ममतांची आत्मघातकी नौंटकी

Biopic on mamta banerjee will come soon

पश्चिम बंगाल निवडणुकीची चुरस दिवसेंदिवस वाढतच आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. त्यातून आजवर आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झाडण्यात आल्यात. निवडणूक म्हटली की हे आलेच. पण बुधवारी मात्र निवडणूक प्रचारादरम्यान ममता यांच्या पायाला आणि मानेला दुखापत झाली. या दुखापतीचे राजकारण आता सुरू झाले आहे. ममता यांनी आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला. भाजपनेही प्रतिक्रिया देत ममता बॅनर्जी या राजकारणासाठी हल्ल्याचे खोटे वृत्त पसरवत असल्याचा आरोप केला. त्यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी भाजप नेत्यांचे एक शिष्टमंडळ कोलकात्यात निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांची भेट घेणार असल्याचेही सांगण्यात आले. ममता यांच्या दुखापतीची एक्सरे आणि एमआरआयव्दारे तपासणी करण्यात आली. यामध्ये ज्या उजव्या खांद्याला, मानेला दुखापत झाल्याचे एमआरआय स्कॅनमध्ये समोर आले आहे.

तर डाव्या पायाच्या टाचेला फॅक्चर झाल्याने प्लास्टर घालण्यात आले आहे. म्हणजेच ममता या ‘नाटक’ करत नसून त्यांच्या पायाला खरोखरच दुखापत झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र दुखापतीच्या वेदना होत असताना ममता यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचा जो बनाव उभा केला तो त्यांच्या पदाला शोभणारा नाही. ममता गाडीत बसत असताना बाहेर उभ्या असलेल्या ४ ते ५ समाजकंटकांनी दरवाजा ढकलल्याचा आरोप ममता यांनी केला आहे. यात तथ्य असते तर ते एखाद्याच्या मोबाइल कॅमेर्‍यात बंदिस्त झालेच असते. आज खेडोपाडी मोबाईल वापरला जातो. त्यामुळे ममता कोठेही जातात तेव्हा त्यांचा फोटो मोबाइलमध्ये काढण्यासाठी नेहमीच गर्दी होते. असे असतानाही ममता यांच्यावरील कथित हल्ला हा कोणाच्याही मोबाइल कॅमेर्‍यात बंदिस्त होऊ नये? त्या मुख्यमंत्री असल्याने त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली जाते.

त्यांच्या ताफ्यात १८ गाड्या होत्या. यात तीन एस्कॉर्ट कार, दोन इंटरसेप्शन कार, महिला पोलिसांची एक गाडी, रुग्णवाहिका, सुरक्षारक्षकांच्या तीन गाड्या, टेल कार आणि स्पेअर इंटरसेप्शन कारचा समावेश होता. चार पायलट कार ताफ्याच्या नेहमी पुढे असतात. यामध्ये डीएसपी आणि सब इन्स्पेक्टर दर्जाचे पोलीस अधिकारी असतात. मग इतक्या कडक बंदोबस्तात ममतांवर हल्ला होऊच कसा शकतो? शिवाय त्यांच्या समर्थकांचा गराडाही कायमच असतो. त्यामुळे त्यांच्यावर जर हल्ला झालाच असता तर आजवर हजारो साक्षीदार उभे राहिले असते. प्रत्यक्षात झाले मात्र उलटच. त्यांच्या कारजवळ उभ्या असलेल्या चित्तरंजन दास नावाच्या प्रत्यक्षदर्शी कार्यकर्त्याने असे काही घडलेच नसल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

घटना घडली तेव्हा चित्तरंजनदास तेथेच उभा होता. त्याच्या सांगण्यानुसार, मुख्यमंत्री त्यांच्या कारमध्ये बसलेल्या होत्या. पण दरवाजा उघडा होता. हा दरवाजा एका पोस्टरला आपटला आणि बंद झाला. कोणीही त्यांच्या कारचा दरवाजा ढकललेला नाही. दरवाजाकडे कोणीही उभे नव्हते. आणखी एक प्रत्यक्षदर्शी असलेली विद्यार्थीनी सुमन हिने सांगितले की, ममता यांना पाहण्यासाठी लोक जमा झाले होते. सर्वजण त्यांना घेरुन उभे होते. त्याचवेळी त्यांच्या मानेला दुखापत झाली. कोणी धक्का दिला नाही. त्यांची गाडी हळूहळू पुढे जात होती. या दोघांचे म्हणणे खरे मानले तर तृणमूलला या अपघाताचा किंवा हल्ल्याचा राजकीय फायदा होण्याची शक्यता कमीच आहे. दुसरीकडे मात्र आता पायाच्या दुखापती नंतर ममता या मोठ्या पेचात सापडल्या आहेत. निवडणूक पूर्व सर्व्हेमध्ये तृणमूलच्या बाजूने कल दिसत असताना त्यांच्या दुखापतीमुळे त्यांचा पक्ष पिछाडीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्या जायबंदी झाल्या असल्याने त्यांना डॉक्टरांनी पुढील दीड महिना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे त्यांच्या प्रचारसभांना मोठ्या प्रमाणात ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रमुख असल्याने त्यांच्याशिवाय विजय खेचून आणणे सध्याच्या परिस्थितीत तृणमूलच्या नेत्यांना जमणारे नाही. भाजपाने गेल्या काही महिन्यांपासून तृणमूलला चांगलीच टक्कर देण्यास सुरुवात केली आहे. सुवेन्दू अधिकारी यांच्यासह तृणमूलचे अनेक प्रमुख नेते भाजपने गळाला लावले आहेत. पश्चिम बंगालचे मैदान जिंकण्यासाठी ४० स्टार प्रचारकांची यादी भाजपने जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांसारख्या बड्या नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीप्रमाणे या निवडणुकीत जातीने लक्ष घालत आहेत.

‘साम, दाम, दंड, भेद’ या नीतीचा वापर या निवडणुकीतही भाजपकडून केला जात आहे. हे कडवे आव्हान परतवून लावण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी प्रत्यक्ष प्रचारसभा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुंकण्याची गरज आहे. मात्र, सध्याच्या घडीला तरी ही गोष्ट अवघड वाटत आहे. त्यांनी जरी डिजिटली संबोधित केले तरी त्याचा परिणाम कमीच असणार आहे. अशा परिस्थितीत आता सभास्थानी ममता आता थ्री व्हिलरवर पोहचतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातून सहानुभूती लाटण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. तसे बघितले तर आजच्या घडीला तरी तृणमूलचे पारडे जड दिसत आहे. मतदानपूर्व कलचाचणीत तृणमूलला निसटते यश मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या कलचाचणीप्रमाणे तृणमूलला ४२ टक्के मते मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

भाजपचा टक्का मात्र पहिल्या कलचाचणीतील ३७ टक्क्यांवरून ३४ टक्क्यांवर घसरल्याचे दिसून आले. डाव्या पक्षांची मतांची टक्केवारी १७ टक्क्यांवर गेली आहे. या चाचणीनुसार तृणमूलला राज्यातील एकूण २९४ जागांपैकी १५६ ते १५८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. त्यामुळे आता विरोधकांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ममता यांना विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढवावी लागणार आहे. ‘मी रोज चंडीपाठ करुनच घराबाहेर पडते. विरोधकांनी माझ्यासोबत हिंदुत्वाचे कार्ड खेळू नये’ अशी भावनिक वक्तव्य करुन फार काही साध्य होणार नाही. उलटपक्षी धर्मनिरपेक्ष किंवा अन्य धर्मियांची मते यातून कमी होऊ शकतात. वास्तविक धर्म, देव हे विषय सार्वजनिक नव्हे तर व्यक्तिगत भावनेचे आहेत. राजकारणासाठी आणि मते मिळवण्यासाठी त्याचा वापर होताच कामा नये. त्यामुळे धार्मिक विद्वेषाचे वातावरण आणि समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असते.

मात्र त्याचा विचार न करता असे वक्तव्य करुन ममता या धर्माचे जाहीर प्रदर्शन करण्याच्या भाजपच्या अजेंड्याच्या जाळ्यात अडकत आहेत. एकेकाळी पक्षाची राजकीय भूमिका व्यासपीठावरुन मांडली जायची. कोणाचा धर्म कोणता हे सवाल विचारले जात नसत. आता मात्र धर्माच्या नावाने उन्माद निर्माण केला जात आहे. त्यातूनही फार काही साध्य होत नाही हे लक्षात आल्यावर अपघातांना ‘हल्ले’ संबोधून राजकारणाची परिसीमा गाठली जात आहे. त्यातून फायदा तर होणार नाहीच, उलटपक्षी नुकसानच होईल. विशेषत: निवडणूक जवळ आली आणि निवडणूक प्रचार रंगात आला की, लोकमत आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक नाट्यमय खेळी खेळल्या जातात, काही वेळा त्या यशस्वी ठरतातही, पण प्रत्येक वेळी त्याचा उपयोग होईलच, असे नाही. यावेळी प. बंगालमध्ये भाजपने सर्वशक्ती पणाला लावली आहे. त्यामुळे ममतांनाही युक्त्या लढवाव्या लागत आहेत.