घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमहाराष्ट्र आधार या भारताचा !

महाराष्ट्र आधार या भारताचा !

Subscribe

महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले, खरा वीर वैरी पराधिनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, सेनापती बापट यांनी महाराष्ट्राविषयी लिहिलेल्या या काव्यपंक्तीतून देशासाठी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे काय महत्व आहे, हे दिसून येते. उत्तरेत धुमाकूळ घालणार्‍या मुसलमान सरदारांची थडगी महाराष्ट्रात का, कारण जशी माती तशी माणसे, असे इतिहासाचे अभ्यासक पु.ग.सहस्त्रबुद्धे यांनी ‘माझे चिंतन’ या आपल्या पुस्तकात म्हटले आहे. उत्तरेत हाहा:कार माजवणार्‍या औरंगजेबासह अनेक मुसलमान सरदारांची थडगी महाराष्ट्रात आहेत, हे वास्तव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी साम्राज्यात रूपांतर केले. त्यावेळी संपूर्ण देशभर मुस्लीम राजवटी होत्या. पण अशा वेळी महाराष्ट्रातून त्याविरुद्ध लढा उभारण्यात आला. पुढे १८५७ ला नानासाहेब पेशव्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात उठावाचे आयोजन केले. पण तो उठाव काही संस्थानिकांनी सहकार्य न केल्यामुळे फसला. पुढे ब्रिटिशांच्या विरोधात महाराष्ट्रातूनच लोकमान्य टिळकांनी चळवळ सुरू केली. हे सर्व सांगण्याचे कारण एवढेच की, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर ते काही महत्वाच्या आस्थापना गुजरातमध्ये नेण्याचा बेत आखत आहेत, अशा बातम्या येऊ लागल्या.

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र, पालघर येथील नॅशनल मरीन पोलीस अकॅडमी गुजरातमध्ये हलवण्यात आल्या. अनेक उद्योग गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. नुकतेच भाजपशासित उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबईच्या दौर्‍यावर आले होते. महाराष्ट्रातील उद्योजकांना उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी त्यांनी उद्योजकांशी चर्चा केली. त्यातही त्यांची मुंबईतील सिनेअभिनेते आणि निर्मात्यांशी झालेली भेट जास्त गाजली. योगींनी मुंबईसारखी सिनेसृष्टी उत्तर प्रदेशात नोएडा येेथे उभारण्याची योजना तयार केली आहे. तिच्या उभारणीसाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी योगींनी मुंबईतील काही आघाडीच्या चित्रपट कलाकार आणि निर्मात्यांशी चर्चा केली आणि उत्तर प्रदेशमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर त्याविरोधात योगी मुंबईत ज्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये उतरले होतेे, त्यासमोर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवेसना आणि मनसे यांनी योगींच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध केला. योगी हे मुंबईतील सिनेसृष्टी उत्तर प्रदेशात नेऊन मुंबईचे महत्व कमी करू पाहत आहेत, असा त्यांचा आरोप होता. पण काय गंमत आहे पहा, महाराष्ट्राचे कुठल्याही पक्षाचे मुख्यमंत्री उद्योजकांनी राज्यात गुंतवणूक करावी, यासाठी विदेशात जातात आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आपल्या राज्यात गुंतवणूक नेण्यासाठी महाराष्ट्रात येतात. योगीच नव्हे तर गुजरात, बिहार तसेच अन्य राज्यांचे मुख्यमंत्री यापूर्वी महाराष्ट्रातील उद्योजकांशी चर्चा करून आपल्या राज्यांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आलेले आहेेत.

- Advertisement -

याचबरोबर इतर राज्यांतील लोक मोठ्या प्रमाणात केवळ मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात पोटापाण्यासाठी आणि आपले नशीब काढण्यासाठी येत असतात. त्यात कालच्या आणि आजच्या मोठ्या सिनेकलाकार आणि निर्मात्यांचाही समावेश आहे. अगदी बांगलादेश आणि पाकिस्तानातूनही लोक इथे येत असतात. त्यांना त्यांच्या राज्यांमध्ये, आपल्या देशांमध्ये आपले नशीब का काढता आले नाही, त्याचा विचार योगी आदित्यनाथ आणि इतर राज्यांच्या नेत्यांनी करायला हवा. दुसर्‍या बाजूला मुद्दा असा आहे की, महाराष्ट्राचे कुठल्याही पक्षाचे मुख्यमंत्री कधी इतर राज्यांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गेलेले दिसणार नाहीत किंवा इतर राज्यांमध्ये नोकरी व्यवसायासाठी जाणार्‍या मराठी लोकांचे प्रमाणही खूप कमी आहे. मार्च २०२० मध्ये जेव्हा कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला, त्यावेळी लाखोंच्या संख्येने परप्रांतीय लोक आणि मजूर आपापल्या राज्यांकडे वाट फुटेल त्या दिशेने जात होते. त्याच वेळी इतर राज्यांमधून महाराष्ट्रात येणार्‍या मराठी माणसांचे प्रमाण अगदीच नगण्य होते. फक्त मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्राच्या अगदी तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा परप्रांतातील लोक आपल्या पोटापाण्यासाठी मिळेल ते काम करत असतात. काही लोक छोेटे छोटे धंदे करत असतात. लॉकडाऊन झाल्यावर हे लोक केवळ मुंबईतूनच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध भागातून आपल्या राज्यांमध्ये जायला निघाले, यावरून महाराष्ट्र आधार या भारताचा, या सेनापती बापट यांनी लिहिलेल्या ओळी किती समर्पक आहेत, हे दिसून येते.

पाकिस्तानमधून येऊन कसाब टोळीने २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर हल्ला करून अनेकांची हत्या केली, तेव्हा त्या कंमाडो प्रशिक्षण दिलेल्या आधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या आत्मघातकी टोळीला नेस्तनाबूत करण्याचे काम महाराष्ट्रातील धाडसी मराठी पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचार्‍यांनी केले. त्यासाठी काहींनी लढता लढता हौतात्म्य पत्करले. यामध्ये एकही अमराठी अधिकारी शहीद झालेला नाही. मुंबईतील अनेक गोष्टींचे आकर्षण बाहेरच्या राज्यातील लोकांना वाटते, पण त्या मुंंबईसाठी लढण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आघाडीवर मराठी माणूसच असतो. इतकेच काय तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हा भेट म्हणून मराठी माणसांना कुणी दिलेला नाही. त्यासाठी इथल्या बुद्धिजीवी विचारवंतानी, पत्रकारांनी, राजकीय नेत्यांनी आणि सर्वसामान्य मराठी माणसांनी दीर्घकाळ लढा दिला होता. त्यात १०७ मराठी बांधव शहीद झाले होते. मराठी माणसांनी सगळ्या गोष्टी या आपले रक्त सांडून मिळविलेल्या आहेत. महाराष्ट्रात अमराठी उद्योजकांची संख्या मोठी आहे. यात बरेच जण पिढीजात उद्योजक आहेत. मराठी माणसे ही पिढीजात लढवय्ये आहेत.

- Advertisement -

तराजूपेक्षा त्यांनी तलवारीवर जास्त प्रेम केलेले आहे. तशीच त्यांची परंपरा राहिलेली आहे. बरेच वेळा इतर राज्यांमधील लोक आणि विचारवंत अशी टीका करतात की, मराठी लोक लगेच इतिहासात शिरतात. पण त्यांनी एक लक्षात घ्यायला हवे की, मराठी लोकांना इतिहास आहे म्हणून ते इतिहासात शिरतात. मराठ्यांचा इतिहास हा उद्योगधंद्यांचा नव्हता, पण उद्योगधंदे वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार करण्याचा होता आणि आहे. त्यामुळे देशभरातून इथे व्यवसाय, उद्योग करण्यासाठी आलेल्या लोकांची भरभराट झाली. त्यांचे उद्योग वाढत गेले. आजही इतर राज्यांमधील बरेच उद्योजक महाराष्ट्रभर आहेत. त्यांच्या उद्योगांची वाढ होत आहे. याचे कारण महाराष्ट्रातले राज्यकर्ते आणि इथली माणसे त्यांना योग्य ते सहकार्य करतात, हे लक्षात घ्यायला हवे. हेच उद्योगक आपल्या राज्यांमध्ये जाऊन मोठे उद्योग का उभे करू शकले नाही. देशाची राजधानी दिल्ली असली तरी आपले नशीब काढण्यासाठी लोक मुंबई आणि महाराष्ट्राकडे धाव घेत असतात.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या हिंदी भाषिक राज्यांतून सगळ्यात जास्त देशाचे पंतप्रधान झाले, तर मग गेल्या सत्तर वर्षात या राज्यांना मोठी प्रगती का साध्य करता आली नाही, याचा विचार तिथल्या राज्यकर्त्यांनी करायला हवा. तिथल्या लोकांनी करायला हवा. महाराष्ट्रात अनेक समाजधुरीणांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात झोकून देऊन काम केलेले आहे. महाराष्ट्राच्या समाजमनावर समर्पणाचे संस्कार केलेेले आहेत. म्हणूनच महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हटले जाते. महाराष्ट्र सगळ्याबाबतीत देशाला नवी दिशा देत असतो. प्रत्येक राज्याने आपला विकास करण्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत. त्यासाठी प्रगत राज्यांकडून त्यांनी शिकायला काहीच हरकत नाही. कारण आपण सगळे संघराज्य संकल्पनेखाली देश म्हणून एकत्र आहोत. पण हे करत असताना ज्यांनी प्रगती साध्य केलेली आहे, त्यांचे गुण आणि वृत्ती आपल्याला आत्मसात करावी लागेल. हे इतर राज्यांमधील राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवे. कारण झाड चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी तिथली माती आणि आजुबाजूचे वातावरण त्याला पोषक असावे लागते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -