Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai

आहे मनोहर तरी…

महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा ध्यास घेऊन शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांच्या पक्षाला लोकांनी सुरुवातीला भरभरून प्रतिसाद दिला, पण पुढे त्यांच्या पक्षाला अनपेक्षित उतरती कळा लागली. महाराष्ट्राची एकहाती सत्ता माझ्या हाती द्या, असे म्हणणार्‍या राज यांना आता विरोधी पक्षपद देण्याची मागणी लोकांकडे करावी लागत आहे. सगळे मनोहर असूनही असे का होते? हे खरोखरच अनाकलनीय आहे.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता नेहमीच्या उत्साहात पुन्हा एकदा राज्याच्या विधानसभेच्या रणमैदानात उतरले आहेत. त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत सत्ताधार्‍यांच्या धोरणांच्या ठिकर्‍या उडवत आहेत. आपली चीड आणि राग व्यक्त करत आहेत. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत आहे. नेहमीप्रमाणे राज ठाकरे यांची भाषणे प्रसारमाध्यमांना सगळ्यात जास्त टीआरपी मिळवून देत आहेत. यावेळी मात्र नेहमीसारखी इतर पक्षांतील नेत्यांची मिमिक्री करणे राज यांनी कमी केले आहे. राज ठाकरे यांची सभा म्हणजे अक्षरश: प्रचंड जल्लोष आणि जोश यांंनी भरलेला आणि भारलेला नेत्रदीपक सोहळा असतो, पण इतके सगळे असूनही प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मात्र त्यांची भाषणे ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी करणारा मतदार त्यांच्या इंजिनाचे बटन दाबत नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षाची गाडी काही पुढे धावत नाही.

राज ठाकरे आपल्या भाषणांमध्ये समोरील समुदायाला उद्देशून म्हणत असतात, इतके सगळे पाहून तुम्हाला चीड कशी येत नाही. तुम्ही शांत कसे राहता, पण ही चीड त्यांच्या मनातील असते. कारण इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही माझे भाषण ऐकायला येता, पण मतदानाच्या दिवशी तुम्हाला माझ्या पक्षाचा विसर कसा पडतो, हाच प्रश्न ते समोरील समुदायाला अप्रत्यक्षपणे विचारत असावेत. लोक आपली भाषणे ऐकण्यासाठी मोठी पसंती देतात, पण निवडणुकीत आपल्याला का पसंती देत नाहीत, या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळेनासे झाले आहे, असेच त्यांचा प्रसारसभांमधील भाषणांचा संतप्त सूर दाखवून देत आहे.

- Advertisement -

तसे पाहिले तर राज ठाकरे यांच्याकडे एका नेत्याला रुढार्थाने लागतात, त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व रुबाबदार आहे, आवाज भारदस्त आहे, भाषणशैली सडेतोड आणि समोरच्या समुदायाला भारावून टाकणारी आहे. विरोधकांवर आरोप करताना ते त्याविषयीचे पुरावे देतात. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत तर त्यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ या मोहिमेला असा काही जबदरस्त प्रतिसाद मिळत होता की, असे वाटत होते की, भाजपचे काही खरे नाही, पण प्रत्यक्ष जेव्हा लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्यावेळी राज ठाकरे यांच्या आक्रमक प्रचाराचा काहीही उपयोग झालेला नव्हता. सगळ्या गोळ्या हवेत विरून गेल्या होत्या असेच दिसून आले. मोदी आणि शहा यांच्यावर राज ठाकरे यांनी अक्षरश: आग ओकली होती, पण लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लोकांनी भाजपला पूर्वीपेक्षा जास्त जागांनी केंद्रातील सत्ता दिली. लोकसभेचा तो निकाल पाहून राज ठाकरे यांनी हा निकाल केवळ अनाकलनीय आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावेळी सुरुवातीला त्यांनी भाजपचा हा विजय मतदानयंत्रांतील केलेल्या बदलामुळे शक्य झाला आहे. निवडणुका मतपत्रिकांवर घ्या, अशी मागणी केली. त्यासाठी ते ममता बॅनर्जींना भेटले.

निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांना भेटले, पण पुढे निवडणूक आयोगाने ती मागणी फेटाळून लावली. त्यामुळे त्याचा काही उपयोग होणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. जेव्हा राज ठाकरे अनाकलनीय हा शब्द वापरतात तेव्हा मोदी-शहांच्या विरोधात पुरावे दाखवून आकाश पाताळ एक केले तरी लोक मोदींनाच का मते देतात, हेच कळेनासे होते, हीच अनाकलनीयता राज ठाकरे यांच्या मनातून व्यक्त होत असावी. राज ठाकरे लहानपणापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावाखाली वाढले. बाळासाहेबांचे सगळे गुण त्यांनी आत्मसात केले. त्यामुळे प्रतिबाळासाहेब अशीच त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती. पुढे बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या प्रमुखपदी आणल्यानंतर राज ठाकरे बाजूला झाले. ते शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. त्यावेळी प्रतिबाळासाहेब या त्यांच्या प्रतिमेमुळे लोकांना त्यांच्याबद्दल आकर्षण वाटले. त्यामुळे त्यांंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लढवलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत १३ आमदार निवडून आले. त्यामुळे हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणावर लवकरच आपला प्रभाव निर्माण करून सत्तेची सूत्रे हाती घेणार अशी शक्यता वाटू लागली होती, पण पुढे त्यांच्या पक्षाला उतरती कळा लागली. त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना उभ्या केलेल्या उमेदवारांना विजय मिळणे तर दूरच, त्यांची डिपॉझिट्स जप्त होऊ लागली. हे असे का होत आहे, हे खरोखरच अनाकलनीय आहे. राज ठाकरे यांची अवस्था आहे मनोहर तरी, अशी झालेली आहे. एकहाती सत्ता मागणार्‍या नेत्याला आज विरोधी पक्ष होण्यासाठी मते मागण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी उसळते, पण त्यांच्या पक्षाचे निवडून आलेले मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकही त्यांच्यासोबत राहू शकले नाहीत. याला काय म्हणावे. राज ठाकरे यांच्याविषयी प्रचंड आकर्षण वाटणारे लोक जेव्हा त्यांच्या जवळ जातात, तेव्हा त्यांचा असा अपेक्षाभंग कशामुळे होतो, ज्यामुळे त्यांना राज यांच्यापासून दूर जावेसे वाटते. राज यांनी बाळासाहेबांकडून सगळे गुण घेतले, पण त्यांच्याकडे आलेली माणसे जोडून ठेवण्याचा गुण ते बाळासाहेबांकडून घ्यायला विसरले का, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. बाळासाहेबांना जेव्हा सामान्य शिवसैनिक भेटायला जाई तेव्हा ते स्वत: उभे राहून त्याचे स्वागत करत, असे जुने शिवसैनिक सांगतात. राज ठाकरे असा जिव्हाळा जपण्यात कमी पडत आहेत का? राज यांच्यासारखे उद्धव ठाकरे तडफदार नाहीत, म्हणून राज यांच्यामागे आलेल्या शिवसैनिकांना उद्धवच चांगले का वाटू लागले. ते पुन्हा शिवसेनेत का गेले? खरे तर राज ठाकरे यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे.

शरद पवार यांचे आता ऐंशी वय आहे. तरीही ते प्रचारासाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यांची भाजपला भीती वाटत आहे. त्यांनी राज यांनी पक्ष काढला तेव्हा एक सल्ला दिला होता. पक्ष काढल्यानंतर सकाळी लवकर उठावे लागते. कार्यकर्ता जोपासावा लागतो. त्यावेळी राज यांनी शरद पवारांची खिल्ली उडवली होती. खरे तर शरद पवारांच्या सल्ल्यावर त्यांनी गांभीर्याने विचार करायला हवा. कारण एकदा गांभीर्य संपले की, लोक त्या व्यक्तीला गांभीर्याने घेत नाहीत. केवळ मनोरंजनासाठी सभांना मोठी गर्दी करतात. नेता आणि अभिनेता यांच्यामध्ये हाच फरक आहे. अभिनेत्याला ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठीही लोक मोठी गर्दी करतात, पण त्याला कुणी निवडून देत नाही. राज ठाकरे यांनी नेता आणि अभिनेता याच्यातील फरक लक्षात घेतला तर त्यांच्या बोलण्यावर लोकांचा विश्वास बसेल आणि लोक त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून देतील.

- Advertisement -