घरफिचर्समायमहानगर ब्लॉगभेटीगाठी मागचे गौडबंगाल...

भेटीगाठी मागचे गौडबंगाल…

Subscribe

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या सदिच्छा भेटीगाठींना बहर आला आहे. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात राजकीय नेत्यांच्या सदिच्छा भेटीमागेदेखील बरेच काही दडलेले असते आणि हे दडलेले राजकारण हे पुढील काही दिवसात किंवा अगदी काही महिन्यानंतर देखील त्याचे राजकीय क्षितिजावर पडसाद उमटताना दिसत असतात. त्यामुळे राजकीय नेते जरी सदिच्छा भेट असल्याचे सांगत प्रसारमाध्यमांना टाळत असले किंवा वेळ मारून नेत असलेले तरीदेखील या भेटीगाठी घेण्यामागे नेत्यांच्या नेमक्या कोणत्या राजकीय इच्छा आणि आकांक्षा त्यामागे असतात हे पाहणे गरजेचे असते. या भेटीगाठींची चर्चा काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे राज्यातील सर्वोच्च नेते शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घेतलेल्या एका गुप्त बैठकीमुळे सुरू झाली. ही गुप्त बैठकदेखील चर्चेत यांनी आली त्याला प्रमुख कारण म्हणजे शरद पवार यांची ही काही नियोजित भेट नव्हती आणि दुसरे त्याहून महत्त्वाचे कारण म्हणजे गेले वर्षभर तरी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात एकही भेट झालेली नाही.

ज्या नरेंद्र मोदी यांनी बारामतीत येऊन जाहीरपणे शरद पवार यांचा उल्लेख त्यांचे राजकीय गुरू असा केला होता त्याच शरद पवारांची भेट घेण्यास मोदी टाळाटाळ करीत असल्याच्या चर्चा या अधून मधून झडत असतात आणि या चर्चेला मोदींनी गेल्या काही महिन्यांमध्ये शरद पवार यांना न दिलेली भेट ही त्याची पुष्टी करणारे आहे. त्यामुळेच शरद पवार यांना अखेरीस प्रफुल पटेल यांना बरोबर घेत अहमदाबादमध्ये जाऊन अकस्मात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घ्यावी लागली होती. महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या सुरू असलेल्या सीबीआय चौकशीच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचे त्या वेळी सांगितले गेले होते. पवार आणि शहा यांच्या या गोपनीय भेटीचे ही अनेक अर्थ अन्वयार्थ प्रसारमाध्यमातील पंडितांनी त्या वेळी व्यक्त केले होते. मात्र स्वतः पवार यांनी अथवा अगदी अमित शहा यांनीदेखील या बैठकीतील कोणताही तपशील हा बाहेर येणार नाही याची काटेकोर दक्षता घेतली होती.

- Advertisement -

त्यानंतर गेल्याच आठवड्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चक्रीवादळ ग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी कोकण दौर्‍यावर असताना महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांची भेट घेतल्याचे उघड झाले होते. विशेष म्हणजे उदय सामंत यांनी आजच एकनाथ खडसे यांच्या समवेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची देखील त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली आहे. उदय सामंत हे शिवसेनेचे असून ते शिवसेनेकडून ते राज्य मंत्रिमंडळात उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाचा पदभार सांभाळत आहेत तसेच ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. महाराष्ट्रात 2019 मध्ये झालेल्या सत्तांतर नाट्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख व सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पराकोटीची कटुता आलेली अनुभवयास मिळत आहे.

त्यामुळेच मातोश्रीतील किचन कॅबिनेटमधील नेते म्हणून उदय सामंत हे ओळखले जात असताना त्यांनी मातोश्रीशी हाडवैर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची गुपचूप सदिच्छा भेट घ्यावी हे काहीसे आश्चर्यकारक आणि तितकेच अनाकलनीय आहे. खरंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत भाजपचे खासदार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांच्या चिरंजीव आंचे आभारच मानले पाहिजेत कारण ही गुपचूप झालेली सदिच्छा भेट उघड करण्याचे धाडस हे राणे पुत्रांनी केले. अर्थात राणे पिता-पुत्रांनी हे उदय सामंत यांना मातोश्रीच्या नजरेत खाली खेचण्याच्या हेतूने केले की देवेंद्र फडणवीस यांचे डावपेच उघड पाडण्यासाठी केले हे अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे.

