घरफिचर्समायमहानगर ब्लॉगरात्रभर मृतदेहाजवळ बसून राहावं लागलं...लॉकडाऊनमधला भयानक अनुभव!

रात्रभर मृतदेहाजवळ बसून राहावं लागलं…लॉकडाऊनमधला भयानक अनुभव!

Subscribe

माझ्या सासूबाई कधी माझ्याकडे सानपाडा येथे राहत किंवा अमच्या वरळीच्या घरी माझ्या एका अविवाहित नणंद बरोबर राहत. सासूबाई ८३ वर्षांच्या होत्या. कमरेला पट्टा होता आणि वॉकर घेऊन चालत. २७ एप्रिल रोजी वातावरणातील फरकामुळे त्यांना थोडी सर्दी झाली आणि थोडी अंगात कणकण वाटली म्हणून नणंद बाईंनी त्यांना काढा आणि क्रोसिन दिली. दुसऱ्या दिवशी थोडा कफ जाणवला पण सर्दीचे औषध घेऊन थोडं बरं वाटलं. (लॉकडाऊनच्या काळात त्या दोघी घराबाहेर गेल्या नाहीत. पूर्ण काळजी घेतली होती). परंतु रात्री ११ च्या सुमारास बाथरूम मधून बाहेर येऊन बेड वर जात असताना त्या खाली घसरून पडल्या. फ्रॅक्चर नव्हतं. परंतु त्यांना लेकीच्या मदतीने उठता आलं नाही. नणंद बाईंनी आणि माझ्या नवऱ्याने खूप प्रयत्न केला डॉक्टर बोलावण्याचा किंवा अॅम्ब्युलन्स बोलवून दवाखान्यात नेण्याचा. परंतु या कोविड-१९ ने घात केला. एकही डॉक्टर किंवा अॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही. त्यातच घाबरून सासूबाईंना जुलाब होऊ लागले. जागेवरून उठता येत नाही, अंघोळ करता येत नाही, स्वच्छ वाटत नाही आणि मुख्य म्हणजे वैद्यकीय मदत येत नाही. शिवाय इतर मुलांना मदतीसाठी वरळीला जाता येत नाही याचा शॉक बसला.

पडल्यानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे २ मेला रात्री १० वाजता हार्ट अटॅकने त्या अगदी बोलता बोलता गेल्या. अनपेक्षित मृत्यू मुळे आम्ही सगळे भांबावलो होतो. नवी मुंबई सानपाडा वरून परवानगी मिळणं कठीण होतं. पण नणंद डीआयजीमधून रिटायर्ड झाल्या होत्या. त्यांनी ऑफिसला सांगून आमची वरळीला जाण्याची सोय केली आणि अॅम्ब्युलन्ससाठी आम्ही जिवाच्या आकांताने प्रयत्न सुरू केले. पण कोविडसाठी अॅम्ब्युलन्स मिळेल पण नॉन कोविड साठी नाही असं सांगितलं. शिवाय रात्र असल्यामुळे कोणीही मदतीला येत नव्हते. मदतीसाठी असलेले सगळे नंबर फिरवले, नगरसेवकांचे नंबर फिरवले. आमदार, खासदार (नावं नाही लिहिणार त्यांची) यांची मदत मागितली. कोणीही आले नाही. कारण बाजूच्या दोन इमारती या कंटेन्मेंट झोन जाहीर केल्या होत्या. शेवटी रात्री ३ वाजता प्रयत्न थांबवून सकाळी सहा वाजता प्रयत्न सुरू करू म्हणून आईच्या मृत देहाजवळ मी, नवरा आणि नणंद रात्रभर बसून राहिलो. (इथे मास्क लाऊन, ग्लोव्ह्ज घालून, काही अंतर ठेऊन १८० फुटांच्या खोलीत बसलो. सकाळी एकटा नवरा आणि त्याचा एक मित्र सगळीकडे डॉक्टर शोधण्यासाठी फिरत होते. सासूबाईंना फक्त हाडांचा आजार होता आणि बाकी आजारपण आलं तर त्या सानपाड्याला येत त्यामुळे तिथे त्यांचा ओळखीचा एकही फिजिशियन डॉक्टर नव्हता. त्यामुळे कोणीही यायला तयार होत नव्हतं.

- Advertisement -

दुपारचे बारा वाजयला आले होते. शेजारी तर कोणी डोकावूनही जात नव्हते. विचारपूस तर सोडा. दोन तीन वेळा नवऱ्याला चक्कर आली उन्हात फिरण्याने. शेवटी माझ्या नवऱ्याच्या मित्राचा मेव्हणा देवासारखा धावला. त्याच्या मदतीने साडेबाराला एक डॉक्टर येऊन त्यांनी कॉज ऑफ डेथ दिलं आणि अॅम्ब्युलन्स पाठवली. पण कोणीही मृत शरीराला हात लावेनात. दोन लग्न झालेल्या मुली आणि त्यांचे नवरे होते, पण तेही बाहेर लांब उभे. शेवटी मी, माझा नवरा आणि एक शेजारी असं आम्ही तिघांनी मिळून सासूबाईंना स्ट्रेचरवर ठेवलं. आणि मग चार जणांनी ती बॉडी अॅम्ब्युलन्समध्ये ठेवली. मी, नवरा आणि नणंद (अविवाहित) असे अॅम्ब्युलन्समध्ये बसलो आणि कुठल्याही धार्मिक विधिशिवाय सासूबाईंना भडाग्नी द्यावा लागला. मुंबईत वरळीसारख्या भागात मला मदत न मिळता एका आईला भडाग्नी द्यावा लागला या इतपर दु:ख ते काय असावं. अंत्यविधी झाल्यानंतर आम्ही ३ मेपासून सानपाड्याला येऊन सगळे स्वत:च १४ दिवसांसाठी सेल्फ क्वॉरंटाईन झालो. असो. काळाचा महिमा आहे. कालाय तस्मै नमः!!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -