घरफिचर्समायमहानगर ब्लॉगभाजपच्या गुळाला मतलबी मुंग्या!

भाजपच्या गुळाला मतलबी मुंग्या!

Subscribe

एकेकाळी भाजपला जातीयवादी म्हणून उठसूठ हिणवणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बरेच नेते भाजपमध्ये डेरेदाखल होत आहेत. काल आपण भाजपवर कशा प्रकारची टीका केली याचा त्यांना पूर्ण विसर पडला आहे. त्यांची ही भूमिका पाहिल्यावर अनेकांना तोंडात बोट नाही तर हाती घालण्याची वेळ आली आहे. पण भाजपचा गूळ खाण्यासाठी या मतलबाच्या मुंग्या जमलेल्या आहेत, हे सुज्ञास सांगण्याची गरज नाही.

सध्या भाजपबद्दल इतर पक्षांच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांना भलतेच प्रेमाचे भरते आलेले आहे. त्यात प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांचा मोठा समावेश आहे. खरे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील गेली अनेक वर्षे राज्य केलेले पक्ष आहेत. त्यांच्या पक्षातील नेतेही राजकारणात मुरलेले आणि आर्थिकदृष्ठ्या संपन्न आहेत. तसेच याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपवर नेहमीच जातीयवादाचा आरोप केलेला आहे. जातीयवादी पक्ष सत्तेत येऊ नये, म्हणून आम्ही राज्यात आघाडी केलेली आहे, असेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते नेहमीच सांगत आलेले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे काँग्रेसमध्येच होते. पण सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे त्यांना काँग्रेस पक्ष सोडावा लागला. पण आपल्या एकट्याच्या बळावर महाराष्ट्रातील सत्ता मिळवणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी एकमेकांच्या विरोधात १९९९ साली निवडणूक प्रचार करूनही निवडणुकीनंतर आघाडी करून सत्ता काबीज केली. त्यामुळे एकमेकांच्या विरोधात प्रचार केलेल्या या दोन्ही पक्षांनी पुढे राज्यात पंधरा वर्षे राज्य केले. त्यावेळी विरोधात असलेले भाजप आणि शिवसेना हे पक्ष विस्कळीत झालेले होते. भाजपचे प्रभावी नेते प्रमोद महाजन यांचे निधन झाले होते. तर राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला होता. त्यामुळे विरोधात असलेल्या भाजप-शिवसेना यांचा जोर ओसरलेला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख तर भाजपवाल्यांना म्हणत असत की, तुम्ही विरोधी पक्षाची भूमिका चांगली निभावता, त्यामुळे तेच तुम्ही करत रहा. जेव्हा भाजप-शिवसेनेचे नेते सत्ताधार्‍यांच्या विरोधात कुठले आंदोलन करत त्यावेळी तो बरेचदा चेष्टेचा विषय ठरवला जात असे. कारण भाजप आणि शिवसेना यांच्याकडे केंद्रात आणि राज्यात प्रभावी नेतृत्व नाही, त्यामुळे पुढेही सत्ता आमचीच असणार, असा ठाम विश्वास काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत होता. भाजप आणि शिवसेना त्यांच्या खिजगणतीत नव्हती. त्यांची आपापसातच कुरघोडी चाललेली होती. काँग्रेसला कोंडीत पकडून त्यांच्यावर कशी कुरघोडी करता येईल, यासाठी राष्ट्रवादीचा आटापिटा सुरू होता. ते त्यांच्यातील सत्तास्पर्धेत मश्गुल होते.

- Advertisement -

भाजप आणि शिवसेनेची स्थिती राज्यात गलितगात्र झालेली होती. अशा स्थितीत नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व केंद्रीय पातळीवर आले. त्यानंतर देशातील आणि राज्यातील राजकारणाचा नूर बदलून गेला. मोदी लाटेने गुजरात व्यापले होते. पण आता ती लाट देश व्यापू लागली होती. ‘काँग्रेसमुक्त भारता’चा नारा, मोदींनी दिला. जनतेेने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि भाजप पहिल्यांदाच केंद्रात बहुमताने सत्तेत आली. बिगरकाँग्रेसी पक्ष केंद्रात बहुमताने सत्तेत येण्याची ही पहिलीच वेळ होती. या बहुमतामुळेच भाजपच्या पंखात नवे बळ आले. भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्या, कार्यकर्त्यांच्या मनातही नवा विश्वास निर्माण झाला. तर दुसर्‍या बाजूला केंद्रीय पातळी काँग्रेसकडे प्रभावी नेतृत्व नव्हते. मनमोहन सिंग यांचे वय झाले होते. राहुल गांधी हे अगदीच नवखे असल्यामुळे त्यांचा अनुभवी मोदींपुढे टिकाव लागणे शक्य नव्हते. केंद्रात काँग्रेसमध्ये प्रभावी नेतृत्व नसल्यामुळे राज्य पातळीवर काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली. पक्ष विस्कळीत झाला. काँग्रेसवर अवलंबून असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीतील मित्रपक्षांचा प्रभावही कमी झाला. कारण या पक्षांची भिस्त काँग्रेसवर होती.

महाराष्ट्रात एका बाजूला मोदी लाटेमुळे भाजप मजबूत होत होती, तर दुसर्‍या बाजूला काँग्रेसमधील गटबाजी उफाळून येत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचीही तिच परिस्थिती होती; पण शरद पवारांसारख्या अनुभव नेेत्याकडे पक्षाची सूत्रे असल्यामुळे नाराजी गिळून बरेच नेते गप्प होते. पण आता राज्यातील विधानसभा निवडणूक जवळ आली असताना मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून अनेक नेत्यांना मोदी लाटेत आपण सहभागी झालो नाही, तर आपला टिकाव लागणार नाही, असे दिसून लागले. कारण त्यांनी तो अनुभव २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत घेतला होता.

- Advertisement -

पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तो फोडणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याला जमले नव्हते. पण तो बालेकिल्ला नरेंद्र मोदींनी उद्ध्वस्त केला. त्यामुळे तसेच मोदींवर नोटाबंदी, आर्थिक मंदी, ईव्हिएम घोळ अशी कुठलीही टीका केली तरी त्यांची लोकप्रियता कमी होत नाही, असे या नेत्यांना दिसले होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासारखे तडाखेबंद वक्तृत्व असलेल्या नेत्याने मागील लोकसभा निवडणूक प्रचारात ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून मोदी आणि शहा यांच्यावर अक्षरश: आग ओकली. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी झाली; पण जेव्हा प्रत्यक्ष निवडणूक झाली, तेव्हा मतदानाचे निकाल मोदींच्या म्हणजेच भाजपच्या बाजूने लागले. त्यामुळे राज ठाकरेंसह त्यांच्या प्रचाराची मलाई लुटण्यासाठी सज्ज असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही मोठा अपेक्षाभंग झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे आता आपले काही खरे नाही, याची त्यांना जाणीव झाली. इतकेच नव्हे तर बर्‍याच विरोधी पक्षातील नेत्यावरील आरोपांची चौकशी सुरू झाली होती. राज्य सहकारी बँकेतील अनेक संचालक गोत्यात आले आहेत. त्यामुळे सगळ्याच वाटा बंद झाल्या आहेत. ईडीने चौकशी केल्यानंतर ईव्हिएमच्या मुद्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी ज्यांना पुढे करत होती, ते राज ठाकरेही आता शांत झाले आहेत. त्यामुळेच आता मोदींपुढे आपले काही चालणार नाही, हे लक्षात आल्यानंतर आता त्यांच्याच तंबूत जाऊन सगळ्याच बाजूने सुरक्षितता मिळवलेली बरी, असे ठरवून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये शिरू लागले आहेत.

भाजपलाही ते हवेच आहे. कारण भाजपला शिवसेनेशी स्वत:हून युती तोडून मराठी माणसांचा रोष ओढवून घ्यायचा नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना महाराष्ट्रात आपल्या जागा वाढवून बहुमत मिळवायचे आहे. त्यांना केंद्रासारखी स्थिती आणायची आहे. भाजपचे बहुमत असल्यामुळे एनडीएतील मित्रपक्ष असून नसल्यासारखे आहेत. तसेच विधानसभेत भाजपला बहुमत मिळाले तर शिवसेना युतीत असली तरी त्यांचे महत्त्व उरणार नाही. आता मुद्दा इतकाच आहे की, उद्या जे काही निकाल लागतील ते लागतील; पण भाजपच्या तंबूत ज्या मोठ्या संख्येने अन्य पक्षातील नेते घुसले आहेत, त्यामुळे भाजपचा तंबू फाटणार तर नाही ना? कारण भाजपमध्ये आलेल्या बर्‍याच नेत्यांना आपल्या जागा टिकवायच्या आहेत. त्यामुळे तिकिटांची आशा बाळगूनच ते आलेले आहेत. भाजपविषयी प्रेम वाटते म्हणून नव्हे. प्रवेश करणार्‍यांमध्ये तीन राजे आणि अनेक प्रस्थापित नेते आहेत. यांना देवेंद्र फडणवीस कसे सांभाळणार आहेत? कारण ज्या हेतूसाठी ही मंडळी भाजपत आली आहेत तो हेतू साध्य झाला नाही तर ते आपला खरा रंग दाखविल्याशिवाय राहतील असे वाटत नाही.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -