घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकिंगमेकर पवारांची सुप्रिय सफाई !

किंगमेकर पवारांची सुप्रिय सफाई !

Subscribe

राज्यातील तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजप जंग जंग पछाडत आहे, पण गेले वर्षभर त्यांनी केलेल्या प्रयत्नात त्यांना यश आलेले नाही. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महत्व कमी करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी महिला मुख्यमंत्री यावी आणि ते पवार करू शकतात, अशी कंडी पिकवली आहे. पण त्याला स्पष्ट शब्दात उत्तर देताना राज्यातील किंगमेकर असलेल्या शरद पवारांनी सुप्रिय सफाई दिली. सुप्रिया सुळे यांना राज्याच्या नव्हे तर राष्ट्रीय राजकारणात रस आहे, असे सांगून भाजपच्या पंखातील हवा काढली. पण महाराष्ट्रात पवार है तो कुछ भी मुमकीन हैं, हे भाजपच्या नेत्यांनाही माहीत आहे.

‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात शरद पवार यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी झाले. भाजपचे नेते आशिष शेलार यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री यावी, अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे. यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीचेही शंभर टक्के समर्थन असू शकते. शरद पवार हे मोठ्या मनाचे मोठे नेते आहेत. मला कुणाशी तुलना करायची नाही. आशिष शेलार यांचे हे विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांना उद्देशून होते, हे उघड गुपित होते. सुप्रिया सुळे जेव्हापासून सक्रिय राजकारणात आल्या त्यावेळपासून शरद पवारांचा राजकीय वारसदार कोण यावरून विचारणा होत राहिलेली आहे. हा विषय अधूनमधून डोके वर काढत असतो, पण पवार कुटुंबीय त्याला सफाईने बगल देत असतात.

आशिष शेलार यांनी अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांचे नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुचविल्यामुळे महाराष्ट्रातील किंगमेकर असलेले शरद पवार हे पुढील काळात सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवणार का, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी याविषयी स्पष्टीकरण देताना, सुप्रिया सुळे यांना राज्याच्या राजकारणात रस नाही, त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. प्रत्येकाची आवड असते, असे सांगितले. अर्थात, ही गोष्ट पवार प्रथमच स्पष्ट करत आहेत, अशातला भाग नाही. सुप्रिया सुळे राजकारणात आल्यापासूनच याबाबत चर्चा सुरू झाली होती, त्यावर सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणाची आवड आहे, त्यांना आदर्श खासदार म्हणून दोन वेळा पुरस्कार मिळालेला आहे, असे पवार म्हणाले. इतकेच नव्हे तर सुप्रिया सुळे यांनीदेखील एकदा संसदेत काम करायची सवय झाली की, पुन्हा राज्य पातळीवर येताना अवघडल्यासारखे वाटते. कारण राष्ट्रीय पातळीवर व्यापक विचार करायची सवय तुम्हाला लागते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आपल्याला रस नाही. मी लोकसभेवरच निवडून जाणार. अगदी २०२८ ची लोकसभा निवडणूकही आपण बारामतीतून लढवणार आहोत, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. म्हणजेच काय तर सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणात रुची आहे, हे त्यांनीही स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

मुद्दा असा आहे की, सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणाची आवड असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पातळीवर विविध राज्यांमध्ये प्रसार करण्याचा शरद पवार यांनी प्रयत्न केला, पण त्यात त्यांना फारसे यश आले नाही. अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राबाहेर काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका लढवल्या, पण तिथे त्यांचा टिकाव लागला नाही. क्वचितच एखादा उमेदवार निवडून येतो, नाही तर बरेच वेळा बहुतांश उमेदवारांची डिपॉझिट्स जप्त होतात. सुप्रिया सुळे यांनी खासदार म्हणून संसदेत वावरताना आपल्या वक्तशीरपणाची आणि विविध विषय मांडण्याच्या हातोटीची उत्कृष्ट छाप पाडली आहे. त्यांनी संसदेतील विविध पक्षांच्या खासदारांशी सलोख्याचे संबंध जोपासले आहेत. त्यामुळे दिल्लीत त्यांची चांगली प्रतिमा आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा प्रभाव हा महाराष्ट्रात आहे. राष्ट्रीय पातळीवर नाही, म्हणजेच दिल्लीत नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्रातील आपला तळ अधिक मजबूत करावा लागेल, कारण जेवढी त्यांच्या पक्षाच्या खासदारांची संख्या वाढेल, तितका त्यांचा संसदेतील प्रभाव वाढेल.

महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे किंगमेकर मानले जातात. त्या मागे त्यांचा राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आणि मराठा लॉबीचे प्रमुख या गोष्टी कारणीभूत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे कुणाला स्वप्नातही वाटले नसेल, पण पवारांनी ते करून दाखवले. अजित पवार हे शरद पवार यांचे राजकीय वारसदार मानले जात असले तरी पवारांनी त्यांना आवश्यक ती स्पेस दिलेली नाही, असेच वेळोवेळी दिसून आले. त्यामुळे त्यांची कोंडी झाल्याचे त्यांनी घेतलेल्या काही पवित्र्यांमुळे दिसून आले. शरद पवारांच्या मुख्य कार्यक्रमाला अचानक अजित पवार गायब असायचे, त्यातून ते आपली नाराजी व्यक्त करत असत. ती खदखदणारी नाराजी पराकोटीला पोचून शेवटी वर्षभरापूर्वी त्याचा स्फोट झाला. अजित पवार यांनी पहाटेच्या वेळी राजभवनावर जाऊन भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वखाली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

- Advertisement -

अजित पवार हे मराठा लॉबीतील एक मोठे प्रस्थ मानले जाते. त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि प्रशासनावर वचक आहे. त्यांचा दबदबा आहे. त्यांच्या शब्दाला वचन आहे. त्यांनी आवाज दिल्यावर प्रशासकीय अधिकारी भराभर कामाला लागतात. खरे तर अशा अजित पवार यांनी इतके मोठे बंड करून मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असती तर एक वेळ मान्य करण्यासारखे होते, पण घेऊन घेऊन त्यांनी घेतली कुठली तर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ. हे पद तर त्यांच्याकडे अगोदरही होतेच. त्यामुळे त्यात काही नवलाई आणि विशेष नव्हते. एवढे बंड करून दुय्यम स्थान स्वीकारल्यामुळे खरे तर त्यांचे हसे झाले. पहिल्यांदा हे सगळे शरद पवार यांनीच घडवून आणले अशी शंका लोकांना आली, कारण पवारांनी यापूर्वी अशी स्थित्यंतरे घडवून आणलेली होती. पुलोदचे सरकार स्थापन करताना त्यांनी जनसंघाच्या चार आमदारांना आपल्यासोबत घेतले होते. त्यामुळे पवार काहीही करू शकतात, असेच सगळ्यांना वाटते, पण अजित पवार यांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी केली यात शरद पवारांना हात नव्हता. हे पुढे दिसून आले. कारण अजित पवारांनी आपल्यासोबत असल्याचा दावा केलेले आमदार शरद पवारांच्या पाठीमागे येऊन उभे राहिले.

एका बाजूला शरद पवार आणि अजित पवार, तर दुसर्‍या बाजूला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे अशी काका पुतण्यांची जोडी आहे. दोघेही राजकारणात आपल्या काकांसोबत मोठे झाले. पण पुढे मात्र काकांनी आपल्या मुलांना राजकारणात पुढे आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुतणे बाजूला पडले. त्यानंतर काका पुतण्यात ताणाताण सुरू झाली. राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा पक्ष काढला. शिवाजी पार्कवरून स्वत:ला महाराष्ट्राच्या सेवेला वाहून घेतले. दुसर्‍या बाजूला अजित पवार यांनाही आपल्या महत्वाकांक्षांना काका महाराष्ट्रात वाव देत नाहीत, असे वाटू लागल्यामुळे त्यांच्याही नाराजीची धुसफूस अधूनमधून व्यक्त होत होती. पण शरद पवारांसमोर त्यांचे काही चालत नव्हते. त्यामुळेच त्यांनी काकांना धक्का देऊन भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न केला, पण तो काकांनी हाणून पाडला.

महाराष्ट्रात सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. भाजपच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास शिवसेनेमुळे हिरावला गेला. त्यामुळे ते आपल्या एकेकाळच्या मित्रावर अतिशय नाराज झालेले आहेत. त्यामुळे त्यांना ते नेहमी खिंडीत गाठण्यासाठी शर्थींचे प्रयत्न करत असतात. सरकार पाडण्यासाठी सगळा जोर एकवटत आहेत. पण त्यांना ते शक्य होत नाही. त्यामुळे ते महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये काही वितुष्ट निर्माण हाईल, यासाठी काही विधाने करत असतात. काँग्रेस तर रेसमध्ये नाहीच, त्यामुळे शिवसेना -राष्ट्रवादीत काही लावून दिले तर आपल्याला त्याचा फायदा होईल, असे त्यांना वाटत असावे. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरातून बाहेर पडत नाहीत. महाराष्ट्राची मुख्यमंत्री एक महिला व्हावी, अशा कंड्या पिकवत आहेत. पण राजकारणात चाणाक्ष असलेल्या किंममेकर शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना राज्याच्या नव्हे तर राष्ट्रीय राजकारणात रुची आहे, असे स्पष्ट करून सुप्रिय सफाई दिली आहे. तरीही पवार ऐन वेळी कुठला निर्णय घेतील, हे सगळ्यांच्या कल्पनेच्या पलीकडचे असते.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -