महाराष्ट्राला खर्‍या सामन्याची प्रतीक्षा

महाराष्ट्रातील राजकारणात एका बाजूला गलितगात्र झालेले आघाडीचे नेतृत्व आणि आत्मविश्वास कम अहंकाराने भरलेले भाजप नेतृत्व असे चित्र दिसत असले, तरी युतीच्या जागावाटपाच्या बोलणी वेळी खरा सामना सुरू होण्याची चिन्हे आहेत. हे दोन्ही पक्ष युतीची बोलणी करण्यास सुरुवात करतील, तेव्हा महाराष्ट्रात त्यांच्यासमोर लढण्यासाठी विरोधकच शिल्लक असणार नाही. समान विरोधक असणारा पक्ष वा पक्षांचा फायदा होऊ नये म्हणून युती किंवा आघाडी केली जाते. भाजप व शिवसेना युतीची बोलणी सुरू करतील त्यावेळी समोर विरोधकच शिल्लक नसतील, तर त्यांना युती करण्याची गरज का भासेल?

भारतीय जनता पक्षानं केलेल्या अंतर्गत पाहणीमध्ये येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेला २२९ जागांवर विजय मिळू शकतो, असा अंदाज असल्याचं सांगितलं जात आहे. एकीकडे भाजप-शिवसेना यांनी अद्याप विधानसभा निवडणुकीत युती करण्याचे निश्चित केले असले, तरी जागावाटपाबाबत काहीही हालचाल केलेली नाही. दोन्ही पक्षांकडून काँग्रेस व राष्ट्रवादीमधून पक्षांतर करून येणार्‍या आमदारांसाठी पायघड्या टाकल्या जात आहेत. दोन्ही पक्षांमध्ये आतापर्यंत आघाडीचे अनेक आमदार आले असून अनेक जण प्रतीक्षा यादीत आहेत. विशेष म्हणजे युती झाल्यानंतर गैरसोय होणार नाही, अशाच ठिकाणी आयारामांना प्रवेश दिला जात असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांचे अवसान गळाले असून विधानसभा निवडणुकीत विजयी होऊ, असा विश्वास देण्यात ते अपयशी ठरले आहेत. यामुळे या पक्षांमधील अनेक दिग्गजांचा आणखी पाच वर्षे सत्तेशिवाय काढण्याबाबतच धीर संपला आहे. यामुळे युती झाल्यानंतरही आपली उमेदवारी कुठे सुरक्षित राहू शकेल, याचा शोध घेऊन भाजप किंवा शिवसेना यांचा रस्ता धरला जात आहे. आतापर्यंत असे अनेकजण युतीवासी झाले असून आणखीही अनेक जण प्रतीक्षा यादीत असल्याचे दावे केले जात आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याची सांगता गणेशोत्सवापर्यंत झाली असून कदाचित गणेशोत्सवानंतर तिसरा टप्पा सुरू होईल, असा अंदाज आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात युतीकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे नियोजन सुरू केले आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीनंतर युतीतील दोन्ही पक्षांकडून विधानसभा निवडणुकीत युती होणारच असे ठामपणे सांगितले जात आहे. पत्रकारांकडून काही अडचणीचे प्रश्न विचारले गेलेच, तर आमचं ठरलंय असं उत्तर दिलं जातं. पण या पक्षांचं नेमकं काय ठरलंय हे कळायला मार्ग नाही. यामुळे युती होणार की नाही, झाली तर तिचा फॉर्म्युला कसा असणार याबाबत त्या त्या पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्तेही संभ्रमात आहेत; पण भाजप व शिवसेना नेतृत्वाकडून हा संभ्रम कायम ठेवला जात असल्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यानंतरच हा संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता केवळ अटकळ बांधणं एवढंच हाती आहे.

महाराष्ट्र दौर्‍यावर आलेले भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी भाषणामध्ये एका ओळीत युतीचे सरकार येणार असा ओझरता उल्लेख केला. यामुळे युती होणार हे मानले जात आहे. तसेच युतीबाबत लवकरच बोलणी सुरू होईल, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. एकीकडे युतीबाबत सकारात्मक वक्तव्य येत असतानाच भाजप व शिवसेना दोन्ही पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती घेताना सर्वच जागांवरील इच्छुकांना बोलावले जात आहे. म्हणजे युतीच्या नेत्यांची उक्ती व कृती यात विसंगती दिसत आहे. दोन बाबींची संगती लावायची ठरली तर यांनी युती करायची आहे, असे ठरवले असले, तरी ऐनवेळी धावपळ नको म्हणून दोन्ही बाजूंनी खबरदारी घेतली जात असावी,असे मानले जाते. कारण मागच्या विधानसभा निवडणुकीत युती मोडल्यानंतर दोन्ही पक्षांची विशेषत: शिवसेनेची खूप तारांबळ उडाली. त्याचाच परिणाम म्हणजे महाराष्ट्रात मोठा भाऊ असलेल्या शिवसेनेला पाच वर्षे नाक घासत भाजपमागे फरफटावे लागले. केंद्र व राज्यातील सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेनेही तिखट शब्दांमध्ये भाजपवर टीका केली. किंबहुना काही वेळा तर काँग्रेस व राष्ट्रवादीपेक्षाही जहाल भूमिका घेतली. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या वेळी व्यवहारी भूमिका घेऊन युती केल्यामुळे शिवसेना फायद्यात राहिली. आता विधानसभा निवडणुकीतही युती करून शिवसेनेला भाजप नेतृत्वाच्या लोकप्रियतेचा फायदा उठवायचा आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी युतीबाबत काही उलटसुलट वक्तव्ये केली, तरी शिवसेनेकडून आमचं ठरलंय असे साचेबद्धपणे उत्तर देऊन वेळ मारून नेली जात असल्याचे चित्र आहे.

शिवसेना म्हणजे आरे ला कारे करणारा पक्ष,अशी प्रतिमा असली तरी यावेळी शिवसेना नेत्यांकडून दाखवला जाणारा संयम विचार करायला लावणारा आहे. यामुळे या दोन्ही पक्षांचं ठरलंय म्हणजे नेमके काय ठरलंय याची उत्सुकता दिवसेंदिवस ताणली जात आहे. या दोन्ही पक्षांनी जे काही ठरवलं आहे, त्यामुळेच आघाडीतील आमदारांची चलबिचल वाढीला लागली आहे. खरे तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे जे आमदार किंवा नेते या दोन्ही पक्षांमध्ये येत आहेत, त्यातील बहुतांश जण आहे त्या पक्षांमध्ये राहूनही विजयी होऊ शकतील, असे त्यांची क्षमता आहे. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादी सत्तेत येऊ शकणार नाहीत, याची त्यांना खात्री झाली आहे व सत्तेशिवाय राहण्याची त्यांची मानसिकता नाही, ही खरी मेख आहे. युतीच्या नेत्यांनी आघाडीच्या आमदारांची ही अगतिकता ओळखूनच आमचं ठरलयं अशी टॅग लाइन चालवल्याचे आता दिसू लागले आहे. कारण लोकसभा निवडणुकीतील मतांची टक्केवारी बघितली तर राज्यात युतीला ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते असली तरी आघाडीलाही ४० टक्के मते मिळाली आहेत. म्हणजे युती झाली नाही, तरच आघाडीला टिकून राहण्याची काही संधी आहे. त्यामुळे आघाडीतील धीर गमावलेल्या नेत्यांना आपल्या गोटात खेचण्यासाठी या दोन्ही पक्षांनी आमचं ठरलंय या भूमिकेचा पुरेपूर वापर करून घेतला आहे. पुढच्या काळातही त्याचा आणखी फायदा उठवला जाईल. आघाडीतील दोन्ही पक्ष बर्‍यापैकी खाली झाल्याशिवाय युतीची जागावाटपाची बोलणी सुरू होईल, असे वाटत नाही. कारण बोलणी सुरू होईल, तेव्हा खर्‍या ठिणग्या उडणार आहे.

सध्या महाराष्ट्रातील राजकारणात एका बाजूला गलितगात्र झालेले आघाडीचे नेतृत्व आणि आत्मविश्वास कम अहंकाराने भरलेले भाजप नेतृत्व असे चित्र दिसत असले, तरी युतीच्या जागावाटपाच्या बोलणी वेळी खरा सामना सुरू होण्याची चिन्हे आहेत. हे दोन्ही पक्ष युतीची बोलणी करण्यास सुरुवात करतील, तेव्हा महाराष्ट्रात त्यांच्यासमोर लढण्यासाठी विरोधकच शिल्लक असणार नाही. समान विरोधक असणारा पक्ष वा पक्षांचा फायदा होऊ नये म्हणून युती किंवा आघाडी केली जाते. भाजप व शिवसेना युतीची बोलणी सुरू करतील त्यावेळी समोर विरोधकच शिल्लक नसतील, तर त्यांना युती करण्याची गरज का भासेल? त्यामुळे आतापर्यंत भाजपचे सत्ताधारी पक्षाचे सर्व आकाश व्यापलेले असताना शिवसेना विरोधकांचे आकाश व्यापण्याचा प्रयत्न करणारच नाही, असे कुणी ठामपणे सांगू शकते का? त्यामुळे तेव्हाच महाराष्ट्रातील राजकारणाचा खरा सामना सुरू होणार असून तत्पूर्वी काँग्रस व राष्ट्रवादीचे घर बहुतांश खाली करण्याचे काम सुरू आहे, इतकेच.