- Advertisement -

यानंतर सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला आणि महाराष्ट्र सरकारला तो एक मोठा धक्का बसला त्यापाठोपाठ ओबीसी आरक्षणदेखील रद्द झाले आणि महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचा फुगा हा ही दोन्ही महत्त्वाची आरक्षण रद्द झाल्याने अकस्मात फुटला आहे. सहाजिकच महाराष्ट्रातील मराठा समाज आणि ओबीसी समाज यांची मोठी नाराजी राज्य सरकारने ओढवून घेतली आहे याबाबत वादच नाही. आता जरी मराठा समाजाला राज्य सरकारने आर्थिक मागास वर्ग प्रवर्गामध्ये आरक्षण दिले असले तरीदेखील ही दोन्ही आरक्षण रद्द होणे यामध्ये राज्यातील ठाकरे सरकारचा अक्षम्य उदासीन पण हाच कारणीभूत ठरल्याचा जो प्रचार राज्यातील भाजप नेत्यांनी केला त्यामुळेदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनमानसांमधील प्रतिमेला तडा गेला आहे.

अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्री आणि वर्षा येथील हस्तिदंती मनोर्‍यातूनच गेले दीड वर्ष राज्याचा कारभार चालवत असल्यामुळे त्यांना राज्यामध्ये घडत असणार्‍या घडामोडींबाबत आणि राज्य सरकारबाबत जनमानसामध्ये उमटत असलेल्या पडसादाबाबत त्यांचे दूत जी माहिती देतील त्यावरच विसंबून राहावे लागते. त्यामुळे राज्यात काय सुरू आहे याबाबत खरेतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे काहीसे अनभिज्ञच असतात. ते शिवसेना ज्याप्रमाणे चालवायचे अथवा आता ही चालवत असावेत त्याच पद्धतीने त्यांनी राज्य सरकारचा ही कारभार चालवणे सुरू ठेवले असल्यामुळे खरेतर ठाकरे सरकारची ही सर्वात मोठी अडचण झाली आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या राजकारणात जो काही ही सदिच्छा भेटींचा सिलसिला सुरू झाला आहे त्यामागे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा अपयशी कारभार हाच प्रमुख कारणीभूत ठरला आहे असे म्हटल्यास नवल वाटू नये.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य सरकारमधील मंत्र्यांनाच भेटत नाहीत, शिवसेनेच्या मंत्र्यांची ही भेट ते टाळतात यामुळे एकूणच उद्धव ठाकरे यांच्याबाबत ठाकरे सरकारमधील मंत्र्यांमध्येच नाराजीचा सूर आहे. त्यातच या सरकारचे जन्मदाते शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे काही दिवस सक्रिय राजकारणापासून अलिप्त होते. गेल्या साधारणपणे महिनाभरापासून ठाकरे सरकारबाबत शरद पवार यांनी कोणतेही जाहीर विधान केलेले नाही याकडे देखील राजकीय नेते लक्ष वेधत आहेत. त्यामुळे काल विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिवसाच्या नियोजित दौर्‍यामध्ये नसतानादेखील त्यांनी अकस्मातपणे शरद पवार यांची घेतलेली सदिच्छा भेट घेतली, ती अनेकांचे डोळे विस्फारणारी ठरली आहे.

शस्त्रक्रियेनंतर शांत झाले शरद पवार हे पुन्हा एकदा राजकीय मैदानात हेल्मेट आणि पॅड बांधून उतरले आहेत. शरद पवारांनी घेतलेल्या आमदार-खासदार तसेच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या भेटीगाठी फडणवीसांना दिलेली भेट, एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या सदिच्छा भेटी या बर्‍याच बोलक्या आहेत. कारण स्वतः शरद पवार यांनी आतापर्यंतच्या त्यांच्या पन्नास-पंचावन्न वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत महाराष्ट्र सुरळीत चालवण्यासाठी दिल्लीतील सत्तेशी कायमच जुळवून घेत काम केले आहे हे लक्षात घेता आजारपणानंतर राज्याच्या राजकारणात सक्रिय झालेले शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी काहीसे धोकादायक संकेत देत आहेत, असेच म्हणावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -