना आहे. आणि त्याला अटकाव करण्याच्या योजनेमध्ये भारत महत्वाची भूमिका बजावू शकतो याचीही त्यांना जाणीव आहे. म्हणूनच माजी प्रमुख हमीद करझाई तसेच आताचे अमरुल्ला सालेह तसेच अफगाणचे माजी अध्यक्ष अशरफ घनी यांना भारत जवळचा वाटतो.

ड्युरान्ड लाईनचा प्रश्न सोडवण्यात पाकिस्तान जर अडचणी आणणार असेल तर ती लाईनच डब्यात टाकणे सयुक्तिक होईल. मग त्याचे पर्यवसान कशामध्ये होऊ शकते याचा विचार पाकिस्तानने करायचा आहे. बलाढ्य ‘शत्रू’ भारत पाकिस्तानात घुसलाच तर आपल्याकडे माघार घेण्याइतकी रुंद जमीन नाही-ज्याला इंग्रजीमध्ये Strategic Depth असे म्हटले जाते-हे पाकिस्तानला डाचत असते. त्यातच ड्युरान्ड लाईनदेखील न मानता अधिक भूप्रदेश गमवायचा तर देशाचे संरक्षण होणार कसे असा हा पेच आहे. अर्थात, भूप्रदेश गमवायचा तर देश उरणार तरी काय हे वास्तव आता डोळ्यापुढे दिसू लागले आहे. म्हणून ड्युरान्ड लाईन हा प्रश्न अफगाणिस्तानसाठी तत्वाचा प्रश्न आहे पण पाकिस्तानसाठी तो ‘अस्तित्वाचा’ प्रश्न बनला आहे. ड्युरान्ड लाईन डब्यात गेली तर पाकिस्तान कुठे जाईल याचे उत्तरही देण्याची गरज इतके लिहिल्यावर उरलेली नाही. पाकिस्तान या महाराक्षसाचा प्राण या पोपटामध्ये आहे. आणि तिथे शांतता राहणार नाही एवढा छळ करण्याचे पातकही पाकिस्तानी सत्ताधार्‍यांनी गेल्या सात दशकांमध्ये करून ठेवलेले आहे. तेव्हा आता भोगा आपल्या कर्माची फळे म्हणण्यापलिकडे त्यांच्या हाती काही उरलेले नाही. म्हणूनच मोदींनी ती ड्युरान्ड लाईन डब्यात टाकायला हवी.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -