फडणवीसांचे ‘प्रारब्ध’ जाणिले कुणी ?

केवळ 56 आमदारांचे पाठबळ असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रासारख्या देशातील एका बलाढ्य राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसले. एरवी भाजपलाच नव्हे तर कोणालाही बालिश वाटणारी शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी शरद पवार यांच्यासारख्या जाणत्या राजाने प्रत्यक्षात सत्यात उतरवून दाखवली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसल्याने त्याचा सर्वात मोठा कडेलोट करणारा परिणाम झाला तो देवेंद्र फडणवीस यांच्यावर. ज्या शिवसेनेच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांनी उभी हयात लढण्यात घालवली त्या शिवसेनेचा मुख्यमंत्री शरद पवार यांच्या आशीर्वादाने बसला, यातच भाजपचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय बुद्धिमत्तेचा सर्वात मोठा पराभव आहे.त्यांचे प्रारब्ध काय आहे, हे येणारा काळच सांगू शकेल.

Respond to the call of the government to win the battle of Coronavirus - Devendra Fadnavis
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एकट्या भाजपचे १०५ आमदार निवडून आल्यानंतरही मित्रपक्ष शिवसेनेसोबत मुख्यमंत्रीपदावरून झालेल्या वादामुळे भाजपला महाराष्ट्रातील सत्ता गमवावी लागली. महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार निवडून आल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होता आले नाही. ‘मी पुन्हा येईन’ हा त्यांचा नारा हवेत विरून गेला. राजकारणात फाजील आत्मविश्वास हा अंगलट येतो. अशावेळी खरेतर अतिआत्मविश्वासापेक्षा समजूतदारपणा आणि राजकीय चातुर्य हे अधिक उपयोगी पडते. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठबळामुळे शिवसेनेला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अतिगृहीत धरण्याची घोडचूक देवेंद्र फडणवीस यांनी केली. ती भाजपला राज्यातील सत्तेपासून दूर घेऊन गेली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना-भाजपच्या अत्यंत टोकाच्या कटूतेवर गेलेल्या नात्यात राजकीय चातुर्य दाखवले. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकीय चित्रच पूर्णतः पालटून गेले. केवळ 56 आमदारांचे पाठबळ असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रासारख्या देशातील एका बलाढ्य राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसले. एरवी भाजपलाच नव्हे तर कोणालाही बालिश वाटणारी शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी शरद पवार यांच्यासारख्या जाणत्या राजाने प्रत्यक्षात सत्यात उतरवून दाखवली. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदी बसल्याने त्याचा सर्वात मोठा कडेलोट करणारा परिणाम झाला तो देवेंद्र फडणवीस यांच्यावर. ज्या शिवसेनेच्या विरोधात शरद पवार कायम लढले, त्या शिवसेनेचा मुख्यमंत्री शरद पवार यांच्या आशीर्वादाने बसला, यातच भाजपचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय बुद्धिमत्तेचा सर्वात मोठा पराभव आहे.

महाराष्ट्रात 1995 साली शिवसेना-भाजपचे युती सरकार पहिल्यांदा स्थापन झाल्यानंतर आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस त्यावेळी बर्‍यापैकी चर्चेत आले होते. उत्तम वक्तृत्व, विषयाचा सखोल आणि सविस्तर अभ्यास, कोणताही विषय विधानसभेत परखडपणे मांडण्याची हातोटी. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे अल्पावधीतच भाजपा नेत्यांच्या गुडबुकमध्ये आले. त्यावेळचा भाजप म्हणजे महाजन आणि मुंडे यांचा भाजप होता. देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास मोठ्या प्रयत्नाने संपादन केला होता. 1999 साली महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले. 2014 पर्यंत शिवसेना आणि भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. विरोधी पक्षात असतानाही देवेंद्र फडणवीस हे राज्यातील भाजपचे तत्कालीन प्रस्थापित नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार यांच्या कंट्रोलमध्ये होते. त्यावेळी एकनाथ खडसे असोत तावडे असोत की सुधीरभाऊ असोत त्यांनी वेळोवेळी फडणवीस यांना राज्यातील राजकारणात संधी दिली हे अमान्य करून चालणारच नाही. हे आता सांगण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्र भाजपात सध्या जे काही सुरू आहे त्याची पाळेमुळे ही गेल्या वीस वर्षांच्या भाजपच्या राज्यातील राजकारणात दडलेली आहेत.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत देशात सत्तांतर झाले. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले. देशाच्या, राज्याच्या, भाजपच्या राजकारणात नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या स्वतंत्र युगाचा प्रारंभ या काळात झाला. त्या वेळी प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे सहाजिकच मोदी आणि शहा यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांचा संपर्क अधिक आला आणि काल-परवापर्यंत तुलनेने ज्युनियर वाटणारे फडणवीस हे खडसे, तावडे, मुनगंटीवार यांना मागे सारत विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कसे बसले हे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना कळलेही नाही. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात ब्राह्मण मुख्यमंत्री देण्याचे धाडस हे शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा शक्तिशाली आणि ताकदवान नेताच करू शकला हे सत्य स्वीकारले पाहिजे. 2014 च्या पूर्वीही महाराष्ट्रात भाजपचे राज्य नेतृत्व हेदेखील मुंडे, खडसे, तावडे, मुनगंटीवार यांच्यासारख्या बहुजन समाजातील नेत्यांकडे होते. त्यामुळे 1999 नंतर थेट पंधरा वर्षांनी महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि त्यातही भाजपचा मुख्यमंत्री बसणार हे जेव्हा निश्चित झाले तेव्हा भाजपचे राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून एकनाथ खडसे, ओबीसी समाजाच्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांचीच नावे अग्रक्रमाने देवेंद्र फडणवीस यांच्याही पुढे होती.

मात्र 2014 सालच्या मोदी लाटेनंतर महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील भाजपचे अंतर्गत चित्र पूर्ण बदलले. मोदी आणि शहा यांना जे नेतृत्व सोयीचे वाटले, त्यामध्ये तुलनेने ज्युनियर असलेले देवेंद्र फडणवीस हे खडसे आणि पंकजा मुंडे अथवा विनोद तावडे किंवा अगदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले नितीन गडकरी यांच्यापेक्षा हाताळायला अधिक सोपे वाटले. त्यामुळेच मोदी आणि शहा यांनी अन्य भाजप नेत्यांच्या हातात महाराष्ट्राचा कारभार देण्याऐवजी तो फडणवीस यांच्या हातात दिला. 2014 नंतर बदललेला भाजप सर्वाधिक कुणाला कळला असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांना कळला असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. मोदी शहा यांचे भक्कम पाठबळ पाठीशी असल्यामुळे त्याचा पुरेपूर वापर करत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रावर आपला एकछत्री अंमल निर्माण केला. राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्रीपद हे सर्वोच्च पद असते. आणि जर राज्याच्या मुख्यमंत्र्याला केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ असेल तर तो मुख्यमंत्री विरोधी पक्षासह मित्र पक्षालाही कसा नामोहरम करतो आणि जेरीस जाणतो हे बघायचे असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या कारकिर्दीकडे बघावे लागेल.

या पाच वर्षांतील एकहाती सत्तेचा वापर करून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी सारख्या मातब्बर विरोधी पक्षांची पूर्णतः नाकेबंदी करून टाकली होती. काँग्रेस राष्ट्रवादीचे दिग्गज नेते फडणवीस यांनी भाजपात आणले. फडणवीस यांच्या कार्यपद्धतीचा सर्वाधिक त्रास राष्ट्रवादीला आणि पर्यायाने शरद पवार यांच्या नेतृत्वाला झाला होता. शरद पवार यांच्यासारख्या जाणत्या आणि कुशल नेतृत्वाने महाराष्ट्रातली जी दिग्गज घराणी राष्ट्रवादीमध्ये वर्षानुवर्षे बांधून ठेवली होती, अशा दिग्गज मंडळीनाही फडणवीस यांनी फोडून भाजपात आणले. जे राधाकृष्ण विखे-पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्याचे विरोधी पक्षनेते होते त्यांना फोडून फडणवीस यांनी भाजपात आणले. राष्ट्रवादी बरोबरच काँग्रेसचीही ताकद खिळखिळी करून टाकली. अर्थात, फडणवीस यांची ही सत्तेची लढाई केवळ राजकीय विरोधक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांबरोबर होती असे बिलकुल नाही, तर त्याच बरोबरीने गेली पंचवीस वर्षे महाराष्ट्रात भाजपची युती असलेल्या शिवसेनेशी फडणवीसांचे छुपे युद्ध अधिक जोरकसपणे सुरू होते. फडणवीसांच्या पाच वर्षांच्या काळात शिवसेनेची जेवढी राजकीय मानहानी झाली तेवढी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गेल्या वीस-पंचवीस वर्षांच्या काळातही कधी झाली नव्हती. मात्र असे असूनदेखील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार ठरवण्याचे आणि त्याहीपेक्षा म्हणजे शिवसेनेला आयते उमेदवार देण्याचे अत्यंत महत्वपूर्ण काम देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, हे नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. शिवसेनेचे नेतृत्व या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या किती कह्यात गेले होते याची ही बोलकी उदाहरणे आहेत.

त्यामुळेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जेव्हा भाजपला सर्वाधिक 105 जागा मिळाल्या आणि शिवसेनेला 56 जागा मिळाल्या तेव्हाच खरे तर महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असा बहुतेकांचा होरा होता. शिवसेना-भाजपने एकत्र येत निवडणूक लढवल्यामुळे युतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पुन्हा येतील असे चित्र राज्यात व दिल्लीत होते. मात्र एकेकाळी फडणवीसांनी दिलेले उमेदवार जसेच्या तसे भगवा टिळा लावून शिवसेनेत घेणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी कसे राजी केले ते त्यांना कळलेही नाही.

सध्या देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लागण झाल्यामुळे सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. एकनाथ खडसे यांच्यासारखे भाजपचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीत गेले आहेत. तिकडे मराठवाड्यात पंकजा मुंडे यांचाही आवाज आता वाढला आहे. गेल्या वर्ष दोन वर्षांपूर्वी भाजपच्या ताटाखालचे मांजर असलेले मित्र पक्ष आता पुन्हा एकदा शरद पवारांच्या पॉवरमुळे वाघासारखे डरकाळ्या फोडू लागले आहेत. थोडक्यात, फडणवीस जो पवार पॅटर्न महाराष्ट्रातून संपुष्टात आणू पाहत होते, सत्तेचा तोच पवार पॅटर्न महाराष्ट्रात राज्य करत आहे. यापुढचा राजकीय काळ फडणवीस यांच्यासाठी अधिक अवघड असेल. त्यामुळे त्यांनी ठणठणीत बरे होऊन पुन्हा एकदा या प्रतिकूल राजकीय परिस्थितीत सगळ्या आव्हानांचा सामना करावा यासाठी त्यांना शुभेच्छा.