गांधीविरोधाची नियोजनबद्ध सांप्रदायिक खेळी!

धर्मसंसदेतील गांधीजींना होणारी शिवीगाळ असो किंवा गांधीजींच्या मारेकर्‍यावरील चित्रपटाचा विषय असो, गांधीविरोधातील निखारा जळता ठेवण्यामागील राजकीय कारणेच प्रामुख्याने आहेत. त्यात कमालीचे आश्चर्यकारक असे नियोजनात्मक सातत्य पाहायला मिळते. गांधीजींच्या मारेकर्‍यांचे समर्थन करताना, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविरोधातील गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील गांधी, भगतसिंग यांच्याविरोधातील गांधी, आणि जहालवाद्यांविरोधातील गांधी, असे चेहरे बदलून गांधीजींचा विरोध केला जातो. गांधीविरोधामागील आपली सांप्रदायिक भूमिका समोर थेट येऊच नये यासाठी केलेले हे प्रयत्न असल्याचे स्पष्ट असते.

प्रजासत्ताकाची ७२ वर्षे पूर्ण केलेल्या भारतासमोरील आव्हाने मोठी झालेली असताना या आव्हानांचा सामना करण्यासाठी अनेकविध मार्ग निवडावे लागणार आहेत. हे मार्ग लोकशाही, सार्वभौमत्व अबाधित ठेवून लोककल्याणकारी राज्य स्थापनेच्या वाटेनेच जाणारे असायला हवेत, हे स्पष्ट आहे. मात्र देशातील राजकीय सत्ताकारणात कधी नव्हे तेवढा तीव्र सांस्कृतिक सत्तेचा वापर होऊ लागला आहे. त्या अनुषंगाने संस्कृती बदलाचे प्रयत्न ंहोत आहेत. त्यातूनच भिन्न मतप्रवाहांमध्ये सुरू झालेले द्वंद्व रोखणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे त्याचा लोकशाहीवरील होणारा आघात कमी करण्याचे आव्हान देशातील सूज्ज्ञ नागरिकांसमोर उभे राहिले आहे.

भारताच्या संविधानसभेत सार्वभौम लोकशाही राष्ट्र म्हणून देश आकाराला येत असताना संसदीय कार्यप्रणालीवर महात्मा गांधीजींचा प्रभाव मोठा होता. ही व्याप्ती संविधानसभेतील काँग्रेसच्या बहुमतामुळेही होतीच त्याशिवाय तत्कालीन संविधानसभेत काँग्रेसविरोधी गटांचाही काँग्रेसला राजकीय विरोध असतानाच गांधीजींच्या विचारांविषयी मात्र सहमती… (प्रश्नचिन्ह) असल्याचे चित्र होते. काँग्रेसचा राजकीय चेहरा हा महात्मा गांधीजींच्या इतिहासावरील प्रभावाचाच आजवर राहिलेला आहे. काँग्रेसच्या एकाहाती सत्तेविरोधातील जनमत आणीबाणीच्या काळात पहिल्यांदा रस्त्यावर उतरून आक्रमक झाले. त्यानंतर काँग्रेस आणि पर्यायाने गांधीविरोध वाढल्याचे स्पष्ट व्हावे. गांधीविरोधाला तत्वज्ञानाची झालर पांघरून महात्माजींच्या हत्येच्या समर्थनाला चळवळ आणि विचार वादाचे स्वरुप देण्याचा प्रयत्न होत आहे.

गांधीजींच्या अहिंसेला विरोध, गांधीजींच्या सामाजिक सुधारणेच्या चातुर्वर्ण्य धार्जिण्या भूमिकेला विरोध आणि गांधीजींच्या धर्मविषयी भूमिकेला विरोध, असा अनेकविध स्तरावर गांधीविचारांना विरोध इतिहासात झालेला आहे. महात्मा गांधींच्या चातुर्वर्ण्य अबाधित ठेवण्याच्या आणि आत्मशुद्धीच्या संकल्पनेवरील सामाजिक सुधारणेच्या भूमिकेला विरोध करणार्‍या लढ्याचे नेतृत्व डॉ. आंबेडकरांकडे होते. तर देशाच्या फाळणीनंतर निर्माण झालेल्या धार्मिक उन्मादातून झालेल्या दंगलींचा ठपका गांधीजींवर ठेवणार्‍यांचा एक गट होता. हा गट त्या काळी झालेल्या धार्मिक दंगलींसाठी जरी गांधीजींना जबाबदार ठरवत होता, तरीही त्या मागचा खरा चेहरा हा या दंगलीत देशातील विशिष्ट जात, धर्मसमुहांच्या झालेल्या हत्यांना जबाबदार गांधीजीच असल्याचे प्रकर्षाने ठरवणारा होता.

म्हणूनच गांधीजींच्या हत्येचे समर्थन करून या हत्येमागील कारणीमीमांसेला विचारवादाचे नाव देणारे तत्वज्ञान रुजवण्याचा प्रयत्न अधूनमधून केलेला आढळतो. हा विचार गांधीविरोधाचे, कधीकधी हत्येचे समर्थन करण्यापर्यंतही नेला जातो. म्हणून महात्मा गांधींंच्या विचारविरोधांचा सर्वसमावेशक चेहरा आपलाच असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न या गटाकडून केला जातो. धर्मसंसदेतील गांधीजींना होणारी शिवीगाळ असो किंवा गांधीजींच्या मारेकर्‍यावरील चित्रपटाचा विषय असो, गांधीविरोधातील निखारा जळता ठेवण्यामागील राजकीय कारणेच प्रामुख्याने आहेत. त्यात कमालीचे आश्चर्यकारक असे नियोजनात्मक सातत्य पाहायला मिळते. गांधीजींच्या मारेकर्‍यांचे समर्थन करताना भगतसिंह यांच्याविरोधातील गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील गांधी आणि जहालवाद्यांविरोधातील गांधी, असे बदलणारे चेहरे लावून गांधीजींचा विरोध केला जातो. गांधीविरोधामागील आपली सांप्रदायीक भूमिका समोर थेट येऊच नये यासाठी केलेले हे प्रयत्न असल्याचे स्पष्ट असते.

देशाच्या राजकीय स्वातंत्र्यलढ्यात मवाळवादी काँग्रेस आणि जहालवादी काँग्रेस असे दोन समांतर मतप्रवाह स्वातंत्र्यलढ्याआधीपासून देशात होते. मवाळवादी काँग्रेसचे प्रतिनिधीत्व अहिंसेच्या तत्वावर गांधीजींनी केले होते. तर जहालवादी गटांचे नेतृत्व गांधीजींच्या आधी लोकमान्य टिळकांकडे होते. मात्र असे असताना आणखी एक गट होता, जो जहालवादी असतानाच बंदुकीला बंदुकीने उत्तर देण्याची धमक ठेवून होता. स्वातंत्र्याच्या आकांक्षेने भारलेल्या आजच्या बलिदानातून उद्याच्या स्वातंत्र्याची पहाट होते, डाव्या, समाजवादी आणि प्रामुख्याने नास्तिक विचारांचा हा गट भगतसिंगांच्या नेतृत्वाखाली काम करत होता. तर आझाद हिंद सेनेची स्थापना करून सुभाषचंद्र बोस यांनी सैनिकी युद्धाच्या बळावर देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचे स्वप्न पाहिले. ही मंडळी युद्ध आणि बलिदान किंवा स्वातंत्र्यासाठी रक्त मागणारी जरी असली तरी ती गांधीजींची हत्या किंवा देशातील कुठल्याही नेत्याच्या हत्येपर्यंत जाणार्‍या तत्वज्ञानाचे समर्थन करणारी कधीच नव्हती.

त्यांचा विरोध होता तो गांधींच्या अव्यवहारी आणि त्यांच्या विचारांनुसार टोकाच्या असलेल्या अहिंसेला, मात्र म्हणून गांधीच संपवायला हवेत असा विचार किंवा त्याची अंमलबजावणी त्यांनी केलेली नाही. असे असले तरी गांधीजींची हत्याच झाली, परंतु गांधीजींची हत्या करणारा गट गांधीजींच्या विरोधकांचा वापर त्यांच्या मारेकर्‍यांचे समर्थन करण्यासाठी करीत असल्याचे चित्र अधून मधून पाहायला मिळते. यामागे गांधीजी आणि पर्यायाने सद्य:स्थितीतील काँग्रेसच्या राजकारणाला शह देण्याचाच प्रयत्न आहे. स्वातंत्र्यानंतर देशात गांधीविरोधक आणि गांधीसमर्थक अशा दोनच प्रमुख आघाड्यांनी राजकारण चालवले आहे. केवळ सामाजिक सुधारणा नव्हे परिवर्तन प्रवर्तन आणि मानवी मनातील करुणेला साद घालणारी प्रज्ञा जागृत करणारा लढा बाबासाहेब आंबेडकर यांचा होता. त्यासाठी कायद्याचा आग्रह बाबासाहेबांचा असताना महात्मा गांधीजी सर्वणांच्या इच्छा आणि दयेवर आत्मशुद्धीच्या मार्गाने सामाजिक बदल होईल, असा आशावाद बाळगून होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील या लढ्याची चर्चा आजही सामाजिक बदलांच्या अनुषंगाने केली जाते. असे असतानाही गांधीजींच्या हत्येचे समर्थन करण्याचा प्रयत्न गांधीविरोधातील या लढ्यात आजही नाही, हे या लढ्याच्या वैचारिक भूमिकेचे यशच आहे.

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी ब्रिटिशांनी दिलेली फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी महात्मा गांधीजींनी जोरकस विरोध केल्याचे दिसत नाही. गांधीजी त्यावेळी देशातील प्रमुख नेते असताना त्यांच्या आक्रमक मागणी समोर भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांची फाशीची शिक्षा जन्मठेप किंवा सौम्य करता आली असती, अशी शक्यता मांडणारेही गांधीविरोधक आहेत. या मुद्याचा गांधीजींच्या विरोधात वापर करून कडवे धर्मवादी गांधीजींना डाव्यांचे विरोधकही ठरवतात आणि या मुद्यावर डावे आणि कट्टर धर्मवादी एकाच बाजूचे गांधीविरोधक असल्याचेही परस्पर ठरवले जाते. समाजमाध्यमांवर हे सोयीस्कर ऐक्य पहायला मिळते. दुसरीकडे पुणे करारातील डॉ. आंबेडकर आणि गांधीजींच्या विरोधातील संघर्षातही गांधीजींनी बेमुदत उपोषण करून डॉ. आंबेडकरांना पुणे करारावर सही करण्यासाठी हतबल केले, असा आरोप केला जातो. या माध्यमातून बाबासाहेबांचे आणि पर्यायाने शोषित गरीबांचे विरोधक असाही गांधीजींचा चेहरा उभा केला जातो.

गांधीजींना विरोध करताना गतकाळातील गांधीजींच्या भूमिकांची आठवण करून तत्कालीन गांधींच्या आडून आजच्या काँग्रेसला विरोध करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न करणारे आपले धर्मवादाचे राजकारण या इतिहासाच्या आडून रेटण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अशा प्रवृत्ती देशात फोफावणे हे एकूणच जनतेच्या हितासाठी चांगले नसते, त्यातून समाजातील विविधतेचा समतोल सुटत जातो. समाज एका बाजूला झुकत जातो. कारण कट्टरवादी लोकांचा प्रभाव वाढू लागतो. भारतासह कुठल्याही देशाचा इतिहास पाहिला तर असे दिसून येईल की, धर्मवाद आणि कट्टरवाद यांचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा देशाचे नुकसान होते, आणि सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल होते.

आधुनिकतेचा मागमुस राहत राहत नाही. देशाचा प्रवास उलट्या दिशेने सुरू होते. अफगाणिस्तानातील तालिबानची सध्याची राजवट आणि त्या देशातील लोकांची स्थिती हे त्याचे जळजळीत उदाहरण आहे. त्यामुळे लोकांनीच सावध होण्याची गरज असते. बरेचदा राजकीय नेते मंडळी मतांच्या राजकारणासाठी धार्मिक कट्टरवाद्यांचा वापर करून घेतात, पण पुढे हे धार्मिक कट्टरवादी राजकीय लोकांच्या हाताबाहेर जातात. त्यांना जुमानत नाहीत. तेव्हा राजकीय लोकांना त्यांच्यापुढे गुडघे टेकण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशाच प्रवृत्तीचा जेव्हा अतिरेक होतो, तेव्हाच त्याची परिणती एखाद्या नेत्याच्या हत्येमध्ये होते.

गांधीजींनी घेतलेल्या भूमिकांविषयी मतभेद होते आणि आहेत. मात्र भारतीय प्रजासत्ताकाच्या निर्माणातील त्यांचे योगदान वादातीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेविषयी शंका नव्हतीच, तरीही त्याकाळात त्यांच्या दलितपणावरून त्यांच्या विद्वत्तेवर शंका घेणारे लोक होते. पण त्यावेळी डॉ. आंबेडकर यांना घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य सोपवताना महात्मा गांधींनी अशी साशंकता व्यक्त करणार्‍या सर्वपक्षीयांना धुडकावून लावले, त्यांनी अशा प्रवृत्तींना दिलेली चपराक ही एकूणच देशाच्या पुढील वाटचालीसाठी महत्वाची होती. कारण भारतीय नागरिकाला त्याच्या क्षमतेप्रमाणे प्रगती करण्याचा वाव मिळाला पाहिजे, तो त्याच्या बुद्धिमत्तेवरून ठरवला जाईल, तो त्यांच्या तथाकथित जातीवरून नाही, हा पायंडा गांधीजींनी घालून दिला.

भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या देशाप्रतीचे समर्पण आणि बलिदान हा सर्वोच्च प्रेरणेचा विषय आहे. मात्र गांधीविरोध करताना या महनीय हुतात्म्यांना संकुचित सांप्रदायिक लढ्यात आपल्या बाजूने उतवरण्याचे प्रयत्न करून त्यांचे सत्तेसाठी राजकीयीकरण करणे चुकीचे आहे. गांधीजी की, नेताजी सुभाषचंद्र बोस, गांधीजी की स्वातंत्र्यवीर सावरकर, गांधीजी की भगतसिंह आणि गांधीजी की डॉ. आंबेडकर अशी तुलना करत गांधीविरोधातील इतर प्रवाहांना सोयीनुसार एकत्र करणारे आणि काँग्रेस पक्षाला शह देण्यासाठी भविष्यातील नव्या तत्वज्ञानाची निर्मिती करू पाहाणारे हे साळसूद गांधीविरोधक आहेत. हे जसे साळसूद गांधीविरोधक आहेत, तसेच ते साळसूदपणे गांधीसमर्थकही असतात. गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वाचा जगभर ढोल पिटताना गांधीविरोधाचाही सोयीस्कर वापर करतात. याला मुँह मे गांधी और बगल मे छुरी, असेच म्हणावे लागेल.