शरद पवार… मानवतेचा चेहरा असलेलं ‘आपत्ती निवारण मॉडेल’

देशात आणि राज्यात कुठेही नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यानंतर तिथे पोहोचून लोकांना मदत करण्यासाठी तत्पर असलेले शरद पवार हे आपत्ती निवारण कार्याचे रोल मॉडेल आहेत.

Sharad pawar tour of sangli kolhapur flood affected area
पूरग्रस्त भागातील लोकांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात महाप्रलयंकारी पूराने थैमान घातले होते. कोल्हापूरमधील शिरोळ येथे पद्मराजे हायस्कूल मैदानात २०० ते २५० बेघर झालेले कुटुंब निवाऱ्यासाठी आले होते. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरु झालेली कोल्हापूरकरांची ससेहोलपट जवळपास दोन आठवडे कायम होती. पद्मराजे हायस्कूलमध्ये काही गाड्यांचा ताफा तात्पुरत्या छावणीजवळ आला. आसऱ्याला आलेले लोक शाळेच्या मैदानात उभारलेल्या मंचाच्या दिशेने धावू लागले. “साहेब! लई वाईट झालंय… पै पै करून उभा केलेला संसार वाहून गेला, डोळ्यादेखत होत्याचं नव्हतं झालं… साहेब तुम्ही व्हतं. आमचं आबा (स्व. आर.आर. पाटील) व्हतं, तेव्हा तुमचाच आसरा व्हता. पण आता तुम्ही नाई तर कुणीच मदतीला आलं नाई…” जवळपास ७० वर्षांची वृद्ध महिला आपली कैफियत मांडत होती. पांढरी पँट, हाफ स्लिव्हचे पांढरे शर्ट, हाताची घडी घालून बसलेले शरद पवार हे सर्व नीट ऐकत होते. नैसर्गिक किंवा कोणत्याही आपत्ती नंतर लोकांच्या आक्रोशाला समोर जाण्याची शरद पवारांची ही काही पहिली वेळ नव्हती. एक पत्रकार म्हणून मी या घटनेचे रिपोर्टिंग करायला गेलो होतो. पवार आपुलकीने प्रत्येक पूरग्रस्ताची माहीती घेत होते. हे चित्र पाहून महाराष्ट्र २६ वर्षापूर्वी घडलेल्या एका आठवणीत गेला.

३० सप्टेंबर १९९३ मी तेव्हा फक्त एक वर्षाचा असेल लातूरमध्ये भयंकर भूकंप झाला होता. ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप होता तो. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यादांच इतका मोठा भूकंप झाला असेल. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते शरद पवार. त्यांनी या संकटावर यशस्वीरित्या मात केली. लातूर भूकंपाबाबत जे काही साहित्य सध्याच्या घडीला उपलब्ध आहेत त्यांना चाळले तर शरद पवार हे नाव त्या साहित्यात ठासून लिहिलेले आहे. रेडिओवर बातमी येण्याआधीच शरद पवार हे लातूरात दाखल झाले होते. पवार या घटनेचा उल्लेख करताना सांगतात की “त्या रात्री अनंत चतुर्दशी होती. विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्याचा तणाव प्रशासनावर होता. स्वतः गृहमंत्री असल्यामुळे मी रात्रभर मिरवणुकांचा आढावा घेत होतो. रात्री तीन साडेतीन वाजता मिरवणुका शांततेत पार पडल्यानंतर मी निर्धास्तपणे झोपण्यासाठी गेलो. झोपलो तोच काही मिनिटांत जमिनीला हादरे जाणवू लागले. वर्षा निवासस्थानाच्या काचा हलू लागल्या इतका तीव्र धक्का होता. तात्काळ मी कोयनानगराच्या भूकंप मापन केंद्राला फोन लावला. महाराष्ट्रात भूकंपाचे केंद्र हे कोयनेच्या आसपासच असायचे. तेव्हा मला अधिकाऱ्यांनी सांगितले की भूकंपाचे केंद्र हे लातूर जवळ आहे”

कार्यतत्पर पवार यांनी लगेच सकाळी ७ वाजता विमान पकडले आणि ७.४० ला भूकंपाचे केंद्र असलेल्या किल्लारी गावात दाखल झालेही. गावात प्रचंड भीषण परिस्थिती होती, इतकी की प्रसंगी पवार यांनी स्वतः काही मृतदेह बाहेर काढले. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकून होते. अनेक घरांची पडझड झाली होती. शेतीचे, पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सत्ता हाती असल्याने तेव्हा निर्णय घेण्याची क्षमता पवार यांच्यात होती आणि त्यांनी निर्णय घेतले. पवार यांनी आपले मुख्यमंत्री कार्यालयच काही दिवसांसाठी लातूरला हलवले. अधिकाऱ्यांना हव्या त्या सूचना दिल्या. या संकटामुळे गावकऱ्यांचे मनोबल खचले होते. त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पवार यांनी त्यांचे मित्र मानसोपचारतज्ज्ञ आणि अभिनेते मोहन आगाशे यांची मदत घेतली. इतकेच नव्हे तर शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या पशुधनासाठी पवारांनी त्याकाळी कोट्यवधी रुपये अवघ्या काही दिवसांत जमवले. पवार एका भाषणात म्हणाले होते की “भूकंपाची परिस्थिती अत्यंत भीषण होती. लोकांमध्ये असलो की खोटंनाटं हसायचो. मात्र एकटे असताना या हजारो लोकांचा संसार पुन्हा कसा उभा करायचा या प्रश्नामुळे मला रडू कोसळायचे.” पवार यांनी महाराष्ट्रावर आलेल्या या प्रसंगावर मात केली. त्यांच्या या कामाची दखल विरोधी पक्षातील नेत्यांनीही घेतली. म्हणूनच अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने २००१ रोजी स्थापन केलेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पवार यांना केले होते.

आपण ज्या समाजात जन्माला येतो त्या समाजाचे आपण देणे लागतो असं म्हणतात म्हणूनच की काय जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आले, तेव्हा सत्ता असो किंवा नसो पवार धावून जातात. ८ ऑगस्ट २०१९ रोजी पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला महापूराने झोडपले. पूरामुळे लोक अडचणीत आल्याचे पाहताच पवार यांनी बारामतीमध्ये तातडीने पदाधिकाऱ्यांची, सहकाऱ्यांची बैठक बोलावली आणि अर्ध्या तासात दीड कोटींची मदत जमा केली. सत्ता हातात नाही, प्रशासकीय निर्णय घेण्याचा अधिकार नाही. तरीही पवारांनी पूरग्रस्त सांगली, कोल्हापूर भागाचा दौरा केला. खचलेल्या लोकांना धीर दिला. तर सहकाऱ्यांना मदतीचे आवाहन केले. राज्याच्या तरूण मुख्यमंत्र्यांना लाजवेल अशी कामगिरी ८० वर्षांच्या तरुणाने केली. (पवारांना वृद्ध म्हटलेलं आवडत नाही) ऊसाच्या वाढ्यावर (शेंडा) पाणी गेले होते, त्या भागात जाऊन पवारांनी पाहणी केली. कोल्हापूरमधील शिरोळ, घालवाड, अर्जूनवाड, आंबेवाडी, चिखली अशी अनेक गावं पूरामुळे बाधित झाली. पवार स्वतः या गावी जाऊन ग्रामस्थांना भेटले. त्यांच्या घरांची पाहणी केली. उद्ध्वस्त झालेली घरे सरकारमार्फत पुन्हा उभे करण्याचे आश्वासन दिले.

पुरामुळे सर्वात जास्त मागासवर्गीय समाजाचे नुकसान झाले. बहुंताशी मागासवर्गीय समाज आजही गावाबाहेर आहे. त्याचे घर मातीचे किंवा कच्चे असते. त्यामुळे पूराची मदत सर्वात जास्त मागासवर्गीय समाजाला आहे. त्यामुळे या समाजाला सर्वात आधी मदत व्हावी, अशी भूमिकाही पवार यांनी मांडली. इतकेच नव्हे तर पूरग्रस्त बांधवांचे मनोबल वाढवण्यासाठी पवार यांनी स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन हा पूरग्रस्त बांधवांसह साजरा केला. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकदा म्हणाले होते की, शरद पवार हे डिझास्टर मॅनेजमेंट एक्सपर्ट आहेत. पत्रकार म्हणून शरद पवार यांचा पूरग्रस्त भागांचा दौरा कव्हर केल्यानंतर पवार यांना डिझास्टर मॅनेजमेंट एक्सपर्ट हा टॅग अगदी तंतोतंत लागू होतो, हे मला प्रत्यक्ष अनुभवता आले.

शरद पवार यांचे राजकीय निर्णय, भूमिका वादातीत असू शकतात. प्रत्येकाची त्यावर वेगवेगळी मत-मतांतरेही असतील. मात्र जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही आपत्ती येते, तेव्हा हा माणूस तिथे सर्वात आधी पोहोचलेला दिसतो. किल्लारी किंवा भूजचा भूंकप, गारपीट किंवा दुष्काळात केलेली मदत असेल, मोदींनी सांगितले तसे गुजरातला गहू पिकात स्वंयपूर्ण करणे असेल, लक्षद्विपमधील नारळाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा केरळमधील कॉफी आणि रबर शेतकऱ्यांचा प्रश्न असेल… पवारांनी सत्तेत असताना भारताच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. मात्र त्यांच्या तोंडून याचा साधा उल्लेखही कधी होताना दिसत नाही. आजच्या सरकारप्रमाणे त्यांनी किंवा त्यांच्या पक्षाने याची साधी जाहीरातही केली नाही. पवारांना तर याची गरजच वाटत नाही. एक पत्रकार म्हणून जेव्हा मी पवारांचे दौरे कव्हर करतो तेव्हा मला त्यांच्यात मानवतेचा चेहरा असलेले ‘आपत्ती निवारण मॉडेल’ दिसते. पवार देशभर बारामती मॉडेलसाठी ओळखले जातात. मात्र आपत्ती निवारण कसे असावे, याचे मी तरी पाहिलेले, वाचलेले आणि अनुभवलेले मुर्तिमंत उदाहरण म्हणजे शरद पवार…

वरील लेखासंदर्भातील व्हिडिओ पाहा – 

 


 

या ब्लॉगचे लेखक निलेश बनकर हे मुक्त पत्रकार आहेत.