घरफिचर्समायमहानगर ब्लॉगबलात्कार्‍यांच्या मनोविश्वात डोकावताना...

बलात्कार्‍यांच्या मनोविश्वात डोकावताना…

Subscribe

हैदराबाद आणि उन्नाव येथील बलात्काराच्या घटनांमुळे सारा देश पेटला. बलात्कार्‍यांचे लिंग छाटा, त्यांना भररस्त्यात जाळा, भर चौकात फासावर लटकवा.. या आणि अशा असंख्य संतप्त स्वरूपाच्या मागण्याही वार्‍याच्या वेगाने पुढे आल्या. भारतातील कायदे किती कुचकामी आहेत, हे सांगण्याचीच स्पर्धा या घटनांनंतर सुरू झाली. मूळ मुद्दा हा आहे की, लिंगच्छेद करून वा आरोपींना रस्त्यात फासावर लटकवून बलात्काराचे प्रमाण कमी होणार आहे का? खरे तर कायदा व कायदाप्रक्रिया यात मोठाच फरक आहे. कायद्यापेक्षा कायदाप्रक्रियेत बदल होणे गरजेचे आहे. जलद न्यायालयांची मागणीही याच भूमिकेतून पुढे येते, पण बलात्काराच्या समस्येची किड केवळ भारतालाच लागलेली नाही. जगभरातील प्रगत राष्ट्रे या किडीमुळे बेजार आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार जगभरात सुमारे ३० टक्के महिलांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपातल्या बलात्काराला बळी पडतात. अमेरिकेत प्रत्येक तासाला १६ बलात्काराचे प्रयत्न केले जातात, तर सरासरी १० स्त्रियांवर बलात्कार होतो.

फ्रान्समध्ये बलात्काराच्या तक्रारी ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत नोंद होतात. जर्मनीत प्रत्येक सात मिनिटाला एका स्त्रीवर लैंगिक हल्ला होतो. एका अभ्यासानुसार, 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेत बलात्काराशी संबंधित फक्त आठ प्रकरणांत निकाल देण्यात आला होता. इंग्लंड आणि वेल्समध्ये बलात्काराची प्रकरणं न्यायालयात पोहोचण्याचं प्रमाण गेल्या दशकभरात सगळ्यात कमी राहिलं. मानवी हक्कांबाबत सजग असलेल्या देशांमध्ये वरच्या क्रमांकावर ज्या देशाचे नाव येते त्या फ्रान्समध्ये हजारो महिला बलात्काराच्या घटनांविरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या. दुसरीकडे स्पेनमध्ये अलीकडेच फेमिनिस्ट इमर्जन्सी जाहीर करण्यात आली होती. पॅम्पलोनमध्ये भरणार्‍या प्रसिद्ध बुल फेस्टिव्हलदरम्यान एका १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. त्याचा निषेध करण्यासाठी ही फेमिनिस्ट इमर्जन्सी जाहीर करण्यात आली.

बलात्काराचे समर्थन कोणीही कोणत्याही व्यासपीठावर करणार नाही. मात्र, केवळ कायदे बदलल्याने बलात्काराचे प्रमाण कमी होईल असे म्हणणे संयुक्तिक ठरत नाही. कायद्यातील पळवाटा दूर करतानाच बलात्काराच्या घटनांकडे मनोसामाजिक अंगानेही बघायला हवे. आजवर बलात्कारीत महिलांवर असंख्य संशोधने झाली आहेत. त्यातून तिच्या वेदना समोर आल्या. मात्र, बलात्कार कमी करण्याचे उपाय मात्र सापडू शकले नाहीत. याउलट काही संशोधकांनी बलात्कारी पुरुषांचा अभ्यास केला आहे. बलात्कार करावासा वाटणं, त्यावेळी मनातील भावना, या भावनांचा सामाजिक, आर्थिक, भावनिक, मानसिक परिस्थितीवर होणारा परिणाम, लैंगिक आनंद या नैसर्गिक भावनेचे हिंसाचार आणि विकृतीत होणारे रूपांतर याविषयीचा उहापोह या संशोधनातून झाला आहे. ‘द कॉर्न्व्हसेशन’ने मांडलेल्या मतानुसार, यापूर्वीच्या गृहितकांनुसार हेच पुढे येते की बलात्कार टाळण्यासाठी महिलांनी अंगप्रदर्शन करणारे कपडे घालू नयेत, एकट्याने असुरक्षित ठिकाणी प्रवास करू नये, पार्टीमध्ये मद्यपान करू नये, पण पुरुषांनी बलात्कार करण्याची कारणं ही अनेकदा वेगळीच असतात. त्यामुळे बलात्कार करण्याची पुरुषांच्या मानसिकता तपासून त्यांच्यावर काम करणं ही काळाची गरज बनल्याचा निष्कर्ष या चर्चेतून निघतो.

- Advertisement -

दिल्लीतील‘निर्भया’ प्रकरणानंतर दिल्लीतल्या मधुमिता पांडे या तरुणीनं तिहार जेलमधल्या १०० बलात्कार्‍यांच्या मुलाखती घेतल्या. या अभ्यासात तिला जाणवले की, बलात्कार करणारे अतिसामान्य माणसं आहेत. त्यांना लहानपणी मिळालेल्या शिकवणुकीमुळे आणि त्यातून तयार झालेल्या त्यांच्या विचारसरणीमुळेच त्यांच्याकडून हे गैरकृत्य केले गेले. पुरुषत्वाच्या भंपक संकल्पना प्रत्येक बलात्कार करणार्‍यात ठासून भरलेल्या असतात. शंभरपैकी फक्त तीन ते चार आरोपींना आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला होता, पण बाकींच्यांना तो झाला नाही. भारतात लैंगिकतेविषयी मोकळा संवाद साधला न जाणं हे बलात्काराचे प्रमुख कारण असल्याचे मधुमिताचे संशोधन सांगते. युनायटेड नेशन्सशी जोडलेल्या चार एजन्सींनी एकत्र येऊन ‘पार्टनर्स फॉर प्रिव्हेंशन’ हा कार्यक्रम काही वर्षांपूर्वी राबवला. आशिया खंडात विविध ठिकाणी झालेल्या सर्व्हेच्या अहवालानुसार काही देशांत १० टक्के पुरुषांनी, तर काही देशांत ६५ टक्क्यांपर्यंत पुरुषांनी आयुष्यात कधी ना कधी बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. अपरिचित महिलेवर बलात्कार करण्यापेक्षा जोडीदारावर बलात्कार करण्याचे प्रमाण बहुतेक सर्वच देशांत जास्त असल्याचे दिसले. ज्या पुरुषांनी अपरिचित महिलांवर बलात्कार केला होता त्यांनी स्वत:च्या बायकोवरही बलात्कार केल्याचे सांगितलेले आहे. काही पुरुषांनी पुरुषांवरदेखील लैंगिक जबरदस्ती केल्याची कबुली दिलेली आहे. या पुरुषांपैकी बहुसंख्य (७२ ते ९७ टक्के) पुरुषांना कोणतेही कायदेशीर परिणाम किंवा शिक्षा भोगावी लागलेली नाही. कारण बहुतेक देशांमध्ये विवाहांतर्गत बलात्काराची संकल्पना कायद्यात अस्तित्वातच नाही. अपरिचित व्यक्तींवर केलेल्या बलात्कारासाठी मात्र काही प्रमाणात शिक्षा झाल्याचे आढळून आले. अनेक बाबतीत जेव्हा पुरुषाला स्वत:ला सत्ताहीन असल्याचा अनुभव येतो तेव्हा आपली सत्ताहिनतेची भावना दूर करण्यासाठी तो कमी सामाजिक सत्ता असलेल्या स्त्रीवर हिंसा करून ताकदीचे प्रदर्शन करतो, असे या अहवालात नमूद आहे. १९७६ साली क्लारमॅट ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटीच्या सॅम्युअल डी. स्मिथमिन या मानसरोगतज्ज्ञाने आणि तेव्हा पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्याने वृत्तपत्रात जाहिरात दिली होती.

या जाहिरातीत म्हटले होते की, तुम्ही बलात्कारी आहात का? संशोधकांना तुमची ओळख न पटवता तुमचा अभ्यास करायचा आहे. या जाहिरातीनंतर त्यांना दिलेल्या क्रमांकावर प्रचंड प्रमाणात फोन आले. आपल्या गर्लफ्रेंडवर बलात्कार करणारे, आपल्या मित्राच्या बायकोवर बलात्कार करणारे, श्रीमंतांचा बदला घेण्यासाठी बलात्कार करणारे असे शेकडो फोन त्यांनी घेतले. त्यात त्यांना एक गोष्ट सामान्य आढळली की हे लोक अत्यंत शांतपणे आणि सभ्यपणाने त्यांच्याशी बोलत होते. दुसरी गोष्ट म्हणजे एकदा बलात्कार केला की तो पुन्हा करण्याची प्रवृत्ती या बलात्कारी लोकांमध्ये असते आणि ते अत्यंत लहान वयापासून हे सर्व करण्यास सुरुवात करतात. त्यातल्या अनेकांना संमतीशिवाय संभोग हा बलात्कार असू शकतो याची कल्पनाही नाही. त्यांच्या या संशोधनानंतर बलात्कारी पुरुषाला समजून घेण्यावर एकमत होऊ लागलं. बलात्कारी पुरुषांच्या अनुषंगाने संशोधन करणार्‍या संशोधक लिंडा लेडरे यांनी आपल्या संशोधन अहवालात म्हटले आहे की, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा हानीकारक कृतींना हातभार लावतात. बिभत्स चित्रांमध्ये बलात्कार हा सर्वसाधारण विषय आहे, परंतु बिभत्स चित्रच केवळ गुन्हेगार ठरत नाहीत. अभ्यासातून असे दिसून येते की हिंसा नसलेल्या लैंगिकतेच्या चित्रपटांपेक्षा, लैंगिकता नसलेल्या हिंसामय चित्रपटांच्या परिणामामुळेच स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन हल्लेखोर वृत्तीचा बनतो. हार्वर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या एका संशोधनात बलात्काराच्या विविध प्रकारच्या थिअरीज मांडल्या आहेत. भारतासंदर्भातही या थिअरींमधील अनेक बाबी लागू होतात. पुरुषप्रधान संस्कृती, वर्णवर्चस्ववाद, आर्थिक दरी, सामाजिक तसेच इतर ताणतणाव या गोष्टींचा बलात्कारावर खूप परिणाम होतो. शारीरिकदृष्ठ्या मुळातच स्त्री कमी शक्तीशाली असल्यामुळे एकावेळी अनेक लोक आले तर ती त्याचा प्रतिकार करण्यात कमी पडते. नकार पचवता न येणं हेही बलात्काराचं एक कारण म्हणता येईल. तिने मला नकार दिला, ती तोकडे कपडे घालून उद्युत करते म्हणून तिला अद्दल घडवायची होती, अशी कारणे बलात्कार करणार्‍या पुरुषांनी संशोधकांकडे मांडली.

- Advertisement -

जर्मन शास्त्रज्ञ गेरहार्ड रोत याने केलेले संशोधन तर अतिशय रोचक आहे. त्यांच्या संशोधनानुसार माणसाच्या मनातली बलात्काराची आणि चोरीची भावना मेंदूच्या एका विशिष्ट भागामध्ये असते आणि तिथून त्याला या दुष्कृत्यांची प्रेरणा मिळते. बलात्काराच्या भावनेचे एक मूर्त स्वरूप या शास्त्रज्ञाला आढळले आहे. या शास्त्रज्ञाने अशा काही दुष्कृत्ये करणार्‍या लोकांच्या विचारांच्या लहरींचे फोटो काढले आणि त्यांचे विश्लेषण केले. ते करत असताना त्याला काही लोकांच्या मेेंदूच्या पुढच्या भागात एक काळसर डाग आढळला. विशेष म्हणजे या डॉक्टरांना जेव्हा तो डाग आणि माणसाच्या मनातल्या दुष्कृत्याच्या भावना यांचा संबंध दिसून यायला लागला तेव्हा त्याने त्या डागावर उपचार करायला सुरुवात केली. जोपर्यंत मेंदूच्या विशिष्ट भागामध्ये तो डाग होता तोपर्यंत माणूस गुन्हेगारी प्रवृत्तीचा दिसून आला. शस्त्रक्रिया करून हा डाग काढून टाकल्यानंतर मात्र त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती नियंत्रणात आली. म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीने वागण्याची प्रेरणा मेंदूच्या एका भागात मूर्त रूपाने आढळली. मानवी भावनांचे मूर्त रूप सापडले, पण आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, मनात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीला लागली म्हणून हा डाग तयार झाला की, डाग तयार झाल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली? यावर संशोधन व्हायला हवं. एकूणच बलात्काराचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर केवळ फाशीच्या शिक्षेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी व्यक्तिगत व सामूहिक पातळीवर वर्चस्ववादी पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी सातत्याने काम करावे लागेल. इतकेच!

बलात्कार्‍यांच्या मनोविश्वात डोकावताना…
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -