खांब सुटतोय रे….

Subscribe

कळवा-मुंब्रा दरम्यान तीन प्रवासी लोकल ट्रेनमधून पडलेल्याची बातमी आज जुनी झालेली असते. वर्तमानपत्रांच्या पानांवर एक चौकट नियमित छापली जाते. ज्यात धान्य, कडधान्य किंवा सोने चांदीचा त्या दिवसाचा बाजारभाव छापला जातो. अशीच आणखी एक चौकट असते ज्यात आजचा सुविचार किंवा त्या दिवसाच्या तापमानाची नोंद केली जाते. या रोजच्या रोज घडणार्‍या घडामोडी असल्याने त्याची जागा आणि चौकट ठरलेली असते. मुंबई, ठाण्यातील लोकलप्रवासात दरवाजातून पडून मरणार्‍यांचे मृत्यू हीसुद्धा अशीच ‘रोजची’ घटना झालेली असते. त्यामुळे ‘लोकल ट्रेनमधून आज पडलेल्या प्रवाशांची संख्या’ अशी नवी चौकट वर्तमानपत्रांमध्ये दिसल्यास आश्चर्य वाटावे अशीही परिस्थिती नसते.

जवळपास ५० लाखांहून अधिक प्रवासी ठाणे, रायगड मधून मुंबई आणि दक्षिण मुंबईकडे रोज सकाळी लोखंडी चाकांवरून धावत असतात. संध्याकाळी हेच प्रवासी पुन्हा कल्याण-कसारा आणि विरार वसईकडे तसेच ट्रान्स हार्बर, हार्बर मार्गावरून पनवेलकडे परतत असतात. चालती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात फलाटावर कोसळलेल्या प्रवाशांच्या घटनांची नोंद रोजच्या रोज रेल्वे पोलिसांकडे होतेच असेही नाही,

हे खरचटणं, पडणं, तुटणं, मोडणं रोजचं सुरूच असतं. याला ‘ती’चे राखीव डबेही अपवाद नसतात. कामावरून जाताना किंवा येताना लोकल रेल्वेस्टेशनवर अनेकदा रेल्वेच्या पुलाखाली अडगळीत पडलेलं एक मरणाचं स्ट्रेचर ‘त्यानं किंवा तिनं’ पाहिलेलं असतं. ज्यावरचे रक्ताचे डाग सुकलेले नसतात, तर अनेकदा काळे ठिक्कर पडून जुने झालेले असतात. मरणाच्या गर्दीने लोकलमधून सुरू केलेला प्रवास या मरणाच्या स्ट्रेचरवरच अनेकदा संपलेला असतो. मात्र, गर्दीला दिलासा देण्यासाठी ठाणे, डोंबिवली अशा स्टेशन्सबाहेर एक अ‍ॅम्ब्युलन्सही कायम तैनात ठेवलेली असते, वन रुपी क्लिनिकही सेवेसाठी असते. मात्र, हा ‘नशिबवान’ दिलासा मिळवणारे तुलनेने कमीच असतात. जयवंत दळवींच्या कादंबरीसारखेच लोकलमधले हे ‘सारे प्रवासी केवळ त्या घडीचे’ ठरू शकतात. ‘घडी’च्या काट्यावर धावणारे, या घडीला पुढच्या घडीवर ढकलणारे, सर्व आयुष्य पणाला लावून लावलेली ‘जीवनाची ही घडी’ जपण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत लोखंडाचे हजारो पाय लावून पळणारे हे प्रवासी, या रोजच्या गर्दीत, गर्दी होऊन बेमालूम मिसळून गेलेले असतात.

- Advertisement -

सकाळच्या वेळेत मध्य रेल्वेच्या डोंबिवली, ठाण्याहून किंवा पश्चिम रेल्वेच्या विरार-वसईहून मुंबईकडे जाणारी फास्ट किंबहुना स्लो गाडी पकडणंही कमालीच्या साहसाचं असतं, त्याला धाडस म्हणता येणार नसतं, अचानक समोर आलेल्या संकटाला सामोरं जाताना केलेल्या आपसुक प्रसंगावधानी प्रयत्नांना धाडस म्हटलं जातं. मात्र, आपल्याला या मरणाच्या गर्दीतल्या लोकलच्या जळणार्‍या इंधनातूनच कुटुंबाची चूल पेटवावी लागणार आहे. हे त्याला किंवा तिला पक्क ठाऊक असतं, त्यामुळे या गर्दीत स्वतःला झोकून देण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे हे अचानक केलेलं धाडस नसतंच, ते रोजचं साहसच असतं. साहस धाडसापेक्षा जास्त कठीण असतं, साहस करताना धोके माहीत असतात, त्याचे परिणामही ठाऊक असतात. मात्र, हे असं जीवघेणं साहस रोजच्या रोज नाईलाजाने केलं जातं. या रोजच्या जगण्यातला धोका पत्करण्याचं मोल त्याच्या किंवा तिच्यापुरतं मोठं असतं. खासगी किंवा सरकारी ऑफिसातला लेटमार्क गर्दीतल्या घुसमटीत घुसून आजच्या दिवसापुरता चुकवलेला असतो, त्यामुळे त्या दिवसाच्या पगाराचं मीटर बँक खात्यात डाऊन झालेलं असतं. हे मीटर बंद ठेवून चालणार नसतं. रोजच्या रोटीसाठी हे मरण रोजच्या रोज चुकवलं जातं किंवा आजचं उद्यावर ढकललं जातं.

आफ्रिकेच्या घनदाट जंगलात टोळीनं फिरणार्‍या शंभर रानगव्यांमधल्या एका रानगव्यावर झाडावर दबा धरून बसलेला बिबट्या झेप घेतो, तेव्हा इतर रानगवे तिथून झुंडीनं पळ काढतात, हे असंच काहीसं असतं. आजच्या जीवघेण्या प्रवासाचा हा बिबट्या कुठल्या रानगव्यावर झडप घालेल हे सांगता येत नाही. या दबा धरून बसलेल्या अपघाती मरण नाव असलेल्या बिबट्याच्या टप्प्यात येऊ नये, म्हणून झुंडीने लोकलच्या कोंडवाड्यात घुसलेले रोजचे रानगवे दरवाजात उभे राहात नाहीत. मात्र, खच्च भरलेल्या लोकल नावाच्या कोंडवाड्यात पुढे सरकण्यासाठी जागाच उरली नसल्याने, निदान लोकल पकडता आली म्हणून स्वतःला समजावून डब्याच्या दरवाजाला जवळ केलं जातं, इथं हे सावज बिबट्याच्या टप्प्यात आलेलं असतं.

- Advertisement -

डब्यातून इतर जनावरांचा रेटा वाढत असतो. ‘आगे से निकलो, इधर गॅप है, अंदर खाली है, कायको घुसा बिच में, डोंबिली किदरको आएगा, बिच में क्यू चढा बे, लेडीज के डबे में जानेका, इधर कायको आई मरनेके लिए, छोटा बच्चा है… उतरने दो, सिनियर सिटीजन है तो घरमें रहने का,’ अशी प्रवास प्रबोधनातली कीर्तनं डब्यातल्या भजनांबरोबरच सुरू झालेली असतात. सोबतच स्पीकरमधून मरणाची भीती दाखवणार्‍या महिलेच्या रोजच्या इशार्‍याला या गोंधळात कुणीही गांभीर्याने घेतलेलं नसतं.‘प्लॅटफार्म और पायदान के बिच में’ असलेल्या मरणाच्या दरीची भीती स्पीकरमधून ती ऐकवत असते. मध्येच ‘फुटबोर्डपर यात्रा न करें..’असंही ती आत्मियतेने बजावून सांगत असते. ‘चलती गाडी में चढना या उतरना खतरनाक है…असा तिचा कमालीच्या सोज्ज्वळ आवाजातला ‘आर्जव’ रोजच्या रोज सुरूच असतो, पण हे आर्जव ऐकायला लोकलमधल्या जनावरांना वेळच नसतो. कानातल्या बोळात चुंबकांची बोंडं घालून माणसांच्या रेताड वाळवंटाच्या वाळूत मान खुपसलेल्या शहामृगासारखे हे दोन पायांचे कपडे घातलेले प्राणी मोबाईलमध्ये आपापली तोंडे खूपसून बसलेले असतात. त्यामुळे लोकलच्या दारातून बाहेरच्या जगात हात सटकून कोण पडलं? हे पहायलाही त्यांच्याकडे पुरेसा वेळ नसतो. एका कानातलं चुंबक काढून ‘कोई गिरा क्या..’ हे इतकं सहज विचारलं जातं. लोकलच्या दरवाजातला मधला खांब त्याचा शेवटचा आधार असतो.

आतली गर्दी बाहेरच्यांना, बाहेरच्या बाहेर लोटत असताना हा खांब ‘त्याच्या किंवा तिच्या’ मरणाला धिरोदत्तपणे रोखून असतो…बाहेर रेल्वेचे ट्रॅक धडधडत बदलत असतात, लोकलची लोखंडी चाकं आणि रुळांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू असते.‘त्याने किंवा तिने’ पूर्ण जीव एकवटून आपली असलेली- नसलेली मानसिक, देहाच्या पातळीवरची सर्व ताकद आपल्या घामेजलेल्या तळहात आणि बोटांमध्ये भरलेली असते. इथं हा खांब सुटला की…जगणं सुटलं, लेकरंबाळं, नातेवाईक, कुटुंब, मित्रमंडळी, सगेसोयरे सगळेच सुटले. या सगळ्यांना धरून ठेवण्यासाठी हा लोकलच्या दरवाजातला खांब धरून ठेवणं हाच एकमेव उपाय असतो. त्यासाठी कमालीची ताकद लागत असते, ही ताकद कमावण्यासाठीची त्याची संपूर्ण भिस्त या लोकलच्या खांबावरच अवलंबून असते, म्हणूनच हा खांब सोडता येणारा नसतो… मरणाच्या दरवाजात स्वतःसह बॅग सावरत असतानाच कामावरच्या लेटमार्कचं टेन्शन त्याला असतं, घरभाडं, मुलांची अ‍ॅडमिशनं, घरकर्ज, मुलीचं लग्न, पै पाहुणे, कर्जाचे हप्ते…असा घरखर्चाचा ताळेबंद लावण्यात त्याचं किंवा तिचं मन रमलेलं असतानाच अरे आज लोकलचा पास संपत आल्याचं अचानक त्याच्या किंवा तिच्या लक्षात येतं….स्टेशनवर उतरल्यावर टीसी असेल, फाईन मारेल… या धास्तीने बॅग किंवा पर्समधून पास काढून तारीख पाहण्याची अस्वस्थता मनात दाटते, अशा गर्दीतही हा धोका पत्करला जातो, गर्दीला रेटण्याचे त्राण आता कमी झालेले असतात, तोपर्यंत बोटांची पकड तळहाताच्या घामामुळे बर्‍यापैकी सैल झालेली असते आणि दरवाजातला खांब हातातून सुटलेला असतो…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -